Thursday, July 1, 2010

मेरी मराठी....

हा प्रसंग घडला आहे तो खरं तर अमेरिकेत...इथे आधीच या राज्यात आम्ही नवे त्यात आपल्या देशातले लोक भेटणार म्हणजे काहीतरी वेगळं आणि त्यातही जर एक नवीच ओळख निघालेला एखादा मराठी निघाला तर?? हम्म्म...जसं दोन गुजराथी भेटले की गुजराथीतच बोलतात तसंच निदान परदेशात तरी दोन मराठी भेटले तर ते मराठीच बोलणार नं? तस्संच घडलं..पण नेमकं तिथे एक अशी व्यक्ती मला भेटली जिला हे आमचं असं इतर अमराठी लोकांत मराठी बोलणं रुचलं नाही...बरं नाही तर नाही दोन मिन्टं गप्प बसायचं की नाही??


अगदी सगळ्यांसमोर आता हे मराठी बंद करा...थोडक्यात ऐकवत नाही आहे तुमची भाषा मला अशा अर्थाचं फ़टकळ बोलणं...तसं पाहायला गेलं तर अरे ला कारे करणं खूप सोप्पं असतं पण उगाच कशाला म्हणून मी थोडं प्रेमानेच म्हटलं की बाई मला मराठी बोलायला इतकं आवडतं आणि सहज जमतं की मी हिंदी (खरं तर तुझी हिंदी म्हणणार होते पण आवरलं) सुरू केली तर तुच म्हणशील मला की मराठीच बोल बाई....

नकळत दोन व्यक्तींमध्ये एक अदृष्य़ रेषा आखली गेली...पुढे निदान त्या व्यक्तीशी तरी बोलणं जड गेलं..का कुणास ठाऊक त्यादिवशीचं बाहेरचं खाणं मलातरी महागातच पडलं...अख्खा आठवडा मी या गोष्टीचा विचार करत बसले की काय चुकलं आपलं चटकन मराठीत बोललो ते?? बरं बोलणं ते काय तर जुजबी.... अमेरिकेत केव्हा आलांत?? इटालियन या आधी खाल्लंय का असलं....म्हणजे त्या तिसर्‍या व्यक्तीचा काहीही संबंध नसलेलं...तरीही ते इतकं टोचलं जावं...

मग खूप खूप जास्त डोकं खाल्लं आणि अचानक ट्युब पेटावी तसं पेटलं..की तुम्ही मराठी बोलु नका पण हिंदी बोला, असं हे जे कुणी सांगतंय याचा अर्थ असा नाही आहे की हिंदी सगळ्यांना कळेल...याचा अर्थ फ़क्त इतकाच आहे की हिंदी त्या व्यक्तीची मातृभाषा आहे...म्हणजे पटकन मी तिथे पडले तर मी जसं "आई गं" म्हणेन तसं ती व्यक्ती "ओ मॉं’ असं काही म्हणेल...मला जर कुणी विचार करायला सांगितला तर मी तो मराठीत करते अगदी लिहिताना इंग्रजीत लिहायचं असलं तरी, तसंच ही व्यक्ती हिंदीत करत असेल...आणि मग माझ्यासमोर जर दुसरी मराठी व्यक्ती किंवा खरं तर स्वतःच्या तंद्रीत असताना कुणीही समोर आलं तर मी मराठीत बोलेन तसंच ही व्यक्ती हिंदीत बोलेल..मग उगाच चवताळून सगळ्यांवर हिंदीची जबरदस्ती नाही चाललीय तर स्वतः मातृभाषेतून व्यक्त व्हायची सोय चाललीय....माझं हे लॉजिक आता मला पटतंय आणि जसा इतरांना आपापल्या मातृभाषेत व्यक्त व्हायचा अधिकार आहे तर तो मला का नसावा आणि तेही कामाचं ठिकाण नाही आहे हे..फ़क्त श्रमपरिहार चाललाय आणि अशा ठिकाणी उगाच भाषेचा बडेजाव करुन स्वतःचं वेगळे(?)पण सिद्ध करणार्‍या लोकांच्या काय नादी लागायचं...फ़क्त पुन्हा असलं महागडं जेवण आणि तेही स्वतःच्या पैशाने जेवायला जायचं नाही एवढं मात्र ठरवलंय....

25 comments:

  1. अगदी अगदी सेम घटना माझ्यासोबत इथ कॉलेज मध्ये झाली.बर झाल माझी ट्यूब पेटवलीस.

    ReplyDelete
  2. मराठीचा बाणा सोडायचाच नाही आपण...
    सगळ्यांना ऍड्रेस करायचं असेल तर ठीक..पर्सनल बोलायला ह्यांचा का जाच...

    ReplyDelete
  3. tya vyaktine hech vakya telugu,tamil lokanna aikavaave, pratikriya baghayla maja yeil :)

    evadhe manala lavun gheu nakos, pudhachyaveles sapashel durlaksh kar ani damtun marathitunch bol[nehemipramane anubhavache bol :)]

    jai maharashtra!

    ReplyDelete
  4. आपल्याला न समजणाऱ्या भाषेत बोलण्याचे कारण ते बोलणे आपल्याविषयी चालले आहे अशा न्यूनगंडाची ती व्यक्ति शिकार असावी.

    ReplyDelete
  5. अपर्णा, त्या व्यक्तीला सरळ मराठीमधूनच झोडायला लागायचं. गरज पडली तर २-४ *सभ्य* कचकचीत शिव्या..

    दोन मराठी व्यक्तींना एकमेकांशी मराठीत बोलायला (त्यांची इच्छा असेल तर) ब्रह्मदेवाचा बापही अडवू शकत नाही.. !!!

    ReplyDelete
  6. सागर, पेटली नं...मलाही एक आठवडा डोकं खाल्यावर एकदम कळलं होतं रे...

    ReplyDelete
  7. बाबा,आधी एवढ्या वेगवेगळ्या लोकांबरोबर कामं, मैत्री वेगवेगळ्या भाषा बोलणार्‍यांशी उठबस आपल्या सर्वांसाठीच नेहमीचं आहे त्यामुळे हा प्रसंग जरा खटकला बघ....

    ReplyDelete
  8. अगं हो मृणाल गुल्टीने बरोबर अशांची उल्टी-पुल्टी केली असती....प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद...

    ReplyDelete
  9. शरयु, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्द्ल आभार...आपण म्हणता तसंही असण्याची शक्यता इथे कमी आहे कारण ती थोडी फ़ार मराठी पार्श्वभूमी असणारी व्यक्ती आहे...

    ReplyDelete
  10. हेरंब अरे मजा म्हणजे त्या व्यक्तीचं अर्धांग मराठी आहे म्हणजे त्यांना एकमेकांच्या घरी थोडं तरी मराठीला सामोरं जावं लागणार..अशा पार्श्वभूमीवर ते वागणं मला नुस्तं खटकलंच नाही तर मग आपण असं जेव्हा इतर भाषिकाशी विवाह करतो साधं त्याच्या भाषेशी आदर/इंटरेस्ट नको का?? असं सगळंही मनात आलं...अर्थात व्यत्किगत पातळीवर त्यांचा निर्णय पण वरील प्रसंगात सार्वजनिकही असं वागणं चूकच...असो...बरीच जुनी घटना आहे ही पोस्ट करायची राहिली होती मायदेश वारीच्या गडबडीत...

    ReplyDelete
  11. अपर्णा...बुद्धी विकास खुंटला असेल त्या व्यक्तीचा...आयोडीन मीठ खायला सांग...:) :) :)

    हेरंब+१

    ReplyDelete
  12. हा हा योगेश....:) अगदी सहमत....

    ReplyDelete
  13. सायको पोस्ट... तेनालीरामाची एक गोष्ट आठवली.. राज्यात एक विद्वान आलेला असतो व त्याला भारतवर्षातील सर्व ज्ञात भाषांचे ज्ञान असते व तो कोणत्याही भाषेत अगदी तेथील लोकल लोकांप्रमाणे सहज बोलतो... त्याने पैज लावलेली असते की त्याची मातृभाषा ओळखून दाखवावी... सर्वांचे प्रयत्न व्यर्थ जातात. अखेर तेनालीरामा त्या विद्वानाचे आव्हान स्विकारतो... खुप वेळ डोके खाजवल्यानंतर त्याला एक क्लृप्ती गवसते. रात्रीच्या वेळी तेनालीरामा त्या विद्वानाच्या शयनगृहात तो घोर निद्रावस्थेत असतांना एक बिन-विषारी साप सोडतो... साहजिकच नॅचरलि तो विद्वान किंचाळतो (पण फक्त त्याच्या मातृभाषेतच...)... यावरून तेनालीरामा आपले बुद्धी-कौशल्य पुनः एकदा जगाला दर्शवण्यात यशस्वी होतो..

    वरील गोष्टीवरून एका गोष्टीचा प्रत्यय नक्कीच येतो... जसे की तुझ्या या लेखाचा सारांशदेखील हाच आहे: कोणतीही व्यक्तीची बहुतेक कामे (ती कोणती असतात त्याचा विचार करावा!) ही involuntary असतात...

    बाय द वे, नेहमीप्रमाणे विचार करायला लावणारी आणि पहिल्यांदाच बघितलेली एक psycho पोस्ट!! :)

    ReplyDelete
  14. मराठी माणसाने एकमेक्ना भेटताना मराठीच बोलावे ,तो जरी इतर भाषेत बोलत असलातरी आपण मराठी बाणा दाखून मराठीच बोलले पाहिजे .मराठीचा अभिमान मराठी माणसाला असलाच पाहिजे, ज्याला मराठी येत नाही त्याला ठीक आहे, आपण किती हुशार आहोत हे दाखवण्यासाठी काही मराठी लोक मराठीत बोलत नाही ,ते सर्व चुकीचे आहे ,मराठी माणसे एकत्र आली तर त्यांनी मराठीतच बोलले पाहिजे , महेशकाका

    ReplyDelete
  15. मराठी माणसाने एकमेक्ना भेटताना मराठीच बोलावे ,तो जरी इतर भाषेत बोलत असलातरी आपण मराठी बाणा दाखून मराठीच बोलले पाहिजे .मराठीचा अभिमान मराठी माणसाला असलाच पाहिजे, ज्याला मराठी येत नाही त्याला ठीक आहे, आपण किती हुशार आहोत हे दाखवण्यासाठी काही मराठी लोक मराठीत बोलत नाही ,ते सर्व चुकीचे आहे ,मराठी माणसे एकत्र आली तर त्यांनी मराठीतच बोलले पाहिजे , महेशकाका

    ReplyDelete
  16. सरळ दुर्लक्ष हाच बेष्ट उपाय ... आवडत नसेल तर कानं बंद करा ...

    ReplyDelete
  17. विशाल तुझं म्हणणं मला शंभर टक्के कळलंय असं नाही पण तुझा 'सायको' शब्द मी 'नेहमीपेक्षा वेगळी' या अर्थी स्वीकारते. (इथे उगाच पु. ल. चे पेस्तनकाका आठवले)

    ReplyDelete
  18. महेशकाका, आपलं निरीक्षण बरोबर आहे आणि जोवर आपण स्वतः भाषेचा आग्रह धरत नाही तोवर हे असंच चालायचं.

    ReplyDelete
  19. खरंय आनंद. फक्त असाच अनुभव आणखी कुणाला आला तर निदान त्यांना एकटं वाटणार नाही हे वाचल्यावर काय?

    ReplyDelete
  20. अग ताई ,मला आज दुपारीच गूगल काकांचा रिप्लाइ आला , जेव्हा आपण ब्लॉगर ओपन करतो तेव्हा http://draft.blogger.com याच URL नी ओपन करावे , http://www.blogger.com. या url ने नव्हे. blogger in draft ने ओपन केल्यावर स्टॅट नक्कीच दिसेल.

    ReplyDelete
  21. ठांकु ठांकु प्रितेश आणि ब्लॉगवर स्वागत....:)

    ReplyDelete
  22. अगदी अगदी. हेरंब+१.काही लोकांना नको तिथे तडमडायची सवयच जडलेली असते. अशांना वेळीच झापडायला हवेच.

    ReplyDelete
  23. श्रीताई, झापडायला हवं खरं..पण पु.ल.च्या भाषेत एंट्रीलाच वाद नको म्हणून नको म्हटलं...पण घ्यायचा तो धडा घेतला...निदान पुढच्या वेळी इतकं निदान विचारु शकते की फ़क्त समोरच्याच्याच मातृभाषेतून बोलायचं का....असो...

    ReplyDelete
  24. अगं तू बोलायचंस ना बेधडक मराठीतून.उलट अगदी हायफाय (म्हणजे लिहायला गेलं तर निदान तीन इंच लांबी होईल एवढे. उदाहरणार्थ: एकसमयावच्छेदेकरून, कर्मधर्मसंयोग, महापापविमोचक, सर्वधर्मसमभाव वगैरे वगैरे..) शब्द वापरायचे. त्या व्यक्तीच्या तोंडाला फेस ये‍ईपर्यंत हे असंच बोलायला हवं होतं. परत कधी बापजन्मात मराठीच्या विरोधात एक वाकुडा शब्द उच्चारण्याची हिंमत झाली नसती. च्यायला...

    ReplyDelete
  25. संकेत, वर म्हटल्याप्रमाणे सुरुवातीलाच नडायाच नव्हतं. पण पुढच्या वेळी तुझी लिस्ट नक्की वापरेन...छान कल्पना आहे...

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.