Friday, June 5, 2015

छोटी छोटी (पर्यावरण) की बातें

"आमच्यावेळी" ही टकळी सुरु केली की तुम्हाला काय आठवतं? मला आठवतं वर्षातून दोनच वेळा मिळणारा नवा फ्रॉक, शाळेच्या गणवेषात एक स्कर्ट आणि दोन शर्ट्स, एक पावसाळी तुटेपर्यंत किंवा साईज बदलेपर्यंत वापरली जाणारी चप्पल आणि एक उन्हाळी तिचेही वापरायचे नियम तेच, आदल्या वर्षीच्या उरलेल्या पानातून बनवलेली रफ वही, आधीच्या भावंडाने वापरलेली पुस्तकं, हे आणि असं बरचं काही. हे मी अशासाठी लिहिते कारण ही यादी काही मुलं सोडली तरी बऱ्याच जणांकडे सारखीच असायची. त्यामुळे आम्ही काही गरीब वगैरे ठरत नव्हतो, सारेच मध्यमवर्गीय आणि गरजांची कुवतही मध्यमवर्गीयचं. 

मग आमच्याकडे पैसे यायला लागले, कसे ते  पोस्टचा भाग नव्हे पण आम्ही शिकलो, प्रगत झालो का काय म्हणतात ते. मग आमच्या मुलांकडे वरचा आढावा घ्यायचा तर वरच्या प्रत्येक वस्तूला कितीने गुणायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. यातल्या किती वस्तू त्यांना खरंच गरजेच्या आहेत? त्यांचं सोडा, आपल्यासाठी आपण घेतलेल्या वस्तूंची यादी बनवायला घेतली  आणि त्यातल्या कुठल्या कमी केल्या तर आपलं अडणार नाही हे पाहिलंत तर आपण कुठेतरी आपल्या गरज अवास्तव वाढवतोय का?  हा प्रश्न नक्कीच  पडेल. 

आज जागतिक पर्यावरण दिवस आहे तर त्यानिमित्ताने एक चितन करायला बसलं तर हे आठवायचं कारण म्हणजे मुबलक पैसा किंवा हवं ते उपलब्ध आहे म्हणून सगळं आपल्याकडे हवं या मोहापायी आपण नकळत पर्यावरणावर किती ताण देतो याकडे लक्ष द्यायची वेळ फार लांब नाहीये. बरं आजवर याकडे सरकार किंवा कुणी इतर माध्यमांनी काही करावं अशी अपेक्षा आपण बाळगतो आणि ते पूर्ण चुकीचं नसलं तरी आपला खारीचा वाटा आपण उचलणार का? 

वरती ते दैनंदिन जीवनातील उदा. द्यायचं कारण हेच आहे की तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांसाठी पर्यावरण दिन म्हणजे काही फार फॅन्सी प्रकारे साजरा केला पाहिजे असं नाहीये. हळूहळू एक एक गरज नियंत्रित केलीत, तरी बराच भर हलका होईल. आपलं योगदान दुसऱ्याच्या दारचा वृक्ष वाढवून देता येईल, तसच आपल्याला लागणारे काही कागद, काही कपडे कमी विकत घेऊनही दोन पाच झाडं कापायची थांबवीत. कुठे जवळपास चालत जाउन एखादं काम करता यावं म्हणजे तेवढाच पेट्रोलच्या साठ्यातलं आपले थेंब वाचावेत. हे आणि असं बरचं काही. बोले तो, छोटी छोटी बातें और सिर्फ ये ही नही बहुत कुछ और भी| जैसे आप सोचे और हो सके तो किसी और को सिखाये|




4 comments:

  1. सहमत, गरजा कमी करायची खरंच गरज आहे...

    ReplyDelete
    Replies
    1. प्रयत्न सुरु केला आहे इंद्रधनू :)

      Delete
  2. उत्तम विचार.

    लहानपणी जसे आदल्या वर्षीच्या वह्यांच्या कोर्‍या पानांपासून रफ वही बनवायचो तसेच सहलीला किंवा प्रवासाला पण घरून वॉटरबॅगमधून पाणी घेऊन जायचो. जिन्नस आणायला जाताना घरून कापडी पिशव्या घेऊन जायचो. हल्ली मात्र रुपयाची मिरची असो वा आठवड्याची भाजी. जेवढी खरेदी जास्त त्या पटीत प्लास्टिकच्या पिशव्या घरात येतात. जागोजागी मिळणार्‍या मिनरल वॉटरच्या बाटल्या, पेपर डिश, पेपर नॅपकिन आणि हाफिसात फुकट आहे म्हणून प्रिंटरवर छापले जाणारे अनावश्यक कागद... अशा एक ना अनेक गरजा(?). मिनरल वॉटरच्या ह्याच बाटल्या मग पावसाळ्यात शहर तुंबवतात. इलेक्ट्रॉनिक कचरा तर अजुन कुणी विचारातच घेत नाही. एके दिवशी हा भस्मासूर सगळे गिळून टाकणार आहे...

    ReplyDelete
    Replies
    1. तुझी लिस्टदेखील विचारात पाडणारी आहे. आपल्या गरजा सहजगत्या बदलल्या आहेत याची जाणीव होते आणि मुख्य इ-कचरा. खरंय भस्मासूर होतोय. आपण आपला खारीचा वाट उचलायचं ठरवतेय.

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.