या घरात राहायला आलो तो पहिला दिवस अगदी लख्ख आठवतो. इन्व्हेस्टमेन्टच्या दृष्टीने आणि मुंबईत कुठे पुढे-मागे अंगणवालं घर (उर्फ़ बंगला) परवडणार म्हणूनही, एक छोटं तीन बेडरुमचं घर घेतलं आणि एका ऑगस्टमध्ये आम्ही तिथे आलो. आधी अपार्टमेन्टच्या वर्दळीची सवय होती त्यामुळे इथे अगदी टाचणी पडेल इतकी शांतता पाहून खरं तर भयाणच वाटलं होतं आणि विचारही आला कसं होणार आपलं. पण मागचे तीन वर्षांपेक्षा जास्त इथे राहिल्यावर ती शांतताच आमची मैत्रीण झाली की आम्ही त्या शांततेचं रुपांतर किलबिलाटात केलं सांगणं कठीण आहे. पण आताशा खूप आपलं वाटायला लागलं.

पहिल्या दिवशी एकटेपणाची जाणीव होती ती कुठे पळाली कळलंच नाही. इथुन जशी इतर महत्त्वाची शहरं जवळ तसं इथली नेहमीच्या खरेदीपासुन, खायला जाण्याची सगळी ठिकाणं जवळ. काही काही दुकानं तर अगदी चालत जाण्याच्या अंतरावर. एक वेगळा वेग इथेही आला. शिवाय स्वतःच घर म्हणजे थोडफ़ार बागकामाची आवड असलेल्या मला तर पर्वणीच होती. अगदी स्प्रिंगला येणारी डॅफ़ोडिल्स, ट्युलिप्स. फ़ॉलमधली मम्स आणि मग जवळजवळ थंडी पडेपर्यंत येणारे छोटे गुलाब आणि देवासाठी झेंडु लावणं मला खूप आवडायचं. दरवर्षी उन्हाळ्यात टॉमेटो आणि इतर काही भाजी, फ़ुलझाडं लावणे आणि मग उरला ऋतु त्याची निगराणी करणे हाही एक आवडता उद्योग बनला. अगदी पहिल्यांदी लावलेली मम्स (आपल्याइथल्या शेवंतीसारखी फ़ुलझाडं) अजुनही आता फ़ॉलमध्ये येतात.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगळ्या देशात असुन आपुलकीने आमची चौकशी करणारा शेजार मिळाला. ही एक गोष्ट मी इथल्या अपार्टमेन्ट मध्ये नेहमीच मिस केलीय. शेजारी कधीही हायच्या पुढे नाही. एखादा भारतीय असला तर थोडा फ़ार परिचय होण्याची शक्यता. इथे मात्र कधीकधी "आज तुझा नवरा घरी नाही तर मी बाहेरचा बर्फ़ काढुन देऊ का" म्हणणारा शेजारणीचा मुलगा आणि "अगं, आता हा ड्राइववेवर धावतोय" अस म्हणत प्रेमळपणे आरुषला "यु सन ऑफ़ अ गन" म्हणणारी बेट्टी आजी, समोरचं दोन मुलींवालं डिनिसचं कुटुंब, "आय विल किप यु इन माय प्रेअर्स" म्हणणारी मेरी आणि कोपर्यावरची मॉली सगळ्यांनीच इथल्या वास्तव्यात जान आणली.
हे इतकं पारायण सांगायचं कारण म्हणजे आता निर्णय झालाय. गेले बरेच दिवस आम्ही दूरदेशी गेलेल्या बाबाची वाट पाहात होतो जे मी मागच्या एका पोस्टमध्ये लिहिलंय सुद्धा. त्यामुळे हे ठरवणं जवळजवळ अपरिहार्य झालंय..आमचं कुटुंब जिथे एकत्र राहु शकेल त्या नव्या गावी आम्ही जातोय. या इकॉनॉमीमध्ये घर विकुन होणारा तोटा टाळण्यासाठी जमलं तर हे घर भाड्याने देऊन आम्ही स्वतः आता पुन्हा एकदा नव्या गावी भाड्याच्या घरात राहायला जाऊ.
पाखरांचं बरं असतं नाही? काडी-काडी जमवुन बांधलेलं घरटं त्यांची पिलं मोठी झाली की पुन्हा मोकळ्या आकाशात जायला तयार होतात. आपण मात्र वास्तुवरही जिवापाड प्रेम करतो आणि मग ती सोडताना सगळ्या जुन्या आठवणी काढत बसतो. खरं तर राहताना कितींदा त्यातल्या थोड्याफ़ार कमी पडणार्या वस्तुंबद्द्ल किरकिरही केलेली असते पण आता सोडणार म्हटल्यावर सगळं अतोनात आवडू लागतं. आम्हाला आधी वाटायच की आता इथुन निघायचं ते थेट मायदेशी जायलाच अधेमधे कुठे हलुया नको. पण शेवटी सगळं आपण ठरवतो तसं थोडंच होणार असतं?? म्हणजे पुन्हा एकदा इथलं सगळं गुंडाळा आणि दुसरीकडे सोडवा.
गेले काही वर्षात किती सामान वाढवलयं याचा आता अंदाज येतोय. विशेषतः मूल झाल्यानंतर तर अगदी अतोनात वस्तू आल्यात त्या सर्व नेणं शक्य नाही. ते परवडणारही नाही. नवं शहर आमच्या शहरापासुन थोडं थोडकं नाही तर चांगल जवळजवळ ३००० मैल लांब म्हणजे अमेरिकेच्या दुसर्या कोस्टमध्ये..विमानानेही सलग ६ तास तरी लागतील. इथे लांब जागा बदलणं म्हणजे तिथे जाऊन बरचसं नवं घेणं जास्त परवडेल इतकं ते सर्व घेऊन जायचा खर्च आणि व्याप आहे. पण घर रिकामी तर करावं लागणार आहे. प्रत्येक खोली आवरताना तिथल्या सर्व आठवणींचा गुंता.
कितीवेळा वाटतं खरंच हा निर्णय घेऊया की सरळ अजुन काही दिवस इथं राहुन पुन्हा याच भागात नव्या नोकर्या शोधाव्यात. मनाचं सारखं तळ्यात-मळ्यात सुरू असलं तरी खरं सांगायचं तर ते जवळजवळ अशक्यच आहे. सध्या फ़क्त स्वतःला समजावणं चालु आहे की कधीकधी काही बदल काही वेगळ्या कारणांसाठी आवश्यक असतात. असे प्रसंग आपल्याला इथल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी लागणारं बळ देतं. आणि आता नुसतं हे घर सोडताना जर इतका त्रास होतो तर कुणास ठाऊक हा देश सोडताना किती त्रास झाला असता?? आता यातुन निभावलं तर कायमचं परत जाणं जास्त चांगल्या प्रकारे होईल. आणि मुख्य म्हणजे आता एक नवं शहर, तिथली प्रेक्षणीय स्थळं हे सर्व पाहुन जर परतायचं असेल तर का नाही??