Thursday, June 23, 2011

नॉट विदाउट माय डॉटरच्या निमित्ताने

बरेच दिवसांनी वाचनालयात जायला मिळालं आणि कित्येक महिन्यांपासुन यादीवर असलेलं ’नॉट विदाउट माय डॉटर’ घेता आलं..मागे इराणबद्दल वाचलेलं ’माय होम, माय प्रिझन’च्या बाजुलाच हे असावं हा योगायोगच म्हणायचा. हे पुस्तक इतक्या उशीराने वाचणारी कदाचित मी एकटीच असेन..त्यामुळे खरं तर वेगळं काय लिहिणार मी?

८४-८६ काळात घडलेली ही घटना. एका अमेरिकन बाईने आपल्या इराणी नवर्‍याबरोबर दोन आठवड्यासाठी इराणमध्ये जाणं आणि आपल्या पाच वर्षांच्य मुलीसोबत तिला तिच्या इच्छेविरुद्ध अडकावं लागणं...तिच्या वाट्याला धर्म या नावाखाली लादलेले जाचक नियम..अगदी सरळ शब्दात सांगायचं तर कैदच...या कैदेतून लेकीसकट पळु जायचं धाडस करुन ते यशस्वी करण हा साराच प्रवास एक स्त्री म्हणून वाचताना मनावर अनेक आघात करुन जातो....अशा प्रकारे स्रियांना वागवलं जातं आणि कितीतरी जणी अद्यापही अशाच जगत असतील हे कटु सत्य आणखीच विषण्ण करायला लावतं... या घटनेवर लगेचच म्हणजे ८७ साली लिहिलेलं हे पुस्तक मुळात वाचलंच पाहिजे..वेदनेलाही भाषा असते आणि ती वेदना आपल्यापर्यंत पोहोचु शकते हे मागचे काही दिवस मी या वाचनाद्वारे मागचे काही दिवस अनुभवलंय...

खरं तर माय होम माय प्रिझननंतर इराणबद्दलची पार्श्वभूमी आधीच मनात तयार झाली होती. ही घटना तर त्याच्या आधीच्या दशकातली. फ़रक इतकाच ती तिथे इराणमधली राजकीय पार्श्वभूमी होती तर इथे तिथली सांस्कृतिक. हे पुस्तक मी सुरु केलं आणि शेवट त्या माय-लेकींच्या सुटकेत आहे हे माहित होतं तरी सारखं त्या दडपणात आपणच जगतोय असं झालं होतं. म्हणजे मध्येमध्ये त्या दडपणाने होणारी चिडचिड घरात येऊ लागली आणि मग बेट्टी आणि तिची पाच वर्षांची मुलगी मोहताब यांनी हे कसं सहन केलं असेल असं सारखं मनात येऊ लागलं...

शेवटी ती खदखद मनात राहु नये म्हणून मग रोज थोडं वाचलं की त्यात काय झालं हे आईला सांगायला सुरुवात केली. तिने स्वतः आत्ताच मी मागे आणलेलं ’सोन्याच्या धुराचे ठसके" वाचुन तसंही आखाती देश आणि त्यांची संस्कृती याविषयीच्या आमच्या चर्चा कम आपलं किती बरंय हे बोलुन झालंही होतं...त्यामुळे तशाच प्रकारच्या या संस्कृतीचं कंटिन्युएशन असलेलं हे पुस्तक तिने माझ्यातर्फ़े वाचलंच...रोज मी थोडं वाचुन झालं आणि चिंतातुर चेहर्‍याने बसले की "काय झालं गं तिचं?" आणि मग आमची चर्चा..आता हा आमच्या घरातलाच प्रश्न असल्याप्रमाणे काही दिवसांनी नवराही सामिल झाला. त्याला तसंही वाचन करायचा कंटाळाच आहे..पण ती या सर्वातून कसा मार्ग काढते हे त्यालाही डिटेलमध्ये हवं होतं...मी दुपारच्या चहाला आईबरोबर आणि रात्री मुलं झोपली की नवर्‍याबरोबर असं तीनदा हे सगळं जगतेय...तिच्यासाठी प्रचंड सहानुभुती आणि "त्या" सो कॉल्ड रुढींबद्दलचा तिटकारा पुन्हा पुन्हा अनुभवतेय...

जशी मला वाचनाची तशी त्याला चित्रपटांची आवड त्यामुळे माझं पुस्तक अर्धं वाचुन होईस्तो आमच्या इन्स्टंट क्यु मध्ये "नॉट विदाउट माय डॉटर" आला. पण माझं पुस्तक पूर्ण झाल्याशिवाय त्याला तो पाहायचा नव्हता..तिचं दुःख,वेदना,तडफ़ड सारं काही सहन करायची माझीही सहनशक्ती संपली होती..त्यामुळे शेवटी ती निर्धाराने मुलीसह घर सोडून अमाल (Amahl) कडे येते, त्यानंतरचं ते पुढे अमेरिकेतल्या तिच्या खडतर प्रवासांचं वर्णन मात्र थांबुन वाचायला मला धीर नव्हता..त्या रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत जागुन मी सुटकेचा निश्वास टाकला...हे सगळं दुसर्‍या दिवशी आईला जमेल तितक्या थोडक्यात सांगितलं आणि मग नवर्‍याला मात्र चित्रपटच पाहायला म्हटलं..

खरं तर हे सगळं पुन्हा उकरुन उद्विग्न व्हायची इच्छा नव्हती पण तरी हा चित्रपटही मी पाहिला. निव्वळ यासाठी की या पुस्तकातलं कितपत त्यात उतरलंय ते तपासायला..ज्यांना या सत्यकथेत खरंच रस आहे त्यांच्यासाठी चित्रपट म्हणजे हिमनगाच्या वरच्या टोकापेक्षा कमी भाग आणि वेदना पोहोचणं वगैरे फ़ार कमी दृश्यात झालंय असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. चित्रपटातली बेट्टी फ़क्त सारखी संभ्रमात असल्याचा चेहरा असलेली वाटते तर खर्‍या आणि पुस्तकातल्या बेट्टीच्या स्वभावाला बरेच कंगोरे आहेत. ती नवर्‍याशी प्रसंगी खोटं नाटक करुन स्वतःला सुटकेचे प्रयत्न करण्यासाठीचा वेळ देते. आपण मुलीला फ़ार लवकर मोठं व्हायला लावतोय का किंवा नाहीच जमलं परत जायला तर कशाला तिला वेडी आशा दाखवा म्हणून आईचं तिचं वेगळं रुप...नंतर नंतर तिची परमेश्वरावर बसणारी तिची श्रद्धा आणि तिच्या प्रार्थनांना आलेलं फ़ळ किंवा तसा योगायोग हे सारं चित्रपटात कळणं कठीणच.....हे सगळं खूप लवकर होतंय आणि काही ठिकाणी काही प्रसंगात ती हे असं का वागते याचं थोडं स्पष्टीकरण जे पुस्तकात मिळतं, चित्रपटात मिळत नाही. चित्रपटाच्य तळटीपेत लिहिण्याप्रमाणे पुस्तकाबर हुकुम चित्रपट नाही हे पुस्तक ताजं वाचलेलं असल्याने जाणवतंच....

एक स्त्री म्हणून हे सारं वाचलं की आपल्याला त्या मानाने बरंच काही मिळतंय असं सारखं वाटत राहातं ...म्हणजे जिथे कमी लेखलं गेलंय आणि जातंय ते नेहमीच जाणवणार पण या 'अशा' देशांमधली भरडली जाणारी स्त्री पाहिली की आपण फ़ारंच बरे आहोत हे लक्षात येतं...म्हणजे पेला अर्धा भरल्यासारखं वगैरे....

माझ्यासारखं कुणी एखादं हे पुस्तक वाचायचं राहिलं असेल आणि त्यांच्यासाठी ९१ मध्ये आलेला चित्रपट हा पर्याय असेल तर त्यांनी पुस्तकच वाचावं फ़क्त हे सांगण्यासाठीचा हा पोस्टप्रपंच....

Monday, June 13, 2011

भागलेला चांदोबा......

मागे कधीतरी मी चांदोबाचं गाणं फ़ुलोरामध्ये टाकलं होतं..त्यानंतर त्या इवलुश्या आयुष्यात अनेकविध गोष्टी,गाणी, प्राणी, वस्तू येत गेले...पण चांदोबा बहुधा जास्त लक्षात राहिला असं वाटतंय...अगदी आजचीच गोष्ट...

रोज झोपताना सर्वात प्रथम "आजीबलोबल झ्योपायच्यं"चं पालुपद सुरु होतं. जास्त करुन तिलाही दोन्ही नातवांना वेळ द्यायचा असतो आणि मला तिला शारिरिक कष्ट जास्त पडू नये म्हणून धडपडायचं असतं..त्यात चांदोबाचं गाणं जास्त लाडकं..आमच्या घरात मला आणि माझ्या आईला असं मध्येच एखादी गाण्याची लकेर घ्यायची सवय आहे...आरुष आसपास असताना चांदोबाच्या गाण्यातलं एखादं वाक्य सुरु करुन सोडलं तर हमखास त्याच्या बोबड्या आणि मोठ्या आवाजात पुढे नेतो...(घरात दोन-दोन लहान मुलं असताना आम्ही तोंड उघडलं की चांदोबा,इंजिनदादा आणि तत्समच पहिल्यांदी नंबर लावतात हे आता कंसात सांगायला हरकत नाही) त्यात नेमकी त्याच्या खेळण्यात एक प्लास्टिकची माशी मिळाल्यामुळे तर काय सोनेपे सुहागा सारखं प्रात्यक्षिक दाखवायचं असतं...मग सुट्टीच्या दिवसांत किंवा पाळणाघरातून परत आल्यावर ती माशी त्याच्या तावडीत सापडलेल्या खाण्यात पडल्यामुळे राहिलेला एक उपाशी चांदोबा आमच्या घरात कायम फ़िरत असतो. आणि आजीच्या आरुषची पापा खाशील का या ऍडिशनला आपला ऋषांकची पापा खाशील का म्हणून एक एक्स्ट्रॉ डब्बा पण जोडला जातो...’हा गाणार’ म्हणता म्हणता कविता करणारच्या कंक्लुजनला यावं लागतं मला इतकं इंस्टंट काय काय सुरु असतं...या तेलात तळलेलं कंल्कुजन म्हणजे चांदोबा ऑल टाइम फ़ेवरिट...

अरे हो ब्याक टु आजचीच गोष्ट.........

आज मात्र पाळणाघरातली दुपारची झोप न घेतल्यामुळे अर्ध जागेपणी, अर्ध झोपेत आमच्या भाषेत सांगायचं तर रुटीन सुरु होतं...शेवटी आंघोळीनंतर ’जय जय बाप्पा’लाच भोकाड पसरल्यामुळे मीच पुढे झाले आणि बाबाकडून ताब्यात घेऊन स्वारीचं आणखी डोकं चालायच्या आत ’चल झोपायला जाऊया’ म्हणून आत नेलं..

तो तर भानावर नव्हताच पण बहुधा मी पण जे काही काम अर्धवट टाकून आले होते त्याच्याच विचारात असावी, म्हणून कुठलं तरी सुचेल ते गाणं आमच्या आतापर्यंतच्या टिपिकल झोपेसाठी हिट टोनमध्ये सुरु केलं..(या टोनला शब्दात पकडायचं मी सोडतेय...घरोघरी याची आपापल्या पिलांसाठी क्लिक होणारी व्हर्जन्स असणार त्यामुळे भावना नक्की पोचतील...)

’मला नीत पकल’ अर्धवट झोपेतली सुचना क्र.१

’बरं बाबा’..रॉकिंग चेअरमध्ये दोघांची बैठक नीट करुन मी पुन्हा आधीचा टोन सुरु केला...

’चांदोबाचं म्हण" झोपाळलेली सुचना क्र.२

’चांदोबा चांदोबा कुठे रे गेला...." पोराने लगेच गुडुप झोपावं म्हणून किंवा स्वतःच्याच तंद्रीत असल्याने डायरेक्ट शेवटच्या कडव्याने सुरु झालेली आई.

"नाई, आधी भागायचं...." झोपाळलेली (???) सुचना क्र. शेवटची...

आईचा मोठा ऑ.......................एक छोटा पॉज आणि अगदी हापिसातल्या बॉसचं पण कधी इतक्या वेळेवर ऐकलं नसेल त्या तत्परतेने "चांदोबा चांदोबा भागलास का................

आई-बाबांवर रुसलास का"ला येईस्तो ऐकु येतो तो संथ लयीतला श्वास..

दिवसभर खेळून दमलेला एक छोटुसा थकला-भागला जीव त्याच्यासाठी आता पुर्वीसारखा वेळ देऊ न शकणार्‍या आईच्या खांद्यावर अजीबात न रुसता झोपुन गेलाय..किती छोट्या असतात काही काही वेळा त्यांच्या अपेक्षा नाही??
 
निदान आज झोपतानाची तरी......:)

Tuesday, June 7, 2011

गाणी आणि आठवणी ९ - रिमझिम रिमझिम...रुमझूम रूमझूम

नवीन गाणी रेडिओवर ऐकायची आणि चित्रहारमध्ये पाहायची..मग आवडली की स्वतःच गुणगुणायला शिकायचं..केबलवाल्याची (आणि त्या रात्री जागरणासाठी घरच्यांची) मर्जी झाली की मग पुसटसा चित्रपट पाहिला तर पाहिला...'१९४२ ए लव्ह स्टोरी' मी पाहिला असावा पण नीट आठवत नाही (आता कुठला चित्रपट मला नीट आठवतो या विषयावर पुना कवातरी)पण गाणी...अहाहा...पंचम पुन्हा एकदा बहरणार अशी आशा असलेली सगळीच एकापेक्षा एक भारी गाणी...

आता इथे डकवलाय तो फ़ोटी त्यादिवशी उन्नतीच्या फ़ेबुला पाहिला आणि एकदम वरळी सी-फ़ेसलाच जाऊन पोहोचले...

आमची इंजिनियरिंगची सुट्टी आणि पावसाळ्याची सुरुवात अशा कॉम्बोमधल्या दिवसांत माझ्या मैत्रिणीने (माझं गुणगुणणं असह्य होऊन बहुधा..:)) ही कॅसेट मला दिली होती..तेव्हा दादाने नुकताच एक वॉकमन मला घरी गाणी ऐकायला घेतला होता...त्यात सारखं लावून ऐकायचे...

त्या पावसाळ्यात मी त्याच मैत्रिणीच्या घरी दादरला चिक्कारवेळा राहिलेय..मग आधी तिच्या काकीच्या स्कुटीवरुन आणि काही दिवसांनी तिच्या बाबांनी तिला घेतलेल्या एम-एटीवरुन भगुभईवरुन दादरकडे सुसाट सुटलेलो आम्ही..मध्ये बांद्रयाला सुरेश वाडकरचं घर लागायचं तिथे तो दिसतो का म्हणून तिला थांबायला सांगायचे ते दिवस....(आता एकेरी बोलते कारण कॉलेजमध्ये आवडीचे कलाकार तो,ती च्या भाषेतच उल्लेखले जायचे) पार्कात थांबता यायचं नाही पण तरी जाता जाता एखादा जिमखान्याचा वडा टाकायला हरकत नसायचे ते दिवस...

पावसांत भिजून घरी गेलो की त्यांच्याकडे कामासाठी तिच्या लहानपणापासुन असणार्‍या बाईंना मस्का न मारता मिळालेला गरम चहा आणि त्याबरोबर काही...नाहीतर त्यांच्याकडे दुपारच्या जेवणावर होणारा एक हमखास पदार्थ म्हणजे कोथिंबिरीचा भगरा (कोथिंबिरीत बेसन घालून त्या करायच्या) आणि संध्याकाळी तिच्या आजीकडे सामिष जेवण...बटर चिकन करणारी आजी मिळाली म्हणून मी तिचा हेवा करायचे...:)

राहायचा बेत असेल त्या दुपारी हमखास वरळी सी-फ़ेसला जाणं व्हायचं.मी स्वतः एम-एटी चालवायला तिथेच शिकले...तिनंच शिकवलं....माझं लर्निंग लायसंस नसताना...मामा लोकांना कधीही आमचा संशय आला नाही..मग घरी आलो की पुन्हा बाहेर पाऊस आणि आत 'रिमझिम रिमझिम' ऐकत बाहेर पाऊस पडताना पाहायचे ते दिवस...तिच्या घरचा मुक्काम संपला की कधीकधी तिला पुन्हा माझ्या घरी राहायला (किंवा सोडायला) घेऊन जायचे...पण एकटं परत जायची वेळ आली की ट्रेनमध्ये गर्दीतही फ़ार एकटं वाटायचे...मग परत घरी पोहोचलं की पुन्हा बाहेरचा पाऊस बघताना "आर डी आता बघ कसा वर येतो" म्हणणारा दादा आणि तीच मैत्रीणीने दिलेली कॅसेट....

आताही गेले काही महिने सतत पाऊस पाहातेय..पण तो 'बादल की चादरे ओढे है वादिया' फ़िल इतके दिवस येत नव्हता तो या एका फ़ोटोने आला त्याबद्दलची ही छोटी आठवण....



फ़ोटो...मायाजालावरु साभार

Wednesday, June 1, 2011

चार आणे

"बाबा चाराणे द्या ना..आवळासुपारी घ्यायची आहे"


"हे घे दोन चार आणे म्हणजे कंडक्टरकडे चिल्लर मागायला नको" - इति आई

"ए पावली पडली बघ तुझी." आणि मागुन जोरात खी खी खी...

"ते चाराणे मला दे नं. मी एशियाडवाले चाराणे जमवतेय."

आण्याचा हिशोब करण्याइतकी माझी पिढी जुनी नसली तरी शाळेत असल्यापासुन चार आणे आणि त्याच्या पटीत बराचसा हिशेब केला जायचा. "चाराणे" हा आमचा नेहमीचा शब्द...

काय काय नाही यायचं या छोट्या गोल नाण्यात? चाळीखाली उतरल्यावर रस्ता ओलांडला की एका चणेवाल्याचं दुकान होतं. चिमुकल्या मुठीतून चणेवाल्याला चाराणे दिले तेव्हा एक अख्खी भेळ आली होती. कदाचित माझ्या वयाकडे बघुन थोडी छोटी पुडी बनवली असेल त्याने पण चण्याच्या तर छोट्या दोन पुड्या यायच्या हे नक्की आठवतंय. मावशीकडे बसने जायचं तर चार आण्याचं अर्ध तिकिट काढलं की पोहोचलंच.साधारण एका विशिष्ट वयात स्टॅंप आणि नाणी गोळा करायचा छंद लागतो तसा मलाही लागला(आणि यथावकाश त्याची धुंदी उतरली) त्याची सुरुवातही चार आण्याच्या नाण्यानेच झाली होती.

माझी शाळा घरापासुन इतक्या जवळ होती की पहिली घंटा झाल्यावर निघालं तरी तिसरी घंटा होईपर्यंत पोहोचेन. मी जेवायला घरीच यायचे (त्यामुळे शाळेतच थांबुन डब्बा खाणार्‍या मुलांबद्दल एक कमालीचं आकर्षण मला होतं. जणु काही मधल्या सुट्टीत त्यांना कुठला जादुचा खाऊच मिळणार आहे...असो) तर त्याचा मुख्य तोटा हा होता की माझ्या आई-बाबांनी आम्हा भावंडांना शाळेसाठी पैसे देणं हा प्रकार कधीच केला नाही. मी मात्र अध्येमध्ये बाबांना मस्का मारुन निदान चाराणे तरी द्या नं असं म्हणून कधीकाळी मिळालेल्या त्या पैशात चैन करुन घेई.

शाळेच्या बाहेर एक छोटं दुकान होतं. एक म्हातारे आजोबा ते सांभाळायचे. त्यांच्याकडे रावळगावच्या गोळ्या, खडखडे लाडु आणि असंच काही अडमतडम काचेच्या बरण्यांमधुन खुणावत असे. मुख्य आकर्षण आवळासुपारी, त्याखालोखाल तळलेली मूगडाळ आणि मग सिझनप्रमाणे बोरं इ.चा नंबर असे. अर्थात आमची आर्थिक परिस्थिती इतकी बेताची होती की हे चाराणे आपल्यासाठी चैन आहे याची पूर्ण जाणीव तेव्हाही होती पण माझ्या बाबांना बहुधा त्यातुन बाकीच्या मुलांसारखं मधल्या सुट्टीत कधीतरी दुकानात जाऊन काहीतरी घ्यावंसं वाटतं हे कळलं असावं आणि आईच्या नकळत त्यांनी ती चैन मला करु दिली.

तर अशा बाबांना खूप मस्का मारुन मिळवलेल्या चार आण्यात मग शक्यतो आवळासुपारीच्या दोन पुड्या मी घेई. कारण त्यावेळी त्या पंधरा पैशाला एक आणि चार आण्याला दोन मिळत. अगदी पुरवून पुरवून खाल्ली तरी आठवडाभर सहज पुरत. त्याच चवीचा कंटाळा आला किंवा साध्या भाषेत थोडी चैन करायची असेल तर मग चार आण्याला तो दुकानदार त्याच्या कुठल्याशा मापाने तळलेली मुगाची डाळ देई ती घ्यायची. चैन कारण कितीशी डाळ असणार त्या छोट्याशा पुडीत? ती त्याच दिवशी संपे आणि आता पुन्हा चाराणे मिळवायचे म्हणजे बाबांना मस्का मारूनही काही फ़ायदा नसे कारण "कडकी" या शब्दाचा अर्थ फ़ार लहानपणीच कळायला लागला होता.

सिझनप्रमाणे शाळेच्या बाहेर बोरंवाल्याची गाडी यायची त्याची ती त्रिकोणी पुडीपण चार आण्यालाच मिळे. लाल जर्द रंगाची, मीठ घालुन सुकवलेली ती चणेबोरं अहाहा! त्या बोरांची चव आणि तो ती पुडी देईपर्यंत हातातलं नाणं गच्च पकडत दुसर्‍या हाताने "भैया थोडा चखने को देदो ना.." अशी विनवणी करायचे ते दिवस भैयाजीच्या "ले लो बिटिया" म्हणताना चार आण्यात मिळालेल्या पुडीतल्या चण्यापेक्षा हेच चणे जास्त मस्त लागायचे बहुधा.

माझी एक मावशी माझ्या घरापासुन तशी जवळ पण तरी बसने जायला लागायचं अशा अंतरावर राही.माझी मावसभावंडं वयाने माझ्या आसपासची. शिवाय मावसबहिण चौथीत असेपर्यंत काकांच्या बदल्यांमुळे ती महाराष्ट्राबाहेर राहायची आणि नंतर मग त्यांनी इथे कायमचा मुक्काम ठरवल्यामुळे माझ्यासाठी हे हक्काचं नात्याचं घर होतं. मी आणि ती मावसबहिण अजुन मैत्रीच्याच नात्यात जास्त आहोत. तेव्हा तर काय फ़ुलपंखी दिवस. प्रत्येक शनिवारची अर्ध्या दिवसाची शाळा संपली की आम्ही भेटलं पाहिजे असं वाटायचं पण प्रत्येक नाही तरी महिन्यातुन निदान दोनदा तरी भेटणं व्हायचं अपवाद परिक्षांचा सिझन. तर त्यांच्या घरी जायला हाफ़ तिकिटात असेपर्यंत तरी चार आण्याचं तिकिट लागायचं. त्यामुळे जाताना आई शक्यतो दोन्ही वेळचे सुट्टे पैसे द्यायची आणि येताना मावशीपण आठवणीने सुटे चाराणे आहेत का हे विचारुनच बस स्टॉपवर सोडायची. मावशीच्या घराजवळंच बाजार भरे. त्यामुळे आईने सांगितलं असेल तर चाराण्याचा मसाला उर्फ़ मिरच्या-कोथिंबीर येता येता घेतली की आईपण खूश आणि हे मी आठवणीने आणलं म्हणून मीही.

कधीतरी आई आम्हाला बचतीचं महत्व सांगतानाही उदाहरण म्हणून चार आणेच घ्यायची आणि म्हणायची तुमच्या पैसे जमा करायच्या डब्यात नुस्ते चार आणे जरी टाकले तरी हळुहळू किती रुपये जमा होत राहतील आणि मग आम्ही मनातल्या मांड्यात त्या अद्याप न टाकलेल्या चार आण्याच्या न झालेल्या रुपयाचं आम्ही काय काय करु शकु अशा विचारात आता चार आणेपण हातात नाही आहेत हे विसरुन जात असू. नंतर मग एकदा आम्हा तिघांसाठी तीन वेगवेगळे पैसे साठवायचे डब्बे आणले. त्यात माझा होता म्हातारीचा बूट आणि त्यात मग पाठीमागे वेगवेगळी चित्रं असलेली कितीतरी चार आण्याची नाणी मी टाकायचे. आणखी इतर नाणीही होती त्यात पण चार आणे सहजी टाकले जायचे कारण त्यातल्या त्यात ते परवडायचे. रुपया किंवा दोन रुपये आईकडेच खर्चासाठी जायचे. मध्ये मग एशियाड झालं त्यावेळी ती पाठीमागे वेगळा छाप असलेली नाणी काढली होती. माझा नाणं जमवायचा म्हातारीचा बूट आईकडे त्याच नाण्यासहित अजुन आहे त्यात मी टाकलेली नाणी तशीच आहेत.काय गम्मत आहे इतके मांडे खाऊनही त्या सेव्हिंगला हातच लावला गेला नाही बहुधा.

चार आण्यात मिळणार्‍या लिमलेट आणि रावळगावच्या गोळ्या तर आताही त्या चवी तोंडावर आणतील. कुणाकडून चुकुन चार आण्याचं नाणं पडलं तर ’पावली पडली बघ तुझी’ म्हणून खिदळायचंही तितकंच लक्षात आहे. माझ्या मामाच्या बाबतीत तर ते नेमकंच व्हायचं आणि आम्ही भाचे कंपनी त्याची पण थट्टा करायचो.

नंतर हळुहळु चाराण्याचा भाव कमीपण झाला. म्हणजे पुर्वीसारखं बसचं तिकिट किंवा गोळ्या-बिस्किटं चाराण्यात यायचं तसं बंदही झालं. पण तरी चाराण्याची आणखी एक ह्रद आठवण आहेच. माझ्या मामाचं गावं पालघर तालुक्यातलं एक छोटं खेडं. मला आठवतं तोवर त्या गावात पीठाची गिरणी पण नव्हती. मामी जात्यावरच दळायची. पूर्ण गावात किराणा, रॉकेल पासुन चणे-दाणे मिळायचं एकच दुकान होतं. मी सातवीत वगैरे असतानाची आठवण आहे ही.मामीने काहीतरी अडम तडम घ्यायला पाठवलं असावं कारण मुख्य किराणा मामा महिन्यात एकदा मनोरला जाऊन आणायचा. माझ्याआधी आदिवासी पाड्यातली एक बाई तिच्या छोट्या शेंबड्या मुलाला अंगावर घेऊन आली होती. "बाय चार आण्याचा गोडातेल दे गं" म्हणून एक काचेची बाटली पुढे केली आणि त्या दुकानवाल्या काकींनी तिची चौकशी करत कुठल्यातरी अगम्य मापाने साधारण एक चमचाभरच्या आसपास तेल तिच्या बाटलीत दिलं. त्यावेळी स्वयंपाकघरातलं विशेष कळत नसलं तरी इतक्याशा तेलात ती नक्की काय शिजवणार हा प्रश्न पडून तिची समस्या मी आईकडे मांडली होती.त्यावेळी आईने मला गावात आदिवासींकडे पैसे नसतात त्यामुळे ते आपल्यासारखं महिन्याचं रेशन भरु शकत नाही मग त्यादिवशी जे लागेल आणि पैसे असतील तसं थोडं थोडं घेऊन तो दिवस साजरा करतात हे समजावलं होतं. "गरीबांचं पोट म्हणजे हातावर कमावुन पानावर खायचं" हे आईचं एक वाक्य नेहमी ऐकायचे त्याचा प्रत्यक्ष अर्थ त्यावेळी कळला होता. त्यादिवशी आपण किती चांगलं आयुष्य जगतोय याचा साक्षात्कार झाला होता.

आज अचानक या आठवणी अशा निघण्याचं कारण म्हणजे काही महिन्यांपुर्वी वर्तमानपत्रात वाचलं की चार आण्याचं नाणं चलनातुन रद्द होणार आहे. हा २०११ चा जून चार आण्याच्या नाण्याचा शेवटचा महिना. कदाचित आतापर्यंत लोकांनी शेवटचे चार आणे कधी वापरले ते आठवायचंही सोडलं असेल .माझ्या मागच्या मायदेशवारीत रिक्षाचा प्रवास तर पन्नास पैशाच्या पटीत होता बहुतेक आणि इतर ठिकाणी तर नाण्यात काही केल्याचं आठवतही नाही.

तरीही आता चाराणे नसणार म्हटल्यावर हे वर म्हटलेले मिरच्या-कोथिंबीरीपासुन बसच्या तिकिटापर्यंतचे सारे व्यवहार डोळ्यासमोर उभे राहिले. मला अर्थकारणातलं विशेष कळत नाही पण तरी जेव्हा जेव्हा मी परदेशात अगदी एक एक सेंटही चलनात पाहते आणि माझ्या लहानपणीची एक एक नाणी अशी गळताना पाहाते तेव्हा कुठेतरी काहीतरी चुकते असंच वाटतं. काय ते माहित नाही पण आत्ता या क्षणी मात्र मी जर कधी माझ्या मुलाबरोबर खेळतानाही सवयीने चाराण्याच्या व्यवहारात काही बोलले तर मात्र त्याला समजावताना पुन्हा एकदा आठवणींच्या गर्तेत जाणार हे नक्की.