Wednesday, December 31, 2014

चले चलो

खरं मला या पोस्टचं नाव hibernation द्यायचं होतं पण त्याचा मराठी अर्थ निष्क्रियता आहे हे पाहिल्यावर तो विचार रद्द केला. निष्क्रिय या शब्दा मध्ये जो ढिम्मपणा आहे तो मनात आणलं तरी प्रत्यक्षात आणणं कठीण इतके आपण परिस्थितीने बांधले असतो. माझं जाऊदे, माझ्या आसपासच्या सत्तरीतल्या पालक मंडळींना पाहिलं तर तर तेही नुसतेच बसून राहिलेत असं क्वचितच दिसतं. 

तर असो. सांगायचा मूळ मुद्दा पूर्ण विसरायच्या आधी हेच म्हणायचं होतं की या वर्षी जसा छान वसंत आणि मग थोडा वाढीव उन्हाळा मिळाला, इथवर सगळं कसं चांगलं सुरु होतं. नुसतं विकेंड टू विकेंडच्या ज्या सगळ्या ट्रिपा केल्या त्याबद्दल लिहायचा पेशन्स असला तर हातून बरीच प्रवासवर्णनं लिहून झाली असती आणि त्यांची आठवण संग्रहीत राहिली असती. बघूया आता पुढच्या वर्षी या जुन्या ट्रिप्सबद्दल काही खरडता आलं तर. 
पण मग पानगळती सुरु झाली आणि नेहमीचेच छोटे छोटे प्रश्नदेखील मोठे वाटू राहिले. उगीच होणारी चिडचिड स्वतःलाच त्रास देऊ लागली. ऑफिशियली हिवाळा एकवीस डिसेंबरनंतर येतो पण इकडे आधीच त्याचा इफेक्ट येऊ लागला.  

 त्या दिवशी एक अस्वल थंडीत झोपून राहतं आणि बाकीचे प्राणी त्याच्या गुहेत येऊन मज्जा करून जातात अशा अर्थाची एक बालगोष्ट वाचून  झाल्यावर असंच आपण पण हायबरनेट करावं असा विचार मनात आला. थंडी इतकी कडाक्याची आहे की कामासाठी बाहेर पडूच नये, तिकडे कोणाचं काय सुरु असेल आपल्याला काय त्याचं, तिकडे कशाला आपल्याच घरात काही मज्जा सुरु असतील तरी आपण त्याचा भाग न बनता सरळ त्या अस्वलासारखं ढिम्म झोपून राहावं असं या थंडीने किंवा त्यामुळे येणारे आजार आणि इतर कटकटींमुळे झालंय. तरीदेखील एक उडी थोडं साऊथला मारून आलोय आणि मग पुन्हा आजारांची रांग मार्गी लावतोय. या परीस्थितीत एक मोठा आरामाचा कार्यक्रम तर हवाच. 

अर्थात असं काहीही वाटलं तरी प्रत्यक्षात जास्तीत जास्त तासभर स्वतःच्या दुखण्यांना देऊन आपण सावरतो. हा थोड्या वेळचा चढ आहे पुन्हा उतारावर आपलीपण गाडी लागेल ही आशा असते आणि तसंही हायबरनेट करायची सोय नाही हे वास्तव आहेच. 

आम्हाला शाळेत या दिवसात शनिवारी आमचे ड्रीलचे सर एक दो एक दो करायला लावायचे. आज ही पोस्ट लिहिताना जरा मागे ब्लॉगकडे लक्ष दिलं तेव्हा लक्षात आलं. या वर्षी महिन्यांची अनुक्रमणिका पहिली तर अगदीच एक दो, एक दो आहे एखादवेळेस तीन. बाकी, प्रकार बदल, वगैरे काही नाही. म्हणूनच सुरुवातीला लिहिताना ब्लॉग पण निष्क्रिय झालाय का असा विचार करत होते. पण या एक दो, एक दो मध्येच पुढे चालायचं बळ  मिळेल असं वाटलं. छोटी छोटी पावलं का होईना पण हालचाल आहे. म्हणून हे स्वतःचं स्वतःला सांगणं की चले चलो.

उद्या दिनदर्शिका बदलायची तर त्याचं स्वागत निष्क्रिय शब्दाने करण्यापेक्षा "चले चलो". शुभेच्छा तर सर्वांसाठी आहेतच. Welcome 2015 आणि जाता जाता २०१४ मधल्या काही महत्वाच्या भटकंतीचं हे कोलाज.

Sunday, December 21, 2014

सुरज की बाहों में...

माझं त्याचं प्रेम तसं पाहायला गेलं तर खूप जुनं पण बहुतेक मलाच ते माहित नव्हतं. त्याला माहित असावं पण मीच जेव्हा तो नेहमी असायचा तिथे राहायचं सोडून लांब लांब जात राहिले. मग मलाही त्याने दर्शन द्यायचे दिवस कमीकमी केले. आज तर सगळ्यात लहान दिवस म्हणजे तो दिसला तरी कमीच वेळासाठी पण आमच्याकडे तर चांगला दहा दिवस तो दिसणार नाही असं आधीच माहित आहे. हो, हा  तोच तो आपला दिवस ज्याच्या येण्याने सुरु होतो  जाण्याने संध्याकाळ संपते तो रवि/सूर्य, माझा हिवाळ्यातला आशेचा किरण. 
जेव्हा काळोख्या दिवसाने नैराश्याचं वातावरण येतं तेव्हा त्याला शोधायला मी दक्षिणेला गेले आणि अपेक्षेप्रमाणे तो प्रशांत महासागरावर माझी पहाटे वाट पाहत होता. त्याला पाहताना त्या दिवशीचा तो वॉक मी नक्की कितीवेळ केला त्याची कुठे मोजदाद करा?


एखादा दिवस असा येतो जेव्हा तो असतो पण आपल्या रोजच्या धावपळीत त्याच्यासाठी वेळ नसतो आणि नेमकं त्याच दिवशी त्याच्याकडे मोप वेळ असतो मग रुसून तो जायच्या आधी त्याला पाहून घ्यावं. इथे कुणाला माहित तो पुन्हा केव्हा दिसणार आहे? 



आणि खरं तर असंच होतं. तो लवकर येतच नाही. नैराश्याचे ढग दाटून येणार, त्याची ही मैत्रीण त्याच्याविना एकटी होणार हे त्यालाही जाणवतं आणि मी ऑफिसला जायच्या रस्त्यावर फक्त माझ्यासाठी तो त्या आमच्या लाडक्या जागी येतो. नुसता येत नाही तर मी माझ्या मनातल्या भावना त्या दिवशी जास्त प्रगट केल्या म्हणून एक खास नजारा प्रदर्शीत करतो. त्यादिवशी सहकार्यांना सेलफोनमध्ये त्याला दाखवताना," तुला कसा दिसला?" म्हणून भाव पण खायला मिळतो. 





त्याच्याबरोबर किंवा फक्त त्याच्याबरोबर शेयर केलेले असंख्य क्षण मी जपलेत, हे माझे जुने अल्बम पाहायला गेले की लक्षात येतं. माझ्या कित्येक कातर संध्याकाळी,प्रसन्न किंवा काही वेळा मरगळलेल्या सकाळी, तो माझ्यासाठी असतो . मला खरचं तो किती आवडतो हे मला नेमकं तो जेव्हा खूप दिवसांसाठी दिसणार नसतो तेव्हा जाणवतं. अशावेळी माझ्या स्वार्थी मनाला मी खूप कोसते.    


तो वाट पाहायला लावतो पण जेव्हा येतो तेव्हा आधीचा विरह संपतो आणि पुन्हा मी त्याच्याबरोबर ते जुने संवाद करायला तयार होते.

आमची मैत्री, आमचं प्रेम इतकं जुनं आहे की आणखी कुणी कितीही प्रयत्न केला तरी ते आमच्या दोघातून निघून जाणार नाही आणि या भरवशावरच तर हे संबंध अव्याहतपणे टिकून आहेत.






या प्रेमाची ही चित्रगंगा. त्याच्या आजच्या सर्वात लहान दिवसानंतर पुन्हा दिवस मोठा होणार आणि मग  माझ्यासाठी  आशेची ऊर्जा घेऊन तो येणार त्याची ही नांदीच.