Tuesday, December 31, 2013

आणखी एक आढावा....


ब्लॉग लिहायचे काही फायदे असतात म्हणजे जुन्या नोंदी वाचताना त्यावेळी आपल्याला काय वाटलं होतं किंवा अच्छा तेव्हा असं  असं  झालं होतं हे सगळं आठवतं. चांगले प्रसंग असतील तर पुन्हा छान वाटत आणि वाईट असतील तर त्यातून काही शिकता येईल का किंवा आता काही बदललं  आहे का याचा आढावा घेत येतो. मी तस प्रत्येक वर्षी नियमित ब्लॉग  लिहिणं किंवा निदान वर्षाच्या शेवटी छोटा आढावा घेणं असं केलं नाही पण केलं तर पुढच्या वर्षी वाचायला मजा येते असं  एकदम वाटलं. मागच्या वर्षी एवढ्याला आमचं विमान मुंबईत पोचून आम्ही जुने व्ह्यायच्या तयारीत होतो. काश! यावर्षी पण तेच करू शकलो असतो. असो मुद्दा तो नाही. निदान यंदाचं काय ते तरी थोडक्यात पाहायला हवं. पुढच्या किंवा त्यापुढच्या काही वर्षी हे सगळं वाचताना कस वाटेल?
 
तर वर्ष सुरु झालं आमच्या मुंबईत. मी खरं तर साल बदलतं, म्हणून जे काही महत्व दिलं जातं तेवढी एक गोष्ट सोडली तर कधीच या दिवसाच्या निमित्ताने शक्यतो वेगळं काही करत नाही.  एकदा शिकागोच्या नेवीपियरला हाडं गोठवणाऱ्या थंडीत फायरवर्कसाठी गेलो होतो; मी गाडीतून उतरलेपण नाही. उगाच दातखीळ बसवायची माझी तरी इच्छा नव्हती. पूर्वी थोडे फार बरे कार्यक्रम असायचे म्हणून टीव्ही पहिला जायचा तेही नवद्दीच्या दशकात. वर्षे सरली तसं या दिवसाबद्दल काही वाटेनासं झालं हे कळलंही नाही. मागच्या वर्षी देशात असताना देखील. तेव्हा तर मी अमळ लवकर झोपले कारण अजून जेट lag गेला नव्हता.
 
बरोबर तीन दिवसांनी बाबांबरोबर त्यांच्या हृदयविकाराचा त्यांच्याबरोबर सामना करण्यासाठी ताईबरोबर रहेजाला होतो. आजारांची आता मला तशी भीती वाटत नाही. मागची काही वर्षे स्वतःचे विकार स्वबळावर झेलतोय म्हणून आल्या परिस्थितीला तोंड द्यावं इतकं नियतीने शिकवलं बहुतेक. बाबा घरी येउन त्याचं रुटीन जुळवण्यासाठी आईला मदत करताना कोण आपलं आणि कोण तोंडदेखलं आपलं  हेही कळलं. चालायचंच. फक्त  यावेळी हे आई-बाबांना पण कळलं असं वाटतंय.
 
मग उरलासुराला वेळ काही खूप जवळच्या आणि काही तोंडदेखलं जवळच्या लोकांना भेटण्यात गेला आणि मग परत आलो ते खर तर इतरवेळची शांतता वगैरे काही न जाणवता. त्याचं मुख्य कारण आम्ही नव्या घरात सामान नुसतं सोडून गेलो होतो, ते सगळं लावायचं ठेवलं होतं. देशात वेळ नसल्यामुळे तशी काही विशेष खरेदी वगैरे झाली नव्हती पण आहे हेच इतकं पसरलं गेलं की मग एक एक खोली लावणे करता करता वसंत ऋतू कसा आला कळलंदेखील नाही. काही फ्रेम्स अजून बासनात पडून आहेत हे ही पोस्ट लिहिताना उगीच खुपतंय.
 
काही वेळा बदल सुखावतात, काही वेळा ते आपल्या असण्याची जाणीव तीव्र करून जातात. मागच्या गाडीच्या ब्रेक लावण्याच्या क्षणाची उसंत माझ्या गाडीला आणि मला जायबंदी करून गेली आणि उन्हाळ्याच्या प्लानिंगमध्ये फक्त फ़िसिओथेरीपी आणि व्यायाम याची भर पडली. ते उरकतेय आणि मुलाचा शालेय प्रवेश त्याच्या गमती जमतीची वाट पाहताना तो एक दिवस कोपर मोडून आला आणि मग फॉल-कलर मध्ये ही भर पडली. मध्ये मध्ये छोट्याच्या तक्रारी, नवऱ्याच्या  तब्येतीच्या कुरबुरी हे सगळं मीठ-मिरी सारखं पेरणीला होतच, पण आता आम्ही निर्ढावलो होतो.
 
मग मुलाचं प्लास्टर निघालं आणि अक्षरश: चार दिवसात प्लान करून वेगसला चार दिवसांसाठी जाऊन आलो. अजिबात गरम नाही आणि रात्री खूप जास्त थंडही  नाही, मागच्या आणि या ऑक्टोबरमधल्या वेगसच्या ट्रीप मला दोन्हीवेळा आवडल्या. काही तक्रार नाही. आताही एकंदरीत इकडच्या सणासुदीच्या दिवसाच्या निमिताने होणार्या काही मित्रमंडळीच्या भेटी. थोडं जवळपास बदल म्हणून जाउन येणं सुरु आहे. थंडीचा कडाका अगदी thanksgiving पासूनच जाणवतोय. दुसऱ्या  राज्यात भाची राहते; तीही मध्ये एकदा नवीन घर पाहायला आली. तिच्यानिमित्ताने pacific कोस्टला धावती भेट देऊन आलो. त्यानंतर पुन्हा एकदा वेळ काढून गेलो त्यावेळी लाटांचा जोर जरा जास्त होता. ती गाज कॅमेराच्या फोनमध्ये बंदिस्त आहे. कधी पुन्हा हे ऐकत बसलं  की  समुद्राचा आवाज मला अगदी पार देवगड आणि मालवणला घेऊन जातो. निसर्ग आपल्याला अंतर्मुख करतो हे खरेच. तो आपले आपल्याशी असलेले नाते स्पष्ट करतो. कधी तरी नुसतं हा आवाज ऐकत समुद्रकिनार्यावर जावं. खूप शांत वाटतं.
 
उद्या हेही साल बदलेल आणि कदाचित आणखी काही बदल आमच्यासाठी घेऊन येईल. बरेचदा अगदी एखादा कटू प्रसंगही  मी चांगल्या मनाने स्वीकारते; कारण त्यामुळे असे प्रसंग हाताळण्याची आपली ताकद तर आपल्याला कळतेच पण समोरच्याच्या मनात माझ्याबद्दल काय भलं किंवा बुरं आहे हेही स्पष्ट होतं. काही वेळा निंदकाचं  घर अगदी शेजारीच असतं मग ते लवकर कळलं म्हणून नियतीचे आभार मानणे  आणि अशांसाठी आपली दारं  बंद करणे हे करायचं देखील कळतं. या वर्षात वर म्हटलेल्या काही प्रसंगी ते शिकणं झालं आणि तीच या बाकीच्या थोड्याफार कठीण प्रसंगातली जमेची बाजू  म्हणायची.

थोडक्यात सांगायचं तर आपली लढाई सुरु असतेच, प्रसंग बदलत असतात, बदलत नसतात ती आपल्याला साथ देणारी आपली जवळची माणसं. माझ्याकडे अशी माझी म्हटलेली माणसं माझ्यासाठी आहेत हे या वर्षाने मला पुन्हा एकदा जाणवून दिलं. हाच या लढाईमधला "माझिया मनाचा" विजय आहे आणि कदाचित हा आढावा म्हणूनच यावर्षी घेतला गेलाय. 

२०१४ साठी आपणा सर्वाना अनेक शुभेच्छा.
 


Friday, December 27, 2013

विंटर वंडरलँड

हिवाळा आला की  थंडी आणि सोबतीला लवकर काळोख पडणारे दिवस येणार हे  नेहमीचंच. यावर्षी त्याला जोड मिळाली जरा लवकर पडलेल्या बर्फाची. आणि अशा थंडीत येणाऱ्या नाताळच्या पार्श्वभूमीवर बच्चेकंपनीच्या मनोरंजनासाठी डाऊनटाऊनच्या जवळ असणाऱ्या विंटर वंडरलँडला जायचा प्लान ठरला. 

खर म्हणजे मागची दोन वर्षे जायचं होतं, पण प्रत्येक वर्षी काही न काही निमित्त होऊन आमची तयारी होईपर्यंत वंडरलँड पुन्हा नॉर्थ पोलला गेलेली असे. यावेळी मात्र आम्ही अगदी रिमांइडर वगैरे लावून वेळेत गेलो. स्वागताला मिट्ट काळोखातून चमकणारा "विंटर वंडरलँड" लिहिलेला दिव्यांचा फलक आणि प्रत्येकाला कॅन्डी केन देणारा स्वयंसेवक.   


त्यानंतर जसं जसं पुढे गेलो तसं एक वेगळंच विश्व दिव्यांच्या माळांनी आमच्यापुढे उभं राहिलं. काळोखात धावणारी सांताची गाडी काय आणि दुधाचे हंडे  ओतणाऱ्या बायका काय. 
आमच्या या छोट्या सफरीमधली काही क्षणचित्रे 


















Sunday, November 17, 2013

ये सचमुच न मिलेगी दोबारा

ओरेगनमधला टिपिकल हिवाळी विकांत म्हणजे बाहेर सूर्य नाही, आदल्या दिवशी रात्री पडून गेलेल्या पावसामुळे आलेली थोडी जास्त थंडी आणि अशात अवेळी झोपलेली मुलं. अशावेळी काही तरी स्वतःचं पाहुया म्हणून पुन्हा एकदा जिंदगी न मिलेगी दोबारा सुरु करतोय. 

प्रथम पहिला तेव्हाही  आवडला होता पण दुसऱ्यांदा पाहताना थोडा जास्त मुरतोय. विशेष करून इम्रान अख्तरने त्याच्या वडिलांच्या कवितांचं त्याच्या आवाजात केलेलं सोनं. हा चित्रपट पाहताना आपण कुणाबरोबर पाहतोय वगैरे असं होत नाही. 

पिघले नीलम सा बेहता ये समा
नीली नीली सी खामोशिया 



घेऊन जातो तो आपल्याला कुठेतरी "बस एक तुम हो यहां" म्हणत असा कुठला तरी क्षण ज्याने जगायला उभारी दिली, असा कुठला तरी खास मित्र/मैत्रीण जिने त्यावेळी आपल्याला सावरलं. तू हे करू शकतेस म्हणून आपल्याला उठायला मदत केली, कुठलाही संबंध नसताना गुरूप्रमाणे पाठीवर दिलेले हात आणि त्या हाताच्या बळाने मग तशी जवळपास स्वतःची लढाई एकटीनेच लढलेले ते आणि आताचेही दिवस. बरोबर म्हणतोय न तो "अपने होने पे मुझको यकीन आ गया  
एक बात है  होटों तक है जो आयी नहीं
बस आंखो से है जानती
तुमसे कभी मुझसे कभी
कुछ लफ्ज है वो मांगती 

तो पाठीवर पडलेला गुरूचा हात कधीतरी मैत्रीमध्ये बदलला कळलं नाही.  त्याला वयाची बंधन नव्हती. तेव्हा कुठेतरी माझ्या कॉलेजमधले मार्क याविषयी चिंता करणाऱ्या मला, "तुझ्याकडे त्या मार्कांपेक्षा खूप चांगली गोष्ट आहे. ती म्हणजे भरपूर कष्ट करायची तयारी", हे सांगून मग माझ्याकडे आलेल्या पहिल्या संधीचं कौतुक त्यांच्या नजीकच्या लोकांकडे करून मला दिलेला आशीर्वाद. मग माझा मार्ग दूरचा पण तरी संबंध तेच. माझ्या वाढदिवसाला शुभेच्छांबरोबर माझा आवडीचा black forest त्यांच्या ऑफिसच्या मुलाबरोबर आठवणीने पाठवायचे ते दिवस. खर तर मी त्याला नेहमी "सर" म्हटलं तरी ९९ मध्ये मी त्यांच्या कंपनीमध्ये केलेलं एक प्रोजेक्टच्या वेळचे दिवस सोडले तर आमच्या इतरवेळच्या भेटी म्हणजे निव्वळ मैत्री. ते नाव दिलं नाही दिलं तरी त्यात अंतर आलं नाही.

जब जब दर्द का बादल छाया
जब गम का साया लहराया
जब आंसु पलकों तक आया
जब ये तनहा दिल घबराया
हम ने दिल को ये समझाया
दिल आखिर तू क्यों रोता है

माझ्या प्रत्येक मायदेशवारीत एकदा मी आले आहे हा फोन केला की माझा फोन  नंबर घेऊन जवळ जवळ रोज फोन करून माझी खुशाली घेणारा माझा हा मित्र. यावेळी मी भेटायला गेले तेव्हा नेमकं आणखी एक काम होतं.
"एकटी रिक्षाने कशाला जातेस? आता मुलं गेली की ऑफिस बंद करून मी येतो न तुला सोडायला. फक्त त्र्याऐशी होताहेत आता मला बघ गाडीमध्ये पोटातलं पाणीपण हलणार नाही."
"खरंच? माझे सत्तरीतले बाबापण मला आता थकल्यासारखे वाटतात. राहूदेत तुम्ही मी खरंच जाईन"
"अगं थांब गं. गणेश, आज तू कुलूप लावशील?  मी जरा  हिला स्टेशनला घेऊन जातो."

गाडीमध्ये अखंड बडबड, माझी, माझ्या नवऱ्याची, मुलांची चौकशी. मला कधी कधी अशी माणसं माझ्या आयुष्यात आली याचा हेवा वाटतो. म्हणजे बघा न एक साधं इंजिनियरिंगचं प्रोजेक्ट करणाऱ्या मुलीला एका मिडसाइज टेलीकॉम कंपनीच्या मालकाने इतकं महत्व का द्यावं?
त्यादिवशीच माझं काम अपेक्षेपेक्षा लवकर संपलं कारण लागणारे सर्व कागद मी धांदरटपणे आणलेच नव्हते. मग पुन्हा ते पूर्ण करायची जबाबदारी घ्यायची  तयारी. का ही इतकी निस्वार्थी माणसं जीव लावतात?  त्यांच्याकडे आधीच इतकं आहे की  ठरवलं तरी मी काही करायची गरज नाही.
"सर नको तुम्ही. हे नाही झालं तरी चालेल. उगाच तुम्हाला माझ्यामुळे उशीर."
या ठिकाणी माझ्या शालेय जीवनातल्या खूप आठवणी आहेत. त्या रस्त्यांची वळणं मला माझ्या बालपणात घेऊन जातात. कस कळलं त्याला? गाडी उलट वळवायचं सोडून चल आज थोडं पुढे जाऊन येऊ म्हणून माझा मूक होकार गृहीत धरून आम्ही रस्त्याने पुढे जातोय. नवे बदल माझ्या लक्षात येतील न येतील म्हणून ते मला दाखवले जातात. मध्ये कुठेतरी त्यांच्या आवडत्या pattice वाल्याकडे खायला घाल, घरच्यांसाठी खाऊ आणि मग पुन्हा परत.
का करावसं वाटलं असेल त्याला हे सगळं? आमच्या त्या लॉंग ड्राइव्हला का मला त्याच्याही आयुष्यातले काही जुने प्रश्न, त्यासाठी त्याने केलेल्या तडजोडी मला सांगणं ?
"तू आजकाल परत गेलीस की तुझ्या मुलांमध्ये इतकी बिझी होतेस की  पूर्वीसारखे आपले फोन होत नाहीत, नाही?"
"तसं नाही वेस्ट कोस्ट म्हणजे जगाच्या मागे आहे त्यामुळे वेळेची सांगड घालायचं तंत्र जुळत नाही."
"ह्म्म. थांब मी स्टेशनजवळ गाडी घेतो."
"नको हा नवा उड्डाणपूल चांगला बांधलाय. मी इथून चालत जाईन. या वळणावरून तुम्हालापण बरं पडेल."
मी परत  आल्यावर आम्ही पुन्हा फेब्रुवारीत बोललो. मध्ये माझ्याकडे लक्ष प्रश्न आले आणि हे निवळलं की  फोन करू म्हणून मध्ये इतके महिने निघून गेले.
देवाघरून माझ्यासाठी खास आलेलं आणखी एक माणूस देव घेऊन गेला. त्याच्या माझ्यातला दुवा मीच होते. मला कोण कळवणार की तो गेला म्हणून?
ये जो गहरे सन्नाटे है
वक़्त ने सबको ही  बाटे है
थोडा गम है सबका किस्सा
थोडी धूप है सब का हिस्सा
आंख तेरी बेकार ही नम  है
हर पल एक नया मौसम है
क्यु तू  ऐसे पल खोता है
दिल आखिर तू क्यु रोता है 
एक स्वप्न म्हणून सुरु केलेल्या त्याच्या कंपनीचं कुलूप वयाच्या त्र्याऐशीव्या वर्षी देखील सकाळी साडेसातला स्वतःच उघडणारा हा माझा मित्र. आता मुलगा बाकीचे सगळे व्यवहार पाहतो पण ही factory हेच माझ सगळं काही आहे, माझे वर्षानुवर्ष साथ देणारे कामगार मला रोज पाहतात आणि त्यांना काही हवं नको असेल तर मीच ते बघू शकतो मुलाला तितका वेळ नसेल म्हणून रोज ऑफिसला येणारा माझा मित्र. या माझ्या मित्राला मी रडलेलं  चालेल का? याचा विचार मी करतेय. म्हणजे आईच्याच शब्दात सांगायचं तर ही  वेळ कुणालाच चुकली नाही, चुकणार नाही हे आपल्याला माहित आहे. वय झाल्यावर तर ते अपरिहार्य आहे. आपण रडत बसलेलं  आपल्या आवडत्या माणसाला आवडेल का याचा पण विचार केला पाहिजे. 

मी पुन्हा त्या जिंदगी न मिलेगी दोबाराकडे लक्ष देते… प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या वाटेने आलेला एकच विचार असतो 


दिलों  मे  तुम अपनी बेताबीयां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम
नजर मे ख्वाबों की बिजलीया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम
जो अपनी आंखो में हैरानिया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम 





Thursday, November 14, 2013

त्यांचाही बालदिन

माझ्याकडे अगदी मी शाळेत असल्यापासून लहान मुलांचा ओढा जास्त आहे. शेजारची बाळं आमच्या घरी सतरंजीवर टाकून त्यांच्याशी बोबडं बोलत खेळायला मला मजा वाटे. मग मी दहा वर्षांची असताना मला एक मावसबहीण झाली. मी स्वतः  माझ्या घरात शेंडेफळ असल्याने हे हक्काचं लहान भावंड मिळाल्याचा आनंद मी मनसोक्त घेतला. ती मावशी पण तशी जवळच्या गावात राहत असल्याने तेव्हा जास्तीत जास्त शनिवारी दुपारी शाळा सुटली  की चार आण्याचं हाफ तिकीट काढून जायचं आणि रविवारी दुपारी परत निघायचं असा एक पायंडाच पाडला होता. 


मग माझ्या भाचेकंपनी बरोबर ती चार साडेचार वर्षांची असेपर्यंत माझं लग्नही व्ह्यायचं होतं तोवर खूप मजा करून घेतली. आताही ती मला नावाने हाक मारतात म्हणून मावशी आत्यापेक्षा आमचं नातं जास्त जवळचं आहे. माझी मुलं त्यामानाने माझ्या रागाची देखील धनी होतात. म्हणजे आता हे लिहिताना मला असं लक्षात आलं की मला आवडलेल्या, मी खेळलेल्या इतर मुलांवर मी शक्यतो ओरडणे, रागवणे हे प्रकार सहसा केले नाहीत पण दिवसभरात एकदाही मी माझ्या मुलांवर रागावले नाही अस शक्यतो झालं नाही. असो खर मला आजच्या बालदिनी हे सगळं लिहायचंदेखील नव्हतं. 

गेले काही दिवस फिलिपिन्समधल्या टायफूनच्या बातम्या आपण वाचतोय. त्यासंदर्भात आज एक विस्तृत ईपत्र एच आरतर्फे आलं. त्यात तिकडच्या मुलांचा उल्लेख होता. त्यांचे जवळचे नातेवाईक हरवलेत, त्यांच्या शाळादेखील असून नसल्यागत झाल्यात आणि हे सर्व ज्या वयात त्यांना सामोरं जायला लागतंय म्हणजे खर तर नियतीने केलेला अन्यायच म्हणायला हवं. 
अर्थात निसर्गापुढे माणूस खुजाच. पण आजच्या बालदिनाच्या निमित्ताने आपण अशा काही मुलांना त्यांच्या उर्वरित भविष्याची तरतूद म्हणून काय करायला हव यासाठी त्या मेल मध्ये एक साईट होती तिची लिंक आहे  savethechildren.org
तुम्हाला आणखी काही साईट्स माहित असतील तर तर त्या नक्की कळवा. आजच्या बालदिनी आपण जसा आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करत असाल तसाच याही मुलांचा करुया. 

आणि हो बालदिन म्हटलं म्हणजे आपल्या मुलांबरोबरची मजा तर घायलाच हवी. तुम्ही काय केलतं माहित नाही आम्ही आमच्या १४ च्या रात्री तिकडे आमच्या देशातला आमचा क्रिकेटचा देव, याच्या घरात जायला आम्हाला संधी मिळाली, ज्याला मागच्या रणजीमध्ये वानखेडेला पाहायला आम्हाला संधी मिळाली आणि आज तो त्याचा शेवटचा सामना खेळतोय , त्या सामन्यातली त्याची खेळी आमच्या मुलांबरोबर एन्जॉय केली. आमच्या बच्चेकंपनीने त्याचे पन्नास होताना केलेला जल्लोष. या लिटील मास्टरला माझ्या घरचे लिटील मास्टर्सपण खूप मिस करणार. 
बालदिनाच्या शुभेच्छा. 



Sunday, November 10, 2013

दिवाळी २०१३

एक एक वर्ष येतं जेव्हा प्रत्येक ठिकाणी युद्धभूमीसारखी कामं मागे लागतात. सध्या तरी मी फक्त दिवाळीबद्दल म्हणतेय हो.
या वर्षी माझ्या नव्या घरातली पहिली दिवाळी. खर तर आता पर्यंत निदान सातेक घरं बदलली. मग दिवाळीला ते घर चांगलं कस दिसेल याची तयारी देखील प्रत्येक ठिकाणच्या निदान पहिल्या दिवाळीला तरी  होते. त्यात आमच्या चाळणीत क्रिएटिव्हिटीचे एक दोन खडेही न आल्याने किती काही केलं तरी शेवटी फार उजेड पडणार नाही हे साधारण माहित असतं. यंदा तर आठवडाभर तीन वेळा बिघडलेला कंदील मार्गी लावेस्तो दिवाळीच्या शुक्रवारची मध्यरात्र उलटली. आणि तरी तो संपूर्ण विभाग बेटर हाफच्या ताब्यात आहे.
 
यंदा वर्षभर मित्रमंडळ घरी बोलावता आलं नाही म्हणून दुसरया दिवशी संध्याकाळी डझनभर पोरं, त्यांचे पालक आणि काही नवीन लग्न झालेले असा बराच उरक होता. कामांची यादी वाढत जात होती. तरी या वर्षी दोन्ही घरच्या आई मंडळींनी फराळ वेळेवर पोचावा म्हणून एक आठवडा आधीच पाठवला होता. पण मग त्यातले काही पदार्थ थोडे फार मोडले वगैरे तर ते आपणच खाऊ आणि पाहुण्यासाठी थोडं तरी फराळाचं कराव म्हणून ते मागे होतच.
 
दरवर्षी आणि वर्षातून मध्ये मध्ये मी चिवडा करते त्यामुळे ती कामगिरी आधीच फत्ते करून ठेवली होती. पण यावेळेस सासूबाईंनी येता येता एक मुगडाळीची चकली करायला दाखवून प्रेमाने सोऱ्या दिला होता. त्याच्या आठवण झाली आणि मग चकल्या करायचं ठरवलं.
 
मी आजतागायत माझ्या स्वयंपाकघरातल्या प्रयोगात हा प्रयोग खरं तर विविध कारणांनी टाळत होते पण यंदा माहित नाही का पण मुलांना आवडतात आणि आजीच्या चकल्या प्रवासात तुटल्या म्हटल्यावर माझ्यातली आई जर जास्तच जोरात जागी झाली. आणि मग त्या असंख्य टिपा आठवत चकलीची पहिली batch केली. आपल्या चिमुकल्या दातांनी कुडुम कुडुम करत ती मोडून खाणाऱ्या माझ्या पिलांना खाताना पाहून मग  त्यांच्या घरी येणाऱ्या मित्रमंडळीसाठी पण थोड्या करूया असं माझं मीच ठरवलं. आणि मग त्या मंद आचेवर तळणाऱ्या चकल्यानी माझ्या दोन रात्री चकलीमय झाल्या. अर्थात ही कढई पुढच्या gasवर आली म्हटल्यावर असंख्य काम back burner वर गेली हे वेगळं सांगायला नकोच.
 
असो तर अगदी शेवटच्या घटकेपर्यंत घरच्या दिवाळीवर हात फिरवता फिरवता ब्लॉग बिचारा वाट पाहात राहिला. पण असं म्हटलंय न की देवदिवाळी पर्यंत शुभेच्छा दिल्या तरी चालतात म्हणून मी माझ्या सर्व प्रकट अप्रकट ब्लॉगवाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा देते.
आणि आमच्या घराचा थोडा फार फराळ ठेवला आहे तुमचा इतक्यात संपला असेलच तेव्हा हा थोडा फराळ गोड मानून घ्याल अशी आशा.
 
ही दिवाळी आपण सर्वाना सुखसमाधानाची जावो आणि हे नवीन वर्ष आपणासाठी चागंल्या गोष्टी घेऊन येवो हीच कामना.

Sunday, October 13, 2013

औषध (न) लगे मजला

लहान बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तस्मात त्याचं पहिल्या आठवड्यातलं एबीसी विटामिनचं औषध पितानाचं तोंड त्यांनी आई बाबांचा छळवाद करण्यासाठी विधात्याने निर्माण केलेल्या पुढे येऊ घातलेल्या काही वर्षात, औषध नामे बाटल्यांचा खप किती आणि कशा प्रकारे होऊ शकतो याचा संकेत देण्याचं एक निमित्त आहे असं आमच्या थोरल्या चिरंजीवाच्या गेल्या पाच वर्षातल्या अनुभवावरून मी ठाम सांगू शकते. (बिलीव मी हे वाक्य या ब्लॉगवर लिहिलं गेलेलं सर्वात मोठं (आणि व्याकरणदृष्ट्या बरोबर) वाक्य असलं तरी इतर कुठल्याही वाक्यांपेक्षा जास्त खरं (आणि पारखलेलं) वाक्य आहे…)

नाही कळलं? शक्यता आहे.  नाही! वाक्याचा दोष नाही, त्यात एकवटलेल्या अर्थाने गोची केलीय. तर थोडं  सुसंगत सांगायचं  तर मूल  हॉस्पिटलमधून घरी आलं की  तिथून निघताना अत्यावश्यक लिस्टमध्ये एक एबीसी (की एबीसीडी) नामक एक विटामिनचा रोज एकदा दिला जाणारा डोस द्यायला डॉक्टर आवर्जून सांगतात. आईच्या दुधातून मिळू न शकणारी विटामिन्स त्यात असतात. आरुषच्या वेळी पहिल्यांदी पालक असल्यामुळे (दुसऱ्या वेळी पालक ए के ए दुसऱ्या  मुलाचं पालकत्व हा एक वेगळा विषय आहे पण दुसऱ्या  मुलाला वाढवताना जी आपसूक सहजता येते ते पाहता तो विषय पुढची पाच वर्षे तरी ब्लॉगवर येईल असं  वाटत नाही.) 
हा तर ते पहिल्यांदी पालक असल्यामुळे त्याच्या प्रत्येक गोष्टी आम्ही जातीने पाहत असू तेव्हा हे औषध कसं  लागत असेल ते माझ्या नवर्याने (किंवा आमच्या बाबाने सोयीसाठी आपण त्याला बाबाच म्हणुया) हा तर आमच्या बाबाने चाखून पाहिलं आणि त्याच्या चेहरा (आणि कसनुसं होणारं अंग देखील) पाहण्यासारखा झाला आणि त्याला आरुषची दया आली. 
"अगं खुपच  याक्क लागतंय. डॉक्टरला दुसरा brand आहे का विचारूया का की प्रिस्क्रिप्शन घेयुया? तुला सांगतो हि लोकं  जेनेरिक मार्केट करतात पण…"
"अरे पण तो तर चांगला मिटक्या मारत खातोय की  आणि वर गायीसारखा रवंथ पण करतोय" मी बाळाचं बोळकं बघत माझ्या मताची पिंक टाकली. 
"अरे हो की." आमच्या बाबाची बरेचदा लेट  पेटते मुख्यत: फ्यामिली म्याटर असलं की  जर जास्तच. 
असो आम्ही काही जास्त जीवाला लावून घेतलं नाही पण खर तर हे  याक्क औषध रवंथ करून पिताना "मला औचद आवलतं" हे तो आम्हाला सांगू पाहतोय हे कळायला मला बरीच वर्षे लागली.

पहिलं वर्ष ते वर म्हटलेलं एबीसी द्यावंच लागतं आणि मग त्याचा नाद सुटतो. तर आरुषच्या वर्षाच्या वाढदिवशी त्याची आत्या भारतातून आमच्याकडे आली होती आणि सगळ्यांना आवडते म्हणून काजू कतलीचा भला मोठा बॉक्स तिने आणला होता. आम्ही बाळाला कौतुकाने काजू कतली भरवली आणि त्याचं थोंड हा हा म्हणता माकडासारखं लाल झालं त्याला अजून काही होतंय का हे कळायला मार्ग नव्हता म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरने आम्हाला याला नट्स अलर्जी आहे तुम्ही हवं  तर वेगळी अलर्जी टेस्ट करू शकता किंवा तो दोन वर्षाचा झाल्यावर आपसूक जाते का ते बघा नाही तर बेनाड्रील किंवा तत्सम कुठलही ओवर द काउंटर औषध हाताशी ठेवा. त्या दिवशी बेनाड्रील पितानाचा त्याचा आनंदी चेहरा माझ्या लक्षात यायला हवा होता, पण तेच ते म्हटलं  न पहिल्यांदी पालक वगैरे वगैरे त्यामुळे या अलर्जी बाईंच्या आगमनाने मी जर खट्टू होते. दुसऱ्या  वर्षी ती अलर्जी काही गेली बिली नाही तर आता तर चुकून असं  काही खाल्लं तर त्याचा घसा सुजतो सुद्धा त्यामुळे अलर्जीचं औषध सावलीसारख ठेवावं की त्याला शर्टवर लेबल लावावं असा विचार माझ्या डोक्यात घोळायला लागला. तोस्तर त्याला येणाऱ्या दोन तीन शब्दात तो मला नेहमी ते औषध दाखवून उगाच द्यायला भाग पाडायचा प्रयत्न करे पण मी ते लपवून ठेवलं. 

त्यानंतर आम्ही त्याच्या दुसऱ्या वाढदिवशी भारतात गेलो तेव्हा ताईने त्याला सहज जीरागोळी दिली ती त्याने इतक्या आनंदाने खाल्ली की त्या वारीवरून परतताना माझ्या सामानात पावेक किलोतरी जीरागोळी होती. त्यावेळी मला रोज विटामीनची गोळी घेताना आरुष पाही आणि मग स्वतःच्याच मनाने त्याने माझी गोळी म्हणून त्या जीरागोळीचा वापर सुरु केला आणि एकदम माझ्या लक्षात आलं की साहेबांना एकंदरीत औषधाचे गोळी किंवा प्यायचे प्रकार आवडतात. 

त्याला आवडतात म्हणून की माहित नाही पण त्यानंतरच्या वर्षात नॉर्थवेस्ट मध्ये असलेल्या सदाहरित वनांच्या काही झाडांच्या अलर्जीने त्याच्या शरीराचा ताबा घेतला आणि महिनाकाठी एकदा असं सतत तीनेक महिने तो त्याने हैराण होता म्हणजे त्याचं शरीर आणि आमची मनं हैराण. पण त्यासाठी दिल्या जाणाऱ्या antibiotic प्यायला मिळतं म्हणून तो खूष आणि पुन्हा पुढच्या महिन्यात डॉक्टरकडे जायला आनंदाने तयार. शेवटी त्याच्या कानावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून त्याला एक प्रोसिजर पण करावी लागली. तेव्हा घरी परत आल्यावर डॉक्टरने औचद दिलंय याची खात्री करायला तो विसरला नाही.

तिसऱ्या वर्षापासून दाताच्या डॉक्टरची पण एक वारी झाली आणि तो खुशच झाला कारण आमच्या नळाच्या पाण्यात फ्लोराईड नाही म्हणून रोज रात्री दात घासले की प्यायचे फ्लोराईड drops दिले. त्यामुळे रात्री दात घासायचा आम्ही कधीच कंटाळा केला नाही हे वेगळं सांगायला नकोच. शिवाय तोवर ती नॉर्थवेस्ट वी अलर्जी पण थोडी तीव्र झाल्याने सकाळचा रतीब होताच. पाचव्या वर्षी फ्लोराईडचा डोस दुप्पट होतो त्यामुळे साहेब दुप्पट खुश. ही खुशी आपल्याला लहान भावापेक्षा जास्त औषध प्यायला मिळतं यासाठी तर होतीच पण त्या dropper ला मोजणीची रेषा आधीच्या डोसइतकीच होती त्यामुळे दोन वेळा "आ" करायला लागतो याचा आनंद जास्त असावा.  आता नवीन काही नको रे देव असं आम्ही म्हणायला काही अर्थ नव्हताच देव लहान मुलाचं आपल्या आधी ऐकतो हे मी पुराव्याने शाबित करू शकते.  

खर तर पहिल्या पाच वर्षात मूल आजारी पडणे हे स्वाभाविक आहे त्यामुळे आता पाच वर्षाचा झाला तेव्हा हुश करायचं मी ठरवलं होतं. त्याप्रमाणे या वर्षाचे गेले सगळे महिने तसे बरे गेलेही. त्या दिवशी शाळेतून अवेळी फोन आला आणि पुन्हा माझा ठोका चुकला. सगळी धावपळ करून नवऱ्याला पुढे पाठवून छोट्या ऋषांकला घेऊन मी हॉस्पिटलला पोहोचले तेव्हा रडव्या तोंडाने मंकीबारवरून पडून हात मोडून पडलेलं माझं पोरगं औषध घेऊन येणाऱ्या नर्सला पाहून "आर यु रेडी टू टेक सम मेडिसीन?" असं विचारल्यावर रडं विसरून मोठा आ करून राहिला. त्याचं ते आनंदाने औषध घेणारं रूप पाहून मागच्या पाच वर्षाच्या आवडीने औषधं आणि तेही आम्ही विसरलो तर आम्हाला आठवण करून मागून मागून औषध घेणारे त्याच्याबरोबरचे प्रसंग मला नकळत आठवले आणि माझ्या डोळ्यातलं पाणीही एक क्षण वाहायचं थांबलं.     

Monday, September 9, 2013

मी आणि सण, थोडे सैरभैर विचार


आज गणेश चतुर्थी, मला लहानपणापासून आवडणारा सण.त्यावेळी न कळत्या वयात तो आजूबाजूला साजरा केला जाई तसाच आठवतोय. मग मोठं झाल्यावर आपण नक्की आस्तिक की नास्तिक या प्रश्नातही  गणेश चतुर्थी आली की एक वेगळाच उत्साह येतोच. 

आजचीच गोष्ट. करूया, नको, वेळ मिळेल का? असा सगळा विचार करतानाही सोमवारचे दोन तास निवांतपणे हाताशी आले. मागच्या आठवड्यात नारळ किसून फ्रीज करायचं काम करून ठेवलं  होतं म्हणजे बेटर हाफने कामातला आपला हिस्सा आपल्या सवडीने करून ठेवला होता. तसही सण  साजरा करायचा म्हणजे  हे अमकं तमकं अगदी अस्सच झालं पाहिजे इतका अट्टाहास नाही. त्यामुळे असा आधी खवलेला नारळ हाताशी असेल तर आम्हाला चालतं. 

एका बाजूला नारळ परतताना मन लावून गूळ चिरला आणि नारळ गुळाची गट्टी झाल्यावर त्यात थोडी वेलची पूड घालून ते मिश्रण एकीकडे निवत ठेवलं. या जानेवारीत निघता निघता आईने आठवणी दिलेलं मोदकाचं घरचं पीठ खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते बाहेर काढलं आणि उकड काढायची आईची टीप आठवत बसले. हम्म! दुप्पट पाणी की  अर्ध की समान? जामच गोंधळ उडाला तेव्हा अर्ध्याहून थोडं जास्त अस मधलं प्रमाण मोजून तुक्का मारायचं ठरवलं. मग एकदम लक्षात आलं की  हे आता जास्त रसमय होतंय आय मीन इंटरेस्टिंग. म्हणजे बघा मागच्या वीसेक मिनिटात मी माझी आई मोदक कसे करायची हा एक विचार सोडला तर आणखी कशाचाच विचार करत नाहीये. 

तर ती उकड काढताना उकळत्या पाण्यात थोडं  मीठ आणि तूप घालून मोदकाचं पीठ घातलं की  एक वाफ आणायची. आता हे थोडं हाताशी यायला अवकाश आहे तोवर आधीच सुरु केलेला वरण भाताचा कुकर बंद करून दुसरीकडे फ्लॉवरची भाजी निवडून फोडणी-बीडणी करून मंद आचेवर शिजत ठेवायची. 

आता पुन्हा आपलं  सगळं लक्ष मोदक उर्फ स्टार ऑफ द जेवण कडे. अर्थात अंदाजे घेतलेल्या उकडीचं तंत्र चुकल्यामुळे थोडं कोमट पाणी घालून पुन्हा मळून  घ्यायचं आणि मग पारीबाईंच्या मागे लागायचं. आज पारी करताना उकडीच्या भाकऱ्या करणारी मामी आठवली आणि पहिलीच पारी करताना ती तो उंडा हातावर गोल गोल करून मोठा करायची तसं केलं  आणि जी सुरेख पारी झाली की माझी मीच सुखावले, अर्थात तरी कळ्या जमणे ही पुढची एक अवघड पायरी होतीच. अगदी लक्ष देऊन केले त्या त्या मोदकांच्या पाऱ्या अगदी सुबक आल्या आणि काही रुसलेल्या. आमच्याकडे बाई हिचं लक्षच नाही असं म्हणणाऱ्या. 
नेहमी एकावेळी पाचपेक्षा जास्त मोदक केले नव्हते पण आज करायचा सूर चांगला लागल्याने बहुतेक गाडी चक्क अकरावर गेली. आणि मग ते शिजवताना पुन्हा काही गोंधळ होऊ नये म्हणून माझं बेकिंगचं अर्धवट ज्ञान वापरून भांड्याला आधी थोडं तेल लावून घेतलं. मोदक शिजताना नाममात्र फुलके करून घेतले त्यांनी मात्र काही फुलण्याचा चांगुलपणा दाखवला नाही. पण आज लक्ष अर्थात "स्टार ऑफ द" कडे असल्यामुळे ते नेहमीचं फ्रस्टेशन आलं नाही. 

मला अगदी पूर्वीपासून म्हणजे स्वयंपाकात खाण्याखेरीज गती नव्हती तेव्हापासून वाढायला फार आवडतं. आज नैवेद्याचं ताट वाढताना घड्याळाकडे लक्ष गेलं  आणि मग एकदम लक्षात आलं की गेले दीड तास आपण बाप्पाचा नैवेद्य, उकडीचे मोदक आणि एकंदरीत ताट पूर्ण असणे याखेरीज कुठलाही विचार केला नाही. 

मग मला जाणवलं की आज या निमित्ताने माझं खूप दिवस फक्त एकटीने थोडा वेळ मनन करणे (ध्यान करणे वगैरे माझ्या बाबतीत फारच उच्च वाटतं मला म्हणून मनन) राहिलं होतं, बहुतेक तसंच काही तरी झालं. हा एक छोटा दोन तासाचा सोहळा म्हणूया हवं तर मला माझ्याकडे थोड्यावेळासाठी का होईना घेऊन आला. 

आज बऱ्याच दिवसांनी एक पक्वान्न घरी मी मन लावून बनवलं आणि शेवटी देवाच्या नावाने ते आम्हीच खाणार. पण तो बनवायची कृती मला माझ्या पाककौशल्याकडे नव्याने पाहायला शिकवून गेली. हे सगळं आई कसं करते ते आठवून करताना मला मज आली आणि तिच्यातलं मल्टीटास्किंग माझ्यातही न कळत कसं मुरलंय हे मला कळून सुखावून गेली. 

मला वाटतं माझ्यासारखे अनेक जण असतील जे या निमिताने थोडी सजावट, एखादं  नवीन पक्वान्न करतील त्यावेळी त्यांच्या मनात दुसरा विचार असणार नाही आणि ती कृती पूर्ण झाल्यावरही मन प्रसन्न असेल. नेहमीच बाहेर जायचे छंद जोपासून मनाला ताजंतवानं करतात, आज घरातच थोडी आराधना आपल्या पद्धतीने करून तसचं ताजतवानं व्हावं. मग त्यासाठी मी आस्तिक आहे की  नास्तिक असा आर या पार प्रश्न पडण्यापेक्षा या अवस्थेला कुठलं नाव न देता आहे त्या स्थितीशी एकरूप व्हावंआणि तिची मजा लुटावी.  

आमच्या घरचं प्रसादाचं ताट कसं दिसतंय ते नक्की कळवा. 

गणपती बाप्पा मोरया.