Saturday, February 6, 2010

खेकडेगिरी

बरेच दिवसांपासून आमची शेजारीण साशा तिची बोट पाहायला जाऊया म्हणत होती. या ना त्या कारणाने ते जमलं नव्हतं पण दोनेक आठवड्यापुर्वी तिच्या बोटीला गिर्‍हाइक आलं आणि मग तिनं पुन्हा एकदा तो विषय काढला. खरं तर माझ्या नवर्‍याला का कुणास ठाऊक थोडं विचित्र वाटत होतं अर्थात त्याला कुणामध्ये मिसळायला माझ्यापेक्षा जास्त वेळ लागतो त्यामुळे ते साहजिकच होतं म्हणा पण त्यादिवशी जेव्हा ती म्हणाली की आपण बोटीवर जाऊ आणि थोडे खेकडे पकडू म्हणजे थोडक्यात lets go crabbing.. हा निरोप नवर्‍याला दिला आणि मग मात्र "अरे चला चला.. लवकर जाऊया" असं लगेचच चालु झालं. शेवटी मागच्या रविवारी आमची वरात पॅसिफ़िक कोस्टच्या न्यु पोर्ट बंदराकडे निघाली.

आम्हाला साधारण तीनेक तास ड्राइव्ह अंतरावर हे बंदर आहे आणि आमच्या गाईड साशाने आम्हाला येताना आणि जाताना वेगवेगळ्या रस्त्याने नेलं. याआधीही मी तिच्याबरोबर एक-दोन जवळच्या ठिकाणी गेलेय आणि हिला या भागाची खूप छान माहिती आहे हे माहित झालं होतं त्यामुळे तिच्याबरोबर जाताना GPS चक्क काढुन ठेवायचं आणि डोळ्यांना सृष्टीसौंदर्य पाहायला तयार ठेवायचं बास.....
न्यु पोर्टला जाताना आम्ही कोर्व्हेलिसवरून गेलो आणि येताना पॅसिफ़िक कोस्टच्या सिनिक बायवे वरून सगळे फ़्री वे टाळून आलो. दोन्ही रस्त्यांनी जाताना वेगळाच नजारा होता.जाताना दोन्ही बाजुला मोकळ्या शेती आणि मध्येच वळणावळणांच्या दुतर्फ़ा उंचच उंच देवदारांच्या रांगा, थोडावेळ देवदारांनीच गच्च भरलेले डोंगर अशी डोळ्यांचे पारणे फ़िटतील अशी सौंदर्यस्थळं होती. शिवाय आमच्या नशीबाने लख्ख सुर्यप्रकाशामुळे तो टिपिकल इथल्या थंडीचा पावसाळी फ़िल नव्हता आणि बाहेरही प्रसन्न वाटत होतं. आणि परत येतानाच्या रस्त्याचं तर मी शब्दात वर्णनच करू शकणार नाही. डावीकडे दिसणारा प्रशांत महासागर आणि वरखाली होत जाणार्‍या रस्त्यांमुळे मध्ये समोर येणारा दर्या आणि क्षितिज एकाच रेषेवर असं फ़ार छान दृष्य दिसे. या रस्त्यावर अर्धाअधिक वेळ प्रशांत महासागराला लागुनचा रस्ता म्हणजे हवाई बेटांमधील मौईतलं लनाईला गेलेलो त्याचीच आठवण व्हावी. अर्थात दोन्हीकडे महासागर तोच आहे त्यामुळेही का माहित नाही पण पुन्हा एकदा पॅसिफ़िक कोस्टने वेड लावलं..
साधारण साडे-अकरा वाजता आम्ही बंदरावर पोहोचलो म्हणजे आधी ठरवलेल्या वेळेच्या किमान एक तास उशीरा...म्हणजे तसं फ़िरायला जाताना त्यातही समुद्रकिनारी जायचं तर वेळेचं काय? पण आमच्या साशा गाईडचं खेकड्यांचं गणित होतं त्यासाठी ते आवश्यक होतं. कारण भरतीचं पाणी खाडीत शिरतं त्याने आत आलेले खेकडे ओहोटीबरोबर परत आत जातात त्यामुळे या मधल्या वेळातच त्यांना टपकावणे आणि मग मटकावणे यासाठी आज तरी आम्हाला ती वेळ साधायची होती. अर्थातच लेट्स ब्लेम इट ऑन आरुष म्हणून आम्ही आमच्या उशीरा निघण्याचं कारण त्याच्यावर ढकललं पण अधिक वेळ न दवडता गाड्या पार्क करुन लगेच इथे तिथे न बघत बसता माझा नवरा आणि साशा तिच्या बोटीकडे पळालेच. तिने खेकड्यांसाठी लावायला आधीच कोंबडीचं पॅकेट घेऊन ठेवलं होतं. त्यातलं थोडं चिकन एका हुकला अडकवुन मग तो संपुर्ण पिंजरा तिची बोट जिथे लावली होती त्याच्याच आसपासच्या पाण्यात ढकलुन ती दोघं इतर सामान उतरवायच्या तयारीला लागले. आरुषही गाडीतली त्याची छोटी झोप पुर्ण झाल्याने उठला होता त्यामुळे मग सर्वच बोटीत बसायला नि बंदर पाहायला निवांत झालो.

आता विकली गेल्याने बोट फ़क्त पाहाणारच होतो पण मुख्य डोळा खेकड्यांवर होता त्यामुळे सुरूवातीला थोडंफ़ार बंदर फ़िरलो, तिची बोटही आतुन पाहिली पण लक्ष मात्र ध्येयाकडे तसं खेकड्याकडे म्हणून शेवटी तिने एकदा तो पिंजरा काढुन पाहिला तर बर्‍यापैकी चिकन गायब होती पण जाल्यात मासली काय गावली नव्हती...अरारा....मग तो गळ बाहेरच्या बाजुने लटकावला होता त्याऐवजी आतल्या बाजुने लटकवुन मागच्या वेळी टाकला होता त्या बाजुला न टाकता जरा उजवीकडच्या अंगाने टाकुया असं ठरवुन पुन्हा पिंजरा आत ढकलला.साशाला मात्र बहुतेक उशीरा आलो असं वाटायला लागलं पण आम्ही काय तसेही नवशिकेच त्यामुळे वाट पाहात होतो.मग लेकाला करमेना म्हणून नवरा त्याला फ़िरायला घेऊन गेला आणि मला पण नुसतं पाहात बसून कंटाळा आला तसा मी तिला पुन्हा एकदा पिंजरा पाहायची गळ घातली..तिनेही काढुन पाहिला तर मी तर उड्याच मारायला लागले आणि आतापर्यंत बर्‍याचदा खेकडे पकडले असले तरी तिही जाम खूश झाली. चक्क मोठ्ठे दोन काळे ढोण खेकडे गळाला म्हणजे आपलं ते पिंजर्‍याला लागले होते.

आणि ही शूर बाई त्यात हात घालुन बिनधास्त त्यांना काढत होती. परत मला त्यातून नर मादी कशी ओळखायची हेही शिकवलं.मी पहिले तिला थांबुन फ़ोटो काढुन घेतले कारण मला माहित होतं इथल्या नियमात बसले नाही तर ती त्यांना सोडून देणार आणि मग परत नाही मिळाले तर निदान फ़ोटोत तरी असुदे.
जर तुम्ही discovery वरची deadliest catch series पाहिली असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर खेकडे कसे पकडतात हे साधारण माहित असेल आमची पद्धत साधारण तशीच पण जरा लो स्केलवरची म्हणायला हरकत नाही.तर हे आम्ही पहिले-वहिले पकडलेले dungenes crabs. पाठीच्या बाजुला पाहिलं तर जो त्रिकोण दिसतो तो नराच्या बाबतीत मादीपेक्षा छोटा असतो. आणि इथल्या कायद्याप्रमाणे तुम्ही एक विशिष्ट वाढ झालेले फ़क्त नरच आपल्याबरोबर पकडून नेऊ शकतात आणि त्यासाठी तुमच्याकडे शेलफ़िश साठीचं लायसन्स हवं (आता अर्थातच साशाकडे ते आहे)

ढोबळ मानाने फ़ोटोत दाखवलंय तसं खेकड्याच्या पाठीच्या भागातला सर्वात जास्त लांबीचा भाग एका डॉलरच्या नोटेच्या मापाइतकातरी पाहिजे. लहान असल्यास त्या खेकड्याला पुर्ण वाढ होण्यासाठी परत पाण्यात इमानेइतबारे सोडायचं. इथे सगळी लोकं हे सर्व नियम कटाक्षाने पाळतात. आता आम्ही वर पकडलेल्या दोन खेकड्यांपैकी एक थोडा कमी वाढीचा निघाल्याने वाचला पण हा पहिला मोठा मात्र आमचा हक्काचा आइसबॉक्समध्ये घातला.
आता या खेकडेगिरीत जरा जास्त रस आला म्हणून मग परत आधीच्या लकी जागेतच आमचा पिंजरा टाकुन पाहिला.तेवढ्यात लेकाल घेऊन नवरा आला आणि लक्षात आलं अरे याने काही पाहिलंच नाही मग त्याला बिचार्‍याला तो आइसबॉक्समध्ये चालणारा खेकडा दाखवला. मला परत पिंजरा पाहायचा आहे अशी त्यानेही गळ घातल्यामुळे त्यालाच म्हटलं बघ आताच टाकलाय तर काही लागलंय का तर ती जागा बहुतेक खरंच लकी होती. यावेळी तर तीन-चार खेकडे बसले होते. त्यातला एक हमखास लहान असणार म्हणून आधीच टाकला आणि दोघांची मापं घेतली तर एक थोडा कमी मापाचा निघाला मग हो नाही करता त्यालाही सोडलं आणि एक आमच्या पदरात पडला.

त्यानंतर अजुन एक खेकडाही मापाचा मिळाला. हळूहळू ओहोटी चालु झाली असणार आणि आमची जेवणं खावणं होऊन दुपारही टळत आलेली. आता आवरतं घेतलं पण अख्खा रस्ता आमच्या खेकडेगिरीच्या गोष्टी चालु होत्या. शिवाय परत जातानाच समुद्रकिनार्‍यालगतचा रस्ता डोळे सुखावत होता.
दुस‍र्याच दिवशी मला साशाने मेलवरुन खेकडे शिजवल्याचं कळवलं आणि ती नेहमी खाते म्हणून सर्वच आम्हाला देत होती पण थोडे मी तिला ठेवले.

माझ्या आईचा चिंबोर्‍याचा रस्सा माझ्यापेक्षा जास्त माझा नवराच आठवत होता पण यावेळी मला तो करता येत नसल्यामुळे किंवा असंच अमेरिकन पद्धतीने म्हणजे साध्या सरळ भाषेत उकडवलेलेच खाऊया असं ठरवलं.याला तिखट आवडतं म्हणून फ़क्त त्याच्यासाठी लाल मिरचीचा ठेचा बाजुला घेतला. खरं सांगते एवढं कष्ट करून, वाटणं घाटणं करुन वेळ घालवण्यापेक्षा असे खेकडेगिरी करून आणलेले खेकडे सरळ असेच शिजवुन खावेत.

अहाहा काय ते लुसलुशीत मांस आणि काय त्याची चव. I can say this was the best crabbing and the best crabs I ever had...Photos speak better than words..Enjoy!!!!!









तळटीप:
कधीपासुन crabbing साठी पर्यायी शब्द शोधतेय पण इंग्रजीत जशी to लावुन कुठल्याही शब्दाचं क्रियापद बनवायची फ़ॅशन आहे तसं आपल्याकडे नाही म्हणून वेळ गेला थोडा पण तरी ज्यांना नसेल कळलं त्यांच्यासाठी खेकडेगिरी म्हणजे शुद्ध भाषेत समुद्र किंवा खाडी (किंवा जिथे मिळतील तिथे) जाऊन खेकडे पकडणे..

22 comments:

  1. अरेरे.. काय हे खेकड्यांना मारताय तुम्ही लोक. :-( .. हे उगाच. मला काय कळतंय त्यातलं म्हणा.. पण पोस्ट झकास नेहमीप्रमाणेच. आणि ते "लेट्स ब्लेम इट ऑन" ला सेम पिंच.. ;-)

    तू पण तळटीप? अरे वा वा. तळटीपा एकदम फार्मात हायेत सध्या..

    ReplyDelete
  2. तळटीप.. वाचायला छान वाटत...
    आणि हो प्रतिक्रिया काय देऊ"?
    एक तर तीन चार वर्षापासून (आधी जन्मापासून... नंतर काही वर्ष सोडली तर) मी फक्त वेजी (फार फार तर एगी )आहे..
    त्यामुळे प्रतिक्रिया दिली तर मांसाहार होण्याचा धोका आहे ... तरी प्रतिक्रिया देणे राहवत नाही..
    खेकडे पकडण्याचे आत्तापर्यंत अनेक किस्से ऐकले होते.. काहीना तर मी बिलातून वगैरे खेकडे पदाकताना live बघितलेही आहे.. पण
    असे बोटीवर जावून खेकडे पकडणे..म्हणजे भन्नाटच अनुभव असेल न...
    मराठी माणसाच्या पूर्वीच्या वृत्तीचे प्रतिक म्हणून खेकडे माहित होते.. ते खातात हे हि माहित आहे..
    खेकड्याचा रस्सा वगैरे वगैरे.. आणि आम्हाला आवडणा-या सचिन तेंडूलकर ला खेकडे खूपच आवडतात...
    त्यामुळे तुमची खेकडेगिरी अजुनची आवडली...
    आम्ही असे पर्यटन फक्त तुमच्या लेखाद्वारे करू शकतो...त्यामुळे प्रतिक्रियेत सहभाग घेणे आले...
    तेवढेच फिरून आल्याचे समाधान...
    असो, प्रतिक्रियेला नांगी टाकतो.. (म्हणजे इथेच थांबतो...)

    ReplyDelete
  3. खेकडेगीरी आवडली. चिपळुणात खेकड्याच्या रस्सा भुर्र..भुर्र.. करुन चापलेला ते आठवले.. लिहलयं पण छान..

    लगे रहो... :)

    ReplyDelete
  4. काय रे हेरंब कमेंट देउन मोकळा आधीच....तरिही
    या पोस्ट वर मी, हेरंब, आदितेय आम्हा सगळ्यांचा जाहिर निषेध नव्हे त्रिवार निषेध....

    ReplyDelete
  5. हा हा हेरंब पुर्वीची लेट्स ब्लेम इट ऑनची भांडणं आता एकदम थांबलीत कारण आम्ही एकमुखाने बोला बोला....:)
    तुझ्यासारखी वटवट येत नसली तरी तळटिपा ल्याहचा प्रयत्न करतो काय म्हटलंय ना चांगलं ते घ्यावं किंवा खाल्ले ते मासे आणि राहिले ते काटे....हे कुठुन मध्येच सुचलं...रोहन कुठे गेला???

    ReplyDelete
  6. अखिल अशा दिर्घ प्रतिक्रियांची सवय नाय रे या ब्लॉगला..इथं रोज काहीतरी साधसुधं घडलं असतं त्याचंच कौतुक सुरू असतं त्यामुळे अर्थात तशी अपेक्षाही नाही...हे हे..
    अरे पण खेकडेगिरी लिहिताना मलाही तू म्हटलंस मराठी माणसाचं आठवलं होतं त्यामुळे न विसरता तळटीप लिहिली...उगाच मला खेकडा व्हायचं नाहीये...:)
    तू मांसाहार करत नाहीस तरी पण ही पोस्ट वाचलीस त्याबद्द्ल पण आभार....हे हे....

    ReplyDelete
  7. दिपक अरे नेहमी तुझे ऑरकुटमधले फ़ोटो पाहुन जळतो नं आम्ही एकदिवस आमचे पराक्रमही पाहा काय??

    ReplyDelete
  8. तन्वी तुला खेकडे पकडायला तुमच्या ब्लेम इट वाल्यांना घेऊन यायचंय का?
    आरुषला तिच्या आइसबॉक्समध्ये हात घालायचा होता..

    ReplyDelete
  9. अग, जबरीच झालीये की तुमची ’ खेकडेगिरी’. तुझी ही धमाल फोनवरही ऐकली होतीच.:) फोटो एकदम मस्त. बाकी चवीबद्दल अन चिंबोरीचा कालवण-अहाहा....असे मी नाय गं बोलू शकत.पोस्ट एकदम मस्त. खेकडे खाऊन अगदी तृप्त होऊन भरल्यापोटी त्यांना शब्दात उतरवून त्यांचे पांग फेडलेस की.’मेलो परी भरून पावलो व शब्दारूपी उरलो ’ असेच म्हणत असतील.:)
    बाकी तन्वीचा निषेध नक्की कशाला आहे....:P

    ReplyDelete
  10. हाय रे मना मी तर आता शाकाहारी पण फोटोस आणि अनुभव वाचून पाणी सुटला बघ एकदम..आवडली खेकडेगिरी :)

    ReplyDelete
  11. भाग्यश्रीताई, ’मेलो परी भरून पावलो व शब्दारूपी उरलो ’ सही आहे....

    ReplyDelete
  12. सुहास एकदा खाऊन पाहणार का मग खेकड्याचं लुसलुशीत मांस.....

    ReplyDelete
  13. लय मोठ्ठाले खेकडे होते वाट्टं... मी बी मागच्या वर्षी गावाकडं गेलतो तव्हा धरले होते नदीमंधी, मावशीच्या गावातल्या...!!! ते बी लय मोठ-मोठाले व्हते.. एकाला त्येच्या भोसक्यातून (बीळातून..!) काढतांना त्याने चान्स साधला व्हता, अन मव्हा आंगठा काडकण फोडला व्हता, त्याच्या आणिदार नांगीणं.. पण मी बी लय भारी, त्याचे सगळे फोटो काढून त्याला १ घंटा उन्हात तपत ठेऊन मंगच त्याच्या बीळात परत सोडला व्हता...! हेऽऽऽ..हेऽऽऽ...! पण मोबाईल बदलला अन त्याचे काढलेले फोटो बी गेले, नाहीतर तुला दाखोणार होतो...! जाऊ दे, पुढच्या वेळी गेलो, की चांगले फुटो काढीन...!

    त्वा त्या खेकड्याचं माउंस खाल्लं, कसं लागतं गं...??? मी बोकड्याचं अन कोंबड्याच्या शिवाय अजुन दुसर्‍याचं टेस्ट नाही केलंय, जर मस्त आसंन, तर पुढची खादाडी रंगणार (खेकड्यांवर...!) असं आत्ताच स्वप्नात येऊन गेलं, पण फोटो काढयाचे तव्हा मोबाईलची चार्जिंग संपली आसं बी दिसलं स्वप्नात....! ;) हाऽऽ....हाऽऽऽऽऽ!!!!

    - विशल्या!

    ReplyDelete
  14. सही.. पण कोण पहातं थोडा लहान असला तरी पण?? चालवुन घ्यायचा नां..
    अनुभव मोठा मस्त वाटतोय. मी बोटिवर फिशींग केलंय बरेचदा.
    पण हे खेकडा पुराण पहिल्यांदाच ऐकलं..
    गोव्याला एकदा एक जहाज ड्राय डॉक ला आलं होतं,( कुठे ते नांव लिहित नाही) बाहेरुन सगळा भाग शेल्स् ने वेढला होता. एक ट्रक भरुन शेल्स मिळाले होते..

    ReplyDelete
  15. कसला सही अनुभव आहे. खेकडा आणि पिंजर्‍यात पकडलात सही. पहिल्यांदाच ऐकल आणि पाहिलं देखील. कोकणात कुशल (हो कुणाला पण नाही जमत) लोकं किनार्‍याजवळ खडकात/कपार्‍यामध्ये जाऊन खेकडे पकडतात. आत्ता होड्या घेऊन समुद्रात जाणारे लोकं पण पकडतात खेकडे पण कसे ते नाही माहीत. आणि काय हो खेकडा पकडल्यानंतर त्याचे पुढचे दोन डेंगे नाही तोडलात? फोटोत तसेच दिसत आहेत. तुमचे हात त्यापासून कसे काय संभाळलात?
    मला जाम excitement वाटते आहे. काश मला पण कधी तरी खेकडे पकडायला जायला मिळेल. आत्ता रत्नागिरीला गेलो की पाहतो जमतं का? बाकी मस्त वर्णन आहे, फक्त तुम्ही ते खेकडे उकडून न खाता रस्सा केला असता तर वर्णन मस्त रसरशीत झालं असतं. आणि हो आधी महेन्द्र काका मग रोहन आणि आत्ता तुम्ही नॉनव्हेज खादडि लिहाली आहे. मला जर का लवकर घरी जाऊन बोंबील, चिकन आणि खेकडे खायला नाही मिळाले तर तुम्हा सगळ्यांच्या पोटात दुखणार आहे. तयार राहा.

    ReplyDelete
  16. क्यो जले पर खेकडा छीडक रही हो अपर्णा....हे हे हे

    ReplyDelete
  17. मी खेकडे खात नाही. कसे खावे हे कळत नाही पण हा खेकडा बघून खाऊन पहाण्याचा प्रयत्न करावासा वाटू लागला आहे. एका खेकड्याचा गळापासून पोटापर्यंतचा प्रवास! खेकडेगिरी हे नावही मस्त आहे.

    ReplyDelete
  18. saasha punha tujhya blog var avatari te pahun anand jhala, ushira commenttatoy tyabaddal mafi :-)

    khekadepuran sorry khedagiri ekdam mast jhaliey, mala khekade khayala jam avdatata buva tyamule pot chagalach khavayalay.

    tujhe te crab che photos pahun ani luslushit maan pahun mi vedach vhyacha baki rahiloy

    ReplyDelete
  19. खरंय विशाल..मोठ्ठालेच होते खेकडोजी...आणि इथल्या कायद्याप्रमाणे घरी न्यायचे खेकडे किमान एवढे मोठे म्हणजे पुर्ण वाढ झालेले असावेच लागतात..तुझ्या फ़ोटोंची वाट आमी बी बगु....हानाच एकदा एक तरी चिंबोरी...रस्सा तर लय जबरी असतो...

    ReplyDelete
  20. महेन्र्दकाका हाच फ़रक आहे इथल्या बर्‍याचशा गोष्टींत. सामान्य माणसं जे छोटे छोटे नियम असतात ते बरोबर पाळतात त्यामुळे मलाही वाटलं नाही कमी वाढीचे घ्यावे. आणि पाहायचं म्हणाल तर पाहिलं जाऊ शकतं पण तरी विश्वासाचा मामला आहे...आपण भारतीयांनी हे एक शिकलं तर फ़ार बरं होईल.बघा नं साधं रस्त्यावर लेनप्रमाणे वाहन चालवलं जात नाही आणि मग कोंडी झाली म्हणून कोकलायचं...इथे सकाळच्या घाईच्यावेळी पण ट्रॅफ़िक असतं पण लोकं मात्र आपली लेन सांभाळून जो कमी जास्त स्पीड असतो तोच ठेवत योग्य ठिकाणी पोहोचतात...असो..भरकटलेच..
    तुमचं गोव्याचं फ़िशिंग करायला नक्कीच मजा आली असणार..आता एकदा कधीतरी फ़िशिंगपण करूया म्हणतोय इथेच...:)

    ReplyDelete
  21. सिद्धार्थ कधी डिस्कव्हरीवर "Deadliest catch" म्हणून एक शृंखला आहे ती पाहायला मिळाली तर बघा. ती लोकं अलास्कामध्ये बेरिंगच्या सामुद्रधुनीत हे खेकडे मोठ्या प्रमाणावर पकडतात त्यांचे पिंजरे खूप मोठ्ठे असतात आणि खेकडे तर अक्षरशः खोर्‍याने. माझा नवरा त्या सिरीजचा मोठा चाहता आहे म्हणून तो लगेच खेकडा मोहिमेसाठी तयार झाला. आणि हाताचं म्हणशील तर म्हणूनच मी साशाला शुर म्हटले ती अगदी अलगद लहान बाळाला पकडावं तसं त्यांना पकडून मोजुन नर की मादी हे सर्व पाहात होती आणि नंतर आइस बॉक्स मध्ये ठेवत होती. बहुतेक तिने घरी आल्यावर डेंगे तोडले बिडले असतील..अपुनको कुछ पताच नही चला...शिजवायचं कामही तिचंच..आम्ही फ़क्त खाल्ले म्हणून मग ते रस्सा करायचं राहिलं..तशी मी आळशीच आहे आणि खरं सांगते की हे नुस्तं मांसही इतकी चविष्ट होतं ना? अर्थात आईच्या हातचा चिंबोरीचा रस्सा माझा लाडका आहे पण...असो...इथे बोंबील मिळत नाहीत पण तुम्हाला नक्की मिळतील आणि मला माहित होतं असं काही कॉमेन्टमध्ये येणार म्हणून मी पोस्टपण जवळजवळ पंधरा दिवसांनी टाकलीय तर आता तुला नाही मिळाले तरी आमच्या पोटात दुखणार नाही..टुकटुक...:)

    ReplyDelete
  22. हा हा कांचन शाकाहारी असशील तर माहित नाही पटकन तुला किती आवडेल पण जनरली मांसाहार केला असशील तर खेकडा आणि तो पण आपला कालवण स्टाईल नक्की आवडेल..खोकला झाला की आई बाबांना चिंबोर्‍या आणायला सांगायची..तुला खेकडा खायचा असेल तर निमित्त म्हणून खोक जराशी आणि हाण रस्सा...

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.