Wednesday, October 21, 2009

वीज जाते तेव्हा....

परवाचीच गोष्ट, दिवाळीनंतरचा हा पहिलाच दिवस. सक्काळ सक्काळची माझी एक सवय आहे. उठल्या उठल्या आय पॉड (टच) वर पहिल्यांदा इ-मेल पाहुन घेणं. कधी कधी प्रत्यक्ष लॅपटॉप चालु करुन सविस्तर पाहायला वेळ लागतो पण साधारण पहिल्या डाकेने काय आलंय याची एक माहिती करण्याचं जवळ जवळ व्यसनच म्हणा ना. आता ब्लॉगींग सुरु झाल्यानंतर तर बरं वाटतं प्रतिक्रियांचे मेल्स वाचायला. फ़क्त त्यात एकच प्रश्न म्हणजे आय-पॉडवर देवनागरी वाचता येत नाही त्यामुळे मग काय बरं लिहिलं असेल ते अगदी प्रत्यक्ष वाचेपर्यंत घोळत राहातं. आज सकाळी तसंच इंग्रजीतले प्रतिक्रिया मेल वाचुन त्यांना उत्तर द्यायचा खूप मोह झाला होता पण त्यासाठी अर्थातच मला बराहावर जायचं होतं. ब्लॉगवर शक्यतो देवनागरीतच लिहायचा प्रयत्न असतो ना म्हणून. त्यामुळे लेकाला पटापटा दुध देऊन लॅपटॉप चालु केला. मेल उघडुन वाचत होते तोवर अचानक लॅपटॉपचा बॅटरीचा आयकॉन दिसला. मला वाटलं पाठुन पॉवर निघाली असेल. म्हणून एकदा तपासलं. लेकही सारखा पाठीपाठी करत होता तेव्हा त्याच्या पायात आलं का ते पाहिलं तरी काही नाही. आणि अचानक जाणवलं. मी आजकाल जिथे लॅपटॉप ठेवते तिथेच माझा एक कि-बोर्ड आहे आणि आजकाल मुलाला त्याचं चालु-बंद करायचं तंत्र जमतं (किंवा मीच शिकवुन ठेवलयं काही म्हणा) तर तो ते चालु बंद करुन कि-बोर्ड बडवत असतो. यात फ़ायदा आमचा दोघांचा होतो. त्याला थोडा विरंगुळा आणि मोठ्यांच्या गोष्टींशी खेळायला मिळतं आणि तो जितका वेळ त्यात गुंतेल तितका वेळ मी संगणकावर काम करु शकते. असो. तर आज सकाळीही तो ते बडवत होता त्याचाही आवाज बंद झाल्यामुळे तो माझ्याकडे आला होता. त्याला ते कदाचित चालु करता आलं नसेल असं वाटुन मी त्याला आधी ते चालु करुन द्याव म्हणून पाहिलं आणि झटकन माझ्या डोक्यात प्रकाश पडला अरे वीज गेली वाटतं??
या भागात आम्ही २००४ पासुन आलो तेव्हापासुन ही पहिलीच वेळ तशी वीज जायची त्यामुळे खरं तर आपल्याच घरचं काही बिघडलयं असं वाटुन मी दिवाळीच्या निमित्ताने घरी असणार्या नवर्याला लवकर उठवण्याची संधी सोडली नाही. तो बिचारा डोळे चोळत खाली आला आणि त्याने पेको (आमचे वीजमंडळ) चा फ़ोन फ़िरवला. त्यांच्या संदेशामध्ये त्यांनी आमच्या भागात काही तांत्रीक बिघाडावर काम चालु असल्याचं अगदी लगेच अपडेट केलं होतं...हम्म्म्म...आता काय करायचं?? एकतर बाहेर तापमान एक आकडी आणि घरातला हिटर बंद. नशीब की आज सुर्यदेवांनी थोडी कृपा केली होती त्यामुळे थोड्याच वेळात निदान सनरुममध्ये तरी बसु शकणार होतो. आणि आमच्याकडे इतरांसारखं कॉइल नाही आपला नेहमीसारखा गॅस आहे त्यामुळे चहा-पाणी तरी होणार होतं. फ़क्त लायटर इलेक्र्टीक असल्यामुळे काडेपेटीने गॅस पेटवायचा होता. मात्र बाकी सर्व बंद. इंटरनेट नसल्यामुळे तर एक अंग गळुन पडलंय असंच वाटत होतं. पाचेक मिनिटांतच माझ्या शेजारणीची सासु आज तिच्या मुलीला सांभाळायला आली होती तीही येऊन चौकशी करुन गेली की आमच्याकडेही तिच्यासारखंच सर्व बंद आहे म्हणून.
पण काही का असेना आज बाकी कसला विचार न करता बाहेरच्या खोलीत सुर्यप्रकाशाची मजा चाखत झोपाळयावर बसल्या बसल्या मला सहजच लहानपणीचे भारतातले वीज जाण्याचे दिवस आणि मुख्य म्हणजे रात्री आठवल्या. आम्ही राहायचो त्या गावात काही ना काही कारणामुळे नेहमीच वीज जायची. कधी खूप पावसामुळे तारेवर झाड पडलंय, कधी कुठला ट्रान्सफ़ॉर्मर जळालाय कधीकधी नुसतंच लोडशेडिंग म्हणून. सुटीच्या दुपारच्या वेळी ती गेली की फ़ारच कंटाळा येई कारण मग खूप गरम होत असे. रात्री विशेषकरुन जेवणं झाल्यावर वीज गेली की मात्र मला खूप बरं वाटे. एक म्हणजे रात्रीचा काही अभ्यास करायला नको आणि दुसरं म्हणजे अशावेळी मग शेजारी पाजारी मिळून कधी अंताक्षरी नाहीतर भूता-खेतांच्या गप्पा असं काही चालु होई. आणि मग एकदम सगळ्यांचे दिवे चालु झाले की सर्व मुलं एकदम ओरडत त्याचीही एक वेगळीच मजा होती. "कॅंडल लाईट डिनर" या भानगडीला नक्की इतकं काय महत्त्व आहे हे मला कधी कळलं नाही कारणं मेणबत्तीच्या उजेडात जेवणं बर्यापैकी नेहमीची. माशांचे काटे नीट दिसतील का हा मला त्यावेळी पडलेला एक गहन प्रश्न असे. आणि कधी कधी आई मला खास काटे काढलेले पिसेस देई ही त्यातल्या त्यात मिळालेली सवलत. हे वीज प्रकरण पुढे माझे भाऊ-बहिण दहावीला वगैरे गेल्यावर महाग पडायला नको म्हणून माझ्या बाबांनी घरी चक्क पेट्रोमॅक़्स घेतली होती. त्याचं तेलपाणी करायला ते बसले की त्यांना पाहायला मला फ़ार मजा येत असे. मात्र एखाद्या "ये जो है जिंदगी" सारख्या लाडक्या सिरियलच्या वेळी जर वीज गेली की मात्र सगळे जण लाईटवाल्यांच्या नावाने शिमगा करत.
सगळीकडे चांगला मिट्ट काळोख असताना खेळल्या जाणा-या आंधळी- कोशिंबीरीची सर मात्र कुठच्याही खेळाला नाही. त्यात आपल्यावर राज्य आलं की संपलंच. मग मात्र कधी एकदा उजेडाचं राज्य परत येतय असं होई. आमच्या चाळीतील मुलं खिडक्यांच्या वर वगैरे चढुन बसत आणि वरुन टपली मारुन कंन्फ़्युज करत.
माझ्या आजोळी सुट्टीत नेहमीच रात्रीचीच वीज नसे. आणि त्या पालघर मधल्या आडगावात गेलेली वीज परत लगेच यायची शक्यताही नसे. त्यावेळच्या मोठ्या ओट्यावर बसुन सगळी मोठी मंडळी बराच वेळ त्यांच्या लहानणीच्या आठवणी काढत त्या अशा ऐकावं ते नवलचवाल्या असत. आणि मग घरात खूप गरम होतंय म्हणून मागच्या सारवलेल्या खळ्यात मस्त खाटा टाकुन चांदण्या रात्रीचं आकाश पाहात झोप कशी येई कळतच नसे. तिथे दुस-या दिवशी कधीतरी वीज परत येई. इतक्या सा-या मावस-मामे भावंडांच्या गराड्यात कळतही नसे की आपली काही गैरसोय होतेय. आमची नाती त्या काळोख्या रात्रींनी खरंतर जास्त घट्ट केलीत. आताच्या अस्तित्त्व टिकवण्याच्या शर्यतीत सगळे कसे पांगलेत आणि पुर्वी काहीच सोयी नसताना आपण कशी मजा केली याची आठवण कधी काळी काढली की नाही म्हटलं तरी थोडं वाइटच वाटतंय.
आता इथे मात्र खरं तर दोनच तास झालेत पण नवरोबांना नेट हवंच आहे असं काहीसं दिसतंय म्हणून पुन्हा एकदा तोच फ़ोन फ़िरवला तर त्यांनी चक्क ५३ घरांमध्ये वीजेच्या प्रश्न आहे आणि १२:२० पर्यंत तो सुटेल असा रेकॉर्डेड मेसेज ठेवला होता. मला नाही म्हटलं तरी थोडं कौतुकच वाटलं. अर्थात प्रगत देश आहे हा म्हणजे इतकं तर नक्कीच असेल. थोड्या वेळाने आमच्या बॅकयार्डमध्ये एक वीजेचा खांब आहे तिथे एक काळा-कभिन्न माणुस येऊन पाहुन गेला. त्याची गाडी गेली आणि पाचेक मिनिटांत वीज परत आली. साधारण पावणे-बारा झाले असावेत. आहेत बाबा वेळेचे पक्के. नेटसाठी लायब्ररीत गेलेल्या नवर्याला मी फ़ोन करुन परत घरी बोलावुन दिवसाच्या सुरुवातीला लागले.

13 comments:

  1. वाचता-वाचता 'पालघर'चा उल्लेख आला म्हणुन विचारतोय ... नेमका गाव कुठले? मी स्वतः 'केळवा'चा आहे.

    ReplyDelete
  2. अपर्णा , भूतो न भाविषति ........मस्कत मधील आमचा गुब्ऱ्हा भाग व अल्कुवैर भाग ऐन दीपावलीत अंधारात होता.कधीही वीज जात नाही,मेजर बिघाड होता.अगदी तुझ्यासारखी परिस्थिती झाली होती. दम दमा दम..... प्रतिक्रिये बद्धल आभारी आहे.होय मी तुम्हा सर्वांचा आग्रह व आपुलकी करिता ब्लॉग लवकरच घेऊन येते............

    ReplyDelete
  3. रोहन तुला (की तुम्हाला??) मासवण माहित असेल नक्की. ते माझं आजोळ. दिवाळी आणि मे महिना लहानपणीचा अगदी पडिक असायचो आम्ही. मी कधी केळव्याला गेले नाही पण मला माहित आहे. आणि तेही छान आहे. केळवे-माहिम म्हणतात ना त्या बाजुला??

    अनुजाताई, वाट पाहातोय आम्ही सर्व आपल्या ब्लॉगची. आणि हे आपल्या दोन्ही ठिकाणी अशी दिवाळीच्या आसपास वीज गेली हा कसला संकेत समजायचा?? ग्लोबल वॉर्मिंग?? :)

    ReplyDelete
  4. हे बाकी एकदम खरं!कोणी काय कॉमेंट टाकली आहे ते पाहिल्या शिवाय बरं वाटत नाही. एखादं पोस्ट टाकलं की जरी नेट वर नसलो तरिही सेल फोन वरुन कॉमेंट्स अप्रुव्ह करणं सुरु असतं.

    उत्तर देता येत नाहित सेल फोन वरुन पण कोण काय म्हणालं हे तर नक्किच दर तासा दिड तासाने चेक केलं जातं.

    विज गेली.. बरं झालं, तेवढंच ’घरी’ आल्यासारखं वाटलं असेल.. :)

    ReplyDelete
  5. हा हा हा...अगदी बरोबर "घरी" आल्यासारखं वाटलं. तुम्हाला सेल मध्ये देवनागरी पण वाचता येत असेल तर बरं आहे. कारण मला आय टच मध्ये देवनागरी वाचता येत नाही मग प्रत्यक्ष काय बरं लिहिलं असेल असं वाटुन जमेल तसं मेलवर जाते....आपली कॉमेन्ट असली की बरं वाटतं. सध्या माझ्याकडुन सारखं वाचणं होत नाही पिलु सारखा त्रास देतं आणि उरला वेळ कामात. पण एकदा घाऊक कॉमेन्टिंग करेन म्हणते...:)

    ReplyDelete
  6. हाहा....खरं आहे गं. चैन पडत नाही. वेडं आहे हे. पण छान वाटतं ना? बाकी आम्ही आजोळी जायचो ना -रावळगावला, तेव्हां पत्र्याच्या बनवलेल्या सिनेमागृहात जायचो शिनूमा पाहायला...दोन रीळे झाली की हमखास फूस्सस्सस्स.....जी जायची ती दुसरे दिवशी रात्रीच्या खेळालाच यायची.....हेहे

    ReplyDelete
  7. कधी कधी जावेत ग लाईट, बालपणाची आठवण होते....निदान या सगळ्या ईलेक्टॉनिक्स च्या गोष्टींपल्याड जगण्यासारखे बरेच काही असते ते तरी मुलांना कळेल....आणि आपल्यालाही नव्याने उमजेल...

    ReplyDelete
  8. http://anukshre.wordpress.com/
    my blog
    anuja

    ReplyDelete
  9. आमच्या इथेही रात्रि अशी विज गेली की अगदी तुम्ही लिहल्या प्रमाणेच अन्ताक्षरी रंगायची किंवा मग इकडून तिकडून ऐकलेल्या भुताच्या गोष्टींचा थरार आम्ही अनुभवायचो ....

    ReplyDelete
  10. भाग्यश्रीताई, तुमचा रावळगावचा अनुभव भारीच मजेशीर आहे. आणि हे आम्ही रावळगाव म्हणून एक चॉकोलेट खायचो त्याशी संबंधीत आहे का हो???
    तन्वी तुझं म्हणणं अगदी खरंय. कधीतरी विजेवीना राहुन पाहावं नाही. इथे "आमिश" म्हणून डच लोकं राहातात ना ते अजुन बग्गीमध्ये प्रवास करतात आणि शेती पण पारंपारिक पद्धतीने करतात. वीजेचा ते वापर करत नाहीत...आहे ना इंटरेस्टिंग??
    देवेन्द्र प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद. लाईट गेल्याने भुतांच्या गोष्टीत अजुन रंग भरतो नाही???

    ReplyDelete
  11. हो गं अपर्णा तेच रावळगाव- माझे आजोळ.:)

    ReplyDelete
  12. माझ लहानपण चिपळुणला गेलय, तिकडे लाईट नेहेमी जायचे. मला काळोखाची जाम भिती वातते, अजुनही :)
    तु कुठे रहातेस मुंबईत? लिखाणावरुन तरी सेंट्रल साईडला रहात असावीस असं वाटतं.
    सोनाली

    ReplyDelete
  13. सोनाली आमच्या मामाकडे जायचो पालघरला तिथे मजा यायची वीज गेली की....अगं अजुन बहुतेक तू काही पोस्ट वाचल्या नसशील..मी कधीच सेंट्रलला राहिले नाही..नेहमीच वेस्ट...(आणि त्यातही पश्चिम..पुर्व पण नाही) ...:) आणि आता इथे अमेरिकेतही पश्चिम...पुर्वेला होतो आधी....

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.