Wednesday, November 14, 2012

गानसंस्कार


आमच्या घरात सकाळी साडे पाचला आई-बाबा उठत आणि साधारण सहाच्या आसपास रेडिओ सुरू होई.सकाळी आठेक वाजेपर्यंत म्हणजे ती राजाभाऊंची श्रुतिका होईपर्यंत मराठी आणि मग हिंदीची बारी.नंतर मग संध्याकाळी पुन्हा ’सांजधारा’ आणि त्यानंतर ’फ़ौजी भाईको की फ़र्माईश’ ते मग रात्रीचं बेला के फ़ूल’ पर्यंत काही न काही वाजत असे...त्यामुळे अगदी लहानपणापासून गाणी कानांवर पडत राहिली.आजही बरीचशी गाणी त्याबद्दलची बाकी माहिती आठवत नसली तरी चाल आणि शब्द अशी आपसूक लक्षात आहेत.....

गाण्यांचं कसं काम करताना ऐकली तरी कामात खंड पडत नाही.आपला हात एक आणि कान एक (आणि मेंदु बहुधा तिसरंच काही) करायला तरबेज होतात.मल्टीटास्कींग म्हणावं का याला? काय म्हणायचं ते असू दे पण बरं बरोबर जमतं, नाही का?? माझं गुणगुणंणं काही वेळा अविरत सुरू असतं...अगदी एखादा कॉन्फ़रंस कॉल म्युट करुन ऐकतानाही एखादी लकेर चुकारपणे येऊन जाते आणि मिटिंगची मरगळ आपसूक जाते...न कळता आम्हा भावंडांवर हा गानसंस्कार करणार्‍या माझ्या आई-बाबांचं मला त्यासाठी खूप कौतुक वाटतं...

मागे एकदा आरुष बराच आजारी होता. त्याच्यासाठी आम्ही दोघं आलटून पालटून सुट्ट्या काढत होतो त्यावेळी त्याला सारखं जवळ घेऊन बसावं लागे. मग बाजुलाच एक प्ले लिस्ट लावून ठेवायचे. तो शांतपणे पहुडला असे आणि मी माझं फ़्रस्टेशन गाण्यामुळे तरी विसरायचा प्रयत्न करायचे. या नादात एक झालं, तो बरा झाल्यावर एके रात्री मला झोपवताना त्या प्ले लिस्टमधल्या काही गाण्यांच्या त्याने फ़र्माईशी केल्या. त्यातलं एक तर चक्क हिंदुस्थानी क्लासिकल, आरतीताईंचं "जा रे जा रे संदेसा"...म्हणजे त्याला न येणार्‍या हिंदी भाषेतलं...मी तर उडालेच..

मग मलाच एक छंद लागला. रोज मी गाडीतून सकाळी मुलांना सोडते त्यावेळात एक गाणं लावायचं आणि आठवडाभर तेच एक गाणं सकाळी वाजवायचं. यात शक्यतो मराठी गाणी मी लावते. कारण मराठी भाषा मुलांना कळते म्हणजे गाण्याचे शब्दही ते ऐकतात. हिंदी गाणी आम्ही फ़िरायला वगैरे जातो तेव्हा असतात त्यावेळी आजकाल मुलं चक्क गोंधळ घालतात म्हणजे कॉलेजमध्ये एखादा विषय पोरांच्या पूर्ण डोक्यावरून जायला लागला की त्यांनी मोठमोठ्याने गप्पाबिप्पा मारायला सुरूवात करावी तसं. इतर वेळी घरी मूड असेल तेव्हा यु ट्युबवरची त्याच्या लहानपणी लावायचो ती बालगीतं पण लावायची म्हणजे अगदीच पुढचं पाठ नको...बालगीतं तर काय असंही मुलं ऐकतात. पण सारखं एखादं गाणं ऐकलं की ते गाणंही त्यांना आवडलं की ते ऐकत राहतात...आणि थोडी शांतही बसतात.अर्थात हे काही औषधाच्या मात्रेसारखं गाण्यांची मात्रा वगैरे नाही पण जोवर लक्षात आहे तोवर आपले शब्द, भाषा आणि अर्थात संगीत परीचयासारखं होऊ शकतं. 

मध्येच मी कामासाठी आठवडाभर बाहेर गेले आणि परत आले तर बाबाच्या राज्यात त्यानी "ढिंग चिका" पण शिकुन ठेवलंय...बाबाने "ढिंग चिका" म्हटलं की "हे हे हे" करतानाचा जोश थोडा वेगळाच. थोडक्यात कानावर पडलेलं लक्षात राहायचं वय आता सुरू झालंय. मग त्यात ते कसंही का असेना....:)

सर्वात जास्त मला आवडलं ते मागे मी जी श्रीधरजींची कार्यशाळा केली त्यातलं एका गाण्यातलं वाक्य आरुषला गुणगुणताना ऐकते तेव्हा...त्यांनी आम्हाला शिकवलं होतं की "उन्हात्त पान मनात्त गान" यात त वर जोर आहे..(म्हणून मी ते त ला त जोडून "त्त" लिहिलंय)...आणि छोट्या आरुषचं "उनात्त पान" ऐकताना इतकी गम्मत वाटते की असं ऐकून ऐकून एकेका गाण्याची ओळख करून द्यायचं तंत्र मलाच आवडलंय..

ऋषांकसाठी तर गाण्यांनी मलाच आधार दिलाय कारण तो लहान होता तेव्हा मला एकटीनेच पहिले तीन महिने काढायचे होते. मग मी "रंग बावरा श्रावण"ची सिडी कायम आमच्या बुम बॉक्समध्ये घालून ठेवली होती..त्याच्या झोपायच्या वेळी त्याला पाळण्यात घातलं की मी ती सिडी लावून चक्क स्वयंपाकघरात काम करत बसे..."बाळ उतरे अंगणी"ने सुरू केलेली सिडी साधारण तिसर्‍या गाण्याला माझा बाळ निवांत झोपलेला असे....सीडी संपली की काहीवेळा मी ती पुन्हाही लावे. त्यावेळी ही आरुष कधीकधी मध्येच मोठ्याने "आला किनाला" म्हणत असे. 

मागच्या वर्षी आई-बाबा आल्यावर दिवसा ते दोघा मुलांसाठी गाणी म्हणत आणि काहीवेळा रात्री ऋषांकसाठी एकदा सिडी असं आमचं रूटीन होतं.. त्यानंतर जरा चळवळ्या झाल्यावर त्याने त्या बुम बॉक्सचा डब्बा गुल केला, पण आम्ही ही गाणी आमच्या आय पॅड, आय पॉड वगैरे समस्त ठिकाणी सुखरूप ठेवलीयत..त्यादिवशी एका रिसॉर्टमध्ये साहेब रात्री (की पहाटे) दोनला उठून पुन्हा झोपायलाच तयार नाहीत तेव्हा मी आय पॅडवर तीच गाणी सुरू केली आणि माझा गुणी बाळ थोड्या वेळाने झोपला..

तो झोपताना किती त्रास देतो याचं परीमाण पण लहानपणी गाण्यावर असायचं. म्हणजे तिसर्‍या गाण्याला झोपला तर चांगला..अख्खी सिडी संपून पुन्हा लावायला लागली की मग बाहेर येऊन तसा रिपोर्ट असं आमचं सुरू असतं..या पार्श्वभूमीवर तो बोलायला लागला की त्याला हे गाणं नक्की माहीत आहे का हे जाणून घ्यायची माझी केव्हाची इच्छा होती. मग एके दिवशी झोपायला नेताना मी सहज त्याला विचारून पाहिल,"ऋषांक, आता आपण कुठली गाणी लावायची??" आणि त्याने चक्क त्याच्या बोब्ल्या बोलात "बा..." असं सांगून झोपण्याची अ‍ॅक्टिंग पण करून दाखवली...मला त्यावेळी इतकं सही वाटलं की पुढच्या वेळी पद्द्मजाताई भेटल्या की त्यांचा आवाज जर त्याने ओळखला तरी मला नवल वाटणार नाही..

आता लवकरच ऋषांक दोन वर्षांचा होईल. त्यामुळे त्याचे बोबडे बोल ऐकायला मजा येतेच आहे पण त्यात जर त्याने अशा प्रकारे सारखं ऐकलेल्या गाण्याची ओळख दाखवली की मस्तच वाटतं. सारखं सारखं ऐकून आरूषने एकदा "हे गगनाआआआ" असा सूर लावला त्यातला "हे"चा थोडा अमेरिकन "हेय..."सारखा उच्चार ऐकून हसायला येत होतं तर त्यापुढल्या वाक्यातल्या "सर्व कहाणी?"चं उत्तर ऋषांकने "थावी(ठावी)" असं दिल्यामुळे माझी चांगलीच करमणूक झाली. मी आरुषच्या वेळेस एक घरगुती गाणं बनवलं होतं म्हणजे कुठल्याही प्राण्यांचं किंवा पक्ष्याचं नाव घ्यायचं आणि गाण्यातच हा काय करतो? असा प्रश्न विचारुन तो झोपतो असं म्हणायचं. बेसिकली मुलं काहीवेळा झोपायचं सोडून गाणी आणि गोष्टी ऐकत बसतात त्यावर हा माझा घरगुती उतारा होता. तर कधी कधी ऋषांकला म्हटलं की "मला झोपव", की तो मग त्याच्या बोबड्या बोलात "चिव चिव चिमणी काय कत्ते, काय कत्ते? चिव चिव चिमणी झोपते" असं बोलतो ते ऐकायला खरंच फ़ार गोड वाटतं आणि त्यात मग त्याला आवडणार्‍या इतर प्राण्यांचे अ‍ॅडिशन्सही येतात फ़क्त त्या सगळ्यांचे आवाज आ आ असतात म्हणजे आ आ पिगी काय कत्तो, आ आ नायनो (डायनो) इ.इ. 

आतापुरता सांगायचं तर ही मुलं इंग्रजी माध्यमात शिकतील, मोठी होतील..मातृभाषा म्हणून मराठी तर त्यांना यायलाच हवी. अर्थात कलेच्या म्हणजे पुस्तकं, नाटकं, गाणी याच्या अनुषंगाने मराठीची गोडी मी कितपत लावू शकेन माहित नाही. पण अशा गाण्याच्या निमित्ताने त्यांना काही चांगले शब्द,गाणी लक्षात राहिली तर ते मला हवंच आहे. आणि थोडंफ़ार गुणगुणूही शकले तर सोन्याहून पिवळं नाही का? 

फ़ार पुढचा विचार नाही पण त्यांच्या आत्ताच्या वयापासून वेगवेगळी गाणी ऐकवणे हे मात्र मी करत राहणार आहे...त्याचं एक कारण मलाही गाणी ऐकत राहायची असतात आणि दुसरं अर्थातच न कळत मुलांवर होणारे गान संस्कार...जसे माझ्या लहानपणी माझ्या आई-बाबांनी नकळत आमच्यावरही केलेत....

आजच्या बालदिनाच्या निमित्ताने माझ्या ब्लॉगवाचकांच्या अवतीभवती असणार्‍या मुलांना शुभेच्छा देता देता त्यांच्याकडूनही या विषयावरच्या आणखी काही टिपा/अनुभव ऐकायला नक्की आवडतील. आपण आपल्या मुलांना लहानपणापासून गाणी ऐकायला शिकवता का? 

20 comments:

  1. झक्कास लिहिलंयस.. आमच्याकडे सध्या सायकाकाच्या गंगनम स्टाईलचा महा धुडगूस चालू आहे. तरीही मी अधून मधून 'एकटी एकटी घाबरलीस ना' किंवा 'करून करून काळजी माझी' वगैरे लावण्याचा क्षीण प्रयत्न करत असतो. पण सध्या बाबापेक्षा सायकाकाचं पारडं जड आहे :)

    ReplyDelete
    Replies
    1. सायकाका कोण रे हेरंब..आमच्याकडे अजून आला नाहीये का हा? तू एकदम "एकटी एकटी घाबरलीस ना" असं म्हटल्यामुळे सायकाकाचं प्यादं जास्त पुढे जातंय का? कदाचीत आदि घाबरायचं म्हणजे रे काय बाबा अशा विचारात आहे....
      बाकी गंगनम (की गॅंगनम??) माझ्याही आयुक्षात आलं नाही आहे...हे हे हे..

      आभार्स रे....:)

      Delete
    2. आभार्स भावा..एका दिवाळी गेट टुगेदरला याची झलक मिळाली...तेव्हा तुझ्या कमेंटची आठवण झाली. :)

      Delete
  2. छान आहेत गानसंस्कार!

    ReplyDelete
    Replies
    1. आभार अभिषेक आणि ब्लॉगवर स्वागत.
      तुला या पोस्टचा (आता किंवा नजिकच्या काळात) नक्की फ़ायदा होईल अशी आशा :)

      Delete
  3. मस्त !

    नायनो (डायनो) खास ! :)

    मला एकदम पुलंच्या अमेरिकेत बीएमेम च्या वेळस केलेल्या भाषणाची आठवण झाली.. भावार्थ असा होता की : "मुलांना पाच पन्नास मराठी गाणी शिकवा. मग परदेशात राहताना मराठी भाषेची आणि संस्कृतीची चिंता करण्याचे (पालकांना) काही कारणच नाही. कारण ती गाणी मुलांबरोबर आयुष्यभर राहतील."

    तेव्हा तुझे गानसंस्कार अगदी योग्यच !

    ReplyDelete
    Replies
    1. राफ़ा तुझ्याकडून हे आलं आणखी काय? ते भाषण माझ्याकडेही आहे आणि त्यात खरं म्हणजे परदेशातल्या देशी पालकांसाठीचे बरेच संस्कार आहेत, नाही का?

      बॅक टू डायनो.. ऋषांकला प्राणी इतके आवडतात की त्याच्या गाण्यात डायनोपासून बग आणि उंदिलमामांपर्यंत सर्वांची हजेरी लावल्याशिवाय त्याला झोपच येत नाही..कधीकधी या नेव्हरएंडिंग गाण्यात माझीच विकेट गेलेली असते.
      आवर्जून लिहिल्याबद्दल आभार्स. :)

      Delete
  4. गानसंस्कार छान झालेय !

    आपल्या लहानपणी आकाशवाणीवर अखंड गाणी, मालिका, बातम्या, नाटुकल्या... सुरुच असायचे... आणि रेडिओ सतत ऑन असल्यामुळे दिवसरात्र कानावर पडायचे. ते इतके पक्के स्मरणात कोरले गेलेय. तशीच आई म्हणत असलेली सगळी स्तोत्रे, रामरक्षा ! तुझा मुलांना मायबोली त्यांच्या नकळत शिकवण्याचा प्रयत्न पर्फेक्ट !

    बाकी सुरवातीला दोन गाण्यात पडणारी झोपेची विकेट हळूहळू संपूर्ण सीडी संपली तरी पडतच नाही... हे अव्याहत सुरूच आहे. ;D:D

    ReplyDelete
    Replies
    1. श्रीताई, तुझे अनुभवाचे बोल आहेत. सो तुला वेगळं काय सांगणार?
      मला अजून त्यांना स्तोत्रं इ. सुद्धा शिकवायला हवंय़ पण कदाचीत माझंच पक्कं करावं लागेल आधी...सध्या इकडे सदा सर्वदा मध्ये "उपेक्षु नकोस" अशी धमकी दिली जातेय देवबाप्पाला ;)

      Delete
  5. Mulancha honara he vaichaarik pollution thambavna garjecha ahe. Nahitar mag marathi lavkarach lupt hoil. I hate when marathi kids speak in english or hindi or whatever. I hate it.

    ReplyDelete
    Replies
    1. एजे, आभार. मराठी लुप्त होणार नाही पण तिचं मराठीपण मात्र कमी होतंय हे साधारण मला जाणवतंय. त्यादिवशी कुठच्या तरी मराठी कार्यक्रमामध्ये, बक्षिस घ्यायला येणार्‍या नवोदित कलावंतांचा ड्रेस सेन्स आणि त्यांचं जड आणि इंग्रजीमिश्रित मराठी पाहून ही मंडळी मराठी कलाकार म्हणून मिरवताहेत पाहून खरं तर दुःखच जास्त होत होतं....आणि जर हे कार्यक्रम आजची पिढी पाहत असेल तर नकळत त्यांच्यावर होणार्‍या संस्कारातून एक वेगळीच धेडगुजरी मराठी लवकरच निदान मोठ्या शहरात तरी रूळणार असं दिसंतय....

      Delete
  6. भानस ह्यांच्या प्रत्येक शब्दाशी सहमत

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर निनाद आणि तिचा अनुभव आपल्यापेक्षा जास्त आहे नाही का त्यामुळे हे खरं तर ती जास्त चांगलं समजावू शकते :)
      आभार.

      Delete
  7. काय योगायोग आहे गो. आमच्याकडे पण सकाळी नळपाणी, बाग शिंपणे आणि मग सगळे आटोपून देवपूजा ई.ई. कामांमुळे नातवाला वेळ द्यायला मिळत नाही, त्याच्याशी व्यवस्थित बसून बोलता येत नाही म्हणून बाबांनी नवा रेडिओ घेतला आहे. सगळी कामे होईपर्यंत नातू मस्तपैकी आकाशवाणीवर बातम्या आणि गाणी ऐकत असतो. त्याला ही एकटे वाटत नाही. अधूनमधून वेळ मिळेल तसा आज्जी, आजोबा, आई येऊन त्याच्याशी गप्पा मारतात. FM ची चॅनेल्स आमच्याकडे अजुन लागत नाहीत हे एक बरे आहे त्यामुळे धांगडधिंगा नाही. मला पण ही आयडिया जाम आवडली. दिवाळीच्या सुट्टीत माझ्यावर पण काही गानसंस्कार झालेत आणि रेडिओच्या जुन्या आठवणींनना उजाळा देखील मिळाला. :D

    ReplyDelete
    Replies
    1. मस्त आयडिया सिद्धार्थ....आणि बघ तो जेव्हा बोबडं बोलायला लागेल तेव्हा त्यातलं काहीतरी वाक्य, शब्द किंवा गाणं म्हणेल आणि आपण हे याला कधी शिकवलं असं तुम्हाला वाटेल.
      आता तुझ्यावर झालेल्या गानसंस्कारांवर कधी लिहिणार आहेस ;)

      Delete
  8. गानसंस्कार यथार्थच आहेत. मराठी गाणी लावली की आम्ही मुलांना अर्थ समजला का हे ही विचारतो कारण नेहमीच्या वापरातले शब्द आणि गाण्यातले, खूपवेळा वेगळे असतात. मी मुलगा पाच वर्षाचा झाल्यापासून सकाळी त्याला एका मराठी वाक्याची चिठ्ठी लिहून ठेवायची. ती तो मन लावून वाचायचा. चिठ्ठीसुद्धा विनोदी असली की मुलांना आवडते, जेव्हा तो मराठी लिहायला शिकला तेव्हा त्याचं मराठी उत्तर एखाद्या विनोदी शब्दातच असायचं.

    ReplyDelete
    Replies
    1. मस्त मोहना.
      माझा मुलगा अजून एकुणातच स्वतःच स्वतः वाचू शकत नाही पण जेव्हा तो वाचायला सुरूवात करेल तेव्हा ही चिट्ठीची पद्धत मी जरूर वापरेन. सध्या आमच्याकडे चित्रांच्या चिट्ठ्यांची देवाणघेवाण कधीतरी असते. त्यातल्या चित्रांना ओळखायचा भन्नाट गेम :)

      Delete
  9. संगिताला भाषा नसते. कानावर पडेल ते आपोआप तोंडातून बाहेर पडतं!

    ReplyDelete
    Replies
    1. तेही खरंय म्हणा...सध्यातरी आमच्याकडे जेव्हा दंगा हिंदीला होतो त्यामानाने मराठी जरा भक्तिभावाने ऐकतात तरी. :)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.