Wednesday, June 27, 2012

सोबत


घरून काम करायचे असंख्य तोटे असतात असं मी म्हटलं तर कदाचीत प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन काम करणारा वर्ग दोन्ही भुवया वर करून माझ्याकडे पाहिल...पहिले फ़ायदेच पाहायचे तर एक प्रवास करावा लागत नाही एवढं एकंच दिसतंय मला आणि काम हे काम असतं घरी काय, ऑफ़िसमध्ये काय ते करावंच लागतं, म्हणजे इथे एकमत असेल तर उरले ते बरेचसे तोटे.....

मला ज्यांच्याबरोबर काम करते त्यांची तोंडं दिसत नसतात, पर्यायाने एक कलिग म्हणून त्यांची कामाच्या वेळेत मिळणारी सोबत नसते..कधीतरी एकत्र कॉफ़ी पिणे, एखाद्या करंट अफ़ेअर्सवर चर्चा,एकत्र जेवणं किंवा झालंच तर नवे कपडे/दागिने अमक्या तमक्याचं  कौतुक हे सगळं मी माझ्या कामात मागची काही वर्षे अनुभवणं जवळ जवळ विरळाच...यातून येणारा एक वेगळा एकटेपणा असतो..प्रचंड कामात असलं तरी तो तुमच्यासोबत कायम असतो....अशा एकांतात मग सोबतीला येते ती आमच्याकडे महिन्यातून एकदा घरातली सफ़ाई करण्यासाठी येणारी "किरा"...

तिचा आमचा संबंध किंवा माझा नव्हताच खरं तर, तो आला होता ऋषांकच्या वेळेस मी दवाखान्यात असताना. त्याआधी एक नेहमीची येणारी "जिना" आमच्या घरापासूनच्या लांबच्या गावात राहायला गेली त्यामुळे जी काही पाच-सहा महिने ती यायची त्यानंतर आता काही जमायचं नाही हे तिनं आम्हाला सांगायला आणि बाळाचं आगमन साधारण एकत्रच झालं होतं. मग आम्ही पुन्हा एकदा मायाजालावरून एक बाई शोधली. ती यायच्या वेळेस मी म्हटलं तसं घरात नव्हते त्यामुळे आता जी कुणी येणार ती नवर्‍याला चांगलाच चुना लावून जाणार असं मी तरी गृहीत धरुन होते..अर्थात "बेबी ब्लु" या नावाखाली त्या हिवाळ्यात बरंच काही होत होतं त्यापुढे हे फ़्रस्ट्रेशन काहीच नसणार असं मी उगाच स्वतःला सांगत बाळाला घेऊन घरात आले....आणि स्पॉटलेस घर बघून नवर्‍याला लगेच पसंतीची पावती दिली....त्यानेही हुश केलं असणार..पण तरी नंतर लगेच काही मला कुणाला घरात बोलावून सफ़ाई करवून घ्यायला बाकीच्या कामांमुळे जमत नव्हतं...पण त्यानंतर लगेच दोनेक महिन्यांनी आई येणार होती त्यामुळे तिला निदान आल्याआल्या सगळा पसारा नको म्हणून लगोलग किराला पुन्हा बोलावले गेले...

यावेळी ती यायच्या एक दिवस आधी मला नवरा म्हणाला,
"अगं तुला सांगायला विसरलो तिला बोलता येत नाही"
"क्का....य?? मग तू तिला कॉंटॅक्ट कसा केलास?"
"ती मागच्या वेळी फ़ोन नं देऊन गेली आणि मी तिला फ़ोन करेन असं हाताने सांगत होतो. ती एकदम मला थांवबून म्हणाली, "टेक्स्ट टेक्स्ट"....टेक टेक टेक टेक्नॉलॉजी बेब्स..."

ओह, काय हा असा?? सांगायला नको का आधी? पण खरं तर आपल्याला हवं ते काम नीट करते याखेरीज बाकीच्या गोष्टींशी आपल्याला काय करायचंय हा त्यांचा शांत अ‍ॅट्यिट्युड मला आवडला...तरी तेव्हा बाळ लहान होतं म्हणून तोही घरात थांबून त्यावेळचं कामसत्र आटपलं..तिने कामाच्या गडबडीतही बेबी छान आहे म्हणून मला हातवारे करून सांगितलं....

त्यानंतर आम्ही घर बदललं. त्यामुळे ते बदलायच्या आधी आणि नंतर असं दोनेक महिने आम्हाला तशी तिची गरज पडली नाही..मग पुन्हा आमची गाडी रूळावर आली..प्रत्येक महिन्याला पसारा करा आणि तिला बोलावून घर साफ़ करून घ्या....

ती पहिल्यांदी आमच्याकडे एका एजन्सीतर्फ़े आली आणि मग तिने त्यांच्यातर्फ़े नको असेल तर काही डिस्काउंट देऊन आमच्याकडे तिच्या सर्विसेसचं (न बोलता) मार्केटिंग केलं...मला काम करायचा तिचा हा गूण अतिशय आवडतो. म्हणजे एकदा मी तिला म्हटलं की प्रत्येक महिन्याला येशील का? प्रत्येकवेळी सगळं करायला नको. एक आड एक गोष्टी करू म्हणजे कधी दोन्ही बाथरूम्स, तर कधी फ़्रीजचं डिप क्लिनिंग आणि असंच काही....मग तिला आमचं तिचे ग्राहक म्हणून पोटेंशियल लक्षात आलं आणि तिने स्वतः आम्हाला महिना झाला की एक रिमांईडर टेक्स्ट करायला सुरूवात केली...आहे की नाही टेक टेक टेक टेक्नॉलॉजी???
या घरात नवीन असताना इथे सफ़ाई करायचं एक रूटीन आम्ही दोघींनी सेट केलंय त्यामुळे आजकाल फ़ारसं सांगावंही लागत नाही.  ती आली की मस्त हसून मला हाय करते आणि पहिले आपला ब्लॅकबेरी पहिले चार्जिंगला लावते. मी मनातल्या मनात उगीच हसते....कारण खरं तर स्मार्ट फ़ोन वापरायला मीही आजकाल सुरूवात केलीय....

नंतर सुरू होतो आमचा थोडं लिहून, थोडं खुणांच्या भाषेचा संवाद...त्यात बर्‍याच गोष्टी असतात...काही कामाच्या तर काही अशाच....तेव्हा सुचलं म्हणून केलेल्या...सगळं लिहून....
मागच्या वेळी मी केस कापले होते त्यावेळी दरवाजा उघडल्याउघडल्या तिने केस फ़ारच छान आहेत म्हणून  स्वतःच्या केसांकडे बोट दाखवून दोन्ही हाताने छान म्हटलं आणि माझी कळी खुलली..एकदा आमचा दिवस ठरला असताना अचानक तिचा मुलगा आजारी पडल्यामुळे येऊ शकणार नाही असं तिने कळवलं मग मी तिला उलट टपाली जेव्हा जमेल तो दिवस कळव म्हटलं आणि मग आल्यावर पहिले मी तिच्या मुलाची चौकशी केली. तिलाही ते आवडलं...मग आम्ही असंच एकमेकांची मुलं आता अ‍ॅलर्जी सिझन असल्यामुळे कशी आजारी पडताहेत त्याबद्दल बोललो..मग मुलांचे आजार स्वतःलाही होतात याबद्दलही थोडा उहापोह झाला...

यावेळी फ़्रीजवर माझ्या फ़िजिओथेरपीने दिलेल्या व्यायामांचे प्रिंट आउट्स आहेत म्हणून मग तिने माझ्या कंबरदुखीचीही चौकशी केली...

तिला नक्की का बोलता येत नाही हे काही मी तिला विचारणार नाही, पण आता एक दोन अनुभवांमुळे साधारण वाटतंय की तिला ऐकु येत नसावं. तरी तिला इंग्रजी भाषा येते हे मात्र  चांगलं आहे. म्हणजे काही शब्द तोंडाच्या हालचालीनेही तिला कळतात आणि हालचालीनेच बोलता येतात. पण आवाज मात्र नाही. वाईटही वाटतं..कधी कधी तल्लीन होऊन किचन साफ़ करताना आधी डायनिंग एरियामध्ये केलेला व्हॅक्युम तसाच सुरू असतो. माझ्या कामाच्या तंद्रीत मलाही ते लक्षात येत नाही आणि मग इतर वेळी तशा आवाजाची सवय नसल्याने काय वाजतंय म्हणून उठून मी तिला पाहते आणि काहीच न बोलता तो व्हॅक्युम बंद करून टाकते...तिला ते तसंही ऐकु येणार नसतं...काहीवेळा तर माझ्या पायरवाचीही  तिला जाणीव नसते..मग हळूच खांद्यावर हात ठेवून मी तिला काही सांगायचं असेल तर ते लिहूनच सांगते.

तिला ऐकु येत नाही हे जाणवतं, अर्थात तिला काम देणे आणि जमेल ती इतर मदत जसं काही वस्तू वगैरे देणे इतकंच मी करू शकते तेच करते. ती असताना तिला सूचना देऊन जेव्हा मी कामाच्या जागी येऊन बसते, तेव्हा तो वर म्हटलेला एकटेपणाचा कंटाळा, आजकाल पाठदुखीने हैराण असण्याच्या तक्रारी हे सगळं विसरून जाते...देवाने मला सगळे शाबूत अवयव दिल्याने शिक्षण घेऊन मी आज या जागी बसून काम तरी करतेय...कानाने दगा दिल्यामुळे अशा प्रकारे या किराला कदाचीत माझ्यासारखी शिकायची संधी मिळाली नसेल आणि त्यामानाने जास्त शारीरिक कष्टाचं काम करून ती आपला संसार विनातक्रार चालवतेच आहे नं??  

तिचं ते आमच्याशी न बोलता संवाद साधूनही जिव्हाळ्याने काम करणं आणि पैसे दिल्यावर मनसोक्त हसून हनुवटीला हात लावून आभार मानणं हे माझ्यासाठी आज इंस्पिरेशनल असतं...माझ्यासाठी न बोलता मिळालेली एक अनमोल सोबत असते...घरून काम करता करता.....Thanks Kira....:)

16 comments:

  1. अपर्णा,
    माझी आई नेहेमी म्हणते, एक संसार चालवताना फक्त दोघंच नसतात.... तो सावरताना असंख्य हात सोबतीला असतात. दृश्य-अदृश्य....
    अशा अगणित support systems आपलं आयुष्य सावरतात हेच खरं.
    छान पोस्ट आहे. अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या त्यांच्या अस्तित्वानं आपलं जगणं सुसह्य करतात पण बऱ्याचदा दुर्लक्षित ही राहतात. आज तू इथे त्यांचा उल्लेख केल्यास. मस्तच वाटलं.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरंय..या आणि अशा अनेक सपोर्ट सिसिट्म्स नसत्या तर दोघं काम करणार्‍यांच्या घरात तर संध्याकाळी फ़क्त भांडणंच वाजली असती....कारण मग ही सगळी कामं कोण करणार हा एकच प्रश्न अनेक वादांना पुरला असता...:)
      आभार गं.....:)

      Delete
  2. छान झाला आहे लेख. आवडला. हळवा...कामात मग्न असलेली ती डोळ्यासमोर आली आणि मागून हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवणारी तू. :)

    ReplyDelete
    Replies
    1. अनघा, बरेच महिने तिला पाहातेय त्यामुळे खरं तर मलाच वाचल्यावर हळवं झाल्यासारखं वाटत होतं....पण लिहिल्यामुळे आता बरंही वाटतंय....कारण तिचं निव्वळ घरात असणंही एका दिवसापुरता मला थोडी सोबत देऊन जातं ते खूप महत्त्वाचं आहे.

      Delete
  3. Replies
    1. बरेच दिवसांनी शार्दुल....:)
      आभार...:)

      Delete
  4. अपर्णा - नेहमी प्रमाणेच जमून आली आहे "सोबत". खरंच अशा अनेक सपोर्ट सिस्टिम्स आपलं रोजचं जगणं सुरळीत आणि सुखाचे करतात ना! नशीबवान तू अशी अबोल पण योग्य काम पार पडणारी सोबत तुला मिळाली आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. अनघा "नेहमीप्रमाणे"चा अर्थ आधीचं वाचलेलंही आवडलेलं आहे (असा माझ्यासाठी सोयिस्कर) अर्थ घेतेय....स्वागत...:)

      हो मी यावेळी थोडी नशीबवान आहे..कारण इथेही नाहीतर सारखं सारखं एजन्सीकडून प्रत्येकवेळी वेगळी माणसं मिळाली की त्यांना पुन्हा आपल्या घराचा/कामाच परीचय द्या चं त्रांगडं निदान सध्यातरी नाहीये...आणि किरा खरंच खूप चांगली आहे.....:)

      Delete
  5. माणसांना स्वत:सह जगू देणारी व्यवस्था ज्या देशांनी/ समाजांनी निर्माण केल्या आहेत त्याचं नेहमीच कौतुक वाटत. अर्थात किरासाराख्या व्यक्तींचही कौतुक आहेच!

    ReplyDelete
    Replies
    1. हो कौतुक तर आहेच...आणि मला तर तिची अशी एक वेगळी सोबत मिळाल्यामुळेही तिचं असणं लक्षात राहिल....
      आभार, सविता..

      Delete
  6. ग्रेट अनुभव !! मस्तच.. हा लेख स्पॅनिशमध्ये अनुवादित करून किराला दे :)

    ReplyDelete
    Replies
    1. हेरंब अरे फ़ॉर चेंज ती स्पॅनिश नाही अमेरीकनच आहे...:)
      तिला मी ते फ़क्त शेवटचं already अनुवादित वाक्य नेहमी सांगत असते...:)

      Delete
  7. किरा, टोशा, तुझी ती शेजारीण... लिखाणातून सगळ्या व्यक्तिरेखा कशा मस्त उतरवल्या आहेस. वपुंसारखं तू पण आत्ता "माणसं" नावाचे एक पुस्तक लिहायला घे.

    ReplyDelete
    Replies
    1. अरे बापरे सिद्धार्थ तू यंदा हरभर्‍याचं झाड लावलंस का??
      मला वाटतं व्यक्तिरेखा नाही ते अनुभव आहेत माणसांचे. अर्थात त्यातून थोडंफ़ार त्या माणसांना रेखाटता आलं आहे असं समजुया हवं तर....
      बाकी काही जुन्या पोस्टची एक पीडीएफ़ काढायचं केव्हापासून डोक्यात आहे आणखी ते काही आवडीच्या पोस्टच्या लिंकचं एखादं पानपण..सगळंच मनात....बघुया...

      आभार्स रे...बर्‍य़ाच दिवसांनी आलास आणि आवर्जून लिहिलंस त्यासाठी..तुझी नवी पोस्ट कधी येतेय...:)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.