Monday, January 4, 2010

मौइचा नावाडी

गेले एक-दोन दिवस सलोनीच्या ब्लॉगवर हवाईच्या सफ़रीचं वाचतेय आणि सारखं आमची २००६ मधली हवाईची क्रुझ आठवतेय...त्यावेळी काहीही लिहिलं गेलं नाही पण आठवणीत मात्र अजुनही तितकंच ताजं आहे...आजची त्यांची पोस्ट वाचल्यावर मात्र राहावलं नाही आणि माझ्या स्नॉर्कलिंगच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या.
मुळात पाण्याचं आणि माझं वावडं नव्हतं; म्हणजे अजुनही नाहीये. पण माझ्या भावाने माझ्या पोहोणं शिकण्याच्या सुरूवातीलाच पाण्याखाली जोरदार दाबुन पाण्याखाली जायची भीती मनात कायमची बसवण्याचं सत्कार्य फ़ार्फ़ार वर्षांपुर्वीच पार पाडलंय. तरी निदान तरंगण्याइतपत म्हणजे स्वतःच्या जीव एक दहा-पंधरा मिनिटं वाचवण्याइतपत तरी पोहोता येतं हेही नसे थोडके. आता या बळावर स्नॉर्कल करता येणं म्हणजे आईचा स्वयंपाक पाहून स्वतःला छान स्वयंपाक करता येण्यासारखंच आहे..


तरी पहिलंवहिलं स्नॉर्कल करण्यासाठी फ़्लोरिडामध्ये की-वेस्टला जेव्हा अटलांटिक मध्ये गेलो तेव्हा केवळ नवर्याला तिथले पाण्याखालचे छान छान मासे पाहता यावे म्हणून ’अरे करूया ना’ असं म्हणून मी स्नॉर्कलिंगचा तो सगळा जामानिमा बांधुन पाण्यात उतरले. खरं तर की वेस्टला जिथे स्नॉर्कलिंगला नेतात तिथे तसा समुद्र उथळ आहे पण समुद्राच्या पाण्याचं वजन हा जो काही प्रकार आहे तो मला तिथेच कळला.त्यामुळे जरी पाण्यात उतरले तरी लगेच बुडल्यासारखं पाण्याखालीच गेले आणि तेही अंगात लाइफ़जॅकेट असताना...असे विनोद माझ्याबाबतीतच होऊ शकतात म्हणा (इति अर्थातच अर्धांग...असो) पण पुन्हा माझी ती जुनी पाण्याखालची जायची भिती मला काही तो प्रकार करायला धजू देईना...मग काय त्या बोटीला त्यांनी उतरण्यासाठी म्हणून एक दोरखंड बांधला होता त्याला सरळ पकडून पकडून जमेल तितकं पाण्याखाली पाहिलं पण जे काही थोडं थोडकं पाहिलं त्याने मात्र आपण काय मिस करतोय त्याची कल्पना आली..अर्थातच काही फ़ायदा नव्हता कारण जोपर्यंत मी साधारण पाण्याखाली श्वास घ्यायला सोडायला शिकले आणि थोडंथोडकं बळ आलं तेवढ्यात आमच्या स्नॉर्कलिंगसाठीची वेळ संपली. सगळीजण परत येत होते आणि मी आपली त्या दोरखंडावरचा इतका वेळचा मालकी हक्क गेला म्हणून पाहात बसले. त्यावेळी त्या बोटीवर आमच्याबरोबर असलेली पाच-सहा वर्षांची एक भावा-बहिणींची जोडी पण त्यांच्या आई=बाबांबरोबर मस्त आतपर्यंत जाऊन आली होती आणि त्यांचे गोरे गोरे गाल मस्त लाल-गुलाबी झालेले पाहात मी आपली मनातल्या मनात माझ्या लहानपणीच्या भीतीला मनातल्या मनात कोसत होते (आणि त्याच्या मागे असलेल्या माझ्या भावाला अर्थातच) या पहिल्यावहिल्या स्नॉर्कलिंग ट्रिपचा त्यातला त्यात फ़ायदा म्हणजे स्नॉर्कलिंग गियर कसे वापरायचे याचं त्यातल्या त्यात मिळालेलं जुजबी प्रॅक्टिकल.
त्यानंतर साधारण दोनेक वर्षांनी आम्ही हवाईच्या सफ़रीचं साधारण प्लान करत होतो त्यात सगळ्यांनी हे कराच म्हणून सांगितलेली गोष्ट म्हणजे "मौई बेटावरचं स्नॉर्कलिंग". इथे पॅसिफ़िकमधले सर्वात सुंदर मासे पाहायला मिळतात. तशी ही ट्रिप म्हणजे खूप धावतपळत निघालेलो आम्ही आणि गेल्यावर क्रुझवर बघू काय करायचं ते असं झालेलं त्यामुळे एक म्हणजे ज्या दिवशी आम्ही मौईत असणार होतो त्यावेळंचं काहीही बुकिंग वगैरे केलं नव्हतं आणि त्याचा फ़टका आम्ही जोवर स्नॉर्कलिंगला जाऊ याचा विचार केला तेव्हा बसला. मोलेकिनी क्रेटरच्या जवळ स्नॉर्कलिंगचा स्वर्ग आणि तिथं जाणार्या सगळ्या बोटी सकाळीच स्नॉर्कलिंगला जाणार्या लोकांना घेऊन गेल्या होत्या.
आता काय करायचं म्हणून आम्ही नुस्तंच जवळच्या बीचवर गेलो. तिथं तर अगदी जवळच्या पाण्यातही छान छान मासे दिसत होते. आता मात्र माझ्या नवर्याचा जीव कासावीस होत होता म्हणून पुन्हा मग साधे स्नॉर्कलिंग गीयर घेऊन जवळचं डुंबावं म्हणजे दुधाची तहान ताकवर तरी म्हणून एका दुकानात गेलो. त्यावेळी मी सहज तिथल्या मुलीकडे आमचं दुःख हलकं केलं आणि त्याचा फ़ायदा (तरी नेहमी मी याला म्हणते कुठेही गेलं तर टॉक टु लोकल्स चांगलं असतं म्हणून..) म्हणजे तिने आम्हाला सांगितलं की जर तुम्हाला स्पीडबोटने स्नॉर्कलिंगला जायचं असेल तर तसे पर्यायही असतात. फ़क्त या ट्रिपा थोड्या फ़ास्ट असतात.


आम्हाला काय तसेही क्रुझमुळे आम्ही तासन्तास समुद्रात राहायचंय या विचाराचे नव्हतोच. मग तिनेच एका कंपनीकडे फ़ोन करून आमची सोय करून दिली आणि आम्ही उत्साही मनाने त्या दोन जोडी स्नॉर्कलिंगला जाऊ शकतील अशा छोट्या स्पीड बोटमध्ये गेलो. आम्ही ज्या बोटीने गेलो ती एकच लालगोरा माणूस चालवणार, तुम्हाला जिथे स्नॉर्कलिंग करणार तिथे नेऊन मग तिथे अर्धा-पाऊण तास थांबून मग परत किनार्याला असं काम होतं.आमच्यासारखंच आमच्याच क्रुझमधलं एक वाट आपलं ते मोठी बोट हुकलेलं जोडपं आमच्या बरोबर होतं.
मोलोकिनी क्रेटर आलं आणि आमच्या नावाड्याने नेहमीसारखं लाइफ़ जॅकेट देऊन सगळ्या सुचना द्यायला सुरुवात केली. तो आम्हाला एका ठिकाणी सोडून त्याच परिघात एक रिंगण मारून जरा दुसर्या बाजुला पुन्हा नाव घेणार होता. आणि इथे पाणी मुख्य म्हणजे साधारण तीनशे फ़ुट खोल असणार होतं. आमच्या बरोबरीचं जोडपं अगदी पाण्यातच जन्म झाल्यासारखे पटकन गेलेही आणि लांब त्यांची नुसती पाण्याखाली पाहणारी डोकी दिसू लागली. माझी ती जुनी भिती पुन्हा वर आली आणि त्यातून माहित आहे की पाणी पण खोल म्हणून मी माझ्या नवर्याला म्हटलं तू जरा एकदा पाहून ये कसं काय दिसतं तोपर्यंत मी बोटीजवळच प्रॅक्टिस करते. तो गेला आणि मी पुन्हा आपली बोटीच्या बाजुला सोडलेली दोरी पकडून पकडून बघतेय कसं वाटतंय...नवराही तोपर्यंत एक चक्कर मारून आला होता आणि एकदम सॉलिडेय वगैरे म्हणून मला जळवत होता. आता त्याला काय सांगु? तसं बोटीजवळूनही मला मासे दिसले होते पण जेवढी व्हरायटी स्वैरपणे दिसते तितके सगळेच प्रकारचे मासे बोटीच्या आसपास नव्हते.
शेवटी मी चक्क नांगर टाकून म्हणजे सरळ बोटीतच बसून आमच्या नावाड्याशी गप्पा मारत बसले. माझ्याशी बोलताना त्याला माझा प्रॉब्लेम बहुधा कळला असावा म्हणून मग अनपेक्षितपणे त्यानेच ऑफ़र दिली. त्याला तसंही दुसर्या बाजुला ही बोट घेऊन जायचं होतं तर तुझ्यासाठी मी थोडी मोठी दोरी सोडतो, त्याला घट्ट पकड आणि ते स्नॉर्कलिंग गियर सांभाळून तू सगळं बघू शकशील असं तो स्वतःच मला म्हणाला...येल्लो कल्लो बात...आपण तर बोटही मागितलं नाही आणि हा हात देतोय...


आमचा नावाडी खरंच चांगला होता. त्याने नेहमीसारखं सरळ सरळ न जाता मस्त गोल गोल ती नाव चांगली वीसेक मिन्टंतरी फ़िरवली आणि मी ते वेगवेगळे रंगांचे स्वर्गिय मासे पाहून अगदी तृप्त झाले.इतके सुंदर मासे,त्यांचे इतके छान रंग आणि काही काही माशांचे थवे अगदी जवळून जाताना पाहाणं. एकदम पैसा वसूल. मला त्याने अगदी समुद्राच्या अंतरंगाची प्रायव्हेट टुर केली म्हणा ना...मौईच्या समुद्रात किती विविध मासे आणि प्रवाळ आहे याचं दर्शन मला मिळायचं सगळं श्रेय त्या नावाड्याला आहे.खरंच काहीतरी पुण्य केलं होतं बहुतेक म्हणून ती मोठी नाव चुकली आणि हा पर्सनल ट्रेनरसारखा भेटला. आता पुढच्या स्नॉर्कलिंग पर्यंततरी मला पाण्याखाली डुंबायचं धैर्य गोळा करायला हवं नाहीतर याच नावाड्याला शोधायला तरी हवं म्हणजे अर्थातच मौईला पुन्हा एकदा जायला हवं...की दिवास्वप्नातून जागं झालेलं बरं???

16 comments:

  1. वॉव. स्नोर्कलिंग केलयस तू? सहीच. अजून फोटो टाक ना. बघूया आमच्या पण विश-लिस्ट मध्ये आहे ते (along with flying small air-plane, sky diving etc. with none of them tick-marked yet :( )

    ReplyDelete
  2. अरे हेरंब केलयंस म्हणजे त्याने करवलंय...:) ज्यांना पाण्याची माझ्यासारखी भिती नाही ना वाटत त्यांच्यासाठी स्वर्ग आहे हे... मुख्यतः हवाईला तर खूपच छान आहे....इथे पाण्यात डुबकी मारायचीच मारामार त्यामुळे अंडरवॉटर चालणारा कॅमेरा नाही घेतला...त्यामुळे आता फ़क्त ते आठवायचं...तुला जमलं तर कि-वेस्ट सुद्धा ट्राय करून बघ. तिथे थोडं कमी रिस्की वाटतंय...अर्थात लाइफ़ जॅकेट असतंच त्यामुळे फ़क्त भिती हा फ़ॅक्टर जर सोडला की झालं....आणि आपल्यासाठी तर हे टिकमार्क पेक्षा चांगलं....

    ReplyDelete
  3. Aparna ... Tumachaa anubhav vaachalaa... chaan aahe. Maui aani Florida donhi kade snorkeling kele tumhi, heva vaatala.

    p.s. - Lahaina harbor madhun glass bottom boat tour karane he snorkelingchya javalapaaschaa pan almost 100% surakshit option aahe!

    ReplyDelete
  4. @बाल-सलोनी चे बाबा,
    अहो खरा हेवा माझ्या नवर्याचा वाटला पाहिजे त्याने दोन्हीवेळी जास्त मजा केलीय...मी आपलं भीतभीत..तो ग्लास बॉटमबोटचा पर्याय होता पण याला स्वतःच खरंखरं जवळून पाहायचं होतं म्हणून नाही केली..आता मुलाला घेऊन कुठेही गेलो तर असेच पर्याय शोधावे लागतील...निदान तो लहान असेपर्यंततरी....

    ReplyDelete
  5. hehehe lai bhari ha .... navadi kharach chang la hota :)

    -ashwini

    ReplyDelete
  6. मी अजून स्नार्कलींग केलेलं नाही पण हे वाचून इच्छा झाली आहे :-(

    ReplyDelete
  7. धन्यवाद अश्विनी...सुट्टी संपलेली दिसतेय....

    ReplyDelete
  8. अजय, अरे नक्की कर..मला वाटतं तारकर्लीला बहुतेक स्कुबा डायव्हिंग चालू करणार होते..ते अजून पुढचं आहे..पण एकदा पाण्याखालचे मासे दिसायला लागले की एकदम नॅशनल जिओग्राफ़ीक आणि डिस्कव्हरीच्या कार्यक्रमाची लाइव्ह कॉन्सर्ट्ला गेल्यासारखं प्रत्यक्ष समोर दिसतं.....कधी न विसरण्यासारखं....

    ReplyDelete
  9. मस्त .. मला पण खुप आवडते ही असे काही .. स्कूबा, स्नोर्कलिंग वगैरे... आता अंदमान नाहीतर, लक्ष्यद्वीपला जायला हवेच... :) आणि भीती कसली गं ??? उथळ तर असते ना ते पाणी... बिनधास्त एकदम... :)

    ReplyDelete
  10. तुझं खरंय रोहन पण तू जर तुझ्या पोहोण्याची पहिली-वहिली वेळ पाण्याखाली जोरदार दाबून झाली असती मग भीती बसणे म्हणजे काय हे तुला कळलं असतं..असो...आता शिकेन आणि मग स्नॉर्कलिंग करेन

    ReplyDelete
  11. अपर्णा अग मलाही स्नॊर्कलिंग एकदा तरी करायचच आहे. पण पाण्याची इतकी जबरी भीती वाटते ना मला....:( तुझा अनुभव पाहून आता मलाही थोडा उत्साह आलाय. ( अर्थात प्रत्यक्ष वेळ येईल तेव्हां बहुतेक माझी गाडी गळपटलेच. आणि लेक व नवरा जातील उड्या मारत. ) पण कीवेस्टला मी ग्लास बॊटमची टूर केलेली आहे. मस्तच वाटले.
    उशीरा का होईना यावर पोस्टलेस हे सहीच. :)

    ReplyDelete
  12. भाग्यश्रीताई नक्की कर...माझी टिप तुला उपयोगी पडेल....आता आरूषमुळे तो मोठा होईस्तोवर गेलोच तर आम्हाला ग्लास बॉटमचाच पर्याय आहे...

    ReplyDelete
  13. हेहे ... मला काकाने दिला होत ढकलून विहिरीत.. २५ फुट वरुन. हेहे ... :D

    ReplyDelete
  14. चल मग रोहन तू माझिया कुळीचा आहेस तर....पण तरी पण डरपोकांच्या यादीत माझा नंबर पैला...हे मला माहित आहेच म्हणा...:)

    ReplyDelete
  15. गंमतच झाली की. मी थोड्यावेळापूर्वीच अजयला मेल पाठवून ctrl+c कसं बंद करायचं ते विचारलाय. ती लिंक नक्की पाठवा. मी देखील ctrl+c पर्याय बंद करून टाकतो. माझा ईमेल nasatiuthathev@gmail.com

    ReplyDelete
  16. सिद्धार्थ अरे ती ट्रीक महेन्द्रकाकांचा एक ब्लॉगचोरीच्या पोस्टच्या कॉमेन्टमध्ये मला मिळाली होती..तुला इ मेल केली आहे.....

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.