Monday, January 23, 2012

"ति"ला शुभेच्छा.....

सुरूवातीला मध्य, नंतर पूर्व आणि आता पश्चिम अशा अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागांत राहिल्यानंतरचा जानेवारीतला माझा अनुभव म्हणजे सगळीकडे वाढत गेलेली थंडी आणि त्यामुळे आलेला आळस..कुठे बाहेर जाऊ नये, घरातल्या घरात शेकोटी लावून काहीतरी गरम हातात घेऊन बसून राहावं असं वाटायचे हे दिवस. थोडेसे कंटाळवाणेच...या कंटाळ्याला आधार असतो तो जानेवारीत असणार्‍या ऑस्ट्रेलियन ओपनचा.
तसंही मायदेशात असल्यापासून मी ग्रॅंड स्लॅमच्या टुर्नामेंट्स तिथे क्रिकेटचे सामने पाहायचे त्याच (किंवा त्यापेक्षा कांकणभर अधीक) भक्तिभावाने पाहाते. त्यावेळी स्टेफ़ी हे माझं दैवत. मग तिने एखादा सामना गमावला की त्या सेमेस्टरच्या माझ्या निकालाची पण गडबड होणार असं मला वाटे...ती निवृत्त झाल्यानंतरही आणखी वेगवेगळे टेनिस खेळाडू आवडत राहिले.पण तिच्याइतकं कुणी कंसिस्टंटली आवडलं नाहीये...आणि आता इतक्यात वाचलेल्या "ओपन"मुळे कळलेला आंद्रेही पुन्हा एकदा जास्त आवडलाय....इतकं प्रामाणिक आणि विथ डिटेल्स आत्मचरित्र बर्‍याच दिवसांनी वाचलं...पण विषय या दोघांबद्दल नाहीये मुळी.
या जानेवारीतही म्हणजे अगदी आत्ता ही ऑस्ट्रेलियन ओपन सुरू असताना खरं म्हणजे शनिवारी किंवा कुठल्याही रात्री कुणाकडे जायचा मला कंटाळा येतो. कारण एकतर वेस्ट कोस्टमुळे बरेच सामने दुसर्‍या दिवशी सकाळी रिपिट टेलिकास्टमध्ये दाखवले तर पाहावे लागता किंवा फ़क्त निकाल पाहता येतो. त्यामुळे निदान विकेंडला तरी मुलं झोपली की निवांतपणे जागरण करून आपल्या आवडीचे काही सामने पाहायचे असा बेत होता. पण नेमकं मुलालाच त्या कुंटुबाकडे खेळायला जायचं असल्याने आम्हाला जाण्याखेरीज गत्यंतर नव्हता. पण मग लवकर निघुया असं ठरवलं होतं तरी येता येता साडे-नऊ वाजलेच..उशीरा येतानाचा फ़ायदा म्हणजे छोटं पिलु गाडीतच झोपलं आणि मोठ्याने पण पेंगायचे सूर लावले होते. या पार्श्वभूमीवर जेव्हा मी ऑस्ट्रेलियन ओपन सुरू केली तेव्हा पहिल्या सेटमध्ये ती कशी पडली आणि तिच्या घोट्याला कसं बॅंडेज लावलंय त्याचे फ़ुटेज दाखवत होते आणि दुसरा सेट सुरू होता. मी डोळ्यांना स्कोर दिसायच्या आत जमेल तेवढा डिव्हिआर मागे घेतला आणि आताच आल्यासारखं फ़्रेश मनाने मॅच पाहायला बसले.
पहिल्या सेट "ति"ने गमावला होताच आणि दुसर्‍या सेटमध्येही काही आशेचे किरण असे दिसत नव्हते. त्यात टाय ब्रेकरमध्ये तिच्या समोर असलेल्या तितक्याच ताकदीच्या खेळाडूला तो सामना खिशात टाकायला चांगले चार मॅच पॉइन्ट्स होते. आपल्या आवडत्या खेळाडूला हरताना पाहायला कुणाला आवडेल?? पण जिद्दीने खेळून हे चारही मॅच पॉइन्ट्स वाचवून तिने तिसरा सेट आणि पर्यायाने मॅच खिशात टाकली तर....माझ्यासारखाच हा विचार "ति"च्या प्रत्येक चाहत्याने केला असणार खात्री आहे मला आणि अर्थात तिने स्वतः.ही.
फ़क्त एकच विचार आम्ही करू शकत नव्हतो तो म्हणजे तिला आत्ता झालेल्या दुखापतीचा. तुम्ही आंद्रेचं "ओपन" वाचलंत तर टेनिस या खेळाबद्दल आपले एकंदरीत डोळे उघडतील. फ़िटनेस, हेल्थ आणि खेळाडूचा त्या दिवशीचा गेम याबद्दल एक प्रेक्षक म्हणून आपण विचारच करू शकत नाही इतक्या गोष्टी तिथं पडद्यामागं होत असतात. आपल्यासाठी सामना असतो ती या दोन योद्ध्यांसाठी एक लढाई असते आणि असतात डावपेच. प्रतिस्पर्ध्याचा कमजोर भाग मिळाला की त्यावर हल्ला करून फ़ायनल सेट हा खूपदा मानसिक ताकदीवर जिंकला जातो. अर्थात हा सामना पाहताना मात्र फ़क्त आता "ति"च्यासाठीचा विचार, "ति"ने खेळावं हेच वाटत होतं....पण त्यादिवशी ते चारही मॅच पॉइन्ट वाचवून मग तिसर्‍या सेटला नमनालाच डबल ब्रेक करून आपलं पारडं जड करायची किमया "ति"ने साधली. त्यानंतर जरी तिची सर्विस तिच्या प्रतिस्पर्धीने एकदा मोडली तरी आधीच घेतलेल्या आघाडीमुळे तिला ६-४ असा तिसरा सेट आणि पर्यायाने ती मॅच खिशात टाकण्यापासून अडवणारं कुणीच नव्हतं. तो दिवस, ती रात्र तिचीच होती....फ़क्त तिची.....
याआधीही मी तिच्याबद्द्ल इथे  लिहिलंय...हो तिच्या पुनरागमनाच्या वेळेस....कदाचित माझं स्वतःचंही त्यावेळी स्वतःच्या करियरमध्ये काही न काहीतरी करायचं सुरू होत होतं पण जुळत नव्हतं म्हणून ती जास्त लक्षात राहिली. आताही तिच्याइतकं भव्य काही केलं नसलं तरी काही ना काही सुरू आहे. एकदा मुलं झाली की एक एक छोटं पाऊलही मोठ्या शिडीवर चढल्यासारखं वाटतं त्यामुळे असेल बहुधा किमची मी मोठ्ठाली पंखी आहे..तिने पूर्ण सीझनमध्ये एक पदक मिळवलं तरी माझ्यासाठी ते खूप खास असतं.
टेनिस किंवा कुठल्याही खेळात खेळाडूचं वय, त्यांची शारीरिक पार्श्वभूमी याला खूप महत्व आहे. तिला आधीच्या मॅचमध्ये झालेली दुखापत आणि तिच्याबरोबर खेळणार्‍या तिच्यापेक्षा वयाने लहान असणार्‍या स्पर्धक हे सर्व एका पारड्यात टाकलं तरी ती माझी लाडकी सुपरमॉम असल्याने आई होताना आणि मग आईपण जपताना कामाच्या ठिकाणी कराव्या लागणार्‍या ऍडजस्टमेन्ट करणार्‍या माझ्या सार्‍या मैत्रीणी (आणि अर्थात याची पूर्ण कल्पना असणारे मित्र) तिला यावर्षीच्या फ़ायनलमध्ये पाहायला नक्कीच इच्छुक असतील.....
आता इथे स्पर्धेत राहिलेल्या सगळ्या स्पर्धक म्हणजे अगदी किमची आजची मॅच जिच्याबरोबर आहे ती वोज्नियाकी काय किंवा दुसर्‍या भागात आगेकुच करणारी शेरापोव्हा आणि अगदी काल व्हिनसला सरळ दोन सेटमध्ये हरवणारी मॅकारोव्हा या सगळ्या सगळ्या मला तितक्याच आवडत असल्यातरी जेव्हा मी एक आई म्हणून माझी करियर,घरातली छोटी लढाई लढत असते...स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करत असते त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं अगदी मनापासून द्यायच्या माझ्या शुभेच्छा मी देणारे त्या फ़क्त "किम"साठी,एका सुपरमॉमसाठी आणि सगळ्यात मुख्य तिने आता सांगितल्याप्रमाणे तिच्या शेवटच्या  ऑस्ट्रेलियन ओपन साठी.......

Best of Luck Kim....

छायाचित्र मायाजालावरुन साभार.....

Sunday, January 15, 2012

पन्नासाव्या डेटची पहिली कहाणी

’ल्युसी’, हवाईमध्ये राहणारी एक मुलगी आपल्या बाबांच्या वाढदिवसासाठी अननस आणायला गेली असता झालेल्या अपघातात मेंदुच्या एका विशिष्त भागाला धक्का बसल्याने स्मृतिभ्रंशाच्या वेगळ्याच प्रकाराला सामोरी जाते. त्यानंतर ती रोज फ़क्त तोच १३ ऑक्टोबर जगते, ज्या दिवशी रविवार असतो आणि तिच्या वडिलांचा वाढदिवस असतो.
तिच्या या जागृत समाधीवर काही उपाय नसल्याने तिचे बाबा तिच्यासाठी हेही सुखकर व्हावं म्हणून तिला तोच दिवस आहे असं वाटावं याची शक्य होईल ती सोय करतात. तिच्यासाठी त्या दिवशीचं वर्तमानपत्र ठेवलं जातं. ती रोज तेच वाचते. नेहमीच्या ठिकाणी ब्रेकफ़ास्टसाठी जाते, मागवलेल्या वॉफ़ल्सचे त्रिकोण नाहीतर घरासारखे आकार करुन पुस्तकं वाचायची रविवारची सवय, मग घरी आल्यावर बाबांना तीच sixth sense ची कॅसेट गिफ़्ट देते. आधी ठरल्याप्रमाणे बाबा तिला भिंत रंगवायचं काम देतात. मग वर्तमानपत्रात वाचलं असतं त्याप्रमाणे वायकिंगचा गेम (तिला ठाऊक नसतं तिच्यासाठी कॅसेट टाकून ठेवली आहे) भावाबरोबर पाहताना त्याच पैजा. मग ती आधी दिलेली sixth sense ची कॅसेट पाहून पहिल्यांदीच पाहात असल्यासारखं त्यातल्या सस्पेन्सवर तिचं भाष्य. रोज तेच..तिच्या बेडरुमचा दिवा मालवला की मग लगोलग बाबा आणि भावाचं पुन्हा दुसर्‍या दिवसासाठी सारवासारव करणं...भिंत पुन्हा पांढरी करणं, वर्तमानपत्राची नवी प्रत काढणं, sixth sense ला गिफ़्ट रॅप करणं..
रोज हाच दिवस जगणार्‍या या मुलीच्या आयुष्यात त्या ब्रेकफ़ास्ट रेस्टॉरन्टमध्ये आलेला, एका मत्स्यालयात सील/वॉलरसचा व्हेट असणारा हेन्री येतो. तो तिच्या आयुष्यात येतो म्हणण्यापेक्षा ती त्याच्या आयुष्यात येते असंच म्हणायला हवं कारण सकाळी हिची पाटी पुन्हा कोरी होणार.
इथपर्यंत जर हटके वाटत असेल आणि त्यामानाने थोड्या इमो विषयावरही हलकाफ़ुलका चित्रपट बनू शकतो असं वाटत असेल तर पहायलाच हवा 50 first dates.
२००४ मध्ये आलेल्या हा चित्रपटाबद्दल मी आता का ब्लॉगवर लिहिते असा प्रश्न पडला असेल तर माझं आणि चित्रपटांचं नातं म्हणजे मी अगदी चित्रपटवेडी नाहीये आणि त्यातही मुख्य म्हणजे एकदा चित्रपट पाहिला तरी मी थोड्याच दिवसांत त्या चित्रपटाबद्दल विसरलेले असते. त्यामुळे मी काय पाहिलंय हे माझ्यापेक्षा ज्यांनी तो चित्रपट माझ्याबरोबर पाहिला असतो त्यांना जास्त लक्षात असतं.खूपदा दुसर्‍यांदा चित्रपट पाहताना मी याची शेंडी त्याला लावून एका वेगळ्याच चित्रपटाची पटकथा तयार होते.. आणि नट-नट्या यांच्या नावांबद्दल मी घातलेल्य गोंधळावर तर एक संपुर्ण वेगळी पोस्ट तयार होईल. या पार्श्वभूमीवरही काही हटके चित्रपट लक्षात राहिले जातात. या चित्रपटाततर विसराळूपणालाच खूप छानपणे सादर केल्यागेल्यामुळे हाही लक्षात राहणार हे माहिते त्यामुळे ही पोस्ट थोडीफ़ार माझ्या चित्रपटविसरभोळेपणाची माझी मलाच आठवण राहण्यासाठी.

image credit

Sunday, January 1, 2012

दो "टि"वाने....

एक टिवाना...नहीं...एक टिवाना और एक टिवानी भी.....दो टिवाने शहर में...दिन के कोई भी वक्त में......टी का बहाना ढुंढते है.....
यप्प...आलं का लक्षात..."टी"...हो तेच ते चाय....चहा..च्या....ची पोस्ट म्हंजे आलं, टी...टिवाने हेच येणार नमनाला.....
खरं तर मी आणि चहा हे जसं विळ्या-भोपळ्याचं नाही तरी चंगु-मंगुचंही नातं नव्हतं..मला संपूर्ण दिवसात चहा-कॉफ़ी काहीही नाही घेतलं तरी चालतं..लग्नानंतर मी फ़क्त विकेंडला नवरा घरी असला की चहा (तो सहसा त्यानेच केलेला) नाहीतर कधीकधी कॉफ़ी आणि इतर दिवशी सकाळी दूध-सिरिय़ल घेतलं की झालं असं असे किंवा आता असायचं असं भूतकाळात म्हणायला हवं...म्हणजे थंडीच्या प्रदेशात राहायला लागल्यापासून मला गरम काहीतरी हवं म्हणून ऑफ़िसमध्ये कलिग्जबरोबर कॉफ़ीची सवय लागली. त्यात कुठच्याही डाउनटाउनमध्ये नेहमीचे स्टारबक्स, डंकिन डोनट्स सोडूनही बरीच स्थानिक छोटी छोटी कॉफ़ीशॉप्स असतात. माझा फ़िलीच्या ऑफ़िसातला कलिग जरा दर्दी होता म्हणून कॉफ़ीचे ते स्थानिक अड्डे आणि त्यांचे वेगवेगळे मोका, लाटे, अमेरिकानो असे विविध प्रकार ट्राय करताना मला थोडी फ़ार कॉफ़ीची सवय लागली आणि मग ऑफ़िस संपलं तरी घरी पण कॉफ़ीमेकर आणून सोय करुन ठेवली...हो हो येतेय चहावर पण येतेय पण मुदलात काय आय मीन मुद्दलच बदललंय पण नंतर मग तो कॉफ़ीमेकर साफ़ करायच्या कंटाळ्याने मी पूर्वपदावरही आले. आता पुन्हा मी फ़क्त विकेंडला नवरा घरी असला की त्याने चहा केला तर चहा किंवा मूड असेल तर कॉफ़ी असं सुरू झालं. मला वाटतं माझ्यासाठी आधी रोज कॉफ़ी प्यायला कंपनी असायची हे त्या कॉफ़ीप्रेमामागचं कारण असेल. त्यामुळे घरी राहिल्यावर मग खास चहा-कॉफ़ी हवीच असं काही नव्हतं..
पण ...(येस...गाडी इज कमिंग बॅक टू टी) मग (अर्थातच) ओरेगावात आलो आणि थंडीला सततच्या पावसाची जोड मिळाली. सतत म्हणजे इतका सतत की आठवडाभर सूर्यदर्शन नाही, टेंपरेचर शुन्याच्या आसपास थोडक्यात एकदम बकवास वेदर...मग यावर उतारा म्हणून सकाळी दहाच्या आसपास एक मस्त चहा घेऊन बसायची सवय लागली. लागली म्हणजे काय एकदम लागलीच...आणि मुख्य म्हणजे माझ्या नवर्‍याला चहाची प्रचंड आवड आहे...तो एकावेळी मोठा मग संपला की त्यात अजून चहा घेऊन निवांत पीत बसतो. त्याच्याच आईच्या शब्दात सांगायचं तर "टमरेल भरून चहा लागतो तुला" आणि इथल्या मगाची साइज पाहता मी पण त्यातलीच...त्यामुळे इकडच्या पावसाळी हवेत त्याच्यातल्या चहाबाजाने डोकं वर नाही काढलं तर नवलच...आणि त्याला जोड मला लागलेल्या चहाच्या सवयीची....

त्यातच भर पडावी अशी योजना असावी म्हणून असेल, आता सियाटलला एका ख्र्सिसमसच्या दिवशी कुणी जेवण देता का जेवण असं आम्ही एखादं रेस्टॉरन्ट शोधत एका मॉलच्या प्रत्येक माळ्यावर फ़िरत असताना एका बंद दुकानाच्या काचेमागे असलेल्या खूप सुंदर किटल्या दिसल्या आणि रेस्टॉरन्ट विसरून आम्ही दोघं तिथे थांबलो. बाहेरून किमती दिसत नव्हत्या आणि दुकान तर बंद होतं...मी वर नाव पाहिलं..."टिवाना"....मला एकदम हसू आलं...दुसर्‍या दिवशी येऊन पाहू असा विचार केला होता पण दुसर्‍या दिवशी सियाटल दर्शनाच्या कार्यक्रमात पुन्हा त्याच मॉलमध्ये जाणं शक्य नव्हतं. मग आपल्या इथे यांचं दुकान आहे का बघून खरं तर तेही विसरलो.

पण नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भटकायला बाहेर पडलो आणि दोन-चार दुकानात भटकल्यावर चल निघुया केलं आणि एक्झिट शोधतोय तितक्यात डाव्या कोपर्‍यावर तीच लाल किटली आणि "टिवाना"चा बोर्ड. शिवाय दारातच त्यांचे दोन स्पेशल टी सॅंपल घेऊन एक जपानी मुलगीही स्वागताला होती.
हे म्हणजे नवर्‍याच्या भाषेत "जिसको ढुंढा गली गली" असो...तर आता आहेच आपल्या गल्लीत म्हणून वळलो आणि आमच्या लाडकीची १०० डॉलरची किंमत पाहून लगेच आत गेलो..आता इथे गैरसमज नको...असे शंभर डॉलरचे बोर्ड जिथे जिथे असतात तिथे नेहमी आत जावं म्हणजे आपल्याला हव्या त्या किंमतीचं काही न काही आपल्याला परवडेल त्या भावात सेल नाव्याच्या बारमाही फ़ळीवर हमखास मिळतं...

त्याप्रमाणे आम्ही "तू नहीं तो और सही" म्हणून आम्हाला हवी ती एक किटली आणि कपाचा सेट घेतला.. तो दारात ट्राय केलेला चहाही इंटरेस्टिंग होता.मग तो किटलीला एकटं वाटू नये म्हणून तो स्पेशालिटी चहा आणि त्या चहाला आता आपण कुठे आलो बरं असं वाटू नये म्हणून एक बॉक्स अशी भरगच्च खरेदी करून बाहेर पडलो....आणखी थोडा वेळ थांबलो असतो तर कोस्टर, आणखी दुसरे कुठले कुठले चहा आणि बरंच काहीपण घेतलं असतं इतकं सुंदर दुकान होतं.आणखी काही सुंदर सुंदर किटलीचे सेट्स पण पाहायचे होते....कदाचित आमच्या पोरांना आमच्या खिशाची काळजी पडली असावी त्यामुळे योग्य वेळी आणि योग्य अंतराने वरचे सा लावून त्यांनी आम्हाला आवरतं घ्यायला लावलं.
तसे आधीचे कप,किटली इ. प्रपंच आहे, त्यात हे नवं अपत्य...पण काय करणार आता टिवाने झालोच आहोत तर रोज "हा प्याला..टिवानाचा" असं संदीप खरेच्या सूरात सूर मिसळून म्हणायला काय हरकत आहे?


टीप - आता एक चहाची किटली घेतल्यावरही वर्षाच्या पहिल्या दिवशी ही बया पोस्ट टाकणार असेल असं जर कुणाला वाटलं असेल तर त्यांच्यासाठी मला एक स्पष्टीकरण देणं भाग आहे ते म्हणजे, काही नाही मी आज सकाळ सकाळी सिद्धुच्या ब्लॉगवर चहाचा मसालेदार फ़ोटो पाहिला त्यामुळे चहा चढला आणि मग हे टंकलंच...सिद्ध्या सब निषेध के हकदार अब तुम हो....

काही फ़ोटो टिवानाच्या साइटवरून साभार...