Thursday, November 12, 2009

मन तळ्यात मळ्यात....

हा विषय तसा जमेल तितका वेळ टाळला. म्हणजे पहिल्यांदा वाटलं तेव्हा फ़क्त मनाचं रडगाणं गायलं...मग पुन्हा वाटलं तेव्हा नदीच्या दुसर्या किनारी जाऊन पाहिलं पण आता घोडा मैदान जवळ आलं आणि राहावलं नाही. ही पोस्ट खरं तर लिहुन पोस्ट न करता ठेवावी असंच वाटतंय पण तरी पोस्ट करतेय. माझी एक मैत्रीण मला नेहमी म्हणायची मनातलं कधी साचु देऊ नये त्याचा त्रास जास्त होतो. लिहुन काढलं की मग तो सल उरत नाही असाही एक सल्ला होता. कदाचित त्यासाठीही हे लिहिणं.
या घरात राहायला आलो तो पहिला दिवस अगदी लख्ख आठवतो.  इन्व्हेस्टमेन्टच्या दृष्टीने आणि मुंबईत कुठे पुढे-मागे अंगणवालं घर (उर्फ़ बंगला) परवडणार म्हणूनही, एक छोटं तीन बेडरुमचं घर घेतलं आणि एका ऑगस्टमध्ये आम्ही तिथे आलो. आधी अपार्टमेन्टच्या वर्दळीची सवय होती त्यामुळे इथे अगदी टाचणी पडेल इतकी शांतता पाहून खरं तर भयाणच वाटलं होतं आणि विचारही आला कसं होणार आपलं. पण मागचे तीन वर्षांपेक्षा जास्त इथे राहिल्यावर ती शांतताच आमची मैत्रीण झाली की आम्ही त्या शांततेचं रुपांतर किलबिलाटात केलं सांगणं कठीण आहे. पण आताशा खूप आपलं वाटायला लागलं.
घेतल्या घेतल्या जवळजवळ पहिल्याच महिन्यांत माझ्या अगदी जवळच्या तीन मैत्रीणी ज्यातल्या दोघी आता वेगवेगळ्या देशांत आहेत त्यावेळी नेमक्या अमेरिकेत होत्या. माझं त्यातल्या त्यात मध्यवर्ती आणि मोठं ठिकाण असल्याने, त्या सर्वांना एकत्र बोलावुन एक छोटं गेट-टुगेदर झालं. खूप खूप गप्पा मारल्या. दोन रात्री त्या राहिल्या. घर लगेच भरुन गेलं. त्यानंतर माझे आई-बाबा, सासुबाई, नणंद, भाचा असे नातलगही येऊन राहुन गेले. त्यांना थोडफ़ार अमेरिकेचं नॉर्थ-ईस्ट दर्शन करवता आलं. काही जवळचे मित्र-मैत्रीणी यांच्यासाठीही न्युयॉर्क, डी.सी.ला जायचं असलं तर हक्काचं राहायचं ठिकाण म्हणजे हे घर होतं. नंतर बाळराजांचं आगमन, त्याचा पहिला वाढदिवस सगळं एकापाठी एक चालुच होतं.
पहिल्या दिवशी एकटेपणाची जाणीव होती ती कुठे पळाली कळलंच नाही. इथुन जशी इतर महत्त्वाची शहरं जवळ तसं इथली नेहमीच्या खरेदीपासुन, खायला जाण्याची सगळी ठिकाणं जवळ. काही काही दुकानं तर अगदी चालत जाण्याच्या अंतरावर. एक वेगळा वेग इथेही आला. शिवाय स्वतःच घर म्हणजे थोडफ़ार बागकामाची आवड असलेल्या मला तर पर्वणीच होती. अगदी स्प्रिंगला येणारी डॅफ़ोडिल्स, ट्युलिप्स. फ़ॉलमधली मम्स आणि मग जवळजवळ थंडी पडेपर्यंत येणारे छोटे गुलाब आणि देवासाठी झेंडु लावणं मला खूप आवडायचं. दरवर्षी उन्हाळ्यात टॉमेटो आणि इतर काही भाजी, फ़ुलझाडं लावणे आणि मग उरला ऋतु त्याची निगराणी करणे हाही एक आवडता उद्योग बनला. अगदी पहिल्यांदी लावलेली मम्स (आपल्याइथल्या शेवंतीसारखी फ़ुलझाडं) अजुनही आता फ़ॉलमध्ये येतात.
या घराच्या मागच्या बाजुला एक सनरुम आहे म्हणजे त्याच्या तीन बाजुला संपुर्ण काचेच्या भिंती त्यामुळे मागच्या लॉनवर य़ेणारे ससे, खारींची पळापळ पाहाणे हाही एक टि.पी. होता. शिवाय ऋतुंप्रमाणे सुंदर पक्षीही दिसत. शिवाय आपण काचेच्या पल्याड असल्याने तेही बिनभोबाट आपल्यासमोर वावरत. मला आवडतो म्हणून इथे झोपाळा ठेवला आहे. प्रसन्न सुर्योदय असण्यार्या सकाळी तिथे बसुन चहा घेणे आणि बाहेरचा निसर्ग पाहाणे यात वेगळंच समाधान असे. त्याचप्रमाणे बाहेर बर्फ़ पडला असताना तिथला जुन्या काळचा स्टोव्ह (किंवा फ़ायर प्लेस) मध्ये लाकडाचा ओंडका टाकुन खूप गरम झालं की तिथं बसून तो पांढरा बर्फ़ आणि बाहेरच्या तारांवर ओघळताना गोठलेले बर्फ़ाचे आकार पाहाणं हाही एक वेगळा छंद बनला. कधी आपण या घराचे झालो कळलंच नाही. हे भाड्याचं घर नाही म्हणून ही ओढ की आतापर्यंत सर्वात जास्त वर्ष निवास केल्यामुळे आलेलं प्रेम सांगणं कठीण आहे. पण पाहता पाहता इथे वेळ पुरेनासा झाला.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगळ्या देशात असुन आपुलकीने आमची चौकशी करणारा शेजार मिळाला. ही एक गोष्ट मी इथल्या अपार्टमेन्ट मध्ये नेहमीच मिस केलीय. शेजारी कधीही हायच्या पुढे नाही. एखादा भारतीय असला तर थोडा फ़ार परिचय होण्याची शक्यता. इथे मात्र कधीकधी "आज तुझा नवरा घरी नाही तर मी बाहेरचा बर्फ़ काढुन देऊ का" म्हणणारा शेजारणीचा मुलगा आणि "अगं, आता हा ड्राइववेवर धावतोय" अस म्हणत प्रेमळपणे आरुषला "यु सन ऑफ़ अ गन" म्हणणारी बेट्टी आजी, समोरचं दोन मुलींवालं डिनिसचं कुटुंब, "आय विल किप यु इन माय प्रेअर्स" म्हणणारी मेरी आणि कोपर्यावरची मॉली सगळ्यांनीच इथल्या वास्तव्यात जान आणली.
हे इतकं पारायण सांगायचं कारण म्हणजे आता निर्णय झालाय. गेले बरेच दिवस आम्ही दूरदेशी गेलेल्या बाबाची वाट पाहात होतो जे मी मागच्या एका पोस्टमध्ये लिहिलंय सुद्धा. त्यामुळे हे ठरवणं जवळजवळ अपरिहार्य झालंय..आमचं कुटुंब जिथे एकत्र राहु शकेल त्या नव्या गावी आम्ही जातोय. या इकॉनॉमीमध्ये घर विकुन होणारा तोटा टाळण्यासाठी जमलं तर हे घर भाड्याने देऊन आम्ही स्वतः आता पुन्हा एकदा नव्या गावी भाड्याच्या घरात राहायला जाऊ.
पाखरांचं बरं असतं नाही? काडी-काडी जमवुन बांधलेलं घरटं त्यांची पिलं मोठी झाली की पुन्हा मोकळ्या आकाशात जायला तयार होतात. आपण मात्र वास्तुवरही जिवापाड प्रेम करतो आणि मग ती सोडताना सगळ्या जुन्या आठवणी काढत बसतो. खरं तर राहताना कितींदा त्यातल्या थोड्याफ़ार कमी पडणार्या वस्तुंबद्द्ल किरकिरही केलेली असते पण आता सोडणार म्हटल्यावर सगळं अतोनात आवडू लागतं. आम्हाला आधी वाटायच की आता इथुन निघायचं ते थेट मायदेशी जायलाच अधेमधे कुठे हलुया नको. पण शेवटी सगळं आपण ठरवतो तसं थोडंच होणार असतं?? म्हणजे पुन्हा एकदा इथलं सगळं गुंडाळा आणि दुसरीकडे सोडवा.
गेले काही वर्षात किती सामान वाढवलयं याचा आता अंदाज येतोय. विशेषतः मूल झाल्यानंतर तर अगदी अतोनात वस्तू आल्यात त्या सर्व नेणं शक्य नाही. ते परवडणारही नाही. नवं शहर आमच्या शहरापासुन थोडं थोडकं नाही तर चांगल जवळजवळ ३००० मैल लांब म्हणजे अमेरिकेच्या दुसर्या कोस्टमध्ये..विमानानेही सलग ६ तास तरी लागतील. इथे लांब जागा बदलणं म्हणजे तिथे जाऊन बरचसं नवं घेणं जास्त परवडेल इतकं ते सर्व घेऊन जायचा खर्च आणि व्याप आहे. पण घर रिकामी तर करावं लागणार आहे. प्रत्येक खोली आवरताना तिथल्या सर्व आठवणींचा गुंता.
कितीवेळा वाटतं खरंच हा निर्णय घेऊया की सरळ अजुन काही दिवस इथं राहुन पुन्हा याच भागात नव्या नोकर्या शोधाव्यात. मनाचं सारखं तळ्यात-मळ्यात सुरू असलं तरी खरं सांगायचं तर ते जवळजवळ अशक्यच आहे. सध्या फ़क्त स्वतःला समजावणं चालु आहे की कधीकधी काही बदल काही वेगळ्या कारणांसाठी आवश्यक असतात. असे प्रसंग आपल्याला इथल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी लागणारं बळ देतं. आणि आता नुसतं हे घर सोडताना जर इतका त्रास होतो तर कुणास ठाऊक हा देश सोडताना किती त्रास झाला असता?? आता यातुन निभावलं तर कायमचं परत जाणं जास्त चांगल्या प्रकारे होईल. आणि मुख्य म्हणजे आता एक नवं शहर, तिथली प्रेक्षणीय स्थळं हे सर्व पाहुन जर परतायचं असेल तर का नाही??

15 comments:

  1. अगं अपर्णा कुठे निघालीस गं? अगदी खरं गं, आपण किती हौशीने अनेक गोष्टी करतो...प्रचंड गुंततो आणि तेच सोडून जायची वेळ येते तेव्हां जीव फार हळवा होतो. अडीच वर्षांपूर्वी असेच आम्ही आमचे घर सोडून निघालो होतो....अजूनही कधीमधी मन दुखतेच.शिवाय तू लिहिलेस तसे किती पसारा वाढत जातो ना पाहता पाहता....ह्म्म्म्म....आता तुझ्याकडे यायचं म्हणजे उडावच लागणार की....:)
    बदल नेहमीच स्वागतार्हच असावेत.नाहितर प्रगती खुंटते. असे आपले माझे मत हो.:) तू जवळ असतीस तर मदतीला आले असते, पण...अनेक शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. अपर्णा,
    मेरा कुछ सामान पडा है, लौटा दो अस काहीस एक गाण आहे. त्याचीच आठवण आली. प्रत्येक वेळेला घरमोड, खरच
    नकोशी वाटणारी गोष्ट आहे. तू गडबडीत पण पोस्ट दिलीस, आता नाही तुला त्रास देणार पण लाडके, तुझे घर मस्त
    होते. इथे सगळ्या रूम सन करता आहेत. ४५ ते ५५ पर्यंत उन्हीपारा वर वर जातो. निवांत पणे बदल कर. मी अमेरिकेत
    फिरण्या करता यायचे म्हणते, तर तू दूर दूर जातेस? ए, तिथली पण पोस्ट लिही सवडीने. आरुष च्या बाबांना नमस्कार
    सांग. कसली मस्त पोस्ट जाता जाता दिलीस, तिकडे न येऊनही मी तुझ्या घरात डोकावून आले. तुझ्या काचांना म्हणजे सन रूम ला हात लावला, झोपाळ्यावर बसले, आता तुझ्या नवीन घरी पण तू दिसलीस की लगेच येईन.

    नवीन गृहप्रवेश करिता आपल्या ब्लॉग परिवार कडून शुभेश्च्या

    ReplyDelete
  3. भाग्यश्रीताई...तुम्ही बोललात त्यातच खूप मदत मिळाल्यासारखं वाटतंय...तुमचं बरोबर आहे खरंच खूप हळवं व्हायला झालंय..ही पोस्ट म्हणजे हिमनगाचं वरचं टोक...मला सगळं शब्दात मांडायला जमणारच नाही पण तरी लिहिलंय...आणि कुठे ते सांगेनच लवकर...:) खरं सांगु का मी स्वतःच नव्या जागेचे फ़ोटो इ. मुद्दाम पाहिले नाहीत...असंच स्वतःचं पहिलं इम्प्रेशन काय पडतं पाहु आणि लिहेन त्यावर...

    अनुजाताई....तुमच्यात झोपतात का?? की अति सुर्यामुळे तेही कमी झालंय?? :) तुमची प्रतिक्रिया छान आहे..आणि इथे यायचं म्हणाल तर सरळ मी असेन त्या शहराचं तिकिट काढलंत की मी अमेरिकेत कुठेही असले तरी साधारण सारखाच वेळ लागेल...पण यायचं हं....

    ReplyDelete
  4. अहो पायात घालायची वहाण पण चावणारी जरी असली तरी तिची पण सवय होते. हे तर पुर्ण घर.. इतक्या होसेने जमवलेलं सगळं टाकुन निघायचं म्हणजे आता मनस्तापच होणं, किंवा वाईट वाटणं पण सहाजिकच आहे.. . नविन गृहप्रवेशासाठी शुभेच्छा..

    ReplyDelete
  5. अहो पायात घालायची वहाण पण चावणारी जरी असली तरी तिची पण सवय होते. हे तर पुर्ण घर.. इतक्या होसेने जमवलेलं सगळं टाकुन निघायचं म्हणजे आता मनस्तापच होणं, किंवा वाईट वाटणं पण सहाजिकच आहे.. . नविन गृहप्रवेशासाठी शुभेच्छा..

    ReplyDelete
  6. navin thikani pan tula chan chan shejar nakki milel aani navin friends suddha ........ arthat june sodatana honare dukh swabhavik aahe ......... happy journey :)

    -Ashwini

    ReplyDelete
  7. आपण छोट्या छोट्या गोष्टींवर जीव लावतो. हे तर शेवटी घर. तुला होणारा त्रास मी समजु शकते. मी गेले आहे ह्या अनुभवातुन. पण नव्या घरातही तु लवकरच रुळशील आणि तिथे पण छान छान आठवणी तयार होतील. शुभेच्छा

    ReplyDelete
  8. काय कमेंट करू गं!!! आमच्या लग्नाला परवा ८ वर्षे आणि ८ महिने झालेत, त्यात ८ घरे बदललीत आम्ही!!!स्वत:च्या घरात कायम भाडेकरु आहेत मी एकही दिवस राहिलेले नाही...पण तरिही जे काय १०-१५ मि. तिथे जाते खूप हळवं व्ह्यायला होतं!!!!नवीन जागी मोकळ्या मनाने जा....नव्या अनूभवांना मोकळी जागा दे!!!!बदल आरूष सोबत आहे त्यामूळॆ खुपसा बोचणार नाही....नव्या जागेसाठी शुभेच्छा!!!!

    ReplyDelete
  9. महेन्द्रकाका, घराशी संबंधीत आठवणींचा गुंता जास्त असतो ना म्हणून त्रास असं वाटतंय...

    अश्विनी शुभेच्छांबद्दल धन्यवाद..

    रोहिणी ताई, स्वागत आणि आभार..खरं तर या आधीही घर बदललीत पण माहित नाही का ते यावेळी जरा जास्त चटका लागतोय असं झालंय....

    तन्वी, तुला बहुतेक माझी दुखरी नस कळलीय...मला वाटतं जे स्वतःचं ते जास्त प्रिय म्हणून ते सोडताना जास्त त्रास...तुम्ही पण जेव्हा स्वतःच्या त्या घरात जाल तुला खूप छान वाटेल...

    आपणा सर्वांच्याच शब्दांनी हा त्रास नक्कीच हलका होईल...

    ReplyDelete
  10. अगं अहो जाहो नको करुस गं .. आपण समवयस्कच असु. किंवा मीच तुला ताई पण म्हणु शकेन कदाचित :)...

    ReplyDelete
  11. अरे हो....मी खरं तुझी जास्त माहिती न काढताच तसं म्हटलं गेलय...पण आपण आता एकेरीवर (चांगल्या अर्थाने) येऊया....

    ReplyDelete
  12. नवीन गृहप्रवेशाकरिता अनेक शुभेच्छा!!!

    ReplyDelete
  13. धन्यवाद सिद्धार्थ आणि स्वागत...(नव्या घरी अर्थात आम्ही गेल्यावर आणि ब्लॉगवरसुद्धा...:))

    ReplyDelete
  14. खुप उशीर कमेंन्ट देतोय त्याबद्दल माफी असावी. आजच लेख वाचला. घर आणि ते पण आपलं हक्काचं अशी प्रत्येकाची इच्छा असते. एक एक काडी गोळा करुन घर घेणं यात खरंच खुप आनंद असतो आणि ते घर नंतर आपल्या हाताने सजविणे यासारखं तर सुख कशात नाही. आपल्या कल्पकतेला इथेच वाव मिळतो. लेख खुप वेगळा असला तरी वाचायला आवडला. नविन घराचे अजुनही काही फोटोज आवर्जुन ब्लॉग वर टाक बरं का.

    -अजय

    ReplyDelete
  15. धन्यवाद अजय आवर्जुन लिहिल्याबद्द्ल. आम्ही नवीन घरात आता सोमवारी जाऊ. त्यावरही लिहेन आणि फ़ोटो टाकेन. सध्यातरी या घरातल्या शेवटच्या दिवसांत नाही म्हटलं तरी थोडं भावुक व्हायला होतंय....

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.