Thursday, June 12, 2014

उन्हाळ्याचं वर्तुळ

अजगरासारख्या सुस्तावलेल्या दुपारी चिंचेच्या झाडाखाली खाट सरकवून नदीवरून येणारा वारा खात पाय लांब करणे ही उन्हाळ्यातली माझी अत्युच्च आठवण आहे. खाटेवर जागा पकडणे ही एकमेव महत्वाची बाब. त्यासाठी जेवतानाच आधी विचार करून वेळेत किंवा खरं म्हणजे सगळी एकत्र जेवत असताना आपलं लवकर आटपणे आणि परसदारी भसाभस चूळ भरून मागच्या वाड्यात झपाझप जाऊन एकदा बूड टेकलं की मग आजूबाजूला हळूहळू जमणाऱ्या मोठ्या मंडळींच्या गप्पा ऐकत उन्ह सरायची वाट पहायची. 

त्या गप्पांमध्ये कळणारे आणि न कळणारे कितीतरी विषय चघळले जात. आईचे बाबा, म्हणजे माझे मी न पाहिलेले आजोबा, ही त्यांची सर्व मुले एकत्र जमली की गप्पांमध्ये येणारी हमखास व्यक्ती. त्यांना आई, मावश्या, मामाच काय पण  अख्खा गाव "दादा" म्हणे. मामांच्या ओटीवर त्यांचा तरुणपणातला फोटो आहे. दिसायला राजबिंडे आणि देश स्वतंत्र व्हायच्या आधीच्या काळापासून तेव्हाच्या काँग्रेसमध्ये. तेव्हा जयंतीबेन म्हणून काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या त्यांच्या कार्यालयात काम केलेले. दादा गेले त्याच वर्षी नेहरू वारले असा दाखला आई नेहमी देते. तुरुंगवासही भोगला; पण त्याचा पुरावा घेऊन सरकारी सोयी उपटल्या नाहीत. फक्त एका मुलीचं लग्न पाहून संपलेल्या आयुष्याने या मुलांच्या आयुष्यात कष्टाची वर्तुळं वाढली हे काही वेगळं सांगायला नको. 

"त्या दुपारी" या म्हणजे दादा गेल्यानंतरच्या काळातल्या आणखी काही आठवणी ऐकून न कळत्या वयातही मनाला यातना व्ह्यायच्या. तेव्हा खरं सांगायचं तर आमची तेव्हाची परिस्थिती म्हणजे त्याकाळचे मध्यमवर्गीयच किंवा कदाचीत त्याहून एक पायरी खाली. चाळीतलं दोन खोल्यांचं घर, वर्षाला एक पावसाळी आणि एक उन्हाळी चप्पल, दिवाळीलाच काय ते नवीन कपडे (मध्ये कधीतरी कुणी कापड भेट म्हणून दिलं असलं तर एक  जादा फ्रॉक), शाळेत आणि बारावीपर्यंत जुनी पुस्तकं (आणि इंजिनीयरींगला रेंटवर मिळणारी) असे आमचेही दिवस. पण तरी त्या उन्हाळ्यात आमच्या आई-बाबा आणि नातेवाईक यांच्या होणाऱ्या गप्पा ऐकल्या की  आम्हाला आमची ती परिस्थिती खूप म्हणजे खूपच चांगली वाटायची. 

अखेर आमचीही ती परिस्थितीदेखील नाही म्हणता सुधरली. आमची तिघांची शिक्षणं होऊन थोडे कमवते झालो. मुंबईत चांगल्या ठिकाणी घर वगैरे तेव्हाही स्वप्नच होतं. चाकरमान्यासारखं उपनगरातून चर्चगेटपर्यंत आणि नंतर सिप्झ असे दोन्ही महात्रासदायक प्रवास सुरु झाले. माझ्या वयाच्या आसपासचीच असणारी आम्ही सगळीच भांवडं नोकरीच्या रामरगाड्यात अडकलो आणि मग "त्या दुपारी" फारसा गाजावाजा न करता  कुठेतरी गायब झाल्या. 

ऊन आता इकडेही तापायला लागलं आहे, आई-बाबा त्यांच्या नातवंडाना भेटायच्या निमित्ताने, फार दिवसांनी ,"त्या दुपारी" शनिवारी किंवा रविवारी येऊ पाहताहेत. पुन्हा जुने विषय रंगतात. फक्त आई आता दादांबद्दल बोलायच्या ऐवजी आम्ही आमच्या लहानपणी कसा दोन खोल्यात अभ्यास केला, त्याबद्दल बोलते. बाजुला खेळता खेळता मुलाने एका कानाने हे टिपलेलं असतं आणि तो निरागसपणे विचारतो,"आई, खरच?" त्याचा बदललेला चेहरा मला काही सांगू पाहतो. त्याला माझ्या तेव्हाच्या परिस्थितीबद्दल वाईट वाटत आहे, हे मला स्पष्ट दिसतं. त्याच्या डोळ्यात माझी मी पाहताना माझं "उन्हाळ्याचं वर्तुळ" नकळत पूर्ण होतं. 

Wednesday, May 21, 2014

भरून भरून ........

माझ्याबरोबर भगुबाईला असणारा एक मित्र गेले काही वर्षे त्याचं करीयर गुजरातमध्ये करतोय. बरेच दिवस त्याच्याशी प्रत्यक्ष बोलणं झालं नाही, पण आमच्या batch मधल्या मुलांच्या त्या ग्रुपमधल्या मुलांना मी जितकं ओळखते, त्यावरून तरी त्याचं भविष्य तिथे उज्ज्वल असल्याशिवाय तो तिथे जाऊन स्थायिक वगैरे होणार नाही हे मला माहित आहे. तेव्हापासून गुजरात, तिथली इकोनॉमी इत्यादीबद्दल एक कुतूहल आहे आणि पुढचं कुतूहल अर्थातच ते नाव जे गेले कित्येक महिने सगळ्यांच्याच तोंडावर आहे. 
माझा राजकारणाचा अभ्यास तसा कमीच आहे आणि कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घ्यावा इतका आत्मविश्वास मला कुणाही पक्षाबद्दल आला नाही; कारण सगळीकडे कामसू आणि कामापुरते असे दोन्ही कार्यकर्ते पाहण्यात आले. मग कुणा पक्षाला चांगलं म्हणायचं हा संभ्रम होणारच. 
पण जेवढी माहिती "मोदी" या वलयाबद्दल मला वाचायला मिळाली आणि त्यांची जी काही online भाषणं मी ऐकलीत त्याने मला या व्यक्तीबद्दल आदर आहे. पक्ष म्हणून खरं प्रत्येक पक्षाने त्यांच्या त्यांच्या कमकुवत जागा जेव्हा जेव्हा त्यांना सत्ता मिळाली तेव्हा तेव्हा दाखवून दिल्या आहेत. पण तरी खंबीर नेता मिळाला तर आपण बदल घडवून आणू शकतो असा आत्मविश्वास ज्या नेतृत्वाकडे असायला हवं ते मोदींकडे असेल असं त्यांना ऐकताना जाणवतं.
त्यांच्या मुंबईला केलेल्या भाषणात त्यांनी १८ ते २८ या वयाबद्दल आणि त्यावेळी संधी मिळाल्या नाहीत तर काय होऊ शकतं याबद्दल व्यक्त केलेले विचार मला दहाबारा वर्षांपूर्वी माझा माझ्या करियरशी सुरु असलेला धडा आठवून गेला आणि वाटलं खरच तेव्हाही असाच नेता असता तर? आणि आताचं त्यांचं निवडून आल्यानंतरचं भाषण, ज्यात ते हळवे झालेत, हे सगळं पाहिलं की आत कुठेतरी या व्यक्तीशी आपली नाळ जुळते आहे असं वाटतं. त्याचं कालचं भाषण मी दोनवेळा ऐकलं.  



रडणं म्हणजे एका वेगळ्या प्रकारे व्यक्त होणं. हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. तेवढं भावूक होण्यासाठी आपला भूतकाळ कारणीभूत असतो असं मला वाटतं. तळागाळातून वर आलं की  ते जुने दिवस आठवणींच्या तळाशी असतात. त्या कधी डोकं वर काढतील सांगता येत नाही. अशावेळी  आसवांनी वाट मोकळी करून दिली तर त्यात त्या व्यक्तीचा कमकुवतपणा न दिसत त्याची सच्चाईच दिसते. बदलेले दिवस काळ अर्थातच दाखवेल आणि यातून काही न काही चांगलं हळूहळू का होईना नक्की घडेल. 

देशापासून इतक्या दूर असले की काही क्षणांची आर्तता जास्त जाणवते. भावना त्याच असतात फक्त आपण तिथे नसतो. आत्ता वाटलं म्हणून सगळं सोडून येता आलं असतं तर किती बरं असं वाटायचा हा क्षण मला धरून ठेवायचा नाहीये. मला काय बदलता येईल मला नक्की माहित नाही किंवा सांगायचं तर त्यांचा अजेंडा, प्लान इत्यादींबद्दल काही लिहावं अशी माझ्या अभ्यासाची व्याप्ती नाही. पण या क्षणी जर मला कुठे असायचं असेल तर ते माझ्या देशात हे सांगायला मात्र आज लिहायलाच हवं. तुम्ही कुठेही राहिलात तरी चांगल्या गोष्टी आपल्या देशात घडाव्यात असं तुम्हाला वाटणं साहजिक असतं किंवा काहीवेळा देशाबाहेर राहिल्यामुळे तुम्ही तुमच्या देशात होणाऱ्या घटनांचा संदर्भ तुमच्या रोजच्या भावनांशी जास्त तीव्रतेने जोडता. त्यात जसं चुकीच्या घटनामुळे होणारा संताप असतो तसचं चांगल्या गोष्टीच कौतुकही असतं. 
मला आजकाल "अच्छे दिन आएंगे" हा वाक्प्रचार आवडतो आणि तसचं हे सगळं वातावरण अनुभवताना समोरचा सद्गदित झाला तस माझेही डोळे पाणावतात. भावनेच्या भरात कदाचित असंच लिहीतही राहीन ज्यात नक्की काय म्हणायचं आहे हेही वाहवून जाईल. आज सगळचं भरून भरून आलंय हेच खरं. 

Thursday, May 8, 2014

गाणी आणि आठवणी १६ - ऋतू हिरवा

हे गाणं माहित नाही असा मराठी गानप्रेमी विरळा. वेगवेगळ्या वेळी हे गाणं ऐकलं आणि प्रत्येक वेळी तितकंच भावलं. त्यामुळे या गाण्याची सलग आठवण नाही पण म्हणून त्याला गाणी आणि आठवणीमध्ये स्थान द्यायचं नाही हेही रूचत नाही. 
सगळ्यात पहिले जेव्हा ही कसेट बाजारात आली आणि ऐकली तेव्हाचा आशाताईचा स्वर आणि सुमधुर संगीताचा बाज भावला. यातला कोरसही तितकाच खास. श्रीधरजींचे आभार मानावे तितकेच कमी आणि शांता शेळके यांचेही. तेव्हा आम्ही वसईला राहत असताना वसई गावात एक होतकरू तरुणांचा गाण्याचा ग्रुप होता. मी त्या ग्रुपचं नाव विसरले आहे आणि आता त्यापैकी कुणी माझ्या संपर्कात नाही. पण त्यांनी एक स्थानिक गायकांना घेऊन एक गाण्याचा कार्यक्रम केला होता. त्यात बसवलेल्या अनेक गाण्यात हे गाणं सगळ्यात छान बसलं होतं. सहगायकांनी मूळ गाण्याच्या तोडीचा कोरस गायला होता. मला वाटतं त्या कार्यक्रमाची सांगता या गाण्यानी झाली होती. त्या रात्री तिथून निघताना मन हिरवं झालं होतं. त्यानंतर कधीही त्यातले कलावंत कुठे दिसले की त्यांनी गायलेलं ऋतू हिरवा आठवे. 

मग अमेरीकेत आल्यावर ताईने आठवणीने कसेट पाठवली आणि तो मोसम नेमका वसंत ऋतुचा होता. इस्ट कोस्टचा वसंत म्हणजे हिवाळ्यानंतरचा पाऊस पडून आलेल्या हिरवाईचा महोत्सव. त्यावेळी केलेल्या सगळ्या लॉंग ड्राईवला एकदा तरी हे गाणं ऐकून तल्लीन झालो नाही असं झालं नाही. 

आता आई बाबा आशाताईंचा नवीन अल्बम "साकार गांधार हा" घेऊन आलेत. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी लिहेन पण त्यानिमित्ताने आशाताईंचा या वयातही तरुण असणारा आवाज याचा आईबाबांबरोबर विषय झाला आणि पुन्हा एकदा आधीचा अल्बम म्हणून "ऋतू हिरवा"ची पुन्हा आठवण झाली. त्यांच्या जुन्या आवाजाची तुलना म्हणून नाही पण ऐकावसं वाटलं म्हणून. 
योगायोग म्हणजे आताच वसंत सुरु झाला आहे. तसा सदाहरित सुचीपर्णी वनाचा प्रदेश असला तरी हिवाळ्यात ती झाडं सोडली की बाजूला काड्या आणि रखरखाटच असतो. यंदा इतर वर्षांच्या तुलनेने इथे काय म्हणतात ते "स्प्रिंग चांगला आहे". आजूबाजूला हिरवाई पसरते आहे आणि नेमकं कानात ऋतू हिरवा वाजतंय. या सगळ्या भावना शब्दात पकडणं कठीण आहे. पण आईबाबांबरोबर कुठचा लांबचा प्रवास करून येताना हे गाणं त्याना तल्लीन होऊन ऐकताना पाहणं हीदेखील माझ्यासाठी सुखद आठवण आहे. या प्रवासात फक्त शांता शेळके यांचे शब्द असतात आणि आशाताईंचे आलाप. या गाण्याचा कोरस म्हणजे गाण्याचा प्राण आहे. जर मन कुठच्या कारणाने बेचैन झालं असेल तर मनाला शांत करायचा उपाय म्हणजे हे गाणं आहे. 

मला वाटतं हे गाणं माझ्यासाठी या आणि अशा बऱ्याच आठवणी निर्माण करत राहील. तरीही अधुऱ्या आठवणींची ही पोस्ट माझ्यासाठी खासच. 

Tuesday, April 15, 2014

कहानी में ट्विस्ट

माझ्या घरात दोन माकडं आहेत. ती घरामध्ये धांगडधिंगा घालत असतात आणि माझ्या डोक्याला काही न काही तरी खुराक लावून देत असतात. ती एकमेकांशी आणि आम्हा दोघांशी भांडतात,मज्जा करतात आणि काही वेळा शाळेतल्या त्यांच्या इतर मित्रांना त्रास देतात. तो त्रास आटोक्यात असेल तर ठीक पण नेहमीचं झालं की मग त्यांची टीचर एखादी नोट पाठवते. हे "लवलेटर" घरात आलं की त्या संध्याकाळी मग मी स्वतःशी विचार करते की आता यांना थोडा आवर घालायचं कसं शिकवायचं. मागे मोठं माकड हरवलं होतं ती गोष्ट तुम्ही वाचली आहे का? इकडेच आहे ती. त्यावेळी मी त्याला त्याच्या आवडत्या थॉमस इंजिनाची एक गोष्ट रचून सांगितली होती. त्यामुळे आता त्याला माझा फोन क्रमांक माहित आहे. म्हणजे त्याने पुन्हा हरवू नये पण अशी चुकामूक झालीच तर तो निदान आपला पत्ता कळवू शकेल. तेव्हा ती गोष्ट ब्लॉगवर टाकायची होती पण आज उद्या करता राहूनच गेली. 

सध्या लहान माकड फॉर्मात आलयं आणि वेळ आली आहे त्याच्यासाठी अशी एक गोष्ट तयार करायची तर ही त्या गोष्टीची गोष्ट. 

खर पाहिलं तर ही गोष्ट आपल्याला सर्वांनाच चांगली माहित आहे. माकड, उंदीर आणि मांजर तिघं मिळून खीर बनवतात आणि मांजरीताई एकटीच सगळी खीर संपवते. मग ती "मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी" म्हणताना बुडून जाते. माझ्या सुरुवातीच्या गोष्टीत मी मांजरीला बुडू दिलं नव्हतं कारण मित्र एकमेकांना मदत करतात आणि मित्रांकडे एकमेकांना वाचवायचा उपाय असतो असा काही नवा संदेश मला मुलांना द्यावासा वाटला. (शिवाय मारून टाकणे aka violence चा बागुलबुवा होताच) मग मागचे काही महिने ही गोष्ट आमची लाडकी झाली. जेवणात एक घास जास्ती खाणे किंवा नकळत नावडत्या भाज्या घशाखाली उतरवणे अशी कामं या गोष्टीने बिनबोभाट होऊ लागली. 

परवा या गोष्टीमध्ये सांगताना सुरुवातीलाच असं ठरलं की आज मांजर खीर नुसतीच राखत बसणार, अजिबात खाणार नाही. मग माकड आणि उंदीर गेले आंघोळ करायला आणि मांजर बसली आपली राखत. तेवढ्यात तिथे एक मोठ्ठा हत्ती आला (हत्ती मोठ्ठाच असतो पण माझं छोटं माकड, "हो? एवदा मोथा?" म्हणतं ते पाहण्यासाठी आणि एक घास घशात घालण्यासाठी असे बझवर्ड्स वापरणं जरुरीचं आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच) 

हत्ती म्हणाला," मांजरी ताई, मांजरी ताई मला खीर खायची आहे". मांजर म्हणाली, " अरे पण उंदीर आणि माकड आंघोळीला गेले आहेत तोपर्यंत कुणीच खीर खाणार नाही. मी बसलेय राखण करत. तुला दुसरं काही काम असेल तर ते करून ये." हत्तीने विचार केला या तिघांनी मिळून खीर केली आहे आणि ते ती आपल्याला पण देणार आहेत मग आपण ती फुकट घायची का? (इथे आमची घरची तल्लीन झालेली माकडं मान हलवून नाही वगैरे म्हणताहेत) तो जंगलात गेला आणि त्याला तिथे एक मोठं आंब्याचं झाड दिसलं (इकडे नेहमी न मिळणारे आंबे हे आमच्या घरातल्या तमाम माकडांचं अतिशय आवडतं फळ आहे विशेष नमूद करायला हवं) त्याने चौघांसाठी चार आंबे त्याच्या सोंडेने काढून घेतले आणि तो परत मांजरी खीर राखत बसली होती तिथे आला. 

तितक्यात माकड आणि उंदीर त्यांची आंघोळ आटपून आले आणि त्यांनी मांजरीसोबत हत्तीला पाहिलं. त्यांना पाहून मांजरी म्हणाली, "हे बघा आज आपल्याबरोबर कोण आलं आहे खीर खायला?" हत्ती म्हणाला," मी मांजरीकडे खीर मागितली तेव्हा ती मला म्हणाली की ती तुमच्यासाठी थांबली आहे. मला अशी शेयर करणारी मित्रमंडळी खूप आवडतात म्हणून मी पण तुमच्यासाठी एक गम्मत आणली आहे". असं म्हणून हत्तीने सगळ्यांना एक एक आंबा दिला. मग त्या चौघांनी मिळून खीर आणि आंबे असे दोन दोन डेझर्टस खाल्ले. 

मी - गोष्ट ?
दोन्ही माकडं - संपली… 
मी - मग आपल्याला आज नवीन काय कळलं?
मोठं माकड - नवीन फ्रेंड्स बरोबर शेयल कलायचं. 
मी - मस्त. आणि मित्रांबरोबर बोलताना ओरडून बोलायचं नाही. जर मांजरी सुरुवातीला हत्तीला ओरडून बोलली असती तर कदाचित हत्तीने तिला सोंडेने फेकून दिलं असतं आणि सगळी खीर खाल्ली असती पण मांजरी त्याच्याबरोबर चांगलं बोलली आणि म्हणून त्यांचा काय फायदा झाला? 
मोठं माकड - त्यांना दोन दोन डेझर्टस मिळाले. 
मी - म्हणून मित्रांबरोबर मग ते शाळेत असो शेजारी असो कुठेही असो कसं वागायचं?
लहान माकड - चांगलं वागायचं. 

चांगलं वागायचा हा धडा कितपत चालतो ते लवकरच कळेल. तोवर आम्ही माकड, उंदीर, मांजर आणि हत्ती अशी आमची नवीन गोष्ट वेळ पडेल तशी सांगत राहणार. कधी कधी कहानी  में ट्विस्ट फॉर्म्युला चालतो कधी नाही. देखते है यह कहानी कितना रंग लाती है? 

Monday, March 31, 2014

कशासाठी? स्वतःसाठी….

काही महिन्यापूर्वी ब्लॉगचे फॉलोअर्स अचानक वाढले असं लक्षात आलं. ज्या वेगाने या ब्लॉगवर लिहिलं जातं किंवा जे नेहमीचेच विषय इकडे मांडले जातात त्या मानाने हे खरं मला अपेक्षीत नसतं. एकुण फॉलोअर्स १९० च्या पुढे वगैरे म्हणजे, "अगं बाई, खरंच?" असं काहीसं. साधारण त्याचवेळी, एका ब्लॉगवाचकाची मेल आली, तुझ्या पोस्टचे अपडेट्स मराठीब्लॉग्स डॉट नेटवर दिसत नाहीत. त्या साईटवर तपासून पाहिलं तर त्यांनी माझा ब्लॉग काढून टाकला होता. त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील म्हणून त्यांना मेल करणे, ब्लॉग पुन्हा जोडून पहिले वगैरे करून पाहिलं पण एकदंरीत काही बदललं नाही. आणि त्यांच्याकडून मेलला उत्तर वगैरेदेखील नाही. 
मग विचार करत बसले की खरंच आपण ब्लॉग का लिहितो? व्यक्त व्हायचं साधन म्हणून की आणखी कशासाठी? आणखी काही (वाटलं तरी किंवा नाही वाटलं तरी) आपण काही करू शकणार नाही हे निदान माझ्या सद्यपरिस्थितीत माझं मला माहित आहे. मग ते कुणी वाचलं काय नाही काय मला व्यक्तिश: काय फरक पडतो? काहीच नाही. शिवाय माझ्या व्यक्तिगत आयुष्यातला प्रत्येक प्रसंग काही मी ब्लॉगवर मांडणार नाही. पण जे मला खरंच लिहावंसं वाटतं ते लिहिलं गेलं तर त्यात फक्त वैयक्तिक स्वार्थ आहे. मला स्वतःला माझ्या जुन्या पोस्ट्स वाचायला आवडतात. मला जे डीटेल्स लक्षात राहिले नसते ते ब्लॉग पोस्टच्या निमित्ताने मला पुन्हा आठवतात. आता काय बदललंय हे उगाच लक्षात येतं. 
हा एक मागच्या पाच वर्षांचा किंवा आठवणीबद्दलचं बोलायचं तर मागच्या कित्येक वर्षांचा प्रवास माझा माझ्यासाठी नकळत लिहिला गेला. पुन्हा पुन्हा वाचताना त्याचा प्रवाह मला आवडतो हे लक्षात गेलं.  त्यामुळे अनियमित का होईना इथे लिहित रहावसं वाटणार. लिहिता लिहिता अनेक जणांनी ते वाचलं त्यातल्या काहींनी प्रतिक्रिया दिल्या आणि काहींनी कदाचित खिल्लीही उडवली असेल. त्याने या ब्लॉगिंगला काही फरक पडला नाही किंवा ते आवश्यक आहेच असं नाही. मग मराठीब्लॉग्स डॉट नेटचा लोगो इथे असला काय नसला काय, त्यांनी त्यांच्या साईटवर माझ्या पोस्ट्स टाकल्या काय नाहीत काय काहीच फरक पडत नाही. आज बरोबर पाच वर्षांनी माझ्या ब्लॉगच्या मुखपृष्ठावरून ते चिन्ह काढून टाकताना माझ्यासाठी ब्लॉगिंग किती बदललं  आहे हे लक्षात येतंय. 
थोडसं कडवट वाटणारं वरचं मनोगत आज सुरुवातीला लिहिलं कारण गुढीपाडव्याची सुरुवात कडूनिंबाचा पाला खाऊन होई मग नंतर दुपारच्या जेवणातलं श्रीखंड अधीक गोड लागे. 
वाचक, फॉलोअर्स आणि पोस्ट यांची आकडेमोड करायचं ब्लॉगच वय कधीच सरलंय. पण त्या बद्दलची कृतज्ञता तशीच आहे आणि तशीच राहील. आता इथून पुढे वर्षभर जे लिहिलं जाईल ते वाचकांना नक्की गोड लागेल अशी आशा. 


यंदाची गुढी आपल्यासाठी येणाऱ्या वर्षात काही सुखद बदल घेऊन येवो हीच सदिच्छा. 

Saturday, March 8, 2014

One Tough Mother

ती तेरा वर्षांची असताना  नाझी जर्मनीच्या तावडीतून सुटून मुक्त अमेरिकेत आलेलं हे कुटुंब. तिच्या बाबांनी इथेच पोर्टलँडमध्ये एक टोप्यांच्या व्यवसायात आपले पाय रोवले आणि यथावकाश एक छोटी कंपनी सुरु केली. त्यांच्या मृत्यूनंतर या मुलीच्या नवऱ्याने ही कंपनी पुढे सुरु  ठेवली पण त्यानंतर सहाच वर्षात अचानक वयाच्या फक्त ४७व्या वर्षी हृदयविकाराने तोही गेला, तेव्हा ती आता चाळीशीत असणारी ती वर उल्लेखलेली मुलगी, जिने कधी कुठल्याही  व्यवसाय क्षेत्रात आधी कधी पाऊल टाकले नव्हते आपल्या बाबांचा इतके वर्षांचा व्यवसाय हातात घेतला. 

तिची मुलं तेव्हा अनुक्रमे २१, १९ आणि १२ वर्षांची होती म्हणजे लहानगी नसली तरी अजून शाळा कॉलेजमधली, पालकांवर अवलंबून होती. या मुलांची ही one tough Mother हा सगळा व्यवसाय हातात घेते तेव्हा  आजूबाजूंच्या इतर भाकीतकर्त्यांनी आता ही  कंपनी बुडणार म्हणून चारीठाव सांगून झालं होतं. हेच कशाला तिने व्यवहार हातात घेतल्यापासून वर्षभरात बँकेनेही फक्त चौदा हजार डॉलर इतक्या शुल्लक रकमेवर कंपनी बुडीतखात्यात घालण्याचा सल्ला दिला होता. अशा सगळ्या परिस्थितीला न जुमानता शिवाय पतीनिधनाचं ताजं दुःख बाजूला ठेवून आपलं लक्ष आपल्या मोठ्या मुलाला हाताशी धरून नवीन रिटेल प्रॉडक्ट्स वाढवून आणि जाहिरात इत्यादी माध्यमातून कंपनीला नुसतंच तारलं नाही तर तिचं नाव उत्तर अमेरिका आणि अन्य देशात नावारूपाला आणलं. 

२००४ च्या सुमारास  कंपनीची  त्या वर्षीची वार्षिक विक्री १ बिलियन डॉलरपेक्षा जास्त होती. तिचं नाव निव्वळ व्यवसायामुळेच आहे असं  नाहीये. तिने अनेक ठिकाणी मदतीसाठी संस्था सुरु केल्या आहेत आणि त्यातल्या स्त्रियांसाठी असलेल्या संस्थाही भरपूर आहे. आपल्या भारतातही तिची "हर प्रोजेक्ट(Her project)" म्हणून एक संस्था आहे. तिचा यु ट्यूब विडिओ खाली आहे.



तिच्या बाबांनी पोर्टलँडजवळच्या नदीचं नाव ठेवलेली ही कंपनी आहे "कोलंबिया स्पोर्ट्सवेअर" आणि ही टफ मदर आहे "गर्ट बॉयल". दोन दिवसापूर्वी ही आई नव्वद वर्षांची झाली. तिचा वाढदिवस महिला दिनाच्या आसपास असणं यापेक्षा सुखद योगायोग तो काय?

गर्टच्या खात्यावर असलेली ही यादी पहिली तर तिच्याबद्दलचा आदर  नक्की दुणावेल. 

  • The SBA Outstanding Business Person Award for Oregon (1977)
  • The Oregon Chapter of Women’s Forum Woman of the Year Award (1987)
  • A Top 50 Woman Business Owner by Working Woman Magazine (1993-96)
  • Oregon Entrepreneur of the Year, Oregon Enterprise Forum (1994)
  • The Golden Plate Award, American Academy of Achievement (1998)
  • Awarded the Jimmy Huega “Can Do” Award (2003)
  • Member, Oregon Commemorative Coin Commission (2004)
  • Granted Portland, OR’s prestigious First Citizen Award (2005)
  • Women of Distinction Award, Marylhurst University (2008)
  • Small Business Association Impact Award (2009)
  • Outstanding Mother Award, National Mother’s Day Committee (2009)
  • Women of Achievement Award, Oregon Commission for Women (2009)

तळटीप:

आतापर्यंत माझ्या करीयरमध्ये consulting मध्ये असल्यामुळे वेगवेगळे क्लायंट्स आले आणि माझ्यासाठी आदराची नवनवीन स्थानं निर्माण होत गेली. या टफ मदरच्या एका मुख्य प्रोजेक्टवर काम करायची संधी मिळणं हे माझंच भाग्य. आता तिचा मुलगा मुख्य कारभार संभाळत असला तरी कार्यकारिणीवर असलेली ही आई मला बाजूलाच असलेल्या employee store मधल्या तिच्या One tough Mother या  पुस्तकामुळे आणि  येता जाता लावलेल्या तिच्या पोस्टरमुळे नेहमी दिसते. तिला तसं  पाहताना मला तिची पार्श्वभूमी जाणून घ्यावीशी वाटली. हे पुस्तक खर अजून माझ्या  विशलिस्टवरच आहे. आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गेले काही महिने मला तिच्याबद्दल वाटत असलेल्या भावनांना शब्दांत मांडता आलं की  नाही माहित नाही पण त्या निमित्ताने या वाचकांना एका स्त्रीच्या यशाची कहाणी वाचावीशी वाटली तरी ते या पोस्टचं यश मी समजेन. तिच्या पुस्तकाचा काही भाग अमेझॉनवर या लिंकवर आहे. 



Monday, February 10, 2014

अर्ध्यावरती डाव मोडला….

ती माझ्या आयुष्यात थोड्या काळासाठी आली आणि तिच्या एका छोट्या कृतीने  देता देता एक दिवस मला थोडक्यात पण महत्वाचे शिकवून गेली. आनंदी राहायला खूप पैशाची आणि अपेक्षांची गरज नसते हे तिच्या बरोबर जे काही संवाद झाले तेव्हा तेव्हा नेहमीच जाणवायचं. 

नवऱ्याला पुन्हा नोकरी लागली तेव्हाचा तिचा फुललेला चेहरा, आता स्वतःचा इन्शुरन्स घेऊ शकतो असं सांगून तिच्या छोट्या छोट्या अपेक्षा पूर्ण होताहेत याचं समाधान. मुलाला इकडच्या शाळेत पाठवण्यासाठीचा आनंद, मागे एका dog shelter मधून कुत्रा दत्तक घेतानाची घटना, मी तिला जेव्हाही पाहिलं तेव्हा ती तिच्या कुटुंबात सदैव रमलेली आई/बायको, सतत हसरा चेहरा आणि समोरच्याला मदत करायची तयारी. 

मागे तिने घर घेतलं त्यावेळी आता आम्ही भेटणार नाही असं मला वाटलं. अर्थात तिची एक मैत्रीण आम्ही राहायचो त्याच इमारतीत खालीच राहायची. शिवाय मुलाची शाळा तिने बदलली नव्हती त्यामुळे मी शाळेच्या वेळेत दिसत राहीन असं तिने घर घ्यायची बातमी दिली तेव्हाच सांगितलं. मग तिच्या सामानसुमान थोडं फार लागलं असावं त्यावेळी एक दिवस दुपारी माझ्याकडे येऊन तिने मला एक राजस्थानला मिळतं, एकाखाली एक चिमण्या लटकत असतात ते शोपीस दिलं. मला खात्री आहे ती मला, भारतीय व्यक्तीला काही तरी खास द्यायचं म्हणून कुठलं तरी खास दुकान शोधत हे घेऊन आली असणार. "This is for good luck" मला तिने देताना सांगितलं आणि त्याच्याबरोबर एक सुंदर कार्ड. तिच्या घरासाठी मीही एक गिफ्ट घेतलं होतं. यानंतर आमच्या वेळा जुळल्या तर पार्किंग लॉटमध्ये भेट होई आणि लवकरच आमचीदेखील त्या जागेतून हलायची वेळ झाली. मग पुन्हा एकदा निरोपाची बोलणी आणि शुभेच्छांची देवाणघेवाण. यावेळी मात्र भेटीगाठी कठीण हे साधारण माहित. 

अर्थात मनातून ती जाणं शक्य नव्हतं. तिने तिच्या मुलाची दिलेली काही पुस्तकं आणि वस्तू माझ्याकडे आहेत त्यांचा उल्लेख नेहमी त्यांच्या आठवणीने होतो. 

माझी एक मैत्रीण अजून तिथल्याच एका इमारतीत आहे म्हणून एकदा जाऊया, भेटूया असं करता करता मागचं वर्ष असचं गेलं. काल एका सुपरमार्केट मध्ये तिची ती मैत्रीण भेटली आणि सुरवातीला मी तिच्या मुलाची चौकशी केली, अजून तो याच शाळेत असेल तर मग एकदा भेट जमवावी का असं माझ्या मनात होतं आणि ती वाईट बातमी मला मिळाली. एका वाक्यात सांगायचं तर "ट्रेसी गेली." पुढे तिने जे काही सांगितलं ते मला ऐकू तरी आलं का मला आठवत नाही. अजून मी शब्द जुळवतेय. 

तिला दम्याचा त्रास होता हे मला आताच कळलं. अर्थात त्यावर जे काही उपचार केले जातात ते ती घेत असणार. ख्रिसमसच्या निमित्ताने डिस्नेला जायचा प्लान त्यांनी बनवला. तिकडे जायचं म्हणून सगळी तयारी करून तिला दगदग झाली  हे निमित्त की  ती लोकं तिथे गेल्यावर थोडं दाटलेलं हवामान होतं ते तिचं शरीर झेलू शकलं नाही? परामेडीक्स यायला दहा मिनिटं लागली त्यावेळी ऑक्सिजन कमी झाला त्याने ती त्या दम्याच्या attack मधून उठलीच नाही. डॉक्टरांनी दहाएक दिवस प्रयत्नांची शर्थ केली पण बहुतके तिच्या तिसरीत असलेल्या मुलाचीही नियतीला दया आली नाही ना? देता  देता एक दिवस देणाऱ्यालाच अवेळी घेऊन जाणारी ही जी कुठली शक्ती आहे, तिच्याकडे नक्कीच न्याय नाही. आज राहून राहून तिच्या लहानग्याचा चेहरा समोर येतोय आणि कसंतरीच वाटतं. एका आईच्या तळमळलेल्या आत्म्याला शांती मिळो हे नक्की कुठल्या तोंडाने बोलायचं?