Wednesday, June 27, 2012

सोबत


घरून काम करायचे असंख्य तोटे असतात असं मी म्हटलं तर कदाचीत प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन काम करणारा वर्ग दोन्ही भुवया वर करून माझ्याकडे पाहिल...पहिले फ़ायदेच पाहायचे तर एक प्रवास करावा लागत नाही एवढं एकंच दिसतंय मला आणि काम हे काम असतं घरी काय, ऑफ़िसमध्ये काय ते करावंच लागतं, म्हणजे इथे एकमत असेल तर उरले ते बरेचसे तोटे.....

मला ज्यांच्याबरोबर काम करते त्यांची तोंडं दिसत नसतात, पर्यायाने एक कलिग म्हणून त्यांची कामाच्या वेळेत मिळणारी सोबत नसते..कधीतरी एकत्र कॉफ़ी पिणे, एखाद्या करंट अफ़ेअर्सवर चर्चा,एकत्र जेवणं किंवा झालंच तर नवे कपडे/दागिने अमक्या तमक्याचं  कौतुक हे सगळं मी माझ्या कामात मागची काही वर्षे अनुभवणं जवळ जवळ विरळाच...यातून येणारा एक वेगळा एकटेपणा असतो..प्रचंड कामात असलं तरी तो तुमच्यासोबत कायम असतो....अशा एकांतात मग सोबतीला येते ती आमच्याकडे महिन्यातून एकदा घरातली सफ़ाई करण्यासाठी येणारी "किरा"...

तिचा आमचा संबंध किंवा माझा नव्हताच खरं तर, तो आला होता ऋषांकच्या वेळेस मी दवाखान्यात असताना. त्याआधी एक नेहमीची येणारी "जिना" आमच्या घरापासूनच्या लांबच्या गावात राहायला गेली त्यामुळे जी काही पाच-सहा महिने ती यायची त्यानंतर आता काही जमायचं नाही हे तिनं आम्हाला सांगायला आणि बाळाचं आगमन साधारण एकत्रच झालं होतं. मग आम्ही पुन्हा एकदा मायाजालावरून एक बाई शोधली. ती यायच्या वेळेस मी म्हटलं तसं घरात नव्हते त्यामुळे आता जी कुणी येणार ती नवर्‍याला चांगलाच चुना लावून जाणार असं मी तरी गृहीत धरुन होते..अर्थात "बेबी ब्लु" या नावाखाली त्या हिवाळ्यात बरंच काही होत होतं त्यापुढे हे फ़्रस्ट्रेशन काहीच नसणार असं मी उगाच स्वतःला सांगत बाळाला घेऊन घरात आले....आणि स्पॉटलेस घर बघून नवर्‍याला लगेच पसंतीची पावती दिली....त्यानेही हुश केलं असणार..पण तरी नंतर लगेच काही मला कुणाला घरात बोलावून सफ़ाई करवून घ्यायला बाकीच्या कामांमुळे जमत नव्हतं...पण त्यानंतर लगेच दोनेक महिन्यांनी आई येणार होती त्यामुळे तिला निदान आल्याआल्या सगळा पसारा नको म्हणून लगोलग किराला पुन्हा बोलावले गेले...

यावेळी ती यायच्या एक दिवस आधी मला नवरा म्हणाला,
"अगं तुला सांगायला विसरलो तिला बोलता येत नाही"
"क्का....य?? मग तू तिला कॉंटॅक्ट कसा केलास?"
"ती मागच्या वेळी फ़ोन नं देऊन गेली आणि मी तिला फ़ोन करेन असं हाताने सांगत होतो. ती एकदम मला थांवबून म्हणाली, "टेक्स्ट टेक्स्ट"....टेक टेक टेक टेक्नॉलॉजी बेब्स..."

ओह, काय हा असा?? सांगायला नको का आधी? पण खरं तर आपल्याला हवं ते काम नीट करते याखेरीज बाकीच्या गोष्टींशी आपल्याला काय करायचंय हा त्यांचा शांत अ‍ॅट्यिट्युड मला आवडला...तरी तेव्हा बाळ लहान होतं म्हणून तोही घरात थांबून त्यावेळचं कामसत्र आटपलं..तिने कामाच्या गडबडीतही बेबी छान आहे म्हणून मला हातवारे करून सांगितलं....

त्यानंतर आम्ही घर बदललं. त्यामुळे ते बदलायच्या आधी आणि नंतर असं दोनेक महिने आम्हाला तशी तिची गरज पडली नाही..मग पुन्हा आमची गाडी रूळावर आली..प्रत्येक महिन्याला पसारा करा आणि तिला बोलावून घर साफ़ करून घ्या....

ती पहिल्यांदी आमच्याकडे एका एजन्सीतर्फ़े आली आणि मग तिने त्यांच्यातर्फ़े नको असेल तर काही डिस्काउंट देऊन आमच्याकडे तिच्या सर्विसेसचं (न बोलता) मार्केटिंग केलं...मला काम करायचा तिचा हा गूण अतिशय आवडतो. म्हणजे एकदा मी तिला म्हटलं की प्रत्येक महिन्याला येशील का? प्रत्येकवेळी सगळं करायला नको. एक आड एक गोष्टी करू म्हणजे कधी दोन्ही बाथरूम्स, तर कधी फ़्रीजचं डिप क्लिनिंग आणि असंच काही....मग तिला आमचं तिचे ग्राहक म्हणून पोटेंशियल लक्षात आलं आणि तिने स्वतः आम्हाला महिना झाला की एक रिमांईडर टेक्स्ट करायला सुरूवात केली...आहे की नाही टेक टेक टेक टेक्नॉलॉजी???
या घरात नवीन असताना इथे सफ़ाई करायचं एक रूटीन आम्ही दोघींनी सेट केलंय त्यामुळे आजकाल फ़ारसं सांगावंही लागत नाही.  ती आली की मस्त हसून मला हाय करते आणि पहिले आपला ब्लॅकबेरी पहिले चार्जिंगला लावते. मी मनातल्या मनात उगीच हसते....कारण खरं तर स्मार्ट फ़ोन वापरायला मीही आजकाल सुरूवात केलीय....

नंतर सुरू होतो आमचा थोडं लिहून, थोडं खुणांच्या भाषेचा संवाद...त्यात बर्‍याच गोष्टी असतात...काही कामाच्या तर काही अशाच....तेव्हा सुचलं म्हणून केलेल्या...सगळं लिहून....
मागच्या वेळी मी केस कापले होते त्यावेळी दरवाजा उघडल्याउघडल्या तिने केस फ़ारच छान आहेत म्हणून  स्वतःच्या केसांकडे बोट दाखवून दोन्ही हाताने छान म्हटलं आणि माझी कळी खुलली..एकदा आमचा दिवस ठरला असताना अचानक तिचा मुलगा आजारी पडल्यामुळे येऊ शकणार नाही असं तिने कळवलं मग मी तिला उलट टपाली जेव्हा जमेल तो दिवस कळव म्हटलं आणि मग आल्यावर पहिले मी तिच्या मुलाची चौकशी केली. तिलाही ते आवडलं...मग आम्ही असंच एकमेकांची मुलं आता अ‍ॅलर्जी सिझन असल्यामुळे कशी आजारी पडताहेत त्याबद्दल बोललो..मग मुलांचे आजार स्वतःलाही होतात याबद्दलही थोडा उहापोह झाला...

यावेळी फ़्रीजवर माझ्या फ़िजिओथेरपीने दिलेल्या व्यायामांचे प्रिंट आउट्स आहेत म्हणून मग तिने माझ्या कंबरदुखीचीही चौकशी केली...

तिला नक्की का बोलता येत नाही हे काही मी तिला विचारणार नाही, पण आता एक दोन अनुभवांमुळे साधारण वाटतंय की तिला ऐकु येत नसावं. तरी तिला इंग्रजी भाषा येते हे मात्र  चांगलं आहे. म्हणजे काही शब्द तोंडाच्या हालचालीनेही तिला कळतात आणि हालचालीनेच बोलता येतात. पण आवाज मात्र नाही. वाईटही वाटतं..कधी कधी तल्लीन होऊन किचन साफ़ करताना आधी डायनिंग एरियामध्ये केलेला व्हॅक्युम तसाच सुरू असतो. माझ्या कामाच्या तंद्रीत मलाही ते लक्षात येत नाही आणि मग इतर वेळी तशा आवाजाची सवय नसल्याने काय वाजतंय म्हणून उठून मी तिला पाहते आणि काहीच न बोलता तो व्हॅक्युम बंद करून टाकते...तिला ते तसंही ऐकु येणार नसतं...काहीवेळा तर माझ्या पायरवाचीही  तिला जाणीव नसते..मग हळूच खांद्यावर हात ठेवून मी तिला काही सांगायचं असेल तर ते लिहूनच सांगते.

तिला ऐकु येत नाही हे जाणवतं, अर्थात तिला काम देणे आणि जमेल ती इतर मदत जसं काही वस्तू वगैरे देणे इतकंच मी करू शकते तेच करते. ती असताना तिला सूचना देऊन जेव्हा मी कामाच्या जागी येऊन बसते, तेव्हा तो वर म्हटलेला एकटेपणाचा कंटाळा, आजकाल पाठदुखीने हैराण असण्याच्या तक्रारी हे सगळं विसरून जाते...देवाने मला सगळे शाबूत अवयव दिल्याने शिक्षण घेऊन मी आज या जागी बसून काम तरी करतेय...कानाने दगा दिल्यामुळे अशा प्रकारे या किराला कदाचीत माझ्यासारखी शिकायची संधी मिळाली नसेल आणि त्यामानाने जास्त शारीरिक कष्टाचं काम करून ती आपला संसार विनातक्रार चालवतेच आहे नं??  

तिचं ते आमच्याशी न बोलता संवाद साधूनही जिव्हाळ्याने काम करणं आणि पैसे दिल्यावर मनसोक्त हसून हनुवटीला हात लावून आभार मानणं हे माझ्यासाठी आज इंस्पिरेशनल असतं...माझ्यासाठी न बोलता मिळालेली एक अनमोल सोबत असते...घरून काम करता करता.....Thanks Kira....:)

Friday, June 15, 2012

वाह! क्या चीज है.....


चीज या खाद्यपदार्थाशी माझी पहिली ओळख जरी "पिझ्झा" या माध्यमाद्वारे झाली असली नं तरी खरं चीज भेटलं ते देश सोडल्यावरच...मजा म्हणजे अगदी सुरूवातीला मला चीज हा प्रकार चवीला आवडला नव्हता...तसं खरं म्हणजे मला मनापासून पिझा आवडत नाही असं म्हटलं तर माझ्यासाठी थोडेफ़ार निषेधाचे फ़लक येतील. पण त्याचं कारण चीज नसून माझ्या शरीराच्या आम्लतेला आमंत्रण देणारा तो लाल सॉस हे आहे...असो हे विषयांतर कम तेल हो हो चीजच्या पोस्टेतलं तेल....प्रोसेस्ड चीजवर कसं थोडं तरंगतं तेवढंच पुरे....:)

तर इकडे चीज म्हणजे नुस्तं चीज खाणं म्हणतेय मी....माझं एक प्रोजेक्ट होतं लॉंग आयलंडला. तिकडे ज्या हॉटेलमध्ये आम्ही सगळे कंसलट्न्ट राहायचो त्यांच्या लॉंजमध्ये संध्याकाळी वरती एका छोटेखानी बारमध्ये चीज आणि क्रॅकर कॉंप्लिमेंटरी असायची. लोकांनी वाईनवर खर्च करावा म्हणून केलेली युक्ती असू शकेल..पण एकतर माझं वाईन आणि तत्सम प्रकाराशी काहीच नातं नसल्याने आणि चीजचंही विशेष आकर्षण नसल्याने मी तिथे नुस्तीच ज्युस घेऊन टवाळक्या करत असे....साध्या भाषेत ज्याला पी एम नसला की "पी एमची मारणे" आणि असला की मूग गिळून त्याच्या "हो ला हो म्हणणे" नावाचा एक सभ्य प्रकार जगातले यच्चयाव्त आय टी कामगार करतात तसे...:)

त्या प्रोजेक्टची सगळीच टीम खायच्या बाबतीत भन्नाट होती..ब्रेकफ़ास्टला सगळीजणं साडे सातला भेटत ते तासभर अड्डा तिथेच...कामाची वेळ अर्थात कधीच चुकवली नाही. एखाद्याची सकाळची मिटिंग लवकर असली की तो त्यादिवशी फ़क्त पळे...त्यां सर्वांनी मला ते छोटे छोटे टुथपिकला लावून ठेवलेले चीजचे तुकडे खायला शिकवले असं म्हणायला हवं आणि मी त्यांना नंतर डीनरला एक भारतीय पद्धतीचं खूप छान रेस्टॉरंट होतं त्यांच्याकडचे बरेच प्रकार खायला शिकवले..हे म्हणजे खाणार्‍याने खात जावे, शिकवणार्‍याने खायला शिकवीत जावे आणि खाता खाता एक दिवस खाद्यप्रकारांची अदलाबदल व्हावी तसं चीज माझ्याही खाद्य आयुष्यात आलं...
त्या प्रोजेक्टमध्ये माझं वाढलेलं वजन हा माझ्यासाठी नंतर एक वेगळाच चर्चेचा विषय होता पण तेवढं एक सोडलं तरी चीज मनात जाऊन बसलं..मग एका वेगळ्या कारणामुळे पुन्हा बरंच चीज खाल्लं...आणि तसंही कंट्रोल्ड खाणं जमायला लागलं की हे छोटे छोटे तुकडे खाऊन काहीच जाडं व्हायला होत नाही हेही कळलं...आताही कुठे चीज सॅंपल्स असले की आम्ही दोघं ते आवर्जून खाऊन पाहातो आणि अर्थात एखादं आमच्याही घरात येतंच....
परवा असंच एका डिपार्टमेंटल स्टोअरला असंच एक चीज टेस्टींग होतं, तिथे तीन-चार प्रकारची चीज चाखली पण बाजी मारली ती स्मोक्ड फ़्लेवरने....हे आहे त्यावेळी घेतलेल्या स्मोक्ड गुडा (smoked Gouda) चं फ़ोटोसेशन......
तू "चीज" बडी है मस्त मस्त....

आणि आता फ़ोटो काढताना जरा समोर पहा बरं

Say cheese....:)

छोटे छोटे चीजचे तुकडे आणि सोबतीला क्रॅकर्स आणि ज्युस....यम्मी स्नॅक सगळ्यांसाठीच....



बाकी चीजमध्ये असलेल्या कॅल्शियम इ. चे गूण गाऊन पोस्ट टेक्निकल करण्यापेक्षा मी तर म्हणेन "वाह! क्या चीज है".
Enjoy !!!!



Tuesday, June 12, 2012

इट्स ओके......ऑर मे बी इट्स नॉट.....बट हु केअर्स....


कसं असतं नं लहान असताना आपल्याला एक खास मैत्रीण असते...मग तिला आणखी एक मैत्रीण मिळते...काही वेळा आपण तिघी मैत्रीणी होतो आणि काहीवेळा ती तिसरी आवडली नाही की मग आपल्या "खास"शी भांडण तरी होतं नाहीतर तिला सरळच सांगितलं जातं..."एक तर ती किंवा मी".....आणि हे ती किंवा मी ला किती अर्थ असतो देव जाणे...पण होतं असंही..पुन्हा मैत्री आपला मार्ग क्रमू लागते......हसणं, खेळणं, खिदळणं आणि हो भांडणंही....कट्टी आणि बट्टी...दोघी जणु काही मैत्रीणीच...

आता मोठं झाल्यावर मात्र असं "एक तर ती किंवा मी" असं नाही होत....मुळात आता इथे एकवालीचा संदर्भच नसतो...आता असतो तो सरळ एक ग्रुप किंवा दुसरा ग्रुप...या दोन ग्रुपमध्ये आपली स्वतःची वन ऑन वन मैत्री कुठेतरी चाचपडत राहते....कट्टीही नाही आणि बट्टीही नाही......मधलंच काहीतरी....बोलताना सगळं काही आलबेल असल्यासारखं दाखवलं तरी मुठीतून बरंच काही निसटल्याची जाणीव दोन्हीकडे......

कळपप्रिय प्राण्याला कळप तर हवाच पण तरी त्यात दोन वेगळे कळप असले की मग कुणाला कुठे ठेवायचं याचा एक नवाच गुंता....स्वतः मात्र कुठेतरी एकांत शोधावा असं अशावेळी माझं मला माझ्यासाठी वाटतं....नकोच ते नवे कळप..सगळीकडे नुस्तं हाय हॅलो आणि वर्तमानात बोलून या ओळखींना कुठला भूतकाळ न ठेवता कुठल्या भविष्याचीही चिंता नको असं काहीसं करता यायला हवं नाही?? मुख्य परक्या देशात आणि लौकिक अर्थाने परक्यांबरोबर तरी.....

प्रत्यक्षात हे नेहमी जमणार आहे असंही नाही....तसं करायचंच ठरवलं, तर होतो आपला धोब्याचा कुत्रा..ना इधर का ना उधर का....सगळीकडे दुरून डोंगर साजरे लुक मिळवून त्या ग्रुपमध्ये तेवढ्यापुरता असायची तयारी असेल तर हा स्टॅंड पण काही वाईट नाही...

नाहीतर आधी एका ग्रुपचा घट्ट भाग व्हायचं....काही कारणाने दुसरं आणखी चांगलं (म्हणजे नक्की काय हे मला खरं तर कळत नाहीच) किंवा वेगळं किंवा क्लिक होणारं काही मिळालं की मात्र तिथे बस्तान हलवायचं यापेक्षा हे काय वाईट...

फ़ार विचार केला तर काहीच कळत नाही...म्हणजे एका ग्रुपमधून सरळ दुसर्‍यात जायचं हे बरोबर की साफ़ चूक???एक बरंय की सध्या स्वतःचं आयुष्य स्वतःच्याच कुटुंबाभोवती इतकं फ़िरतयं की घरची चार डोकी सोडली तर कुठल्याच ग्रुप-बिपची तशी गरज नाहीये...

पण इकडे-तिकडे मात्र हा अमक्या ग्रुपमधला तमक्यात गेला वगैरे ऐकते आणि उगाच वाटतं, नसेल झेपलं तिला इथलं काहीतरी, नसेल आवडलं या ग्रुपमधल्यांचं काहीतरी आणि मिळाला असेल मधल्या मध्ये दुसरा जास्त क्लिक होणारा ग्रुप आणि हे सगळं समजावून  सांगण्याइतका पेशंसही नसेल उरला...जे काय असेल ते.......बदलला ग्रुप...

आज इतकं भारी का होतंय.....आई ग्ग....माहित नाही...मागे ठेऊन आले होते काही मैत्रीचे कळप आणि त्यातले काही भरकटताहेत...ही बहुदा त्या आठवणींमुळे उडालेली एक खपली....केवळ तेवढ्यासाठी सध्या कुठल्याच कळपाचा भाग नसल्याचं समाधान आणि काय??? 

Is it OK?? Or may be its not.....But who cares??? Isn't that the attitude anyway.....

Tuesday, June 5, 2012

चंबळचा धावपटू की बागी????


एक भांबावलेला पत्रकार घाबरत घाबरत एक मुलाखत घ्यायला जातो. त्याच्या समोर असतो चंबळच्या खोर्‍यातला एक डाकू, नव्हे त्याच्या शब्दात, "बागी". आपल्या वैशिष्ट्यपूर्ण बोलण्याच्या शैलीत इरफ़ान खानला या बागीच्या रूपात‘ पाहताना आता आपण काय पाहणार आहोत याची उत्कंठा लागून राहते आणि हळूहळू एक वेगळीच सत्यकथा पडद्यावर आकाराला येते.

ही घटना आहे भारतीय सैन्यातील एका भाबड्या सुभेदाराची. त्याच्या पायातलं विजेचं बळ ओळखून त्याला सैन्यातलं स्पोर्ट्स डिविजन दिलं जातं. त्याला खेळात जायचं असतं कारण तिथे त्याला अनलिमिटेड खायला मिळू शकणार असतं. पण खरं तर त्याच्याइतकं वेगवान धावणारं तिथेही कुणीच नसतं. तरीही सुरूवातीला त्याला तिथल्या गुरूच्या काही वैयक्तिक कारणांमुळे ५००० मीटरच्या स्पर्धेऐवजी ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये भाग घ्यायला लावलं जातं. 

जे मिळालं त्याचंच सोनं करणारा हा शिपाई, राष्ट्रीय स्पर्धेत सतत सात वेळा ती शर्यत जिंकतो. धावण्यातले स्वतःचे वैयक्तिक रेकॉड्सही तो स्वतःच या दरम्यान मोडतो. मात्र १९५८ च्या टोकियोतील आशियाई खेळात त्याला आयत्यावेळी स्पाइकचे बूट दिले जातात आणि त्याची सवय नसल्याने तिथे मात्र त्याला पदक मिळू शकत नाही. पण निराश न होता तो आपला खेळाचा सराव सुरूच ठेवतो. 

दरम्यानच्या काळात सीमेवरच्या प्रत्यक्ष लढाईमध्ये मात्र स्पोर्ट्समध्ये असल्याने त्याला कितीही इच्छा असली तरी सैन्याच्या नियमाप्रमाणे भाग घेऊ दिला जात नाही. त्यानंतर मात्र वय होत आलं तरी आंतरराष्ट्रीय मिलिटरी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून तो आपल्या अंगातल्या संतापाची आग विझवतो..देशाचं नाव अशा प्रकारे खेळाच्या लढाईत उंचावतो. 

त्यानंतर थोडं लवकर निवृत्त होताना खरं तर त्याच्या हातात एकीकडे आर्मीमधलं कोचचं पद असतं पण यावेळी मात्र घरच्या जबाबदार्‍यांना तो महत्व देतो; आणि इथेच आपलं सैनिक असणं, देशासाठी जीवतोड धावणं, ते पदक हे सगळं व्यावहारिक जगात काहीच कामाचं नाही, याची हळूहळू प्रचिती यायला सुरूवात होते...सरळ मार्गाने वागून न्याय तर मिळत नाहीच, शिवाय गावगुंडांकडून म्हातार्‍या आईला मारलं जातं त्यामुळे मग चंबळमध्ये आणखी एक बागी तयार होतो आणि त्याची गॅंग. यापुढचं सगळं कथानक वेगळं सांगायला नको. 

शेवट गोड वगैरे व्हायचं भाबडं बॉलिवूडी स्वप्न पाहायची गरज नाहीये कारण ही आहे एक सत्यकथा....आणि हे सगळं ज्याच्या वाट्याला आलं,एक सैनिक म्हणून इमानाने काम करताना, एक गुंड म्हणून मरणं ज्याच्या नशिबी आलं त्याचं नाव आहे "पान सिंग तोमार". 



काही सत्यकथा पाहताना सारखं वाटत राहातं की यातला अन्याय असणार भाग तरी खोटा निघावा..पण ते तसं झालेल नसतं....अशावेळी आपण अंतर्मुख होतो, कुणाच्या आयुष्यात असंही होतं आपल्याला कळतं आणि नकळत आपली मान शरमेने खाली जाते, डोळ्यातून अश्रु ओघळतात...एका वेगवान धावपटूचं त्याच वेगाने एका गुंडात होणारं हे रूपांतर पाहताना असे किती पान सिंग असतील ज्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या खेळाने त्यांना त्या एका पदकाशिवाय काहीच दिलं नसेल असं सारखं वाटत राहातं....हे सगळं चित्रपटापुरतंच असतं तर किती बरं झालं असतं?? 

देशासाठी सुवर्ण पदक आणूनही ज्याच्या घरादाराचं रक्षण केलं जाऊ शकत नसल्याने एका भाबड्या सैनिकाचं एका गुंडात रुपांतर होताना हतबलतेनं पाहणं इतकंच प्रेक्षक म्हणून आपण करू शकतो.

वरील चित्र मायाजालावरून साभार