Sunday, June 21, 2009

आजचा मोठा दिवस

आज २१ जून म्हणजे शाळेत शिकलेल्या भुगोलातला सर्वात मोठा दिवस. आत्ता ही पोस्ट लिहिताना रात्रीचे सवा नऊ वाजताहेत, घरातली सर्व कामे आटोपलीत, बाळालाही झोपवले आणि लिहायला बसतेय तरी संधीप्रकाशाची शेवटची प्रभा आहे.
इथे आल्यापासून हे दिवसाच्या उजेडाचं महत्त्व इतकं जाणवतय ना...एकदा का डे लाईट सेविंग सुरु झालं, घड्याळ तासाभराने पुढे केलं की हा दिवसाचा प्रकाश वाढतो आणि आजच्या दिवशी तो सर्वात जास्त असतो. म्हणजे पहाटे जवळजवळ पाचापासुन सुरु झालेला दिवस नऊ वाजेपर्यंत मिळतो. कामं करायला, खेळायला, चालायला जायला, थोडक्यात नेहमीच्या सर्व गोष्टी करायला खूप उत्साह असतो. काही तासापुर्वी एका स्नेह्याला विमानतळावर सोडायला जाताना जाणवलं की तो वेस्ट कोस्टला चाललाय म्हणजे आमच्यापेक्षा तीन तासांनी त्यांचं घड्याळ मागे म्हणजे हा तिथे पोहोचणार तेव्हा तिथे नवाच्या आसपास वाजले असतील. याचा अर्थ याच्यासाठी मोठा दिवस जरा जास्तच मोठा वाटेल नाही??
पण तरी आता जसजसा काळोख वाढतोय तसतसं जास्त उदास वाटतंय. उद्यापासून थोडा थोडा करुन हा दिवसाचा उजेड कमी कमी होणार आणि पुन्हा ते अति काळोखाचे दिवस येणार असं आजच का जाणवतय काय माहित?
शाळेत असताना पाठ करायचं म्हणुन केलेला हा दिवस खर्‍या अर्थाने इथे आल्यावरच कळला. भारतात इतकं ते जाणवलं नाही आणि मुख्य म्हणजे हिवाळ्यात साडे चारलाच सुर्यास्त होत असल्यामुळे अंगावर येणारा अंधारही मुंबईत नाही त्यामुळे सर्वात मोठा दिवस काय आणि काय काय सारखंच वाटायचं. आपल्याकडे तर पावसाळी वातावरणामुळे तो तितका जाणवलाही नाही. इथे मात्र २१ जूनला उन्हाळाही ऑफ़िशियली सुरु होतो. म्हणजे खरतर चैतन्य आलं पाहिजे. मला वाटतं सध्या मंदीचं वातावरण आहे म्हणूनही ही उदासिनता असावी. असो..
प्रयत्न करतेय उन्हाळारुपी उर्जा आणण्याचा पण जमत नाहीये. माझिया मनाला, जरा थांबना सांगावसं वाटलं की सध्या तरी ह्या ब्लॉगचाच आधार आहे.

5 comments:

 1. I love 21st June, when days start getting smaller and smaller.

  It means Dasara / Diwali spirit will start crawling into me very soon.

  ReplyDelete
 2. खरंय तुमचंही गणपतीपासून दिवाळी पर्यंत धमाल. सध्या इथे आहोत म्हणून हे सण त्या उत्साहाने साजरे होत नाहीत ना म्हणून हा इथला २१ जून असाच....

  ReplyDelete
 3. chhan vatala vachun. khup divasani maitrinishi bolalyasarakha. :) asach lihat raha.

  ReplyDelete
 4. लेखनशैली छान आहे.
  शाळेत असताना पाठ करायचं म्हणुन केलेला हा दिवस.....
  शाळेत असताना अशा ब-याच गोष्टी पाठ करायच्या म्हणून केल्या होत्या, आता त्यांचा अर्थ कळतोय.

  ReplyDelete
 5. धन्यवाद योगेश. मला वाटतं शाळेत शिकलेला मुख्य म्हणजे भूगोल तेव्हा जरा जास्तच गोल होता, आता सुधारतोय..

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.