Wednesday, April 1, 2015

गद्धेचाळीशी

"घोडा दहा वर्षांचा झाला तरी लोळतोय बघ" अशा प्रकारे प्रकट दिनाचा उद्धार होणारी माझी पिढी नसली तरी वाढदिवस ही काही साजरा वगैरे करायची घटना आहे किंवा नेमकं सांगायचं तर त्या निमित्ताने पार्टी नामक खर्च ड्यू असलाच पाहिजे हेही आमच्या बाबतीत फारसं झालं नाही. घरी आधी आईने आणि आता मुलांनी औक्षण केलं की त्या दिवसाच्या काय त्या भावना दाटून येतात आणि पुढच्याच क्षणाला लिस्टवरचं काम पुढ्यात येतं. त्यामुळे ते स्वीट सिक्स्टिन, झालचं तर एकविशी, पंचविशी शिवाय तिशी हे सगळे टप्पे  म्हणायचे तर येणार होते त्या त्या वेळी आले. 

तरी देखील माझ्या वयाच्या मैत्रिणींबरोबर बोलताना या वर्षात चाळीशी हा शब्द मधेच येउन जातो आणि मग इतक्यात होणाऱ्या काही बदलांकडे लक्ष जातं. अगदी मागचं दशक म्हटलं तरी वाघ मागे लागल्यासारखी कामं, करीयरचे टप्पे आणि त्या अनुषंगाने येणारं फ्रस्ट्रेशन आणि आनंद दोन्हीचा मोठा भाग होता. यातलं काही कमी झालं तर त्याची उणीव भासणार असं काहीसं. आणि मग मधेच कधीतरी अचानक ही पेस, ही धावाधाव कमी करायला हवी असं आतून कुठेतरी वाटायला लागलं. मी अगदी जुन्या पोस्ट मध्ये काळ्या जीभेचा उल्लेख झालाय तसं काही गोष्टी जुळून आल्या. नॉर्थ वेस्टला आधीच आलो होतो. इस्ट कोस्टपेक्षा इथे तसं निवांत कल्चर. धावपळीची नोकरी, प्रवास डिमांड केल्यामुळे तिला अलविदा आणि मग मध्ये केलेले कॉण्ट्रेक्ट जॉब्ज डिमांडिंग असले तरी त्याला अंत होता आणि मग आता करते ती निवांत म्हणणार नाही पण त्यातल्या त्यात मधल्या पेसवाली नोकरी मागच्या वर्षी साधारण याच वेळेस हातात आली.
आधीची थोडी मोठी पोजीशन सोडून ही घ्यावी का हा निर्णय का माहित नाही पण फार विचार न करता घेऊन टाकला. काय म्हणतात ते ट्राय करूया फार फार तर काय होईल काही महिन्यांनी पुन्हा दुसरी शोधावी लागली तर शोधू असं एकदा मनाशी म्हटल्याचं आठवतं. आता हे लिहिताना ते आठवलं की वयाच्या आधीच्या टप्प्यात ही "होईल ते होईल" वृत्ती नव्हती. काही तरी बदलतंय याची ही बहुतेक पहिली पायरी होती.
मागची काही वर्षे करियर सोडून काही करण्यासाठी वेळ द्यायला मिळाला नव्हता आता तो वेळ निर्माणही केला आणि सगळ्यात पहिले पोहायला शिकायचा वर्ग सुरु केला. पाण्यात पडले आहे आणि पोहण्यातला तरबेजपणा अजून सरावाने येईल पण श्रीगणेशा राहिला होता त्याला मार्गी लावलं. आणि हे फक्त माझ्यासाठीच असं नाही. मुलाला स्केटिंग शिकताना नवऱ्याला आवड आहे हे ओळखून त्यालाही प्रोत्साहन दिलं. म्हटलं तर "छोटी छोटी बातें" पण ही किती मोठा आनंद मिळवून देतात याचा अनुभव घ्यायला मी इतकी वर्षे का थांबले? बहुतेक ती जुनी म्हण,"वेळेपेक्षा आधी काही मिळत नाही", ही अशा प्रकारे खरी होत असावी.
वरचं पोहण्याचं उदाहरण दिलं तश्या छोटी छोटी बातें वाल्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे थोडा वर्क लाइफ़ balance आला आणि स्वतःसाठी diversion theorem मिळालं.
अर्थात याच छोट्या छोट्या आनंदात यायचे ते मिठाचे खडेही येतात. आजकाल पेशन्स आणि बऱ्याच घटनांकडे एकंदरीत सकारात्मक पहायचा चष्मा कुठून मिळाला हे मात्र लक्षात येत नाही. कधी तरी वाटतं ते तसं नसेल कदाचित घटना न पटणाऱ्या असल्या तरी immunity वाढली असावी. यामुळे काही गमती जमती घडतात.
माझ्या बाबतीत म्हणायचं तर माझ्या वयाच्या काही मैत्रिणीपेक्षा माझी मुलं तशी लहान आहे. त्याचा मला फायदा असा आहे की मला घरी लाईट मूडमध्ये राहणं महत्वाचं आहे.  सोबतीला लहान मुलं असल्यामुळे त्यांच्याबरोबर अवखळ वागलं तर गोष्टी सहजपणे होतात. माझ्या अवतीभवतीचा टोन लाईट करणं हे मी बरेचदा पुर्वीही करायचे फक्त आता त्याची वारंवारता वाढली आहे. त्या दिवशी आमच्याकडच्या निवृत्त होणाऱ्या एकाला गुड बाय मेल करतानाचं त्याचं उत्तर फार आवडलं "You brought the much needed fun element to our team" फार फार तर दहा महिने मी त्याच्याबरोबर असेन आणि  त्यानं दिलखुलासपणे असं म्हणणं हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे.  आता practically बोलायचं तर अर्ध आयुष्य जवळ जवळ संपलं आणि आता मला कुणी मी कामात कणखर आहे म्हणण्यापेक्षा तू रोज इथे येतेस हे आम्हाला आवडत आणि तुझ्यामुळे टीमचा असाही फायदा होतो हे म्हणणं मला जास्त आवडलं. कुठल्या मोठ्या पदाला जाऊन खडूस डेमेजर होण्यापेक्षा हे छान नाही का? हा तो सकारात्मक दृष्टीकोण वेळ लागली पण येतोय आणि त्याने मी सुखावतेय.
मध्ये मध्ये स्त्री सुलभ होर्मोन्स आपलं काम करतात आणि मग होणाऱ्या मूड स्विंगचा त्रास माझ्या कुटुंबाला होत असणार. त्यांनी मला समजून घेणं यातून आमची मैत्री रंगतेय. आजवरच्या वाटेवर अनेक मित्र-मैत्रिणी आले आणि गेले आणि तरीही मैत्रीचं हे पर्व मला जास्त भावतंय. कदाचित या वयाची ती गरज असेल. दोन तीन पण मोजकेच लोकं मला खरं ओळखतात. बाकीच्यांनी त्या पातळीवर यायची गरज नाही हे मान्य केले आहे.
हे न संपणारं मनोगत मी आणखी उदाहरणं देऊन (अजून) बोरिंग करू शकते पण मला वाटतं आता जवळचं धूसर व्हायला लागलं तरी दुरचं स्पष्ट दिसतंय. ते आधी पाहिलं नाही याबद्दल पूर्ण समाधान नाही असं नाही म्हणणार पण त्या अज्ञानात नाही याचं समाधान आहे,
मागच्या आठवड्यात ब्लॉगलाही आणखी एक वर्ष पूर्ण झालं आणि ते साजरं केलं, नाही असं नाही फक्त ते ब्लॉगवर व्यक्त केलं नाही. मुलांचे पाचच्या पुढचे वाढदिवस कसे घरगुती साजरे करतात तसं. आजचा माझा वाढदिवस मात्र मी साजरा करतेय. ब्लॉगवर आणि प्रत्यक्षात सुद्धा. जे काही मागचे काही महिने सुरु आहे, जे शब्दात मांडणं कठीण आहे पण माझ्यासारखी कुणी ४० हा एक आकडा आहे म्हटलं तरी तो इतर दशकांपेक्षा वेगळा आहे हे अनुभवत असेल तर तिला मी जे लिहिलं नाही ते नक्की कळेल.
ही पोस्ट त्या हिमनगाचं टोक म्हणूया हवं तर पण इथून पुढे आकड्याचं भय वाटणार नाही. दूरचं नीट दिसतंय त्यामुळे जवळचे प्रश्न छोटे होतील. आताच वसंत आल्यामुळे आमच्या गावातलं धुकं दूर होतंय तसचं माझ्याही डोळ्यावरचं धुकं दूर होतंय. मला माझी मी सापडतेय आणि त्या  पूर्वीपासून असलेल्या पण थोड्या वाढलेल्या अवखळपणाला गद्धेचाळीशी असं गोंडस नाव देऊन मी  माझं हे खास दशक साजरं करण्यासाठी सिद्ध होतेय.
या माझ्या मलाच वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा :)
   

20 comments:

  1. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आणि ब्लॉगच्या वाढदिवसाच्याही शुभेच्छा. इतकं प्रामाणिक लिहिणं सगळ्यांनाच नाही जमत... :)

    ReplyDelete
    Replies
    1. आभार इन्द्रधनू. अगं प्रामाणिक लिहिलं तर नंतर कुठेही आणि कुणालाही स्पष्टीकरण द्यावं लागत नाही असा एकंदरीत अनुभव आहे आणि ही पोस्ट म्हणजे माझा व्यक्तिगत अनुभव आहे त्यामुळे काय लपवणार :)

      Delete
  2. वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा अपर्णा ! सद्ध्या मी पण याच फेज मधून जात असल्याने या सार्‍याशी जास्त चांगली रिलेट करू शकते. परवाच चाळिशीचा नवा दागिना पण आला आणि माझं स्टेटस होतं "चाळिशीचा चष्मा जग वेगळं दावेल काय?" ?"
    तुझी आणि ब्लॉगची ही वाटचाल अशीच चालू राहू दे या सदिच्छांसह!!!!!!

    ReplyDelete
    Replies
    1. "चाळीशीचा चष्मा जग वेगळं दावेल का?" मला विचारशील तर हो :)

      तुलाही खूप शुभेच्छा अनघा आणि आभार

      Delete
  3. Aparna, Vadhadiwasachya khup khup Shubhechchaa! Enjoy your Big Day! :) :)

    Blogchya Birthdaychyahi Shubhechchaa aahetach sobat. :) Post nehmipramanech chaan zaliye. :)

    ReplyDelete
    Replies
    1. श्रीताई बरेच दिवसांनी ब्लॉगवर आलीस. बरं वाटलं. आणि शुभेच्छांसाठी आभार पण पोस्ट आवडली म्हणतेस तर आम्हाला आवडणारी एक पोस्ट कधी टाकतेस? गेलाबाजार खादाडी तरी ;)

      Delete
  4. वाढदिवसाच्या शुभेच्छा. ४० च्या जवळ आलो की आपल्यापेक्षा इतरच आपल्याला ती जाणीव करुन द्यायला लागतात असा माझा अनुभव. मग पुढची दोन वर्ष नकळत आपण बर्‍याच गोष्टींचा ४० शी संबंध जोडत रहातो आणि एके दिवशी ’वयाची ऐशीतैशी’ करुन प्रत्येक दिन साजरा करायला सुरुवात होते. तुझ्यापेक्षा थोडेसे अधिक पावसाळे पाहिले त्यामुळे अनुभवाचे बोल :-)

    ReplyDelete
    Replies
    1. यु आर म्हणिंग राईट मोहना.
      तुझ्या पोस्ट्स वाचून तर आम्ही प्रेरणा घेत असतो (आम्ही म्हणजे तुझ्यापेक्षा कमी पावसाळे पाहिलेल्या जणी)

      खूप खूप आभार गं :)

      Delete
  5. खूप छान, आयुष्याकडे असं निवांत मागे वळून पाहता आलं पाहिजे, आतापर्यंतचे सगळे टप्पे. टप्प्यागणिक वेगळं फुटवर्क जमलं पाहिजे. कुठला बॅकफूटवर बचावात्मक खेळायचा, कुठल्या टप्प्याला चोरटी धाव घ्यायची, कुठला पुढे सरसावून ओढायचा याची एक आपली आपली जाण तयार झाली पाहिजे. सगळे ट्प्पे महत्वाचे, प्रत्येकाचं आपलं असं एक वेगळं सौंदर्य.

    ReplyDelete
    Replies
    1. >>सगळे ट्प्पे महत्वाचे, प्रत्येकाचं आपलं असं एक वेगळं सौंदर्य.
      अगदी बरोबर प्रसाद. खरं मी इतका पण विचार करून ही पोस्ट लिहिली नव्हती पण तू जे सार मांडलं आहेस तेही बरोबर जुळतंय. आभार :)

      Delete
  6. आयला, वाढदिवसाला यायला उशीर झाला.... सगळी येऊन गेली की!
    आणि आता माझी कमेंट <<-:)

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आभार अभिषेक. अरे काही उशीर नाही तुझ्या कमेंटच्या निदान पाचेक तासा नंतर माझ्या नवऱ्याने मागवलेलं सरप्राईज गिफ्ट आलंय. :)

      Delete
    2. अगो तुझा नवरा हुश्शार आहे. त्याने आधी सगळ्यांची सगळी गिफ्टस किमान आठवडाभरात तुझ्यापर्यंत पोहोचतील असा अंदाज बांधला असणार. मग ती सगळी गिफ्ट्स पाहून (त्यातले पुन्हा काही रिपीट व्हायला नको म्हणून) त्याने एक स्पेशल सरप्राईज गिफ्ट ऑर्डर केले असणार ;-)

      Delete
    3. चला म्हणजे घोवाची बाजू घ्यायला कोणीतरी आलं म्हणायचं का? खरं ते सरप्राइज गिफ़्ट आधी काहीतरी गडबडीमुळे उशीरा आलं आणि आलं ते पण नेमकं एक दिवस मी थोडं बरं नव्हतं म्हणून घरी होते तेव्हा आलं. बिचारा नवरा असं तेव्हा मला उगीच वाटलं. एकदा या विषयावर गजालवाडीवर गप्पा झाल्या पाहिजेत ;)

      Delete
  7. "Better (too) late than Absent" ह्या आमच्या कॉलेज जीवनातील उक्तीनुसार गजालवाडीतर्फे वाढदिवसाच्या वाढत्या शुभेच्छा...

    BTW, मुंबई यूनिवर्सिटीचा माजी विद्यार्थी या नात्याने किमान माझ्यासाठी तरी "चाळीस" ह्या आकड्याचे महत्व अनन्य साधारण आणि अपरंपार आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार सिद्धार्थ. अरे इकडे आधीपासून पुढच्या महिन्यात आरुषचा वाढदिवस असतो त्याचं डोकं खाणं सुरु असतं त्यामुळे मला शुभेच्छा कधीही मिळाल्या तरी चालतात. मी स्वत: त्यात वाढदिवस वगैरे लक्षात ठेवण्याच्या बाबतीत विसराळू आहे so anyway.
      अरे हो! मी पण मुंबई विद्यापीठात शिकले त्यामुळे "त्या चाळीस"ची आठवण काढलीस तर एकदम उचकीच लागली बघ मला :)

      Delete
  8. छान शब्दांकन. माझीही चाळिशी आलीच की!

    ReplyDelete
    Replies
    1. आभार मंदार. तुझाही चाळीशीचा काही अनुभव लिहितोयस का?

      Delete
  9. छान लिहिलंयस....पूर्वीच्या काक्वा, मावशांची चाळीशी आणि आपल्या पिढीची चाळीशी यात खूप फ़रक जाणवतो मला...उलट हा टप्पा बर्‍याचजणी नव्हे बहुतेक सगळ्याचजणी (जणही हां)मस्त एंजॉय करताना दिसतात...या वेळेपोवेतो करियरमधे जे काय भारी भारी झेंडे गाडायचे ते गाडून झालेले असतात....ही डिग्री, तो अभ्यास, तमकी परिक्षा असली शुल्ककाष्ठं मागे नसतात, म्हणून मग या टप्प्यावर स्वत:ला द्यायला हवा होता तो वेळ सापडतो.... गडबडी मागे राहिलेले अनेक छंद नव्या उत्साहात सुरू करता येण्याचा हा परफ़ेक्ट टाईम....मुलं फ़ार मोठी नाही आणि गुंतूनच रहावं इतकी लहान नाहीत असा हा अगदी परफ़ेक्ट काळ....वयानं जबादारी समजायला लागलेली असते (बहुतेक ;)) त्यामुळे सुरवातीच्या काळातला हायपर होण्याचा त्रास कमी होतो...सगळ्या सिच्युएशन्स सहजपणानं आणि मुख्य म्हणजे शांत डोक्यानं हाताळता येतात....एकूण चाळीशीचा टप्पा म्हणजे, आयुष्यातला एक मस्त लॉंग विकएंड....

    ReplyDelete
    Replies
    1. मला तुझ्या प्रतिक्रियेमधला विचार आवडला शिनु.
      >>एकूण चाळीशीचा टप्पा म्हणजे, आयुष्यातला एक मस्त लॉंग विकएंड
      थोडक्यात पण मस्त :)

      अवांतर - तुही माझ्या गद्धेचाळीशी ग्रुपची मेंबर होतेयस का ;) आभार्स :)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.