Monday, February 22, 2010

रेडिओ

लहानपणी रेडिओचं इतकं वेड होतं की खेळताना पण "रेडिओ आणला.धुतला पुसला (आणि मग हाताला चिमटा काढुन) लता मंगेशकरचा आवाज कसा आला?" असा खेळ खेळायचो..टिव्हि तेव्हा आला होता पण माझ्या घरी तो यायला माझ्या भावंडांची दहावी आणि माझी आठवी इतकं उजाडावं लागलं...पण रेडिओ नक्की केव्हा आणला हे आठवत नाही म्हणजे नक्कीच अगदी मी खूप लहान असल्यापासुन असणार. त्यामुळे एकटं असताना रेडिओ ऐकणं हा माझा अजुनही आवडता कार्यक्रम आहे..


शाळेच्या वयात "बालदरबार" हा एक अतिशय आवडीचा कार्यक्रम होता. त्यावर बोक्या सातबंडे ही मालिका ऐकली होती आणि मला वाटतं बुधवारी आणि शुक्रवारी रात्री आठ वाजता गाण्याचा एक कार्यक्रम होता त्यात कुठल्या तरी शाळेच्या (प्रसिद्ध शाळा असायच्या पार्ले टिळक. बालमोहन अशा त्यामुळे माझं रेडिओवर निदान समुहगान गायचं स्वप्न केवळ फ़ेमस शाळेत नसल्यामुळे भंगलं असं मला म्हणायला आवडतं..असो...कंस पुर्ण करायला हवा) तर बुधवारी त्या समुहगीताची चाल त्या मुलांना शिकवली जायची आणि मग शुक्रवारी तेच गाणं परत गाऊन घेतलं जायचं..जास्त प्रसिद्ध नसलेली पण निव्वळ बालदरबारमध्ये शिकवलेली म्हणून कितीतरी गीतं अशी पाठ झालेली आठवतात.म्हणजे अगदी आठवायचं झालं तर "प्राणाहुनही प्रिय आम्हाला अमुची भारतमाता, या भूमीच्या धुलीकणांनी सजवु अपुला माथा" इतकी सुंदर चाल आहे नं..फ़क्त आता कोणते गीतकार आणि संगितकार त्या कार्यक्रमात यायचे तेवढं मात्र आठवत नाही...शाळेत असताना जितकं आवडीने बालदरबार ऐकायचो तसंच गंमत जंमत म्हणूनही एक कार्यक्रम होता त्याचं टायटल सॉंग माझ्यासारखंच बर्‍याच जणांन आठवत असेल..."गंमत जंमत या या गंमत जंमत, ऐका हो गंमत जंमत हो हो गंमत हो जंमत..." असं...पण फ़क्त लहान मुलांचेच कार्यक्रम ऐकायचो असंही नाही.

आई-बाबा कामावर जायच्या आधी रेडिओच्या घड्याळ्यावर त्यांची कामे चालायची म्हणजे सकाळचे संवादच असे की "बातम्या झाल्या तरी आज अजुन डबे भरले नाहीत" किंवा "आज उठायचं नाही का? राजाभाऊपण आले"..हे सर्व कार्यक्रमही कान सराईतपणे ऐकायचे आणि त्यामुळे सवासातला लागणार्‍या मराठी गाण्यांनी दिवस सुरू व्हायचा तो ती गाणी मनात ठेवुनचं..मग साधारण आठेक वाजताच्या सुमारास मुंबई ब वर जाऊन तिथे हिंदी गाण्यांचा फ़डशा पाडायचा असे. साडे-नऊला शाळेत जायला निघेपर्यंत रेडिओ चालु असे. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा "सांजधारा" हा ब वरच लागणारा मराठी भावगीतांचा कार्यक्रम. संध्याकाळच्या वेळ आशा भोसलेंचं "जीवलगा" किंवा लतादीदींचं "मालवुन टाक दीप" ऐकताना दिवस संपल्याची हुरहुर वाढायची. तसंच अनिल-अरुण यांनी संगितबद्ध केलेली आणि अनुराधा पौडवालनी गायलेली "पिया साहवेना हा एकलेपणा", "गीत प्रितीचे कुठे हरवले सख्या" यासारखी कितीतरी सुंदर गाणीही इथेच परिचयाची झाली. नंतर मग अभ्यास आणि खेळ असले तरी सात वाजता फ़ौजी भाईंयोंसाठीची गाणी आणि भूले-बिसरे गीत यामुळे अनेक हिंदी गीतंही त्यावेळी तोंडपाठ असत. चित्रपट पाहायचा विशेष छंद नसला तरी अनेक छान छान हिंदी आणि मराठी गाण्यांनी ते दिवस भारावलेले असत. आणि त्यासाठी आमचा जुना रेडिओच आमचा सखा बनला होता. तेव्हा सिलोनवर मला वाटतं बुधवारी आठ वाजता अमीन सायानीचं "भाईयों और बहनों"आमच्याही रेडिओवर यावं म्हणून माझा दादा काय काय युक्त्या लढवायचा आणि कितीही खरखर का असेना राजहंसाला फ़क्त पाण्यातलं दूध पिता येतं तसं आम्हाला तिथे फ़क्त अमिन सायानीचं बोलणं आणि नव्या गाण्याचा त्या आठवड्यातला नंबर आणि टॉपचं गाणं एवढं बरोबर ऐकायला यायचं..

काळ पुढे गेला आणि कामावरुन घरीच यायला रात्र होऊ लागली. टिव्हीचं आक्रमण होतंच शिवाय आता वेळही कमी मिळायचा पण तरी सकाळचा रेडिओ आणि निदान रविवारचं सांजधारा बरीच वर्ष आमच्या घराचा एक अविभाज्य अंग होता.

देश बदलला पण रेडिओची आवड तशीच फ़क्त आता ती इथली चॅनेल्स, एन.पी.आर. आणि कंट्री क्लासिकची चॅनेल्स यापुरता मर्यादित आहे. प्रवासाला जाताना कितीही छान छान सी.डी. एम.पी थ्री असल्या तरी रेडिओ ऐकणं होतंच..तरीही हिंदी मराठी गीतं रेडिओवर ऐकायची इच्छा व्हायचीच...मग केव्हातरी eparasaran ची लिंक मिळाली. माझ्या दोन प्रोजेक्ट्स मधला, म्हणजे शुद्ध शब्दात 'बाकावरचा काळ' या चॅनेलने सुसह्य केलाय.

मला रेडिओवर ऐकायला मिळणार्‍या गाण्याबद्द्ल सगळ्यात जास्त काय आवडतं ते म्हणजे पुढचं गाणं कुठच्या मुडचं येईल काही कल्पना नसते पण गाणं सुरु होतं, आपण ऐकायला लागतो आणि नकळत त्याच मुडचे होऊन जातो. पुढच्या गाण्याला पुन्हा वेगळा मुड..जसं "ए री पवन" मधला लताचा आवाज मुग्ध करून काश्मीरच्या खोर्‍यात घेऊन जातो तसंच झटक्यात "रिमझिम गिरे सावन" ने आपण परत चौपाटीवरच्या उसळत्या दर्यावर येतो.आपल्या मनाला इतकं छान झुलवायची ताकद रेडिओच्या आपकी पसंदमध्ये आहे हे माझ्यासारखे रेडिओवेडे नक्कीच मान्य करतील.

23 comments:

  1. वॉव.. माझं आणि बायकोचं परवाच अगदी याच exact विषयावर बोलणं झालं :)
    सेम पिंच BTW. माझ्या वाटचं नाही बायकोच्या वाटचं. तिला पण प्रचंड आवडतो रेडियो. मला विशेष आवडता नसला तरी तू म्हणतेस तसा आमच्याही घरी लहानपणी रेडियो पहाटेपासून सुरु असायचा आणि त्या टायमिंगवर सगळी कामं उरकायची. बाकी त्या सकाळच्या रेडियोनेच मला असंख्य मराठी भावगीतं, लोकगीतं, भजनं, अभंग यांची ओळख करून दिली.
    एकदम मस्त पोस्ट..

    ReplyDelete
  2. हेरंब, अनुजाला पण सेम आणि थोडा मोठा (आता तुला काढायला मिळतो म्हणून मोठा काय??) पिंच...
    आताच इप्रसारण वर ती शेवटी दोन गाणी दिलीत नं ती ऐकली आणि एकदम रेडिओच्या त्या जुन्या जमान्यात (एकटीच) गेले रे....तुम्ही पण ऐकता का हा ऑनलाइन रेडिओ???

    ReplyDelete
  3. अपर्णा, काळ एकदम मागे गेला बघ तुझी पोस्ट वाचून. खूपच छान लिहीलेस ग. बारिकसारिक गोष्टींची मस्त याद दिलीस. प्राणाहुनी प्रिय...अगं हे गाणं मलाही चांगल आठवतयं पण कोणी लिहीलेय कोण जाणे.रेडिओच्या तालावरच कामे चालत. माझ्या मनात त्यावेळी सतत लागणारी ’ रात्र काळी घागर काळी ’ ही गवळण तर रूतून बसली आहे.काळ बदलला रेडिओचे रूपडेही( कार्यक्रमांचे ) बदलले पण मनातल्या आठवणी आजही ताज्या आहेत.अमिन सयानी,सुशिल दोषी, टेकाडे भावजी, अनंत-पुष्पा भावे, आणि बरीच मंडळी आजही स्मरणात आहेत. या रेडिओ लावून अभ्यास करण्यावरून लयीच बोलणीही खाल्लीत. :P

    ReplyDelete
  4. चला 'प्राणाहुनही प्रिय' आवडणारं आणि माहित असलेलं कुणीतरी भेटलं..बरं वाटलं तुझी प्रतिक्रिया वाचुन...आता पुर्वीइतका नाही पण एफ़ एम ऐकणारी बरीच लोकं आहेत म्हणा...आता ते मायदेशात कायमचे जाऊ तेव्हाच कळेल...:)

    ReplyDelete
  5. हो ना..टेकाडे कुटुंबीयांच संभाषण एक भाग होऊन गेला होता प्रातसमयीचा..आता मुंबईमध्ये फक्त एफएमचे च वार आहे..पण जुन ते सोन हे खरच..मस्त पोस्ट

    ReplyDelete
  6. हो. ते इ-प्रसारण हल्लीच ऐकायला लागलो आम्ही. मस्त असतं.

    ReplyDelete
  7. सुहास "जुनं ते सोनं" अगदी बरोबर बोललास...

    ReplyDelete
  8. लहानपणी बरयाच वेळी ऐकायचो रेडियो...
    त्यानंतर ३-४ वर्षाआधी रात्री अगदी नियमीत ऐकायचो ते लवगुरु वैगेरे येते ना एम.एम. वर ते, छान गाणी असतात त्यात.प्रवासात बाकी अजुनही रेडीयो बरा वाटतो.लेख छान झाला आहे.

    ReplyDelete
  9. देवेंद्र, लवगुरू बहुतेक मागच्या मायदेश दौर्‍यात ऐकलंय पण आता विसरलेय..पुढच्या वेळी रिफ़्रेश करेन...प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  10. दिवसाची सुरुवात व्हायची सकाळी सहावाजता अर्चना ह्या भक्ती संगिताच्या कार्यक्रमाने. नंतर बातम्या.. प्रवाचिका विजयश्रीः, किंवा प्रवाचको बलदेवानंद सागरः हे वाक्य अगदी डॊक्यात पक्कं बसलंय. संस्कृत बातम्या तर रोज ऐकायचो आम्ही.
    जुन्या दिवसांची आठवण करुन दिली.

    ReplyDelete
  11. संस्कृत मला शाळेतही नव्हतं त्यामुळे नेहमीच थोडं वैट वाटायचं. आणि हो दिवाळीच्या पहाटे ते विशिष्ट आवाजातलं किर्तन असायचं त्याने जाग यायची त्याचा उल्लेख राहिलाच...
    आपली प्रतिक्रिया आली की जरा जास्तच बरं वाटतं महेंद्रकाका...

    ReplyDelete
  12. लहानपण रेडीओवर भक्तिगीते आणि दुपारची भावगीते आणि संध्याकाळी ७च्या बातम्या ऎकण्यात गेले.. थोडं मोठं झाल्यावर एफ-एम ने वेड लावलं. त्यावेळी टाईम्स एफ-एम नावाचं एकच चॅनेल होतं. चांदनी आणि राहत जाफरीच्या आवाजाची सर आजच्या एकाही फिमेल रेडीओ जॉकीला नाही. रात्री १० वाजता राहत जाफरी मधाळ आवाजात निवेदन करतेय आणि लताचं ’सारा प्यार तुम्हारा..’ हे गाणं.. अहाहा.... आत्ताचा जीतुराज तेव्हाही होता पण हल्ली जरा अती करतो.

    असो,
    प्रकटन आवडले :)

    ReplyDelete
  13. धन्यवाद दिपक...जितुराजचा आवाज ऐकलाय पण तुझी मधाळ जाफ़री अद्याप असेल तर ऐकावी लागेल...

    ReplyDelete
  14. रेडियो सारखी मजा नाही. . .मी अन् माझ्या २ बहिणी आम्ही रात्री बेला के फूल अगदी ना चुकता ऐकायचो....त्या सोबत आमचा गप्पांचा फड जमायाचा. . . आज पण त्या घरी आल्या की आम्ही न चुकता रेडियो ऐकतो. . .पोस्ट वाचताना मजा आली सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

    ReplyDelete
  15. अमीन सयानीचं भाईयो और बहनों आणि रजनीगंधा कार्यक्रम मलाही जाम आवडतो. अजूनही रेडिओचं असणं जिवंत आहे पण आरजे कधीकधी फारच पकवतांत.. ईप्रसरणची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. आता माझाही बाकावरचा काळ सुसह्य होईल..

    ReplyDelete
  16. माझ्या लहानपणी टिव्हीचे आक्रमण झाले होते, पण सकाळच्या सातच्या बातम्या मात्र आवर्जुन बाबा लावायचे. सद्ध्या फक्त रात्री ११-१ रेडिओ सिटी ऐकतो कधी कधी, जुनी छान गाणी लागतात....

    ReplyDelete
  17. छान आठवणी जागवल्यास, अपर्णा! मस्त लेख!! :-)

    अरुंधती
    --
    Sing, Dance, Meditate, Celebrate!
    http://iravatik.blogspot.com/

    ReplyDelete
  18. मनमौजी, ’बेला के फ़ूल’ मी लिहीणार होते पण अगदी शाळेत असेपर्यंत आठला जेवणं आणि नऊला निजानीज असं असायचं त्यामुळे बेला के फ़ूल जरा नंतर नंतर ऐकु लागले पण ती गाणी खरंच अप्रतिम वाटायची रात्रीच्या शांततेत...

    ReplyDelete
  19. मीनल, इप्रसारण तुला नक्की आवडेल...

    ReplyDelete
  20. आनंद, टिव्ही आल्यामुळे फ़ार फ़रक पडला नाही अगदी सुरुवातीला..पण नंतर चोवीस तास दळण दळणार्‍या वाहिन्यांमुळे रेडिओ संस्कृतीचं फ़ार नुकसान झालं...

    ReplyDelete
  21. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद अरुंधती...

    ReplyDelete
  22. Bela ke phool, Binaka Geet Mala, Vividh Bharati aani kititari anek karyakram. Mi yuvavaani pan aikayacho kehva tari. Cricket Comentary transistor war aikanyachi maja kahi aurach hoti..
    Gele te din gele..pan aathawani rahatilach. Sundar lihila aahes. - Sachin

    ReplyDelete
  23. Sachin sorry I m replying you so late. Welcome on the blog. :)
    Yuvavaani chi music mala ajun aathwate pan karkram aikla navhta.

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.