काही महिन्यापूर्वी ब्लॉगचे फॉलोअर्स अचानक वाढले असं लक्षात आलं. ज्या वेगाने या ब्लॉगवर लिहिलं जातं किंवा जे नेहमीचेच विषय इकडे मांडले जातात त्या मानाने हे खरं मला अपेक्षीत नसतं. एकुण फॉलोअर्स १९० च्या पुढे वगैरे म्हणजे, "अगं बाई, खरंच?" असं काहीसं. साधारण त्याचवेळी, एका ब्लॉगवाचकाची मेल आली, तुझ्या पोस्टचे अपडेट्स मराठीब्लॉग्स डॉट नेटवर दिसत नाहीत. त्या साईटवर तपासून पाहिलं तर त्यांनी माझा ब्लॉग काढून टाकला होता. त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील म्हणून त्यांना मेल करणे, ब्लॉग पुन्हा जोडून पहिले वगैरे करून पाहिलं पण एकदंरीत काही बदललं नाही. आणि त्यांच्याकडून मेलला उत्तर वगैरेदेखील नाही.
मग विचार करत बसले की खरंच आपण ब्लॉग का लिहितो? व्यक्त व्हायचं साधन म्हणून की आणखी कशासाठी? आणखी काही (वाटलं तरी किंवा नाही वाटलं तरी) आपण काही करू शकणार नाही हे निदान माझ्या सद्यपरिस्थितीत माझं मला माहित आहे. मग ते कुणी वाचलं काय नाही काय मला व्यक्तिश: काय फरक पडतो? काहीच नाही. शिवाय माझ्या व्यक्तिगत आयुष्यातला प्रत्येक प्रसंग काही मी ब्लॉगवर मांडणार नाही. पण जे मला खरंच लिहावंसं वाटतं ते लिहिलं गेलं तर त्यात फक्त वैयक्तिक स्वार्थ आहे. मला स्वतःला माझ्या जुन्या पोस्ट्स वाचायला आवडतात. मला जे डीटेल्स लक्षात राहिले नसते ते ब्लॉग पोस्टच्या निमित्ताने मला पुन्हा आठवतात. आता काय बदललंय हे उगाच लक्षात येतं.
हा एक मागच्या पाच वर्षांचा किंवा आठवणीबद्दलचं बोलायचं तर मागच्या कित्येक वर्षांचा प्रवास माझा माझ्यासाठी नकळत लिहिला गेला. पुन्हा पुन्हा वाचताना त्याचा प्रवाह मला आवडतो हे लक्षात गेलं. त्यामुळे अनियमित का होईना इथे लिहित रहावसं वाटणार. लिहिता लिहिता अनेक जणांनी ते वाचलं त्यातल्या काहींनी प्रतिक्रिया दिल्या आणि काहींनी कदाचित खिल्लीही उडवली असेल. त्याने या ब्लॉगिंगला काही फरक पडला नाही किंवा ते आवश्यक आहेच असं नाही. मग मराठीब्लॉग्स डॉट नेटचा लोगो इथे असला काय नसला काय, त्यांनी त्यांच्या साईटवर माझ्या पोस्ट्स टाकल्या काय नाहीत काय काहीच फरक पडत नाही. आज बरोबर पाच वर्षांनी माझ्या ब्लॉगच्या मुखपृष्ठावरून ते चिन्ह काढून टाकताना माझ्यासाठी ब्लॉगिंग किती बदललं आहे हे लक्षात येतंय.
थोडसं कडवट वाटणारं वरचं मनोगत आज सुरुवातीला लिहिलं कारण गुढीपाडव्याची सुरुवात कडूनिंबाचा पाला खाऊन होई मग नंतर दुपारच्या जेवणातलं श्रीखंड अधीक गोड लागे.
वाचक, फॉलोअर्स आणि पोस्ट यांची आकडेमोड करायचं ब्लॉगच वय कधीच सरलंय. पण त्या बद्दलची कृतज्ञता तशीच आहे आणि तशीच राहील. आता इथून पुढे वर्षभर जे लिहिलं जाईल ते वाचकांना नक्की गोड लागेल अशी आशा.
यंदाची गुढी आपल्यासाठी येणाऱ्या वर्षात काही सुखद बदल घेऊन येवो हीच सदिच्छा.