ही गोष्ट आहे दोन मित्रांची. सोयीसाठी आपण त्यांना राम आणि शाम म्हणुया.
राम आणि शाम एकत्र कॉलेजमध्ये शिकले. पैकी शाम एका छोट्या गावातून आला
होता. त्याची शैक्षणिक प्रगती उत्तम असली तरी मुलाखतीसाठी इंग्रजीतून
बोलायला सुरवात केली की त्याचे उच्चार, भाषा इत्यादीचा फरक लक्षात येई.
त्यामुळे शेवटच्या वर्षात इतर मुलांची प्लेसमेंट झाली तरी याच्या पदरी
मात्र निराशा. रामलादेखील कॅम्पस जॉब मिळाला आणि राम-शामची मैत्री तिथेच
थिजल्यासारखी राहिली.
रामने सुरुवातीला काही काळ नोकरी करून मग उच्च शिक्षणासाठी परदेश गाठला. तिथे चांगल्या दोन डिग्र्या मिळवून आता हा उत्तम पदावर काम करतोय. परदेशी राहताना जितकं चांगलं राहता येईल, मोठा बंगला, त्याला स्विमिंग पूल, मोठी गाडी, सारखे सारखे इतर देशात कामासाठी प्रवास सगळं काही जोरदार सुरु. शिवाय देशात देखील स्वतःच्या गावी मोठा बंगला आणि तिकडेही नेमाने भेटी वगैरे.
रामने सुरुवातीला काही काळ नोकरी करून मग उच्च शिक्षणासाठी परदेश गाठला. तिथे चांगल्या दोन डिग्र्या मिळवून आता हा उत्तम पदावर काम करतोय. परदेशी राहताना जितकं चांगलं राहता येईल, मोठा बंगला, त्याला स्विमिंग पूल, मोठी गाडी, सारखे सारखे इतर देशात कामासाठी प्रवास सगळं काही जोरदार सुरु. शिवाय देशात देखील स्वतःच्या गावी मोठा बंगला आणि तिकडेही नेमाने भेटी वगैरे.
मागे फेसबुकच्या निमित्ताने त्याच्या batch चे जवळजवळ सर्वच परदेशी
गेलेले मित्र भेटले पण शाम कुठे आहे याची काहीच कल्पना नाही. मग एका भारत
दौऱ्यात घराच्या काही कामाने जिल्ह्याच्या एका सरकारी कचेरीमध्ये जायचा योग
आला. तिकडे आपला क्रमांक यायच्या आधीचा वेळ काढताना सहज म्हणून तिथली
अधिकाऱ्यांची यादी वाचताना त्यातलं सगळ्यात वरचं नाव ओळखीचं वाटलं आणि
पुन्हा वाचल्यावर खात्री पटली म्हणून बाहेरच्या शिपायाला या साहेबांना
भेटता येईल का म्हणून विचारलं. अर्थात appointment नसल्यामुळे शिपाई नाहीच
म्हणाला पण तरी एक प्रयत्न म्हणून आपलं कार्ड देऊन यांना तुम्हाला भेटायचं
आहे असा निरोप पाठवला.
ते कार्ड घेऊन शिपाई वर जाताच त्याच क्षणात साहेब स्वतःच खाली आले.
गेले कित्येक वर्षे न भेटलेले शाम आणि आपला राम एकमेकांना गळाभरून भेटले.
आता तू जायचं नाही. माझ्याच बरोबर राहायचं , मला पण बंगला आहे शामचा आग्रह.
कॉलेजमध्ये खर सारेच मध्यमवर्गीय पण रामने बरेचदा शामला मदत केली होती
त्या दोघांची तेव्हा खूप छान मैत्री होती आणि आता इतक्या वर्षाने भेटल्यावर
साहजिकच ही प्रतिक्रिया असणार.
मग रामला कळलं की शामने
कॅम्पस जॉब मिळाला नाही म्हणून खचून न जाता शासकीय परीक्षा आपल्या गुणांवर
आणि काही विषय मराठीमध्ये घेऊन आता उच्चस्थानी नोकरी करून त्याच्यासारख्या
लोकांसाठी काम करतोय. आता त्याच्याकडे सरकारी बंगला, दोन गाड्या आणि
त्याच्यासाठी सिक्युरिटी वगैरे सर्व काही होतं.
दोन दिवसांनी शामला काही दिवसाच्या दौऱ्यावर जायचं होतं. रामला हे
निमंत्रण मोडवेना शिवाय आपल्या देशातली सरकारी कामे कशी चालतात हेही
पाहायला मिळणार होतं. या काही दिवसांत रामने काही गावं, तिथले खेडूत आणि
त्यांची परिस्थिती जवळून पहिली. सरकारी मदत तळागाळात पोहोचावी म्हणून शामने
स्वतः काही महिन्यापूर्वी पाहणी करून ती मिळेल अशी सोय केली होती. त्याला
पाहिल्यावर ही लोकं अक्षरश: त्याच्या पायावर लोटांगण घालत होते. त्याला
मनोमन दुवा देत होती. मोठ्या वयाच्या बायकादेखील, "मुलासारखा तू धावून आलास", वगैरे म्हणत होत्या. आपल्या आयुष्यात प्रथमच असं काही पाहणारा राम त्यावेळी कॅम्पस जॉब मिळवून उर्वरित आयुष्यात आपण काय कमवलं याचा मनात विचार करत होता.
त्या रात्री शामशी बोलताना तो म्हणाला माझं सगळं कमावलेलं घेऊन टाक
आणि तुझी नोकरी मला दे. शाम शांत होता. तो म्हणाला, हे बघ तू माझ्या
बंगल्यावर आला नाहीस कारण तुला वेळ नव्हता पण आला असतास तरी फक्त मीच भेटलो
असतो. कारण मी जिथे जिथे काम करतो तिथे एकही पैसा न खाता लोकांना मदत करतो
शिवाय बरेच मंत्री-संत्री इत्यादीचं काही तरी वाकडं सुरु असतो ते बाहेर
काढतो म्हणून सहा महिन्यापेक्षा जास्त एका जागी कुणी मला ठेवत नाही. लगेच
बदली होते. माझी बायको कंटाळली आणि यंदा मुलीचं महत्वाचं वर्ष म्हणून
दुसऱ्या शहरात राहते. त्यांच्यासाठी इथे शासकीय इतमामाने वापरायला गाडी आहे
पण तीत बसायला कुणी नाही. बर हे जाउदे ही सगळी मेहनत करायची महिन्याची
कमाई बघ. त्याच्याकडचा फक्त पन्नास हजाराचा पे चेक पाहून बराच वेळ त्या
खोलीत कुणीच काही बोललं नाही. शेवटी शामनेच उतारा दिला, "हे बघ राम, तुला
जर खरच मदत करायची आहे तर तू एक गाव दत्तक घे आणि तिथे सोई होतील हे मला
पाहता येत का त्याचा मी प्रयत्न करेन."
राम त्याचा भारतदौरा पूर्ण करून पुन्हा परदेशी आला. पण यावेळी त्याच्या
मनात पूर्वीसारखं आपल्याकडे हे नाही ते नाही असं काही नव्हतं, तर आपल्याला
आता काय करता येईल याची दिशा त्याच्या मनाला मिळाली होती.
हा राम मला कामानिमिताने थोड्या काळासाठी भेटला आणि वर उल्लेखलेलं त्याने मला एकदा बोलताबोलता सांगितलं. या
संपूर्ण खऱ्या कथेची नावं मात्र मी जाहीर करू शकत नाही. विशेष करून शामचं.
आपल्याला असे अनेक शाम हवे आहेत पण म्हणून शामकडे बघून शिकणाऱ्या रामचं
मुल्यही कमी होत नाही हे सांगायचा हा एक छोटा प्रयत्न.