आमची फार्मविलेची पोस्ट लिहिली त्यानंतर पुलाखालून बरचं पाणी वाहिलं. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या प्रकारे शेती करून पाहिली. प्रगती आहे पण तरी मागची काही वर्षे सीएसए शेयर घ्यावा असा विचार होता त्याला शेवटी यंदा मुहूर्त मिळाला. ज्यांना ठाऊक नाही त्यांच्यासाठी सीएसए म्हणजे community supported agriculture. एखाद्या लोकल शेतकऱ्याला आपल्या वाट्याचे पैसे देऊन त्याच्या शेतीतले पीक विकत घेता येतं. किती मोठे शेत आहे त्याप्रमाणे किती लोक भाग घेऊ शकतात त्याचाहिशेब असतो. एकदा का शेतकऱ्याला आपलं पीक विकलं जायची पक्की खात्री झाली की त्याचाही शेतावर बारा-चौदा तास राबायचा उत्साह वाढत असेल आणि ताजी भाजी मिळायची खात्री असल्यामुळे ग्राहक पण खूश असा हा मामला.
मागे एकदा शेजारणीने जवळच्या क्रेस्ट फार्मकडे असा CSA शेयर असतो याची कल्पना दिली होती. त्यांच्या मेलिंग लिस्टवरून त्यांचा शेयर उपलब्ध आहे ही मेल आल्यावर लगेच फोन करून माहिती काढली आणि चेक पोस्टाने पाठवायच्या ऐवजी स्वत:च जायचा विचार केला. अर्थात या कामालाही आज जाते, उद्या नक्की होत होतं आणि बहुतेक पोस्टानेच चेक पाठवायला लागणार होता. तेवढ्यात परवा थोडा वेळ मिळाला आणि एक चक्कर शेतावर मारली.
माझं फोनवर बोलणं झालं होतं जॉन बरोबर त्यामुळे तिथे तोच असेल असा मी विचार केला होता. पण खरं तर मला एक घर आणि त्यामागची शेती, तिथला कम्पोस्ट खताचा भाग आला तरी कुणी दिसत नव्हतं. तिथे उजवीकडे काही रोपं दिसत कुंपणापलीकडे एक स्त्री काम करत होती तिला मी हा चेक कोणाला देऊ म्हणून विचारायला गेले आणि माझी ओळख झाली एमी बरोबर. एमी या वर्षी CSA ची ही शेती करणार होती. म्हणजे तिनं ओळख करून दिली त्याप्रमाणे "I am the farmer this year".
माझ्याकडे वेळ आहे का विचारून तिने मला तिची शेती दाखवायची तयारी दाखवली.मला नाही म्हणावसं वाटलं नाही. शेतावरच्या पहिल्या भाज्या घ्यायला २ जूनला यायचं आहें. आमच्याकडे तसं अजून गरम नाही झालय पण एमीच्या शेतावरच्या ग्रीन हाउस मध्ये गाजर बऱ्यापैकी झाले होते. आणखी काही रोप बऱ्यापैकी मोठी झाली होती. मी सहज विचारल्यावर कळलं की एमी फेब्रुवारीतल्या थंडीपासून या रोपांसाठी करतेय. मग बाहेरची शेती पाहीली. त्यातही कांदे,केल,टोमेटो,बटाटा,मुळा, काकडी, कोबी अशी भरपूर विविधता होती. एक सोरेल नावाची मला माहित नसलेली पालेभाजी दाखवताना ती लावायचं कारण म्हणजे तिची एक ग्राहक रशियन आहे आणि रशियन जेवणात ती भाजी वापरली जाते असं एमी म्हणाली. कोथिंबीर लावता का हे त्याच विषयावरून विचारून घेतलं तेव्हा माझ्यासाठी नक्की लावेन असंही ती म्हणाली.
आमचा संवाद असाच सुरु राहिला असता पण मला निघायचं होतं. ती स्वतः कामात होतीच. जाता जाता शुक्रवारी शेतात स्वयंसेवक म्हणून काम करता येईल ही माहिती पुरवायला ती विसरली नाही.
ही पोस्ट लिहिताना, ही शेतातलं धान्य खरेदी करून शेतकऱ्याला त्याचा माल विकायची आधी विकायची खात्री द्यायची पद्धत पाहता नकळत माझ्या मनात आपले शेतकरी आलेच. कदाचित प्रत्येक प्रकारच्या शेतीला हा फॉर्मुला लागू होणार नाही पण असा प्रयोग करून पाहायला हरकत नसावी. माझ्यासारख्या लोकांनी तंत्रज्ञ म्हणून ढीग काम केलं तरी आमची पोटं भरायला शेतकऱ्याने शेतात राबलं नाही तर सगळं व्यर्थ आहे, ही जाणीव जेव्हा तीव्र होईल तेव्हा तरी असे "एकमेका सहाय्य करू" सेतू उभे राहावेत. तूर्तास, त्या दिवशी निघता निघता आमच्या शेतकरणीने दिलेला ताजा मुळ्याचा गड्डा आणि थोडी फुलं :)