Friday, February 27, 2015

गाणी आणि आठवणी १८- केव्हा कसा येतो वारा

एक निवांत दिवस मिळावा आणि एका मैफिलीला जायचा योग. आपल्या आवडीचा गायक/ गायिका आहे हे इतकचं आपल्याला माहित असतं. बाकी, संगीत आणि गाणी नवीन असली तरी सगळीच टवटवीत आणि मनाला लगेच भावणारी. अशा मैफिलीची सांगता होताना मन भरून येतच पण ते शेवटचं गाणं नंतर कित्येक दिवस पाठपुरावा केल्यासारखं आपल्याला आठवतं. मग फक्त ते एकच गाणं आपण मिळवून ऐकत राहावं. त्या गाण्याचं गारुड आपल्याला शब्दात करता येणार नाही हे माहित असतं तरी त्याबद्दल लिहावंसं वाटतं. तो अनुभव कसा कायमचा जतन करून ठेवण्यासारखा. अर्थात माझ्यासारख्या दोनेक वर्षांनी मायदेशात जाणाऱ्या शिवाय जिथे मराठी (आणि एकंदरीत देशातल्या) गायकांचे कार्यक्रम फारसे होत नाहीत अशा ठिकाणी राहणाऱ्या  व्यक्तीला अशी मैफल अचानक एका अल्बममध्ये मिळते तेव्हा त्याबद्दल लिहिल्याशिवाय खरचं राहवत नाही. 


हा अल्बम आहे "घर नाचले नाचले ". म्हटलं तर यातल्या प्रत्येक गाण्यावर लिहिता येईल कारण त्यांचा बाज वेगवेगळा आणि सगळीच पहिल्यांदी ऐकतानाही लगेच आवडून जाणारी. तशी अवखळ आणि थोड्या उडत्या अंगाने जाणारी ""उंच उंच माझा झोक " किंवा "सांजघडी सातजणी" अशी गाणी ऐकली की मग पद्मजाताई तिच्या त्या अलवार गोड आवाजात सूर लावते 

केव्हा कसा येतो वारा जातो अंगाला वेढुन 
अंग उरते न अंग जाते अत्तर होऊन 
खाली सुगंधीत तळे, उडी घेतात चांदण्या 
फ़ैलावल्या सुवासात कशा डुंबती चिमण्या 

गाण्याच्या सुरावटीतला सुरुवातीचा वाऱ्याचा आवाज सुरु होतो आणि माझ्या नकळत मी बाराएक वर्षे मागे जाते. आमच्या डिप्लोमाच्या सुट्ट्या तशा अवेळी म्हणजे जूनला सुरु होत आणि त्या वर्षी आम्हा सहाजणींचं देवगडला जायचं ठरलं, एका मैत्रिणीच्या मामाकडे. तिथे एका संध्याकाळी सड्यावर बसले असताना दुसऱ्या बाजूला म्हणजे कड्यावर समोर पसरलेला अरबी समुद्र आणि अशीच वाऱ्याची गाज. समुद्र नुसता ऐकायला किती छान वाटतो न? मागच्या वर्षी pacific मधून केलेल्या प्रवासात एका रात्री अशीच गाज जहाजाच्या बाल्कनीत बसून नुसती ऐकत होते तेव्हाची अवस्थाही अशीच संदिग्ध. हा समुद्र मला नेहमीपेक्षा जास्त विचारही करायला लावतो आणि एकाच वेळी शांतही करतो. 

तर आत्ता हे लिहिताना, ऐकताना अशीच मी पोहोचतेय सड्यावर आणि मग तो  वारा त्याबरोबर पाऊस घेऊन येतोय. समोर पसरलेल्या अरबी समुद्रावरून पाऊस, कड्यावरून सड्यावर येतो ते प्रत्यक्ष पहायची माझी तशी पहिलीच वेळ. ती सर आपल्याला "पळ" म्हण सांगायच्या ऐवजी तिथेच कड्यावर खिळवून ठेवते. समुद्राच्या गाजेचा आणि पावसाचा असा मिळून एक वेगळा आवाज ऐकत आपण नक्की कुठे आहोत हे आपल्याला कळत नाही किंवा नाही कळलं तरी काही फरक पडत नाही हा असा तो क्षण पुन्हा जगता येत नाही. अर्थात असं तेव्हा वाटलं पण आता कानावर पडणारे सूर तशीच वातावरणनिर्मिती करू पाहतात आणि लगेच पुढच्या "केव्हा कसा"ला तबल्याचा ठेक्याला आपण चटकन मान डोलावतो.   

म्हटलं तर  चारच ओळींची कविता आणि म्हटलं तर साडेचार मिनिटांचा सुरेल प्रवास. आपल्याला आपल्याच आठवणींमध्ये नेणारा. पहिल्यांदी तो पाऊस पहिला तेव्हा मी पळालेच नाही. त्या "फ़ैलावल्या सुवासात कशा डुंबती चिमण्या" प्रमाणे तो मृद्गंध जणू काही पहिल्यांदीच अनुभवतेय अशी स्तब्ध बसूनच राहिले. पुढे काय झालं आता मला आठवत नाही. कदाचित त्या मामींनी मुंबैकरणी आपल्या घरी आल्यात या काळजीने मला बोलवून घरात बसवलं असेल. गेली कित्येक वर्षे मी हा अनुभव जवळ जवळ विसरलेच होते पण या गाण्याने शेवटी हा माझा अत्तराचा फाया मलाच आणून दिला. आणि या गाण्याच्या सुरुवातीलाच प्रशांत दामलेंनी  म्हटल्याप्रमाणे  आपण इतरांना तो सुगंध वाटत राहतो, असं माझं झालय. 



नुसतं कवितावाचन करून त्याचा आनंद घेता येतो हे मान्य केलं तरी माझ्यासारख्या सर्वसामान्य रसिकांना बरेचदा काव्यांच्या प्रेमात पडताना त्यांची गाणी होणं का महत्वाचं आहे हे मत तसं दुय्यम. त्यामुळे इथे जसे गुण इकडे इंदिरा संतांच्या सुंदर रचनेला तितकेच ते गिरीश जोशी यांच्या संगीताला आणि हे संगीत थेट आपल्याला आपल्याच आठवणीत घेऊन जाणाऱ्या पद्मजा ताईला. यातला प्रत्येक सूर इतका जपून लावलाय की त्याच्या शब्दांना थोडही उणं अधिक व्हायला नको. ती हे इतक्या तरलपणे गात असते की इथे आता कुणीतरी एक चित्र काढतंय आणि आपण त्याचा  भाग होतोय अशी काही कल्पना मनात तयार व्ह्यायला लागते. अगदी पहिल्यांदी हे गाणं ऐकताना जसं मला एखाद्या चित्राचा भास झाला होता तसच चित्र जेव्हाही मी हे गाणं ऐकते तेव्हा पुन्हा या सुंदर सुरावटींवर रेलून नकळत एक चित्र मी रेखाटायला लागते. माझ्यासाठी हे चित्र योग्य शब्दात आणि पूर्णपणे मांडता आलं का माहित नाही पण ही पोस्ट जर मी लिहिली नाही तर मात्र हे मी कुठेच व्यक्त केलं नाही याची तीट त्या अव्यक्त चित्राला लागेल. 

6 comments:

  1. Aparna - your blog and especially this Gani ani Aathavani has got coverage in Loksatta - Viva last Friday. Have you checked it ? Congratulations!!!

    ReplyDelete
    Replies
    1. अनघा आभार.:)

      हो लोकसत्ताचा लेख आणखी काही ब्लॉगवाचक मित्रमंडळींनी देखील आठवणीने पाठवला. गंमत म्हणजे बरेच दिवस या गाण्यावर लिहायला घेतलं होतं आणि शेवटी या मराठी राजभाषा दिनी पूर्ण करून पोस्ट करते आणि नेमकं गाणी आणि आठवणी याचं कौतुक लोकसत्ताने करावं हा एक योगायोगच.
      इकडे बाजूला ब्लॉगकौतुकाच्या काही लिंक्स टाकल्या आहेत आता त्यात ही पण घातली आहे आणि माझ्या ब्लॉगच्या फेसबुक पानावर ती बातमी शेयर केली आहे.

      तू खास आठवण काढून प्रतिक्रिया दिल्याबद्दल अनेक आभार. तुला या पोस्ट मधलं गाणं आवडलं का?

      Delete
  2. अरबी समुद्रावरुन कड़यावरुन सड्यावर येणारा पाऊस.... भन्नाट एकदम... फुल्ल टू Nostalgic

    आणि हो लोकसत्तामध्ये झळकल्याबद्दल अभिनंदन...

    ReplyDelete
  3. अपर्णा … ताई म्हणाले तर चालेल ? हरवून गेले तुझ्या शब्दांत आणि मग नकळत पद्मजाताईंच्या गाण्यात … तेही न ऐकताच! खूपच सुंदर लिहिलं आहेस … मैफिलीत एखाद्या गाण्यात आपण इतकं गुंगून गेलेलो असतो की गाणं संपल्यावर साधं टाळ्या वाजवायचं भानही आपल्याला राहत नाही … तसंच काहीसं झालं माझं हे वाचल्यावर … too good !!!

    -निकिता

    ReplyDelete
    Replies
    1. आभार निकिता. तू मला अपर्णाच म्हण. नात्यातले गोते नकोत :)
      हे गाणं तसंही ऐकल्यावर टाळ्या वाजवायला लक्षात राहात नाहीच. तू आता हे गाणं पण ऐक किंवा खर संपुर्ण अल्बम ऐक. तुला मुंबईत सीडीदेखील सहज मिळून जाईल नाहीतर यु ट्युब. तुला गाणी आवडत असतील तर या ब्लॉगवरचा गाणी आणि आठवणी tag आहे तो नक्की वाच.

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.