Saturday, March 13, 2010

दिसला गं बाई दिसला

ओरेगावात आल्यावर पहिल्याच आठवड्यात फ़्रीवेवर असताना नवर्‍याने विचारलं होतं ’तुला माउंट हुड दिसला का?’ ’कोण हा??’ असं वैतागून म्हणणार होते पण नव्या जागी आल्या आल्या जागेवरूनच वाद नको म्हणून फ़क्त ’नाही’ इतकंच म्हटलं..त्याला वाटलं असणार इतके महिन्यांचं प्लानिंग करुन आपण घर बदललं तर या बयेने निदान नव्या जागेची सर्वसाधारण माहिती काढली असेल..आता त्याला कुठे सांगु घर सोडावं लागण्याचा सल आणि किती मोठा दगड मनावर ठेवला होता ते? असो...खरं तर अद्यापही मनाने मी कधीकधी आमच्या स्प्रिंगफ़िल्डच्या घरात असते त्यामुळे इथे यायचं पक्कं ठरलं तेव्हा नव्या जागेची माहिती काढण्याऐवजी जुन्याच जागेत गुंतलेलं मन मोकळं करत राहिले...वाटतं याबाबतीत पुरुषांपेक्षा स्त्रीया जरा कांकणभर अधिकच हळव्या असतात...असो..तो विषय नाही आज मी जरा दोन घडे जास्तच तेल ओतलंय..

तर हा ’माउंट हुड’ इतकं त्याने विचारुनही का कोण जाणे पण माहितीच काढली गेली नाही..पण आमच्या नवरा-बायकोत थोडा सुसंवाद व्हावा म्हणून त्यालाच विचारलं तेव्हा तसं कुतुहल जागंही झालं होतं पण...हा पण आहे नं तो मला ओरेगावात बराच त्रास देणार आहे एकंदरित..(चला भरकटा परत एकदा....) माउंट हुड हा ओरेगावातला जवळ जवळ कायम बर्फ़ाच्छादित असणारा पर्वत आणि इथली लोकं उन्हाळ्यात वेड लागल्यासारखी त्या पर्वतापासून ते पॅसिफ़िक कोस्ट पर्यंत चक्क धावतात..hood to coast असं नाव असणार्‍या या शर्यतीची नोंदणीच्या दिवशीच फ़ुल्ल होण्याचा तीन वर्षांचा रेकॉर्ड आहे...बापरे..ही शर्यत पाहिस्तोवर ब्लॉगवर काही लिहायचं नाही असं खरं तेव्हा ठरवलं होतं पण...ह्म्म्म हा पण....

काही नाही असेच अधुनमधुन माउंट हुड, माउंट हुड माझा नवरा करत होता पण आलो तेव्हा पाऊस आणि मागेच म्हटलं होतं ते डिमेन्टरवालं धुकं कमी व्हायची काही लक्षणं नव्हती...मला तसंही नवी जागा म्हणून रुळायलाच वेळ लागत होता तिथे हे माउंट हुड शोधायचं नवं लचांड कुठे मागं लावून घेऊ? म्हणून मीही काही विषय वाढवत नव्हते..आणि यार भटकंती करायला आवडते म्हणून काय सगळे डोंगर मला लगेच माहित व्हायला हवेतच का? (त्याच्या टोमण्याला तो कधीच वाचणार नाही हे माहित असूनही दिलेलं उत्तर आहे हे)..

एकतर मुव्हिंगवाल्यांनी सामान पोहोचवण्याची मुदत साधारण १४ दिवस (सरळ १५ दिवस किंवा दोन आठवड्याला राउंड ऑफ़ का नाही करत हो हे??) दिल्यामुळे कमीत कमी सामानात राहायची शिकस्त चालु होती आणि अशात एका रविवारी एकदाचा सामानाचा ट्रकोबा आला..(पक्षी: साधे असतात ते ट्रक आणि १६ चाकीबिकी असतात ते ट्रकोबा). आणि आल्यावर हे सगळं सामान एकत्र का आलं असं झालं...असो...(पक्षी: अगं बये पोस्टचा विषय काय? तुझं चाललंय काय??)...आधीच टिचभर वाटणार्‍या स्वयंपाकघरात ढिगभर बॉक्सेस आणि जरी सगळं फ़र्निचर आणलं नसलं तरी जे काही डाग (टि.व्ही, डायनिंग, रॉकिंग चेअर इ.इ...) आणि ५९ बॉक्सेस म्हटल्यावर काय होणार त्या बिचार्‍या दोन बेडरुमवाल्या अपार्टमेंटचं? काही नाही मध्येच आमचा मुलगा या सामानापाठी हरवुन जाईल की काय या विवंचनेत आम्ही नेटाने जागा करत कसेबसे दुपारपर्यंत संपुर्ण घर सामानमय होऊन बसलो...

नशीब आमचं एक मो चं ग्रिल (म्हणजे आपल्या चिपोटले इ. कुठल्याही मेक्सिकन भावांचा सख्खा भाऊ) आमच्या घराजवळचं आहे..त्यामुळे आमचा ट्रकर त्याचा ट्रकोबा काढण्याआधीच पळालो ते दुपारचं जेवण आणायला..आमच्या नशिबाने बर्‍याच दिवसांनी अगदी स्वच्छ सुर्यप्रकाशाचा दिवस आला होता. या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या मुख्य एंट्रंसपेक्षा काही भाग मागच्या बाजुने जास्त जवळ पडतो त्यामुळे आम्ही मो साठी मागुन गेलो आणि परत येताना मागच्याच बाजुने आलो.

अपार्टमेंटसाठी उजवीकडे वळणार तोच मी किंचाळले "तो बघ" वॉव ...नवर्‍याच्या भाषेत सांगायचं तर जिसे ढुंढा गली गली वो तो हमारे पिछवाडे मिली.....अरे काय नजारा होता...स्वच्छ सुर्यप्रकाशाच्या पार्श्वभूमीवर देखणा पांढरा शालु चमकत होता. मागच्या बाजुला मोकळी रांच आहे त्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ट्रॅव्हेल चॅनेलवर स्विझर्लंडची दृष्य पाहातो ना तसंच हिरवळी आणि थोडंसं डोंगराळच्या मागे बर्फ़ाचा मुकुट डोकावतोय आणि हाच तो माउंट हुड हे सांगायला मला कुठल्याही साइट, जनरल नॉलेज आणि नवर्‍याचा होकार कसलीच गरज नव्हती....गाडीतच नवर्‍याला बसवुन लगेच सामानाच्या भार्‍यातुन कॅमेरा शोधुन लगोलग परत तिथेच जाऊन त्याचे फ़ोटो काढले हे वेगळं सांगायला नको...

आता जसजसे वसंतातले सुंदर दिवस येताहेत तसतसा हा माउंट हुड पाहायचा छंद अजून वाढतोय..काही ठिकाणाहून तर तो चक्क पुर्ण दिसलाय आणि अद्यापतरी संपुर्ण बर्फ़ाच्छादित दिसतोय..इथल्या वेदर रिपोर्टमध्येही नेहमी त्याची किती हजार फ़ुटाची बर्फ़ाची चादर आहे हे सांगितलं जातं..


जेव्हा जेव्हा हा दिसतो जवळ जवळ तेव्हा तेव्हा गाडी थांबवुन जवळ कॅमेरा घेतल्याचं सार्थक आम्ही केलंय...पोर्टलॅंड डाउन टाऊनच्या इथे जायचं असलं आणि स्वच्छ दिवस असला की अपार्टमेंटमधुन निघताना तो मागे असतो आणि मग हलकेच गाडीच्या उजवीकडे येतो आणि मग परत जाताना जर वेगळ्या रस्त्याने गेलो की बराच वेळ समोर राहतो...इतक्यात पुन्हा एकदा तो असाच संपुर्ण दिसला आणि राहावलं नाही म्हणून ही पोस्ट टाकतेय....आणि इतक्यांदा पाहिलं तरी ते पहिलं दर्शन कायम मनात राहिलंय आणि तेव्हाचं ते गुणगुणणं..."दिसला गं बाई दिसला..."

22 comments:

  1. सही आहे हे माउंट हूड प्रकरण. वर्षभर बर्फाच्छादित म्हणजे सही प्रकार आहे. बाकी तो मोज आमचा पण जाम फेव्ह आहे. तिकडे ती 'Friends' की काहीतरी डिश मिळते. ती ट्राय केली आहेस का? जाम सही असते.

    ReplyDelete
  2. व्वा! वर्षभर बर्फाच्छादीत पर्वत, मस्तच आहे....

    अपर्णाजी, एक विनंती - तुमच्या ब्लॉगवर राईट क्लिक डिसेबल्ड आहे, लेखातिल लिंक दुसर्‍या टॅब मध्ये नाही उघडता येत, तर त्याच्या एच्टीएमएल कोड मध्येच तुम्ही target=blank लिहाल काय? जेणेकरुन ते नविन टॅब मध्ये उघडेल....
    धन्यवाद

    ReplyDelete
  3. अरे वा! माउंट हूड, मस्तच प्रकरण दिसतेय. संपूर्ण बर्फाच्छादीत... तू पण जाणार आहेस का... धावायला...:P. आपले घर सोडणे, सामान भरणे आणि पुन्हा नव्या जागी जाऊन रूळणे-सामान लावणे.... ह्म्म्म्म, तीन अनुभव झालेत. अजूनही पहिल्या घराची आठवण आली की डोळ्यात टचकन पाणी येते. तरिही मला हे प्रकरण आवडते.
    फोटो आणि लेख दोन्हीही मस्त.

    ReplyDelete
  4. अरे हेरंब ती फ़्रेंन्ड्स डिश अजुन नाही खाल्ली..पण करेन..आजकाल बरेचदा तिथलं पिक-अप असतं..उसका नंबर भी आयेगा...

    ReplyDelete
  5. आनंद मी ते बदल करते लवकरच..आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..

    ReplyDelete
  6. श्रीताई, मला काय म्हणायचं होतं ते तुला कदाचित सगळ्यात जास्त चांगलं कळलं असेल...आपण फ़ार जीव लावतो नं??आजकाल मला इथे फ़ुललेली डॅफ़ोडिल्स पाहिली तरी माझं जुनं अंगण आठवुन कसंतरी होतं....
    तरी इथे नवनवीन बर्‍याच गमती आहेत त्यामुळे होईल सवय...

    ReplyDelete
  7. वॉव,,मस्त...वर्षभर बर्फाच्छादित म्हणजे धम्माल. ट्रेक मस्त होईल इथे :)

    ReplyDelete
  8. सुहास, हा डोंगराळ भाग थंडीत खूपच बर्फ़ाळ असतो..आताच एका हरवलेल्या गिर्यारोहक स्त्रीसाठी सुरू केलेलं शोधसत्र ती नं सापडल्यामुळे बंद केलंय...असो..अर्थात इथे वर जायचा रस्ताही असेल अद्याप आम्ही वरपर्यंत गाडीने गेलो नाही पण बहुधा जाऊ लवकरच...

    ReplyDelete
  9. अहो आम्ही फोटो पाहून येव्हढे आनंदित होतो तर तर तुम्ही प्रत्यक्ष पाहानारांना किती आनंद होत असेल. तो हि वर्ष भर.

    ReplyDelete
  10. रविंद्रजी, सूर्यकिरणे बर्फ़ाच्या डोंगरावर पडल्यानंतर तर फ़ारच विलोभनीय दिसतं....प्रतिक्रियेबद्दल आभार...

    ReplyDelete
  11. mast ga sahi aahe Mount Hood javun ye ekda aani parat post tak ......... :)

    ReplyDelete
  12. वाह... "माउंट हुड" धम्माल आहे. . . शेवटून दुसरा फोटो खुपच सुंदर आहे!!!

    ReplyDelete
  13. धन्यवाद मनमौजी...कॅमेराच्या झुमची कमाल आहे...आणि त्याठिकाणाहून तसाही चांगला व्ह्यु होता...:)

    ReplyDelete
  14. सुंदर फोटो!
    तू जाणार का मग धावायला? :)

    ReplyDelete
  15. are wa mhanje kevha pan ja..
    aani barfa cha aanad ghya asech zale.....
    dilip

    ReplyDelete
  16. गेले असते गं गौरी पण वाचलंस नं त्याचं रेजिस्ट्रेशन लवकर बंद होतं..नाहीतर तीन दिवस धावायला काय?? इतकी वर्षे काय कमी धावतोय?? ही ही ही...

    ReplyDelete
  17. धन्यवाद दिलिप आणि ब्लॉगवर स्वागत...मला आता प्रत्यक्ष उन्हाळ्यात कळेलच ते पण निदान त्याचं हुड म्हणजे वरची टोपी तरी नेहमीच बर्फ़ाच्छादित असेल असं वाटतंय...

    ReplyDelete
  18. खुपच छान आहे माउंट हूड...
    hood to coast मध्ये सहभागी होवुन एक पोस्ट टाका.
    बाकी तो बर्फ़ाचा मुकुट पाहुन काही आठवल आहे मला खरडतो ब्लॉगवर...

    ReplyDelete
  19. देवेंद्र, अरे ती तीन दिवसांची शर्यत असते...त्याचा थोडाफ़ार भाग पाहता आला तर नक्की लिहेन....आणि हो तुमचा बर्फ़ाचा मुकुट आम्हालाही वाचायला आवडेल...

    ReplyDelete
  20. मध्ये आम्ही कोलोरॅडोला गेलो होतो. तेव्हा तिथे एका कॉटेजमध्ये राहिलो होतो. त्याच्या मागच्या बाजूला असंच दृश्य होतं. हिमाच्छादित पर्वतांची एक रांग होती. एवढं विलोभनीय दृश्य होतं ते. एका रात्री आम्ही ३ वाजता झोपलो होतो. तरीही मी केवळ ती हिमशिखरं पाहण्यासाठी ६ वाजता उठलो होतो. आणि ९ वाजेपर्यंत भान हरपून पाहत होतो. तिथून परत यावसंच वाटत नव्हतं..

    ReplyDelete
  21. खरंय संकेत...अशा काही जागा असतात जिथून कधी हलूच नये असं वाटत....भान हरपून जात...योगायोगाने आम्ही याच विकांताला आणखी एका ठिकाणाहून हाच डोंगर आणखी जवळून पाहून आलो...अजूनही बऱ्यापैकी बर्फ आहे...लिहीलं पाहिजे...

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.