पहिलीत शिकणारी एक छोटीशी जपानी मुलगी. तिच्या वयाला साजेशी खोडकर बरं का? शाळेच्या वर्गात तास सुरू असताना तिला मध्येच खिडकीतून दिसणारे बॅंडवाले आणि त्यांना हाक मारायची तिची सवय किंवा मध्येच चिमण्यांना "तुम्ही काय करता?" असं विचारणं. परिणाम शाळेतून काढून टाकलं जाणं. कसं होणार आता असा विचार करता करता आपण तिच्याबरोबर पोहोचतो तिच्या नव्या शाळेत. हिची नवीन शाळा म्हणजे "तोमोई" कशी असेल आणि तिथे ही मुलगी नव्याने आपलं शालेय जीवन सुरू करताना आलेले अनुभव कसे असतील या पार्श्वभूमीवर जपानची एक आगळीवेगळी शाळा एक वेगळं विश्व घेऊन आपल्यासमोर येते. मूळ जपानी लेखिका "तेत्सुको कुरोयानागी" ही ती वर उल्लेखलेली पहिलीतली मुलगी "तोत्तोचान" आणि या सुंदर पुस्तकाचा तितकाच ओघवता अनुवाद आपल्यासाठी केलाय "चेतना सरदेशमुख गोसावी" यांनी. नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाने केवळ पन्नास रूपयात उपलब्ध करुन दिलेलं हे पुस्तक मूळ लेखिकेने म्हटल्याप्रमाणे अगदी ५ वर्षांच्या मूलांपासून ते १०३ वर्षांच्या लोकांपर्यंत अगदी सर्वांसाठीच आहे.
पाच वर्षांच्या आपल्या चिमुरडीला नव्या शाळेत नेताना तिच्या आईबरोबर झालेल्या मजेदार संवादांनी हे पुस्तक सुरू होतं. बरं नव्या शाळेचं प्रयोजन अशासाठी की आधीच्या शाळेतून हिला काढून टाकलंय. त्यामुळे आईच्या जीवाची आपल्या मुलीचं कसं होणार याची घालमेल तर लेक मात्र काल गुप्तहेर व्हायचं ठरवलं होतं आणि आज मात्र तिकिट कलेक्टर व्हावं का या गहन विचारात. मध्येच तिच्या सुपीक डोक्यात तिच्या कल्पनेतली तिकिट विकणारी जी खरी गुप्तहेर असेल असं काहीसं झालं तरची कल्पना आणि शाळा यायच्या आधीपर्यंत हे सगळं डोक्यातून जाऊन त्याची जागा "रस्त्यावरून जाहिरात करत जाणारे बॅंडवाले" यांनी घेतलेली असते. हेच ते आधी उल्लेख केलेले बॅंडवाले. या बॅंडवाल्यामुळे खरं तर आईला तिचं आधीच्या शाळेतलं खिडकीतून बॅंडवाल्यांशी बोलणं न आठवलं तर नवलच. त्या शाळेतून काढलेल्या असंख्य कारणांपैकी हेही एकच. आपण तिच्या आईच्या घालमेलीत अडकलो असतानाच तिच्यासारखंच बाकीची छोटी मुलं कसंकसं डोकं चालवत असतील असा विचार करत खुदकन हसतो. वाचता वाचता हळूहळू आपणच तोत्तोचानच्या वयाचे होतो. म्हणजे काय हरकत आहे नं चित्र काढता काढता झेंडा काढायला जागा पुरली नाही कागदावरून डेस्कवरची जागा व्यापली तर किंवा तास सुरू असताना मध्येच चिमण्यांना "तुम्ही काय करता आहात?" म्हणून विचारणं. अगदी प्रत्यक्षात नसेल पण आपण पहिलीच्या वर्गात असताना हे असं सगळं भरकटायचं कदाचीत आपल्याही बाबतीत झालं असेल.
फ़क्त आपण एका टिपिकल शालेय जीवनाचा भाग होऊन राहिल्याने असं स्वच्छंदी मन नंतर कुठेतरी हरवून आपणही "क ला काना का" गिरवीत जे इतरांनी वर्षानुवर्षे शाळेत जाऊन केलं तेच करून नंतर मग तीच ती दहावी आणि पुढचं शिक्षण, नोकरी या चाकोरीत अडकलो असू. तोत्तोचानचं नशीब इतकं की तिला अशा शाळेतून काढून टाकण्यात आलं आणि त्याहीपुढे जाऊन म्हणायचं तर तिच्या देशात अशी एक शाळा होती जिथं पाठ्यपुस्तकमुक्त अभ्यासक्रम ठेऊन मुलांना मुक्त पद्धतीने आणि त्यांचं भावविश्व खुलेल असं वातावरण होतं.
दोन झाडांच्या खांबांचं गेट आणि आगगाडीच्या डब्ब्यांचे वर्ग असणारी शाळा कुणाला आवडणार नाही? शिवाय बाकीच्या शाळांपेक्षा वेगळं म्हणजे इथे दिवसाचे तास विषयावार ठरलेले नसत. सकाळी बाई त्या दिवसात काय काय करायचं त्याची यादी करुन मग मुलंच आपलं आपलं काय करायचं ते ठरवत. त्यामुळे एकाच वेळी कुणी निबंध लिहित असे तर कुणी गणित सोडवी. यामुळे शिक्षकांना मुलांचं निरीक्षण करता यायचं आणि त्यांचा विचार करायची पद्धत अधिक जवळून समजून त्यांना मार्गदर्शन करणं सोपं व्हायचं. तर मुलांच्या बाबतीत त्यांना आवडत्या विषयाने सुरूवात करायला आवडे आणि नावडत्या विषयासाठी अख्खा दिवस असे. त्यामुळे कसंबसं का होईना सगळं पूर्ण व्हायचं. सगळा अभ्यास स्वतंत्र करायची सवयही लागे आणि हवं तिथे शिक्षकांची मदतही घेता येई. त्यामुळे विद्यार्थी नुसतंच बसून ऐकताहेत असं नसायचं.
शाळेच्या पहिल्याच दिवशी तोत्तोचानची ओळख यासुआकी यामामोतो नावाच्या एका मुलाशी झाली. त्याला पायाला आणि हाताला पोलिओ झाला होता. तोत्तोचानसाठी हे नवीन होतं. पण पहिल्याच दिवशी झालेला हा मित्र नंतर तिच्या मदतीमुळे आयुष्यात पहिलं आणि शेवटचं झाडावर चढतो तो प्रसंग पुस्तकात वाचताना आपण नकळत त्या दोन छोट्या मित्रांसाठी हळवं करतो. हाच यासुकीचान जातो तेव्हाचा तोत्तोचानचा भाबडेपणा आपल्याही गालावर अश्रू ओघळतो.
शाळा म्हटली की आपल्या मनात अभ्यासाव्यतिरिक्त आणखी येतं ते म्हणजे शाळेत एकत्र खाल्ला जाणारा डब्बा. तोमोईचा नियम होता की रोज काहीतरी डोंगरावरचं आणि काहीतरी समुद्रातलं आणायचं. म्हणजे आपल्या साध्या भाषेत सांगायचं तर धान्य किंवा भाज्या आणि प्रथिनं. किती सोप्या शब्दात हे कोबायशींनी मुलांना शिकवलं. शिवाय ते स्वतः आपल्या पत्नीबरोबर मुलानी काय आणलंय हे पाहायचे. त्यात एखाद्या मुलाकडे यातला एखादा प्रकार नसेल तर त्यांची पत्नी ती भर घालत असे. त्या कोबायशींबरोबर एक माशांच्या सुरळ्यांचं आणि एक बटाटाच्या कापांचं ताट घेऊन फ़िरत. त्याचप्रमाणे प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खायचं एक गाणंही त्यांनी बनवलं होतं. जे रोज गाऊन मग जपानीत कृतज्ञता व्यक्त करून हसतखेळत जेवणं व्हायची.
अशा या आगळ्यावेगळ्या शाळेतले तोत्तोचानचे अनुभव वाचणं आपल्याला तिच्या बालपणात घेऊन जातो. एकदा तोत्तोचानचा बटवा संडासात पडतो त्यावेळी तिला शांतपणे तो काढायची परवानगी द्यायचा प्रसंग असो किंवा तिला वीस पैसे देऊन एका भोंदूबाबाकडून आणलेल्या सालीचा प्रसंग असो, या शाळेने तिच्यासारख्या एका द्वाड ठरवलेल्या मुलीला तिचं मन सांभाळून घेऊन तिच्यावर केले जाणारे संस्कार आपसूक नजरेत भरतात. एका प्रसंगात मोठं झाल्यावर याच शाळेत शिकवायचं वचनही ती कोबायशींना देते.
छोट्या छोट्या गोष्टीतून या शाळेचे मुख्याध्यापक कोबायशी यांनी लहान मुलांशी कशी नाळ जोडली आहे याचा पदोपदी प्रत्यय येतो. लहान मुलांचं भाबडं जग तसंच ठेऊन त्यांना छोट्या छोट्या शिकवणूकी द्यायची पद्धत मुलांना कडक शिक्षा करणार्या इतर पद्धतींपेक्षा ती खूप वेगळी आहे हेही लक्षात येतं. उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्या मुलांना एकत्र पोहायच्या तलावावर कपड्यांचं बंधन न ठेवता पोहायचं स्वातंत्र्य देताना त्यांना एकमेकांच्या शरीरांकडे निकोपपणे पाहायचा दृष्टीकोन देणं हे फ़ारच कौतुकास्पद आहे. जसं यामुळे मुलामुलींच्या शरीरात काही विकृत कुतूहल असायचं टळू शकतं तसंच या शाळेत काही व्यंग असणारी मुलंही होती. त्यांना आपल्या शरीराची लाज वाटून न्यूनगंडही निर्माण होणार नाही हा भाव होता. आजकालच्या काळात एकंदरीत स्त्रियांवरील शारीरिक अत्याचाराच्या बातम्या वाचतो तेव्हा अशा व्यक्तींना जर अशा प्रकारचे संस्कार त्यांच्या लहानपणी झाले असते तर या गोष्टी टळू शकल्या असत्या का असं उगाच मनात येतं.
यातले अनुभव मुख्यतः तोत्तोचानचे असले तरीही तिच्यावरची कोबायशींची छाप आपल्याला दिसते. उन्हाळी सुट्टीमध्ये शाळेतल्याच सभागृहात तंबू उभारून सर्वांनी एकत्र केलेल्या गप्पांबद्दल वाचताना मुलांबरोबर मिसळायचं त्यांचं वेगळं तंत्र आपल्या नजरेत भरतं. संगीत कवायत अर्थात "युरिथमिक्स"चा शाळेच्या अभ्यासक्रमात समावेश करून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासास मदत करायची त्यांची कल्पनाही खूप मस्त आहे. क्रीडादिन साजरा करतानाचे त्यांचे काही खेळ म्हणजे "आईला शोधा", "माशांची शर्यत" खेळायला कोणाला मजा येणार नाही? आणि मग बक्षिस म्हणून भाज्या नेताना मूलं कंटाळली तर "तुम्ही स्वतःच्या कष्टाने या भाज्या मिळवल्यात आणि तुमच्याबरोबर घरच्यांसाठीसुद्धा जेवण मिळवलंय" असं सांगणारे कोबायशी आपल्यालाही मुख्याध्यापक म्हणून लाभले असते तर? असं मनात नक्कीच येतं.
खरं तर या छोटेखानी पुस्तकातला प्रत्येक प्रसंग तुम्हाआम्हाला काही ना काही शिकवून जातो. लिहायचंच झालं तर त्यातल्या प्रत्येक प्रसंगाला साधारण समान स्थान द्यायला हवं. पहिली ते तिसरी या शालेय वर्षांत या मुलीने एवढ्या छोट्या वयात किती आगळेवेगळे अनुभव घेतलेत याचा हे पुस्तक वाचताना पदोपदी प्रत्यय येतो. तिचा रॉकी कुत्राही या पुस्तकातले एक महत्वाचे पात्र आहे.
चांगल्या गोष्टी आपल्याबरोबर दुर्दैवी शेवटाचा शाप घेऊन येतात का असं मला बरेचदा वाटतं. तो शेवट लिहून मला हे लिखाण उदासवाणं करायचं नाहीये. हे पुस्तक जेव्हा वाचलं जाईल तेव्हा ओघाने ते कळेलच.
तूर्तास आपण सगळीजण हे लक्षात ठेऊया की जगाच्या पाठीवर लहान मुलांना त्यांच्या भावविश्वात रममाण करून त्यांना बाहेरच्या जगासाठी तयार करणारी एक शाळा होती. या शाळेचं नाव होतं "तोमोई" आणि तिथले मुख्याध्यापक होते "कोबायशी". हेच ते मुख्याध्यापक ज्यांनी तोत्तोचानच्या पहिल्या दिवशी "हं तुला तुझ्याबद्दल मला हवं ते सांग" असं म्हणून सकाळचे आठ ते दुपारची जेवणाची वेळ होईस्तो म्हणजे तब्बल चार तास तिची बडबड ऐकून मग "आजपासून तू या शाळेची विद्यार्थिनी झालीस हं" असं म्हटलं होतं. त्यांच्या या प्रसंगात ही शाळा निव्वळ तोत्तोचानचीच नाही तर वाचकांसाठीही त्यांचीच शाळा होते. अशी एक शाळा जिथे शिकायला मलातरी नक्कीच आवडलं असतं.