Monday, March 15, 2010

९७,५१,१,.... ... ...

काय आकडेमोड चालु आहे आज ब्लॉगवर असा प्रश्न पडला असेल ना? नाही नाही कुठली नंबर सिरीज नाही आहे किंवा कोडंही नाही?? ९७ वी पोस्ट टाकताना त्या ५१ शिलेदारांचे आभार मानत वाढदिवस क्रमांक १ साजरा करतोय आज माझा ब्लॉग, इतकंच सांगताहेत हे आकडे. ९७,५१,१,...अशी जगावेगळी सिरीज आहे ही आणि याचे पुढचे क्रमांक उणे नक्कीच नसतील...पुढच्या वर्षी निदान शेवटचा आकडा २ नक्कीच असेल.(कारण त्याला असावंच लागेल) फ़क्त सुरुवातीच्या दोन आकड्यांचं गणित आत्ताच नाही मांडता येणार आणि ते कुठल्याही गणितीला सांगता येणार नाही...आहे नं मजा??


खरं सांगायचं तर माणसांबद्दलची विरक्ती म्हणा किंवा इथल्या कडाक्याच्या थंडीने येणारा एक विचित्र एकांडेपणा म्हणा, या पार्श्वभूमीवर सुरू केलेला हा ब्लॉग म्हणजे बरेचदा माझा स्वतःचा स्वतःशी सुरू असलेला संवाद होता. कुणाशीही न बोलताही बर्‍याच जणांशी व्यक्त होण्याचं माध्यमच जणू. पण नकळत हा संवाद इथे प्रतिक्रिया देणार्‍या वाचकांशी सुरू झाला आणि घरगुती विषयही ब्लॉगवर निःसंकोचपणे मांडले गेले. लौकिक जगात भेटतात तशीच टिकाऊ आणि विसरून जाणारी दोन्ही प्रकारची मंडळी इथे भेटली. त्यांचं येणं आणि मुख्यत: जाणं दोन्ही आधीच गृहित धरलं होतं पण तरी चुटपुट तर लागतेच पण त्याचवेळी मनापासुन आठवण काढणारी थोडी जरी असली तरी जास्त जवळीची माणसंही भेटू लागली. माझे आधीचे मित्र दीपक, तन्वी आणि महेंद्रकाका यांच्याशी असलेली मैत्री ब्लॉगिंगमुळे आणखी वाढली तर भाग्यश्री, हेरंब, रोहन असे अनेक नवे मित्र-मैत्रीणी भेटले ज्यांची ओळख फ़क्त ब्लॉगपुरता मर्यादित राहिली नाही...या ब्लॉगचं इतकं सुंदर आणि साजेसं विजेट बनवल्याबद्दल भुंगादादांनी आभार मानु नकोस असं कधीच सांगितलंय पण त्याचा उल्लेख या पहिल्या वाढदिवशी केलाच पाहिजे आणि या ब्लॉगच्या निमित्ताने मराठी मंडळींनी जी माझी दखल घेतली आहे त्याबद्दल त्यांचेही आभार...
आणखीही ब्लॉगवर आवर्जुन प्रतिक्रिया देणारे सर्वच जण मिळून जणू काही ’कारवॉं बन गया’ ज्यांच्यामुळे वर्षभर मी काही ना काही लिहित गेले....

बर्‍याचदा काय लिहू असा प्रश्नही पडायचा. तरी आठवड्याला एक म्हणजे महिन्याला जास्तीत जास्त चार-पाच या गुणाकाराने वर्षाकाठी साधारण साठेक पोस्ट्सचं टार्गेट ठेवलं होतं..पण डिसेंबरमध्येच तो आकडा ओलांडला तेव्हा निदान शंभर पोस्ट्सतरी करूया असं नवं लक्ष्य स्वतःसाठी ठेवलं आणि साधारण त्याच्या जवळपास आलेय...कदाचित तीन पोस्ट्स टाकुही शकले असते पण मध्येच बर्‍याच इतर गोष्टींना प्राधान्य द्यावे लागले.

मागच्या पाडव्याला एक छोटी गुढी उभारली होती आणि आता वर्ष पूर्ण करताना ते ५१ साथीदार आणि बरेचसे मूक वाचक ज्यांचा १५०००+ आकडा माझ्यासारख्या नवख्या ब्लॉगरसाठी खूपच प्रोत्साहन देणारा आहे या सर्वांसाठी आजची पोस्ट. शिवाय वाढदिवसाचा केक खास मराठी मंडळीवर ठेवलाय आणि नवीन वर्षाचं औचित्य साधून ब्लॉगचं रुपडं थोडं बदललंय...आपल्याला आवडेल आणि येत्या वर्षी या ब्लॉगवर आपण नक्की यापेक्षाही जास्त प्रेम कराल ही आशा..

पाडव्याच्या अनेक अनेक शुभेच्छा...नववर्ष भरभराटीचं जावो...

23 comments:

  1. अभिनंदन... आणि निषेध.. माझ्या नावाला लिंक दिली नाहीस... ही ही .. नेमक्या कुठल्या ब्लॉगची लिंक द्यायची असा प्रश्न पडला नाही ना तूला? वर्ष भर उत्तम रित्या लिखाण केलेस. असेच पुढे करीन रहा हिच इच्छा... नवीन वर्षाच्या तूला आणि तुझ्या कुटुम्बास शुभेच्छा ... :)

    ReplyDelete
  2. नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा.
    ब्लॉगसाठी पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
    उत्तरोत्तर प्रगती होतंच जाईल यात शंका नाही...

    ReplyDelete
  3. या शुभ मुहूर्तावर सारी दुःख विसरून, प्रेमाची गुढी उभारूया!!
    हे नववर्ष आपणा सर्वांस सुख समृद्धी, यशाचे व भरभराटीचे जावो!!!!

    पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!

    अपर्णा ताई, तुझ्या ब्लॉगच विजेट कॉपी करता येत नाही. . .ते कस लिंक करणार ब्लॉगवर???

    ReplyDelete
  4. अपर्णा, नववर्षाच्या व ब्लॉग वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! केक पाहून आलेय मराठी मंडळीवर! मस्त दिसतोय :-)
    अरुंधती
    --
    Sing, Dance, Meditate, Celebrate!
    http://iravatik.blogspot.com/

    ReplyDelete
  5. अरे वाह आज वाढदिवस आहे तर 'माझिया मना'चा
    अभिनंदन तसेच नव वर्षाच्या शुभेच्छा
    असेच लिहित रहा मस्त लिहित असतेस
    आणि हे नवीन रूप छान आहे

    ReplyDelete
  6. नववर्षाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा......
    ब्लॉगसाठी पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
    उत्तरोत्तर प्रगती होतंच जाईल यात शंका नाही लेकरू मोठं होतय विषय आपोआप वाढतील...... भरपुर लिही आम्ही वाचतोय!!!!!

    ReplyDelete
  7. सगळ्यांचेच आभार..खरं तर कुणालाच नवं टेम्प्लेट आवडलेलं दिसलं नाही म्हणून थोडं खट्टू वाटतंय..
    आणि हो अरुंधती तुम्ही निदान केक पाहून आल्याचं लिहिलंत त्याबद्दल खूपच आभार..एक तर स्वयंपाक्घर हा प्रांत नसतानाही त्यात डोकावलेय म्हणून थोडं टेंशन...:)
    मनमौजी सध्या तरी विजेट कोड हाताने कॉपायला लागेल...कॉपी पेस्ट फ़क्त तेवढ्या भागासाठी कसं करायचं ते शोधते...

    ReplyDelete
  8. अरे वा गुढी पाडव्याच्या दिवशी पाहिलं वर्ष पूर्ण केलंस की (हे म्हणजे अरे वा मॅच आणि हायलाईट्स एकदम शेम-टू-शेम होते म्हणण्यासारखं आहे. पण तरीही उगाच चंमतग).. आणि विषय न सुचणं हा तर सगळ्यांचा कॉमन रोग आहे बहुतेक (अपवाद महेंद्र काका).. आणि त्यामुळेच मग 'कं' आणि 'पिझ्झा' सारख्या पोस्ट्स टाकाव्या लागतात. :P
    असो. वायफळ बडबड खूप झाली. गुढीपाडव्याच्या आणि पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ते तिन्ही आकडे पुढच्या वर्षी दुपटीने (तिपटीने, चौपटीने....) वाढोत ही सदिच्छा !! अशीच भरपूर लिहीत राहा...
    आणि हो ब्लॉगचं नवीन रुपडं छान आहे. (हे तू आधीच्या कमेंट मध्ये लिहिलं आहेस म्हणून लिहीत नाहीये. खरंच आवडलं नवीन रूप.)

    ReplyDelete
  9. अपर्णा, अभिनंदन!!! खूपच मस्त सजल आहे नवीन रूप. मला आवडले. आणि ब्लॉग तर मस्तच बहरलाय. लगे रहो.:) नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा! सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत.

    ReplyDelete
  10. हेरंब भा. पो...अरे जेव्हा ठरवलं पुन्हा ब्लॉगिंग करायचं तेव्हा मागच्या वर्षी लगे हाथो साडे-तीन मुहुर्तामधला एक हा जवळच होता त्यामुळे वाढदिवस विसरायचं टेंशन नव्हतं...(हो रे मीपण त्याबाबतीत थोडी हीच आहे) आणि आता मला थोडं थोडं पटतंय लोक मुहुर्त काढून कामं का करतात ते बघ ना निदान एक वर्षतरी चालवु शकले नाहीतर मागचा अनुभव माहित आहे नं तुला??

    ReplyDelete
  11. भाग्यश्रीताई, अगं छान म्हणावं म्हणून नाही पण नोंदच घेतली गेली नाही म्हणून लिहिलं गं मी तसं...आणि तुझ्या कॉमेन्टबद्दल आभार..आपण दोघींनी नेमकं एकाच मुहुर्तावर ब्लॉगला नवे कपडे घेतलेत...आता काही गोड करून पाठव ना??

    ReplyDelete
  12. सर्वप्रथम हिंदू नववर्षदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
    परवाच तुझ्या सगळ्या जुन्या पोस्ट वाचत होतो तेव्हाच कळला एक वर्ष होईल ब्लॉगला ह्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर. खूप मस्त लिहतेस आणि लिहणार आहेस पुढे हे ही माहीत आहे मला :)
    ब्लॉग टेंपलेट अप्रतिम. असच लिहीत रहाहाहाहा. माझ्या शुभेच्छा...
    God Bless you

    ReplyDelete
  13. सुहास खूप खूप आभार...तू तसंही आधीच मला शुभेच्छा दिल्या आहेत..कुणीतरी पहिली पोस्ट वाचतंय हे ऐकलं की लिहायचा हुरुप येतोच पण तरी आता एक वर्षानंतर विषय शोधावे लागणार आहेत. पण प्रयत्न करेन....तुलाही नववर्षाच्या शुभेच्छा....

    ReplyDelete
  14. आवडला नाही असे का म्हणतेस??? मस्त आहे की... सांगायचे राहून गेले म्हणुन काय आवडला नाही काय..!!! आणि शेवटी लिहिलेले महत्वाचे. नाही का!!!

    ReplyDelete
  15. अपर्णा ताई, माझा आय.डी. खाली देतोय...

    yogesh.mundhe@gmail.com

    ReplyDelete
  16. अभिनंदन!अभिनंदन!अभिनंदन!
    पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि
    आपला ब्लॉग असाच बहरत राहो हि सदिच्छा...

    ReplyDelete
  17. अरे बाबा रोहन एखादी गोष्ट आवडली किंवा नाही आवडली यापेक्षा त्याची दखलच घेतली गेली नाही म्हणून कुठल्याही सर्वसामान्य माणसाला वाटेल तसं वाटलं की मला....बाकी काही नाही..शिवाय मित्रमंडळी असली की विचारतो न आपणहून त्यासाठी...आणखी काही नाही रे....to be honest कुणी ते छान दिसत नाहीये म्हटलं असतं तरी मला चाललं असतं as against anyway... पण तू खास पुन्हा लिहिलंस त्याबद्दल आभार..खरं तर सगळ्या मित्रमंडळींची नावंही काल रात्री उशीरा पोस्ट लिहिताना राहून गेलंय...पण तरी...असो...आता तीर निशाने के उस पार है तो....
    आणि हो तू इतक्या ब्लॉगबरोबर लग्नं लावलीत की कुठलं पुढे मांडायचं म्हणून तुला लिंकशिवाय ठेवलंय हे तुला कळलंच आहे म्हणा पण तरी माझे दोन सेंट्स....:)

    ReplyDelete
  18. देवेंद्र, आभार....

    ReplyDelete
  19. अभिनंदन!
    पुढच्या वाढदिवशी पोस्ट्चे नाव २९७,२५१,२.. होवो.
    नविन टेंप्लेट वेगळे आणि छान आहे.
    नववर्षाच्या शुभेच्छा!!

    ReplyDelete
  20. मीनल बर्‍याच दिवसांनी दिसलीस...तुझी नंबर सिरीज मस्त आहे ....आवडली...आभार.......

    ReplyDelete
  21. अपर्णा,
    खूप खूप अभिनंदन!
    तुझा ब्लॉग असे अनेक वाढदिवस साजरे करो. नविन वर्षाच्या शुभेच्छा!
    सोनाली

    ReplyDelete
  22. सोनाली आणि शिनु धन्यवाद....

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.