लहान मुलांचं आयुष्य म्हणजे जणू एका कळीचंच...ती उमलण्यापर्यंतचा एक सुंदर प्रवास..काही निष्पाप कळ्या मात्र उमलण्याआधीच मुद्दाम खुडल्या गेल्या की बागेला जसं वाईट वाटावं तसं कालपासून झालंय. जी बातमी नुसती ऐकून टीव्हीवर पाहायचा धीर होत नाही त्याबद्दल काय लिहू? ही पोस्ट अकाली खुडल्या गेलेल्या त्या सगळ्या वीस कळ्यांसाठी. ... :(
मनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....
Saturday, December 15, 2012
Tuesday, December 11, 2012
Rest In Peace 832F
येलोस्टोन, प्रत्येक निसर्गप्रेमीला जावंजावंसं वाटणारं जंगल. एकेकाळी तिथला लांडगा नामशेष झाला होता आणि मग पर्यावरणवादी आणि शास्त्रज्ञ यांच्या अथक परिश्रमाने ७० वर्षानंतर म्हणजे ९५ च्या सुमारास कॅनडामधून १४ लांडगे पार्कात सोडले गेले होते. याविषयी डिस्कव्हरीची एक सुंदर डॉक्युमेंटरी सुद्धा पाहण्यासारखी आहे आणि जालावर बर्याच ठिकाणी याबद्दल लिहिले गेले आहे. लांडग्याचं "आ...ऊ" पार्कात पुन्हा घुमतंय ही गेले काही वर्षे सर्वच प्राणीप्रेमींसाठी एक चांगली घटना आहे.
आज हा विषय काढायचं कारण म्हणजे सकाळसकाळी एक बातमी ऐकली ज्याने हे सगळं आठवलं आणि वाईटही वाटलं. ती बातमी म्हणजे या पार्कातला सगळ्यात प्रसिद्ध फ़िमेल लांडगा (याला मराठीत काय शब्द आहे?) एका शिकार्याच्या बंदुकीला बळी पडला. ही घटना घडली वायोमिंगमध्ये पण येलोस्टॊनच्या थोडंसं बाहेर. जोवर हे लांडगे पार्कात आहेत तोवर त्यांना अभय आहे पण एकदा पार्काबाहेर माणसांच्या तावडीत सापडला की लांडगाही माणसाचं भक्ष्य होतो. मग देश कुठलाही असो.
थोडं या प्रसिद्ध लांडग्याबद्द्ल. लमार कॅनयान पॅकची प्रमुख ८३२एफ़ लांडग्यांच्या बिहेवरियल रिसर्चसाठी गळ्याला रेडीओ बांधलेल्या लांडग्यापैकी होती. आपल्या पॅकसाठी शिकार करण्यासाठीची धडाडी आणि पिलांची अतिशय काळजी घेणे हे तिचे मुख्य गूण तिचा अभ्यास करणार्यांनी नोंदवून ठेवले आहेत. लांडग्यांना मूळात या पार्कात अशाप्रकारे पुन्हा आणणे आणि मग जी नवी पिढी तयार होतेय त्यांना कॉलर करून त्यांचा अभ्यास करणे हे वाचताना वाटतं तितकं सोप्पं नाहीये. त्यामागे एका मोठ्या टीमचे अथक परीश्रम आहेत. अशा प्रकारे केलेल्या संशोधनातून जी माहिती मिळते त्याने संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी हातभार लागतो.अशा प्रकारच्या हत्येने हे संशोधनाचं कामही पुन्हा नव्याने सुरू करायला लागतो. शिवाय लांडग्यासारखे प्राणी जे या पार्कात पुन्हा आणण्यासाठी इतके प्रयत्न केले गेले आहेत ते अशाप्रकारे गमवल्यावर पुन्हा तेच कार्य करणं हेही तितकं सोप्पं नाही. या वर्षात अशाप्रकारे संशोधनासाठी कॉलर केलेल्या लांडग्यापैकी ८ लांडगे मारले गेले आहेत. हा काही चांगला आकडा नाहीये.
संशोधनाच्या हिट लिस्टवर असणारा एक प्राणी पार्काच्या बाहेर गेल्यामूळे शिकार्यांच्या हाती लागणं यासारखं दुर्दैव ते काय? आपण जेव्हाही अशा शिकारी होतात तेव्हा माणसांचा एक बचावात्मक पवित्रा ऐकतो की ते आमच्या जागेवर आलेत. खरं आपण किती अतिक्रमण करून बसलोय याचीही आधी शहानिशा करायला हवी. आणि किती वेळा या प्राण्यांनी माणसांवर प्रथम हल्ला केलेला असतो हेही एक वेगळेच. खरं कारण दडलं असतं ते त्या प्राण्यांना मारून मिळणार्या कातडी, दात इ.च्या बदल्यात हाती लागणार्या घबाडाचं. ते कधीच उघड होणार नसतं.
अभयारण्य करून हे प्रश्न खरंच सुटतील का हे एक कोडंच आहे. कारण अभयारण्याच्या सीमा प्राण्यांना शिकवणं कठीणच. त्यातही जर कॉलर असलेला लांडगा, शिकारी डोळेझाक करून खुशाल मारत असेल तर ज्यांना कॉलर नाही त्यांची गचांडी धरायला कितीसा वेळ?
पुन्हा एकदा निसर्ग विरूद्ध माणूस असे वाद रंगतील. ती सगळी चर्चा वाचताना मला आठवतोय मी माझ्या आतावरच्या भ्रमंतीत पाहिलेला एकमेव रुबाबदार जंगली लांडगा आणि आज ही बातमी वाचून आलेल्या आठवणीने अंगावर आलेला शहारा..
जालावरच्या चर्चेतलं लक्षात राहिलेलं वाक्य म्हणजे "Never kill an animal for doing what it is programmed to do."
May your soul Rest In Peace 832F.
- यलोस्टॊनमध्ये लांडगा पुन्हा आणण्याबद्दलची रोचक माहिती इथे वाचता येईल.
- वरचं लांडग्याचं मोफ़त चित्र साभार.
Wednesday, December 5, 2012
अलाश्काची गमत
हाय..हो मला नं कुणी दिसलं की पहिलं हाय कलायला आव्वतं..पन आज हाय केल्यावर नंतल शगलं शिलियश म्याटल आहे.
आई बोल्ली का तुमाला? ती आनि बाबा आमाला मोथ्या बोतीतून तिथे लांब घेऊन गेले होते अलाश्काला. त्यांना रिलॅक्स का कायतरी व्हायचं होतं आनि फ़िलायचं पन होतं. मला पन बाड इगल बगायचा होता पन तो आई-बाबाला दिशला तेवाच मी कालसीट मदे झोपलो होतो. पन तुमाला माहिते का तिथे खूप सालमन फ़िशी पन होते. तेच बाबाला बगायचे होते.
मग त्यांनी एक कुथलीतली जागा शोधली. खलं त्यांनी नाहीच शोदली कालन त्यांना कुनाला लस्ते विचालायला आव्वत नाई. आईने पाल्क लेंजलला विचालं आनि तिने त्यांना शांगितलं तिथे जा तल हे दोगे लगेच चला तिथे. तली नशीब मी तोपलयंत जागा जालो होतो ते. मग गालीतून उतलल्यावर आई, बाबा, दादा आनि मी माज्या स्तोलरमध्ये अशं निगालो.
बाबाला फ़िशी खूप आवलतात. म्हंजे पालायला पन. आईला आनि आमाला पन आवलतात पन ते खायला आनि आईला तर काहीच पालायला आवलत नाई. खलं म्हंजे मला तो काकाचा डॉगी आवलतो पन आई नुस्ती घाबलते आनि त्यात दादापन म्हनून आमी कदी कदी साशा आंटीकले तिची म्यावी बगायला जातो तल त्याला पन आई घाबलते. खलं तल तो मला ओलखतो. पन जाउदे. आई कुथे मला मासे पालायाला देनाल म्हनून आमी त्या पार्ल्कमदल्या ब्लिजवल उबं लाहून ते क्लॉस कलनाले सालमन बगत बसलो. बाबाने खूप फ़ोतो काडले. आमचे नाई फ़िशीचे.
मग आई म्हनाली माझा आनि लुषांकचा पन काड नं एक फ़ोतो. त्याने काडला पन त्याला अजून सालमन बगायचे होते आनि आईला वॉक कलायचा होता. दादाला माज्या स्तोललमद्ये बसायचं होतं. मला काय कलायचं होतं ते आता मला आथवत नाई. पन सगल्यांना वेगंवेगं कायतली कलायचं होतं. म्हनून आई बाबाला म्हनाली मी जला तिथे जाऊन बगते बीचवल जाता येतं का? बीच म्हनजे नदीचा बीच...त्याला काय म्हनतात बलं हं किनाला तर तिथे..बाबाने लगेच तिला मला घेऊन जा म्हनून सांगितलं..आई म्हनते तो नेहमी अशी वाटनी कलत असतो. ही दोगं कदी मोथी होनाल काय माहित?
मग आई आनि मी मस्त निगालो.तिथे खूप हिलवीहिलवी झाली होती आनि थोलं चालल्यावल पायल्या होत्या.तिथेच तो बीचपन दिसत होता. पन मी पलेल म्हनून आई मला म्हनाली बाबू मी तुजे फ़ोतो काडते मग आपन पलत जाऊ. मी तरी उतलत होतो पन तिला मला हेल्प कलायची नव्हती मग आमी पलत आलो. येताना आमाला एक बुक दिशली. तिते लोकांनी तिते आले म्हनून नाव लिहिलं होतं.
आईने आमची नावं पन तिथे लिहिली आनि आमी पुले परत त्या ब्लिजवल आलो तर बाबा आनि दादा (आनि हो माजा स्तोलल पन) गायब. आईला वातलं ते पाल्किंग लॉतला असतील म्हनून तिथे गेलो तल तिथे पन कुनीच नाय. आता आई म्हनाली आपन पलत तिथेच ब्र्लिजवर जाऊ. मध्ये लस्त्यात तिने एक दोन आदीपासून लोकं होती त्यांना पन विचाललं पन कुनीच बाबाला पाहिला नव्हता. आई तली अशी हेल्प घेते बाबाने कुनाआच विचालं नशतं. अशं आम्ही कितीतली वेला ब्लिज आनि पाल्किंग लॉतला गेलो आनि मला आता भूकपन लागायला लागली. सगलं सामान गालीत आनि आईकले चावीपन नाई.
त्या तिथे कुथलाच फ़ॉलेल्स्ट लेंजल पन नव्हता..आनि आई म्हनाली की सेलफ़ोनला लेंज पन नाई. बापले..मी खलं तर भूक लागली म्हनून पन ललायला लागलो आनि मला बाबा आनि दादापन पाहिजे होते...मग आई तिथे नवीन लोकं आतमध्ये जात होते त्यांना पन म्हनाली की बाबा दिशला तल पलत पाथवा. तिने कुथेतली जाऊन ती फ़ोनची लेंज आनली (माजी आई इंजिनियल आहे नं.मग तिला लेंज नको का आनता यायला?) तल नेमकं बाबाने फ़ोन उचलला नाई. मग तिने त्याला सांगितलं तू इकलेच ये म्हून. पन किती वेल कोनीच आलं नाई. आता आईपन ललनार होती पन ते काम मीच केलं.
मग आई म्हनाली आपन परत बीचकले जाऊ. तल त्या लस्त्यावल पन कोनीच दिशलं नाई म्हनून आईने जोलात हाका मालायला सुलुवात केली. मी पन ओलललो "बा.....बा....." "दा......दा..." मग लांबून दादाचा आवाज आला...मग आमी थांबलो तर ते कुथून तली वलून येत होते...आईने मला उचलून घेतलं कालन हाका मालुन मी दमलो होतो नं? आनि मग बाबा आनि दादा पन आमच्याकले आले...खलं म्हंजे बाबा आनि दादा हलवले होते आनि मग त्यांनी आमालाच आमी हलवलो म्हनून सांगितलं...
त्यादिवशी आई बाबाबलोबल अजिबात रागावली नाई. ती फ़क्त म्हनाली चल बोतीवर पलत जाऊया. आनि तो आमचा पहिलाच दिवस होता म्हनून मग त्यानंतल कदीच गाडी लेंट कलुन अलास्काच्या जंगलात फ़िलायचं नाई हे आईने बाबाला शांगितलं आनि बाबा पन हो म्हनाला.मला पन बलं वातलं कालन कालशीतमध्ये शालखं बसन्यापेक्षा बाबाकडे अप्पी बली पलते.
मला माहिते आईला वातलं जल त्या जंगलात बेअल आला अशता तल? आनि आमी कशं बोलवलं असतं पोलिशाला पन...तिथे अजून थोल्या वेलाने कालोख जाला अशता तल? पन मी आईला शांगितलं मी होतो नं मोथ्याने हाक मालून बोलवायला? आदीच आईने हाक मालायला शांगितली असती तल मग मी आईच्या ब्लॉगवल कशा आलो अशतो? मागच्या वेली दादाने नंबल लावला तेवाच मी थलवलं होतं की मी पन एक गमत शांगायला येनाल आहे..तल ही माजी आनि दादाची गम्मत आहे...अलाश्काची गमत.
Labels:
चकए चष्टगो
Monday, November 19, 2012
मौनं सर्वथा....
कॉलेजमध्ये असताना एका डायरीत आवडीची वाक्य लिहून ठेवायचे त्यातलं लक्षात राहिलेलं एक म्हणजे "दुःख माणसाला अंतर्मुख करतं. ते समोरच्याचं आपल्याशी असलेलं नातं अधीक दृढ करतं". कॉलेजच्याच आठवणीत रमायचं तर दादरला वजा करणं कठीण. मागेही लिहून झालंय. प्रत्येकवेळी दादरला कुठेही फ़िरायचं, वावरायचं तर एक अनामिक सावली नेहमी आपलं म्हणजे माझ्यासारख्या मराठी माणसाचं संरक्षण करते असं नेहमी वाटायचं.
गेले काही वर्षे देशाबाहेर असले तरीही दादरची आठवण आली की ती सावली पुन्हा आधार द्यायची. प्रत्येक ट्रिपमध्ये जाणीवपुर्वक शिवाजी पार्कला मारलेली फ़ेरी त्या कधी न भेटलेल्या सावलीचा आधार नेहमीच दाखवायची. ऑनलाइन दादरबद्दल कुठेही काहीही वाचलं की जसं दादरचे रस्ते, गल्ल्या आठवतात तसंच आपसूक आठवतं ते दादरला असलेलं त्या सावलीचं संरक्षण. खरं तर राजकारणात पडायचा शूरपणा न दाखवू शकणार्या माझ्या पिढीच्या कुठच्याही मराठी तरूण वा तरूणीला हक्कही नाही आहे त्या सावलीकडे बोट करून दाखवायचा कारण ते नसते तर आम्हाला डोकं वर काढायला निदान मुंबईत तरी संधीच मिळाली नसती.
त्यावेळी तर माझं कॉलेजही पन्नास टक्के एका विशिष्ट राज्यातल्या लोकांसाठी आरक्षीत; कारण संस्था त्या लोकांची. त्यामुळे काय तुम्ही घाटी असं कुणीही येता जाता आम्हाला सुनावू शकलं असतं पण दादरचा दरारा त्यांचे शब्द गिळून टाकत होता. आम्ही आपल्या परीने ताठ मानेने आमच्याच राज्यात राहत होतो.
आणि हे सगळं असंच असणार..पुन्हा आपण जाऊ तेव्हाही ती सावली आपल्यासाठी तशीच असणार हे जणू काही गृहीत धरलं असतानाच दिवाळीला शंकेची पाल मनात चुकचुकली. त्यादिवशी खरं तर आदल्या दिवशीचा पाऊस पाहताना पुन्हा एकदा अंधारून येताना वाटलं की संपतंय सगळं आणि अचानक सूर्य पुन्हा थोडा वेळ दिसला. पुन्हा बातम्या तपासल्या आणि असं काही नाहीये आणि होईल अजुनही, आधुनिक वैद्यकशास्त्र वगैरे वगैरे आठवलं. आणखी एक दिवस सूर्यही पुन्हा तसाच आला आणि मग ते गृहीत धरणं बरोबर होतं असंच मनातल्या मनात म्हटलं. पण आमच्या शुक्रवारी रात्री उशीराने झोपलो तरी शनिवारी अवेळीच जाग आली..बाहेर खूप अंधारुन आलं होतं. धाय मोकलून आकाश रडत होतं...वर्तमानपत्र न वाचताच ताईला फ़ोन केला आणि तिने म्हटलं "हो अगं ते गेले".
कधी नव्हे ते बातम्यांच्या चॅनेलचं ऑनलाइन स्ट्रिमिंग पाहायचा प्रयत्न केला आणि माहित नाही का डोकंच बधीर झालं. इतका मोठा आधार गेल्याची भावना सगळ्यांमध्ये असेल असं वाटावं तिथे ओरडून ओरडून काहीतरी बडबड सुरू होती. मला त्या भुंकण्यातलं एक अक्षरही कळण्यासारखं नव्हतं पण कळत इतकंच होतं, की बरेच दिवसांनी लांडग्यांना भक्ष्य मिळालं आहे आणि तिथेच काही तरसं ओरडताहेत. लांडगे आणि तरसं यांना काय कळणार की शांतपणेही खाता येतं. प्रसंग कुठला आणि तुम्ही कधी भुंकायचं याला काही अर्थच नव्हता.
कधी कधी वाटतं की ते दूरदर्शनचे दिवस खरंच बरे होते. एकदा दुखवटा आला की खरंच दुःख निदान अंतर्मुख होऊन त्या माणसाचं आपल्याशी असणारं नातं स्पष्ट तरी करता येतं. आणि त्या निमित्ताने होणार्या शांततेने खरंच त्या आत्म्याला शांतीपण लाभत असेल. हजारो चॅनेल्स आपल्याला पाहायला मिळताहेत ही नक्की आपली प्रगती की वैचारीक अधोगती?
माझं मौन मी माझ्यापाशीच ठेऊन ते स्ट्रिमिंग बंद करून टाकलं. त्यानंतर उरले ते नुसते विचार. दुसर्या दिवशी रेकॉर्डेड अंतयात्रा पाहताना माझ्या लाडक्या दादरला इतक्या शोकाकूल अवस्थेत मी कधीच पाहिलं नव्हतं.. ही सोय नसती तर हे अंत्यदर्शन खरंच मला झालं नसतं. आणि ज्या प्रकारे ते आपली मराठीवर अपलोड केलंय त्याने त्यात कुठलाही व्यत्यय येत नव्हता. बहुतेक म्हणून असेल आता निदान दुःखाने अंतर्मुख व्हायची सोय तरी झाली होती.
आधीचा आदला दिवस जे काही जाणवलं नव्हतं ते पद्मजाताईंनी "बहुत जनांचा आधारू" म्हटल्यावर इतकं जाणवलं की डोळ्यातून पाण्याच्या धारा सतत वाहू लागल्या. मी आणि माझा नवरा, दोघं, त्या पूर्ण वेळेत एकदाही एकमेकांशी नजर देऊन बोललो नाही. माझ्याइतकंच तोही रडतोय हे मला त्याचे डोळे न पाहता दिसत होतं. काय असेल हे नातं अशा एका मोठ्या व्यक्तिमत्वाशी की जे त्यांच्या जाण्यानंतर आम्हाला दादरपासून इतक्या लांब असतानाही जाणवतंय?
आज पुन्हा एकदा इथे अंधारून आलंय आणि तुफ़ान पाऊस पडतोय.मला नक्की कशाचं वाईट वाटतंय मलाच कळत नाहीये. खरंच दुःख माणसाला अंतर्मुख करतं. ते समोरच्याचं आपल्याशी असलेलं नातं अधीक दृढ करतं.... आणि इथे सांगायचं तर ते नातं लक्षात येईस्तोवर इतका उशीर झालाय की आता काहीच करता येणं शक्य नाही असं उगीच वाटतं.
ईश्वर त्यांच्या मृतात्म्याला शांती देवो आणि त्यांच्या नजीकच्या व्यक्तींना यातून सावरायचं बळ याउपर माझ्यासारखी एक मराठी व्यक्ती काय मागणं मागणार त्या कर्त्याकरवित्याकडे?
अपर्णा,
१९ नोव्हें.२०१२.
Wednesday, November 14, 2012
गानसंस्कार
आमच्या घरात सकाळी साडे पाचला आई-बाबा उठत आणि साधारण सहाच्या आसपास रेडिओ सुरू होई.सकाळी आठेक वाजेपर्यंत म्हणजे ती राजाभाऊंची श्रुतिका होईपर्यंत मराठी आणि मग हिंदीची बारी.नंतर मग संध्याकाळी पुन्हा ’सांजधारा’ आणि त्यानंतर ’फ़ौजी भाईको की फ़र्माईश’ ते मग रात्रीचं बेला के फ़ूल’ पर्यंत काही न काही वाजत असे...त्यामुळे अगदी लहानपणापासून गाणी कानांवर पडत राहिली.आजही बरीचशी गाणी त्याबद्दलची बाकी माहिती आठवत नसली तरी चाल आणि शब्द अशी आपसूक लक्षात आहेत.....
गाण्यांचं कसं काम करताना ऐकली तरी कामात खंड पडत नाही.आपला हात एक आणि कान एक (आणि मेंदु बहुधा तिसरंच काही) करायला तरबेज होतात.मल्टीटास्कींग म्हणावं का याला? काय म्हणायचं ते असू दे पण बरं बरोबर जमतं, नाही का?? माझं गुणगुणंणं काही वेळा अविरत सुरू असतं...अगदी एखादा कॉन्फ़रंस कॉल म्युट करुन ऐकतानाही एखादी लकेर चुकारपणे येऊन जाते आणि मिटिंगची मरगळ आपसूक जाते...न कळता आम्हा भावंडांवर हा गानसंस्कार करणार्या माझ्या आई-बाबांचं मला त्यासाठी खूप कौतुक वाटतं...
मागे एकदा आरुष बराच आजारी होता. त्याच्यासाठी आम्ही दोघं आलटून पालटून सुट्ट्या काढत होतो त्यावेळी त्याला सारखं जवळ घेऊन बसावं लागे. मग बाजुलाच एक प्ले लिस्ट लावून ठेवायचे. तो शांतपणे पहुडला असे आणि मी माझं फ़्रस्टेशन गाण्यामुळे तरी विसरायचा प्रयत्न करायचे. या नादात एक झालं, तो बरा झाल्यावर एके रात्री मला झोपवताना त्या प्ले लिस्टमधल्या काही गाण्यांच्या त्याने फ़र्माईशी केल्या. त्यातलं एक तर चक्क हिंदुस्थानी क्लासिकल, आरतीताईंचं "जा रे जा रे संदेसा"...म्हणजे त्याला न येणार्या हिंदी भाषेतलं...मी तर उडालेच..
मग मलाच एक छंद लागला. रोज मी गाडीतून सकाळी मुलांना सोडते त्यावेळात एक गाणं लावायचं आणि आठवडाभर तेच एक गाणं सकाळी वाजवायचं. यात शक्यतो मराठी गाणी मी लावते. कारण मराठी भाषा मुलांना कळते म्हणजे गाण्याचे शब्दही ते ऐकतात. हिंदी गाणी आम्ही फ़िरायला वगैरे जातो तेव्हा असतात त्यावेळी आजकाल मुलं चक्क गोंधळ घालतात म्हणजे कॉलेजमध्ये एखादा विषय पोरांच्या पूर्ण डोक्यावरून जायला लागला की त्यांनी मोठमोठ्याने गप्पाबिप्पा मारायला सुरूवात करावी तसं. इतर वेळी घरी मूड असेल तेव्हा यु ट्युबवरची त्याच्या लहानपणी लावायचो ती बालगीतं पण लावायची म्हणजे अगदीच पुढचं पाठ नको...बालगीतं तर काय असंही मुलं ऐकतात. पण सारखं एखादं गाणं ऐकलं की ते गाणंही त्यांना आवडलं की ते ऐकत राहतात...आणि थोडी शांतही बसतात.अर्थात हे काही औषधाच्या मात्रेसारखं गाण्यांची मात्रा वगैरे नाही पण जोवर लक्षात आहे तोवर आपले शब्द, भाषा आणि अर्थात संगीत परीचयासारखं होऊ शकतं.
मध्येच मी कामासाठी आठवडाभर बाहेर गेले आणि परत आले तर बाबाच्या राज्यात त्यानी "ढिंग चिका" पण शिकुन ठेवलंय...बाबाने "ढिंग चिका" म्हटलं की "हे हे हे" करतानाचा जोश थोडा वेगळाच. थोडक्यात कानावर पडलेलं लक्षात राहायचं वय आता सुरू झालंय. मग त्यात ते कसंही का असेना....:)
सर्वात जास्त मला आवडलं ते मागे मी जी श्रीधरजींची कार्यशाळा केली त्यातलं एका गाण्यातलं वाक्य आरुषला गुणगुणताना ऐकते तेव्हा...त्यांनी आम्हाला शिकवलं होतं की "उन्हात्त पान मनात्त गान" यात त वर जोर आहे..(म्हणून मी ते त ला त जोडून "त्त" लिहिलंय)...आणि छोट्या आरुषचं "उनात्त पान" ऐकताना इतकी गम्मत वाटते की असं ऐकून ऐकून एकेका गाण्याची ओळख करून द्यायचं तंत्र मलाच आवडलंय..
ऋषांकसाठी तर गाण्यांनी मलाच आधार दिलाय कारण तो लहान होता तेव्हा मला एकटीनेच पहिले तीन महिने काढायचे होते. मग मी "रंग बावरा श्रावण"ची सिडी कायम आमच्या बुम बॉक्समध्ये घालून ठेवली होती..त्याच्या झोपायच्या वेळी त्याला पाळण्यात घातलं की मी ती सिडी लावून चक्क स्वयंपाकघरात काम करत बसे..."बाळ उतरे अंगणी"ने सुरू केलेली सिडी साधारण तिसर्या गाण्याला माझा बाळ निवांत झोपलेला असे....सीडी संपली की काहीवेळा मी ती पुन्हाही लावे. त्यावेळी ही आरुष कधीकधी मध्येच मोठ्याने "आला किनाला" म्हणत असे.
मागच्या वर्षी आई-बाबा आल्यावर दिवसा ते दोघा मुलांसाठी गाणी म्हणत आणि काहीवेळा रात्री ऋषांकसाठी एकदा सिडी असं आमचं रूटीन होतं.. त्यानंतर जरा चळवळ्या झाल्यावर त्याने त्या बुम बॉक्सचा डब्बा गुल केला, पण आम्ही ही गाणी आमच्या आय पॅड, आय पॉड वगैरे समस्त ठिकाणी सुखरूप ठेवलीयत..त्यादिवशी एका रिसॉर्टमध्ये साहेब रात्री (की पहाटे) दोनला उठून पुन्हा झोपायलाच तयार नाहीत तेव्हा मी आय पॅडवर तीच गाणी सुरू केली आणि माझा गुणी बाळ थोड्या वेळाने झोपला..
तो झोपताना किती त्रास देतो याचं परीमाण पण लहानपणी गाण्यावर असायचं. म्हणजे तिसर्या गाण्याला झोपला तर चांगला..अख्खी सिडी संपून पुन्हा लावायला लागली की मग बाहेर येऊन तसा रिपोर्ट असं आमचं सुरू असतं..या पार्श्वभूमीवर तो बोलायला लागला की त्याला हे गाणं नक्की माहीत आहे का हे जाणून घ्यायची माझी केव्हाची इच्छा होती. मग एके दिवशी झोपायला नेताना मी सहज त्याला विचारून पाहिल,"ऋषांक, आता आपण कुठली गाणी लावायची??" आणि त्याने चक्क त्याच्या बोब्ल्या बोलात "बा..." असं सांगून झोपण्याची अॅक्टिंग पण करून दाखवली...मला त्यावेळी इतकं सही वाटलं की पुढच्या वेळी पद्द्मजाताई भेटल्या की त्यांचा आवाज जर त्याने ओळखला तरी मला नवल वाटणार नाही..
आता लवकरच ऋषांक दोन वर्षांचा होईल. त्यामुळे त्याचे बोबडे बोल ऐकायला मजा येतेच आहे पण त्यात जर त्याने अशा प्रकारे सारखं ऐकलेल्या गाण्याची ओळख दाखवली की मस्तच वाटतं. सारखं सारखं ऐकून आरूषने एकदा "हे गगनाआआआ" असा सूर लावला त्यातला "हे"चा थोडा अमेरिकन "हेय..."सारखा उच्चार ऐकून हसायला येत होतं तर त्यापुढल्या वाक्यातल्या "सर्व कहाणी?"चं उत्तर ऋषांकने "थावी(ठावी)" असं दिल्यामुळे माझी चांगलीच करमणूक झाली. मी आरुषच्या वेळेस एक घरगुती गाणं बनवलं होतं म्हणजे कुठल्याही प्राण्यांचं किंवा पक्ष्याचं नाव घ्यायचं आणि गाण्यातच हा काय करतो? असा प्रश्न विचारुन तो झोपतो असं म्हणायचं. बेसिकली मुलं काहीवेळा झोपायचं सोडून गाणी आणि गोष्टी ऐकत बसतात त्यावर हा माझा घरगुती उतारा होता. तर कधी कधी ऋषांकला म्हटलं की "मला झोपव", की तो मग त्याच्या बोबड्या बोलात "चिव चिव चिमणी काय कत्ते, काय कत्ते? चिव चिव चिमणी झोपते" असं बोलतो ते ऐकायला खरंच फ़ार गोड वाटतं आणि त्यात मग त्याला आवडणार्या इतर प्राण्यांचे अॅडिशन्सही येतात फ़क्त त्या सगळ्यांचे आवाज आ आ असतात म्हणजे आ आ पिगी काय कत्तो, आ आ नायनो (डायनो) इ.इ.
आतापुरता सांगायचं तर ही मुलं इंग्रजी माध्यमात शिकतील, मोठी होतील..मातृभाषा म्हणून मराठी तर त्यांना यायलाच हवी. अर्थात कलेच्या म्हणजे पुस्तकं, नाटकं, गाणी याच्या अनुषंगाने मराठीची गोडी मी कितपत लावू शकेन माहित नाही. पण अशा गाण्याच्या निमित्ताने त्यांना काही चांगले शब्द,गाणी लक्षात राहिली तर ते मला हवंच आहे. आणि थोडंफ़ार गुणगुणूही शकले तर सोन्याहून पिवळं नाही का?
फ़ार पुढचा विचार नाही पण त्यांच्या आत्ताच्या वयापासून वेगवेगळी गाणी ऐकवणे हे मात्र मी करत राहणार आहे...त्याचं एक कारण मलाही गाणी ऐकत राहायची असतात आणि दुसरं अर्थातच न कळत मुलांवर होणारे गान संस्कार...जसे माझ्या लहानपणी माझ्या आई-बाबांनी नकळत आमच्यावरही केलेत....
आजच्या बालदिनाच्या निमित्ताने माझ्या ब्लॉगवाचकांच्या अवतीभवती असणार्या मुलांना शुभेच्छा देता देता त्यांच्याकडूनही या विषयावरच्या आणखी काही टिपा/अनुभव ऐकायला नक्की आवडतील. आपण आपल्या मुलांना लहानपणापासून गाणी ऐकायला शिकवता का?
Labels:
अनुभव,
आठवणी,
गाणी आणि आठवणी,
बालदिन
Monday, November 12, 2012
आली दिवाळी....
यंदा नोव्हेंबर लागला, पहिला रविवार आला आणि मायदेशात सगळीकडे चाहुल लागली ती दोन आठवड्यांनी येणार्या दिवाळीची. त्याचवेळी म्हणजे याच नोव्हेंबरच्या पहिल्या रविवारी उन्हाळ्यात एक तास पुढे केलेलं घड्याळ एक तास मागे आणलं गेलं.रविवारी तर अगदी एक तास जास्त झोप, हे आणि बरीच कामं एक तास लवकर झाल्याचा दरवर्षीचा अनुभव आला पण खरी कसोटी सोमवार पासून असते. म्हणजे त्या एका तासाने सगळ्यात मोठा फ़रक पडतो तो संध्याकाळच्या वेळेवर. एकतर मी आधीच बरीच कॅनडाच्या जवळ असल्याने तशीही सूर्यकिरणं तिरकी झालेली असतातच त्यात हा एक तास म्हणजे न उगवणारा सूर्य मळभाच्या रुपाने थोडं फ़ार अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करत असतो तो साडेचार पाचच्या सुमारास आकाशाच्या पटलावरून गायब होतो आणि काम संपवून बाहेर येईस्तो डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा मिट्ट काळोख होतो. दिवसाही फ़ार काही प्रेरक वातावरण वगैरे नसतं. पाऊस नसेल त्या दिवशी धुकं आणि मळभ.
या पार्श्वभूमीवर दिवाळीचं माझ्या इथल्या घरात येणं मला सुखदच नाही तर आवश्यकही असतं. घरातली थोडी फ़ार रोषणाई, कंदिल, दिवे आणि यावर्षी घरून आलेला फ़राळ अजून मिळाला नसल्याने वाट पाहून केलेले (आणि थोडेफ़ार फ़सलेले) माझ्याच हातचे फ़राळाचे पदार्थ. आपल्या पद्धतीचे कपडे इकडे मिळत नाहीत म्हणून ती खरेदी नाही आणि खरं तर मुलांना ती वाढतात तसे आणि सिझनच्या हिशेबाने कपडे घेतले गेल्याने आणखी काही नवीन खरेदी अशी नाहीच. जी काही थोडीफ़ार नवी मित्रमैत्रीणी आहेत त्यांना बोलावणं आणि एखाद्या घरचं नंतरच्या शनिवारी होणारं पॉटलक बास हीच काय ती आत्ताची दिवाळी.
पण तरी याने रोजच्या रुटिन जीवनात जो काही थोडाफ़ार बदल असतो तो या थंडी आणि अंधाराने आलेली मरगळ सारायला मदत करतोच. मला वाटतं माझ्या स्वतःच्या बाबतीत म्हणायचं तर यावर्षी उदास व्हायच्या प्रसंगांचा सल असल्यामुळे असेल बहुतेक, निदान यंदातरी दिवाळीचं माझ्या घरी येणं फ़ारच गरजेचं होऊन बसलंय. म्हणजे जणू काही ती माझी कुणी खूप जुनी, गुणाची मैत्रीणच आहे जिला माझिया मनात काय चाललंय ते कळतंय आणि मग ती मला बदल म्हणून हा प्रकाश घेऊन मनातला अंधार दूर करू पाहतेय. सकारात्मक विचारांची सुरूवात म्हणून दिवाळीची आपली वर्षोनुवर्षे असणारी मैत्री वृद्धिंगत करुया असं मीही मग मलाच सांगते.
आवर्जून लवकर उठून केलेली उटण्याची आंघोळ आणि मग लावलेला दिवा. अगरबत्तीचा प्रसन्न वास वातावरण मंगलमय करतोच करतो. मुलं सारखी "दिवाळी म्हणजे काय?" असं चिवचिवत राहतात. त्यानिमित्ताने केले आणि आले गेलेले फ़ोन, शुभेच्छा, फ़राळ आणि खास जेवण. चार दिवस खरंच हवेसे. त्यानंतर लगेच इथे येणारी थँक्सगिव्हिंगची सुट्टी पण मोहवतेय. आह! काही करू नये फ़क्त आपल्या कुटुंबीयांना वेळ देता यावा आणि थोडा विरंगुळा, बास! बाहेर कधी अंधार पडलाय त्याची निदान यादिवसांत तरी खंत नसावी. आणि हे लिहिता दोन्ही देशातले मोठे सण अंधाराच्या पार्श्वभूमीवरच येतात याचं प्रत्येक वर्षी वाटलेलं विशेष.
माझ्या आठवणीतल्या दिवाळी जिथे साजरी करायचे त्या घरातल्या माझ्या अतिशय प्रिय मैत्रीणीने काढलेला एका फ़ोटो शुभेच्छांसाठी, माझिया मनाच्या वाचकांसाठी खास. काय म्हणता दिसत नाही? अरे हो सांगायचं राहिलंच की माझ्या पिकासामधली जागा भरायला काहीच अंश शिल्लक असल्याने निदान फ़ोटोसाठी एक जागा शोधत होते. भाडं कमी, डिपॉझिट नको वगैरे अशी म्हणजे आखुडशिंगी, बहुगूणी वगैरा वगैरा तर एकदम लक्षात आलं आपलं फ़ेसबुक आहे की. तर काही दिवसांपूर्वी माझिया मनाचं फ़ेसबुक पेज निर्माण केलंय.ज्या ब्लॉगवाचक मित्र-मैत्रीणींचे कॉंटॅंक्स आहेत त्यांना आग्रहाचं निमंत्रण पाठवलंय ते स्विकारायचं राहिलं असेल तर या ब्लॉगसाठीची तीच दिवाळी गिफ़्ट समजावी आणि ज्यांना ते पाठवायचं राहिलंय त्यांनी अर्थातच संपर्क साधावा हेच आग्रहाचं निमंत्रण. मग तिथले अपडेट्स तुम्हाला आपोआप व्हाया सर्वांचं (सध्याचं) लाडकं फ़ेबु दिसत राहतील. या पेजच्या वापर वगैरे कसा करायचा ते शिकणंच सुरु आहे त्यामुळे तूर्तास एवढंच. इकडे ब्लॉगच्या उजव्या बाजुलाही त्या पेजची फ़्रेम दिली आहे ते खरं तर फ़ोटोवालं विजेट मला लावायचं होतं पण अभ्यास कमी पडला. त्यावर पुन्हा केव्हातरी...
सध्या मात्र दिवाळीच्या रोषणाई आणि फ़राळाचा आनंद लुटूया. तुम्हा सर्वांना ही दिवाळी सूख-समाधानाची, आनंदाची आणि येणारं वर्ष आरोग्यमयी जावो हीच इच्छा.
Tuesday, October 23, 2012
तिचं हरवलेलं आयुष्य अर्थात a Stolen Life
पाचवीत असणार्या जेसीला साउथ लेक टाहोमधल्या आपल्या घरातून शाळेत जायचा रस्ता ओलांडताना फ़िलीप आणि त्याच्या बायकोने उचललं. त्यानंतरची एकोणीस वर्षे म्हणजे वय वर्षे ११ ते ३०, आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा, मोठं व्हायचा, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेऊन पुढचं जीवन समृद्ध करायचा काळ तिला त्याच्या घरामागच्या अंगणात एका छोट्या तंबुवजा घरात काढावा लागला. या काळात तिला दोन मुलीही झाल्या. तिची आत्ता म्हणजे २०१० मध्ये सुटका झाल्यानंतर, लिहिलेल्या "अ स्टोलन लाइफ़" या पुस्तकात जेसी डुगार्डने ही व्यथा मांडली आहे.
हे पुस्तक वाचताना ती पाचवीतली मुलगी सारखी डोळ्यासमोर येते. तिचं लौकिक शिक्षण पाचवीच्या पुढे झालंच नाही हे तिच्या भाषेवरून कळतं. वाचताना तिचे शब्द, तिचं असणं त्याच वयात थिजल्याचा भास होतो. फ़िलिप तिच्याशी जसा वागला त्यातले ठळक प्रसंग मांडताना आता तिला काय वाटतं (reflection) याबद्दलही थोडं अशी ठळक प्रकरणं आणि मध्ये तिने चोरून लिहिलेल्या डायरीची पानातले उतारे अशी साधारण मांडणी आहे. तिच्याच शब्दात सांगायचं तर हे पुस्तक खूप विस्कळीत होणार याची जाणीव असतानाही ते तसंच केलंय..अत्याचाराच्या परिसीमेची एकोणीस वर्षे पुस्तकाच्या अमुक एक पानात मांडायची आणि खरं तर ते लिहिण्यासाठी पुन्हा आठवायचं, त्याच त्रासातून परत गेल्यासारखंच नाही का?
हा फ़िलिप दुसर्या कुठल्यातरी बलात्काराच्या आणि ड्र्गजच्या खटल्यामुळे खरं तर पॅरोलवर होता. त्याला नेहमी पोलीस स्टेशनात जावं लागणं, तुरूंगवास, पोलीसांचा घरी चेक अप इ.इ. सगळ्याचं रूटीन असताना आणि अमेरीकेसारख्या देशात अशा गुन्हेगाराने एकोणीस वर्षे एखाद्या मुलीला घरी डांबून ठेवलंय हे पोलिसांना न कळणं हे माझ्यासाठी थोडं न पटण्यासारखं आहे.म्हणजे अशा देशांतही कायदा हा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देतोच असं नाही, असंच म्हणायचं का?
आणखी एक न पटणारी गोष्ट म्हणजे हा फ़िलिप जर ड्रग्ज आणि मनोरूग्ण (सेक्सॉहॉलिक) म्हटला तरी हे कृत्य करताना त्याची बायको त्याच्यासोबत आहे. एक स्त्री म्हणून तिला कधीच जेसीला सोडवावसं वाटलं नाही का? की ती पण ड्रग्ज घ्यायची म्हणून तिची मती गूंग झाली असं समजायचं, का तिला फ़िलिपने आणखी कुठलं भय घालून ठेवलंय? की तिला स्वतःला मूल झालं नाहीये म्हणून हिच्याकडून मूल हवंय?एक स्त्री म्हणून या प्रसंगाकडे पाहताना खरंच पुरूषांची शारीरीक ताकत हीच त्यांची मोठी शक्ती ठरते का असंही वाटतं. कारण एक अकरा वर्षांची मुलगी तिच्यासमोर एक बंदूक घेऊन बसलेल्या माणसापुढे आणि त्याच्या एका हाताच्या फ़टक्यासरशी पडणारं शरीर सांभाळून पळणार तरी कशी?
मुलं होणं ही बायकांचीच मक्तेदारी (?) असल्याने अशा अत्याचाराच्या प्रकरणात पदरात मूल आलं की आधीच आपलं नाव हरवून बसलेली जेसी कुठे जाणार? त्यांचं पालनपोषण करण्यासाठी लागणारी शक्ती गोळा करण्यापुरतातरी तिला अशाच नराधमाबरोबर राहावं लागणार, नाही का? त्यात ही तर बंदीवानच. हे पुस्तक वाचताना निव्वळ तिने हे पुस्तक लिहिलंय म्हणून या अत्याचाराचा शेवट असेल अशी आशा वाटते नाहीतर हे असंच सुरू राहील आणि दुसरीकडे कुठेतरी आशा लावून बसलेली जेसीची आई आणि इथे जेसी यांची आयुष्य अशीच संपतील असं सारखं वाटतं. पण भगवान के घर असणारी देर कधीतरी हा अंधेरा दूर करते आणि एका पॅरोलच्या व्हिसिटमध्ये काही एजंट्सना संशय येऊन शेवटी जेसी आणि तिच्या दोन मुली यांची या नराधमाच्या तावडीतून सुटका होते. फ़िलिपने तिला खरं तर लहानपणापासून तिला इतकं घाबरवलेलं असतं की या एजंट्सनाही ती स्वतःविषयी खरं सांगायला सुरूवातीला ती कचरते आणि फ़िलिपलाच कव्हर करण्याचा प्रयत्न करते. अखेरीस एक एकोणीस वर्षे लपवून ठेवलेलं सत्य बाहेर येतं आणि फ़िलिप आणि त्याच्या बायकोवर खटला सुरू होतो. तो मला वाटतं अजूनही सुरू आहे किंवा बहुतेक त्याला शिक्षा झाली असावी.
हे हरवलेलं आयुष्य जेसीला परत मिळणार नाहीच आहे त्यामुळे ही सुटका म्हणायची की आता पुन्हा एकदा जगाला स्वतःच्या नावाने सामोरं जायची नवी शिक्षा? आपल्या मुलींना तिच्या आईबद्दलची माहिती जी मिडीयाच्या धिसाडघाईमुळे बर्यापैकी चघळली गेली आहे, त्यामुळे मिळणार्या नजरांपासून वाचवायचं हा एक नवाच प्रश्न. शेवटच्या प्रकरणांमध्ये हा सगळ्याच्या मानसिक परिणामामधून बाहेर येण्यासाठी ती घेत असलेल्या कौन्सिलिंग, बाह्य जगातल्या साध्यासाध्या गोष्टी जसं ड्रायव्हिंग,स्वतःच्या खर्या नावाने दुकानात जाणं याबद्दलचे तिचे अनुभव आणि एकंदरितच ही घटना वाचताना आपणही सून्न होऊन जातो.
थोडंसं जेसीच्या पुस्तकाच्या स्टाईलमध्ये लिहायचं तर माझंही हे पुस्तक वाचतानाच्या वेळचं प्रतिबिंब:
"माझं हे पुस्तक वाचून झालंय. तुला हवंय का?"
चार पाच तासाच्या विमान प्रवासात चार शब्द पण नीटसे न बोललेल्या शेजारणीकडून आलेल्या प्रश्नाने खरं तर थोडं आश्र्चर्यच वाटलं. पण नेहमी विमानात वर्तमानपत्र ठेवणारी लोकं असतात असं ही पुस्तक ठेवणारे असं वाटून मी फ़क्त कुठलं पुस्तक आहे त्याबद्दल विचारलं.
तिच्या उत्तराने मागे ऐकलेल्या बातमीची आठवण झाली आणि एक गंभीर विषय वाचणार हे माहित होतं..पण माझ्या पुढच्या प्रवासात दीड तासाच्या पण धावपट्टीवरच पंधरा विमानांच्या मागे उभ्या असलेल्या विमानात द स्टोलन लाइफ़ सुरू केलं आणि नुस्तं गंभीर नाही तर एकाच वेळी तिचं काय होणार याची प्रचंड काळजी, अमेरीकेतल्या पोलीसांच्या निष्काळजीपणाबद्द्ल वाटणारं आश्र्चर्य, एक स्त्री म्हणून भोगायला लागलेल्या शारीरीक छळाबद्दलचा आणि पुरूषांच्या भोगलालसेच्या सीमेची परिसीमा पाहून झालेला संताप आणि हे जीव कळवळायला लावणारं सत्य वाचताना डोळ्यात आलेलं पाणी लपवताना कधी जेसीच्या आयुष्याने माझ्या मनाचा ताबा घेतला कळलंच नाही. खरं तर हे पुस्तक मी त्यादिवशी पूर्ण वाचूच शकले नाही.
ज्या अत्याचारांना ती एकोणीस वर्षे सामोरी गेली, त्यातूनही काही चांगले व्हावे म्हणून तिने जी जिद्द दाखवली त्याबद्दल कुंपणावरून वाचायचीही माझी हिम्मत होत नव्हती.
मला हे पुस्तक देऊ करणारी ती बाई आठवली. तिने हे पुस्तक बहुतेक माझ्या पहिल्या फ़्लाईटला सुरू करून वाचून संपवलं. त्या प्रवासात जेव्हा केव्हा आमच्याकडे खाणं किंवा इतर काही कारणांसाठी एअरहोस्टेस आली तेव्हा तेव्हा ही बाई इतकी बावचळलेली असायची की प्रत्येकवेळी तिने मी जे मागवलं तेच मागवलं. थोडक्यात ती प्रचंड अपसेट होती किंवा काहीतरी ठीक नव्हतं असं तेव्हा मला वाटलं होतं. अगदी एक पर्सर आम्ही एक्झिट विंडोला होतो तर आधी उगाच गप्पा मारून आणि नंतर आग्रह करून आम्हाला वाईन हवी का असं चारेक वेळा विचारून गेला तेव्हाही तिने त्याच्याकडे फ़क्त पाहिलं पण पुन्हा पुस्तकात डोकं खुपसून राहिली. तिला ते पुस्तक नुसतंच संपवायचं नव्हतं तर तिला ते बरोबर घेऊनही जायचं नव्हतं. याचा उलगडा मला मी स्वतः हे पुस्तक वाचलं तेव्हा मला आपोआपच झाला.
माझं विमान पंधरा विमानांच्या पाठी उभं होतं असं कॅप्टनने सांगितलं. नक्की किती वेळ ते तिथे होतं मला काहीच माहित नाही. पण फ़िलिपने पहिल्यांदी जेव्हा तिच्या शरीराचा ताबा घेतला ते वाचून माझ्या आधीच्या सुकलेल्या अश्रुंवर पुन्हा पुन्हा ओघळणारे अश्रु पुसायला मी रुमाल काढायला लागले तोवर आम्ही हवेत होतो आणि माझा शेजारचा मेक्सिकन नशीबाने झोपून गेला होता. ही फ़्लाईट तशी दीडेक तासाचीच होती. मला जाम जड झालेलं पण तरी नेटाने मी वाचत राहिले, तिच्या प्रश्नात आणखी गुंतत गेले.
नंतर मला मिडवेस्टच्या एका भागात विमानतळापासून तासभर ड्राइव्ह करून हॉटेलला पोचायचं होतं. दिवस मावळताना मी कार रेंट करून प्रवास सुरू केला आणि मैलोनमैल पसरलेली मक्याची आणि सोयाबीनची शेतं लागायला लागली. रस्ताला लोकवस्ती आणि दिवे नाहीत आणि माहितीचा रस्ता नाही म्हणून मी अप्पर लावून गाडी हाकत होते. एखादा ट्रक वगैरे अशी अगदीच तुरळक वाहतूक होती आणि माझ्या बर्याच वेळाने लक्षात आलं की समोर एक पिक अप ट्रक फ़ार हळू जातोय म्हणून मी त्याला पास करायला गाडी डावीकडे घेतली. त्याने मला पास होऊ दिलं आणि मग मी त्याच्या पुढे आले तशी तो एकदम त्याचा अप्पर माझ्या डोळ्यावर येईल अशा रितीने मला फ़ॉलो करायला लागला. थोडक्यात माझं अप्पर लावून त्याच्यामागे गाडी चालवण्याचं उट्टं काढत होता.
माझ्या डोक्यात जेसीची घटना इतकी ताजी होती आणि हा सुनसान भाग म्हणजे कदाचित मी ९११ केलं तरी कुणी येईपर्यंत माझं काय होईल या विचाराने मुकाट्याने मी पुढचे काही मैल तो अप्पर सहन करून चालवत राहिले आणि एकदाची एक्झिट घेऊन हॉटेलला पोहोचले. ती अख्खी रात्र मला अजिबात झोप आली नाही. उगाच माझ्या मुलांशी व्हिडीओ चॅट करण्यात मी दोनेक तास घालवले पण जीव रमत नव्हता. त्यानंतर ते ओझं घेऊन काम संपवून घरी आले आणि उरलेलं पुस्तक वाचायला घेतलं. एकेका प्रसंगाने मी मोडून जात होते.मध्ये काही दिवस मला अक्षरशः कुठल्याही पुरुषजातीशी बोलू नये इतकं पराकोटीचं विचित्र वाटायला लागलं होतं. त्याचवेळी देशातल्या एका गॅंगरेपबद्दलची बातमी वाचल्यामुळे माझ्या नवर्याला त्यातल्या स्त्रीसाठी कसंतरी वाटतंय असं त्याने मला सांगितलं आणि मी कोसळलेच..त्यालाही या पुस्तकाबद्दल सांगून कितीतरी वेळ आम्ही सून्न बसून होतो. यानंतरही पूर्ण पुस्तक वाचायला मला बरेच दिवस लागले. थोडं थोडं वाचलं की पोटात ढवळून येऊन मी सोडून द्यायचे. तिच्या डायरीचा कित्येक भाग मी वाचलाच नाहीये. I just could not take it.
I remember, I was so proud that I had written this for my kitty and wanted to share it with someone, I showed it to Phillip and he saw that I had put my name in it. He preached to me for I think an hour about how I really didn't want to write my name, and how dangerous that could be if anyone else ever read it. I thought to myself, I never see anyone, though, but I didn't interrupt because it always ended with why he was right and I was wrong. So I tore out the corners with my names and never wrote my real name on anything again until 2009.
हे पुस्तक माझ्यासाठी स्त्रीअत्याचाराची पराकोटी होती. या चिमुरडीने जे सहन करून त्यातून बाहेर येऊन आज ती तिचं जग उभं करायचा प्रयत्न करतेय ते सगळं या पोस्टमध्ये मांडणं कठीण होणार आहे हे ठाऊक असतानाही मी याविषयी लिहायला सुरूवात करतेय. त्याचं कदाचित एक कारण हे पुस्तक अमेरिकेबाहेर किंवा स्पेसिफ़िकली भारतात येईल का मला माहित नाही. तरीही झालेल्या घटनेची थोडीफ़ार कल्पना आपल्या वाचकांनाही द्यावीशी वाटली. ही पोस्ट प्रचंड विस्कळीत असणार आहे याची खात्री असूनही प्रकाशीत करतेय.
सध्या नवरात्रीच्या निमित्ताने एकंदरीत "स्त्री शक्ती" हा विषय थोड्या दिवसांसाठी का होईना पण चघळला जाईल. त्याचवेळी मला काही महिन्यांपूर्वी वाचलेलं हे पुस्तक माझ्या मनात घर करून बसलेली जेसीच नाही तर अनेक स्त्रिया आठवतात. म्हणजे पुरूषांची शारिरीक मक्तेदारी आणि त्यांना आमचं आव्हान देणं अशक्य असणं हे सगळं खरं असलं तरी कुठेतरी ती एक सूप्त शक्ती जात्याच प्रत्येक स्त्रीमध्ये निसर्गदत्त आहे. तिचा संयम, तिचं सकारात्मक असणं, या सगळ्याचा कुठेतरी अंत असेल असं स्वतःलाच सांगायची तिची प्रवृत्ती या सर्वांनीच जगायचं बळ तिला दिलंय..आणि तिची बाळं हेही तिचं बळ असतं. मग ती चाळीत संसार करणारी पण मुलांना शिक्षण देऊन मोठं करुन आता एकटीने अमेरीकेला नातवडांना भेटायला येणारी माझी आई असो की माझ्या मुलीसाठी मी डोंगरही चढेन असं म्हणणारी बेट्टी असो नाहीतर स्वतःच्याच देशात बंदीवान असणारी हाले आणि काही दिवसांपूर्वी पुरुषांची मक्तेदारी असणार्या तालिबान्यांविरुद्ध लढणारी मलाला. या सार्या स्त्रियांप्रमाणेच जेसीने धीर धरुन आलेल्या संकटाला सामोरं जायचं ठरवलं. तिच्या हरवलेल्या जगातलं सगळंच परत मिळणं तर शक्य नाही पण निदान एक माणूस म्हणून जगायचा अधिकार तिला पुन्हा प्राप्त होतोय हेही नसे थोडके.
नवदुर्गेच्या या सणाला अनेक संकटांना सामोरं जाऊन एका नराधमाला अखेरीस कायद्याच्या ताब्यात देऊन आपल्या पिलांसकट स्वतःची सुटका करणार्या या मातेला माझा त्रिवार प्रणाम. वाचकांना नवरात्र आणि दसर्याच्या माझिया मनातर्फ़े शुभेच्छा.
तळटीप: या पुस्तकातला बराचसा भाग मी सहन होत नाही म्हणून वाचू शकले नाही आहे. हे पुस्तक कदाचित भारतात उपलब्ध नसेल. माझं वाचून झालेलं पुस्तक जेव्हा मी मायदेशी येईन तेव्हा माझ्या एक मैत्रीणीसाठी घेऊन येणार आहे. कुणालाही तिच्याकडून ते वाचायला हवं असल्यास संपर्क साधून ठेवा.
Monday, October 1, 2012
खोल खोल
लहान असताना "गुहेत जाणारी पावले" अशी एक बालकथा वाचली आहे. ती फ़ार वेगळ्या कारणाने माझ्या लक्षात आहे कारण मला मुळात गुहा या प्रकाराचीच भीती वाटते. त्या गोष्टीत तो म्हातारा झालेला सिंह गुहेत आलेल्या प्राण्याला खातो म्हणून हुशार कोल्हा फ़क्त आत जाणारी पावले पाहून स्वतःचा जीव वाचवतो. मी या गोष्टीत असते तर गुहेत असंही गेलेच नसते कारण मला वाकून आत काळोखात खोल खोल जायला भीतीच वाटते. अशा ठिकाणी मी गुदमरून जाईन असं आधीपासूनच वाटायला लागतं आणि मग तिथे जायची सुरूवातच शक्यतो मी करत नाही.
कुठल्याही किल्ल्यात वगैरे एखादं भूयार असलं की तिथे "बघुया बरं" करण्यार्य़ात मी कधीच नव्हते. तसंच ते सितागुंफ़ा, जीवदानीच्या देवीला गेलं की डावीकडे असणारं एक गुहेसारखं वाकून आत दर्शनाला जायचं ठिकाण या आणि छोट्या गुहांसारखं काहीही दिसलं तर तिथे जायला मी नाखूशच असते. जमेल तेव्हा अशी ठिकाणं मी खरं म्हणजे टाळलीच आहेत. अशावेळी लांबुनच पाहून "हां हां", "हो हो", "वा वा" असं काहीतरी बोलून वेळ मारून नेलेली बरं असं मी नकळत ठरवलं आहे.
पण काही गुहा अशा असतात जिथे वरचं कुठचंच वाक्य मला बोलता येणार नसतं. सहा-सात वर्षांपूर्वी अशा गुहेत जायला मी जितकी घाबरले होते तितकीच यावेळीही मी घाबरले. दुखणं परवडलं पण गुहा नको असं आधीपासून विचार केला नव्हता तरी त्या गुहेचं तोंड पाहिलं आणि मला झालं.
खरं मी एका अद्ययावत हॉस्पिटलच्या त्या विभागात चेक इन केल्यानंतर माझं काम करणारा त्या दिवशीचा अनालिस्ट मला मजेत म्हणाला
"They did not tell you that they forget to schedule you here. Did they?"
"What do you mean?"
"Well lets go out from the back door. Oh I am not taking you to a parking lot or something. We just have this trailer and I have one machine set inside. Just cause we have so many patients these days we keep one handy."
कामाच्या दृष्टीने सोयीचं पडेल म्हणून रात्रीची वेळ घेतली होती. त्यात हा ट्रेलरपर्यंतचा रस्ता. त्याचं एका चालत्याफ़िरत्या एम आर आय युनिटमध्ये केलेलं रुपांतर. बाहेर त्याचा कॉम्प्युटर आणि एक काचेचं दार आत उघडून आतल्या एसीत माझी वाट पाहणारी ती गुहा. किती नाही ठरवलं होतं तरी पुन्हा ती सुरूवातीलाच म्हटलेली भीती अगदी अंग अंग शहारून गेली. ह्रदयाचे ठोके आणखी जलद झाले आणि मन सुन्न. परतीची वाट बंदच असते अशा ठिकाणी.
उगाच आत गेल्यावर गोंधळ नको म्हणून एक दिर्घ श्वास घेऊन त्या अनालिस्टला म्हटलं आपण दोन मिनिटं थांबुया का? आता तो थोडा संशयाने माझ्याकडे पाहू लागला. एकतर मी कदाचीत त्या रात्रीपाळीतली शेवटची पेशंट असेन आणि मीच उशीर केला तर झाल बोंबलली आजची ड्युटी असं किंवा हिच्यासाठी वेगळा डॉक्टर बोलवायला लागणार का म्हणूनही असेल.
"Alright. Let's wait. But you said you had it before."
"Yes and it was a while ago. I think I had the same problem before."
"OK. hmm..I am not going anywhere until you relax. Don't worry. And hold this knob. Press it if you panic. I am just outside at the computer and I will talk to you. You need 5 scans and first one is just one minute. Rest of them are like between 3 to 4 minutes. I will talk to you in between."
किती वेळ वाट पाहणार न? मी मनाचा हिय्या करून म्हटलं, "Let's go."
मधल्या कालावधीत फ़क्त आत जाताना डोळे बंद करायचे इतकंच ठरवलं होतं. जाईपर्यंत माझ्या पायाला पकडून त्याने मला धीर दिला. मग त्याचा आवाज माझ्या कानांन ऐकू आला. एका जागी स्थिर झोपायचं असतं. हललं तर मग स्कॅन नीट होत नाही. यंत्राची धडधड कानांना लावायला दिलेल्या हेडसेटमधून बर्यापैकी ऐकू येत होती. मध्येच चिपळ्या वाजवल्यासारखा पण एक आवाज सतत येत असतो. मला वाटतं ते त्यांचं आपल्याला बरं वाटावं म्हणूनचं संगीत असावं. अर्थात यंत्राच्या फ़्रिक्वेन्सीला अडथळा येऊ नये म्हणून बहुतेक गाणी वगैरे ऐकवत नसावेत.
"you did good. The second one is coming up."
माझा एक छोटा सुस्कारा. तिसर्या स्कॅनपर्यंत डोळे मिटून का होईना मला बहुतेक सवय होते. म्हणून चौथ्याला डोळे उघडायचा एक क्षीण प्रयत्न आणि पुन्हा ती सुरूवातीला म्हटली होती ती खोल खोल जायची भिती. चौथं स्कॅन चार मिनिटं. तोवर नीट विचार करून पाचव्याला चार पैकी तीनेक मिनिटं तरी डोळे उघडे ठेवायचे एक यशस्वी प्रयत्न.
बाहेर आल्यावर अनालिस्टचं वाक्य थोडफ़ार अपेक्षितच.
"I was thinking you would just not do it. You were so tensed in the beginning."
खरं तर ते त्याच्यापेक्षा जास्त मलाच वाटलं होतं. पण त्या खोल खोल जायच्या भीतीतून निदान एकदा तरून जायच्या विचाराने कदाचित आधीचं दडपण मी विसरू शकेन असं वाटतं. यासाठीच तो प्रयत्न केला गेला असावा बहुतेक. नाहीतर आजारांचं निमित्त. माझ्यापेक्षा जास्ती आजारातून माझ्या आसपासचे जाताहेत हे माझिया मनाला नक्कीच माहित आहे. त्या दडपणातून तरून जायचे त्यांचेही काही वेगळे मार्ग असतील
Thursday, September 13, 2012
खाद्ययोगायोग
मला जायचं होतं कुठे? मिडवेस्टात..
मी राहाते कुठे? नॉर्थ वेस्टात....
आणि मधल्या मध्ये हे नॉर्थ इस्टात, डेट्रॉइटला एक तीन तासाचा हॉल्ट मिळतो काय...मला माझ्या भाच्याला फ़ोन करायचं सुचतं काय? आणि मामीच्या इतक्या आयत्या वेळेच्या नोटीसीवर पण ते गूणी बाळ पाउणेक तास उशीराने का होईना पण येतंय काय आणि मग मला आग्रह करून "शटिला"ला नेतो काय....’दाने दाने पे लिखा है’ चा अनुभव आला की याच म्हणीची सार्थकता पटते तसंच काहीसं...
हम्म....काय बोलतेय मी?? मी काहीच बोलणार नाहीये...फ़क्त फ़ोटोच बोलणार आहेत......ते वर म्हटल्याप्रमाणे त्याने आग्रहाने "तुला हे आवडेल" म्हणून नेलेलं एक नवीन ठिकाण..पुन्हा जायचा योग येणं म्हटलं तर कठीण म्हणून संधीचा फ़ायदा घेऊन एक छोटं सेलेब्रेशन त्याच्याबरोबर तिथे आणि घरच्यासाठी पण एक पेस्ट्री...बॅगेत जागा नसल्याचं मोठ्ठं दुःख मला तिथे गेल्यावर झालं....हाय राम....या पोस्टच्या निमित्ताने समस्त फ़्रेंच बेकर्सचा विजय असो...आणि ते विकणार्या अरब कन्यकांचाही....आणखी काय....
चला आहात नं तयार....एका योगायोगाने घडलेल्या खाद्ययोगाच्या छोट्या सफ़रीला...म्हणून वर खाद्ययोगायोग लिहिलंय :)
डेट्रॉइट विमानतळापासून साधारण अर्धा एक तास ड्राइव्हवर असणार्या डिअरबोर्न नावाच्या गावातल्या एका रस्त्यावर बरीच मिडल इस्टर्न/अरेबिक पद्धतीची दुकानं आहेत. त्यातली एक प्रसिद्ध बेकरी म्हणजे "शटिला". इथे गेल्या गेल्या एक नंबर घ्यायचा आणि आपल्याला काय हवं (खरं तर मला सगळंच हवं होतं) याची मनातल्या मनात नोंदणी करायला सुरूवात करायची.
गेल्या गेल्या दिसतात त्या आपल्याकडे परळला गौरीशंकरकडे वगैरे जसे काचेच्या आत मिठाया आणि वर जिलेबीचे डोंगर आणि आणखी काही निवडक मिठाया तसंच दृश्य. एक एक कप्पा विशेष प्रकारच्या गोडांसाठी. जसं वरचे सगळे मूसचे वेगवेगळे प्रकार. मूस हे साधारण थोडे कमी गोड आणि अत्यंत मुलायम म्हणून मला प्रचंड आवडणारं डेझर्ट.
इथल्या केकच्या सजावटी मनमोहक तर आहेतच शिवाय काही प्रकार छोट्या सिंगल सर्व्हिंगमध्येही ठेवलेले दिसताहेत. बच्चे कंपनीसाठी एकदम यम्म ओ..
हे टु गो बॉक्सेस आणि त्यातली अरेबिक मिठाई खरं तर मला फ़ार घ्यावीशी वाटत होती पण मला लॅपटॉप उचलून पाठदुखी वाढवायची नसल्याने बॅगमध्ये जागाच नव्हती. मग नाहीतरी मुलाला काही नट्सची अॅलर्जी आहे असं एक आंबट कारण मनात येऊन फ़ोटोवर समाधान मानलं ;)
केकच्या आणखी काही सजावटी पाहत बसता आमचा नंबर आल्याने भाच्याने मला भानावर आणलं. आता आम्हाला जे काही हवं होतं ते काचेपल्याडच्या मुलीला सांगून मग ती आमची ऑर्डर स्वतः चेक आउटकडे आणणार होती.
इतक्या कमी वेळात या दुकानाला न्याय देणं तसं कठीण पण नेहमी न खाल्ला गेलेल्या पिस्ता मूसला संधी द्यायचं मी ठरवलं. शिवाय त्याच्याभोवतीचं चॉकलेटचं कुंपणही फ़ार मोहक दिसत होतं की हीच पेस्ट्री पाहिजे असं त्या ललनेला मी सांगितलं.
माझ्या भाच्याने पायनापल खाणार म्हणून आधीच सांगितलं. मी त्याची चव अर्थातच घेतलीच.
खरं तर पाय निघत नव्हता पण आधीच त्याने यायला उशीर केल्यामुळे लगेच न निघाल्यास विमान चुकायची दाट शक्यता होती. म्हणून मुलांसाठी चॉकोलेट रोल्स घेऊन पटकन निघालो.
तुमचं जर या भागात (माझ्यासारखंच चुकून का होईना) जाणं झालं तर हे दुकान अजीबात विसरू नका. खरं तर निव्वळ या दुकानासाठी पुढच्या एखाद्या ट्रिपसाठी व्हाया डेट्रॉइट जावं का असा विचारही मी करतेय.
एंजॉय :)
तळटीप: ही पोस्ट खरं तर कधीपासून लिहायची होती पण फ़ोटो धुवायला टाकायचा मुहुर्त शोधता शोधता आज आणखी एका चांगल्या योगायोगाचं निमित्त.आज ब्लॉगने एक लाख वाचकसंख्या ओलांडली.जेव्हा हा ब्लॉग सुरू केला तेव्हापासून आपण काय लिहिणार किंवा लिहिणार तरी का याचाही नीट अंदाज नव्हता आणि त्यापुढे जाऊन इतक्या वेळा तो वाचला जाईल वगैरे गोष्टी तर मनातही आणल्या नव्हत्या. त्यामुळे या निमित्ताने मी जास्त नियमीत न लिहिताही माझ्या जुन्या पोस्ट वाचून आणि नव्याला प्रोत्साहन देऊन या यशात सामील झाल्याबद्दल सर्वच वाचकांने मन:पूर्वक आभार. केक/पेस्ट्रीज आवडल्या असतील अशी आशा :)
Labels:
दीडीखा,
देशोदेशी,
शटिला,
हलकंफ़ुलकं
Thursday, September 6, 2012
४५ - ३५ - २५
तीन आकडे पाहिले की कोणाचं काय आणि कोणाचं काय सुरू होतं. तसं म्हटलं तर आमचा हेतू चांगला स्पष्ट, चांगला इ.इ. होता पण नेमका या तीन आकड्यांनी आणि मुख्य त्यांच्या क्रमाने केलेल्या घोळाने आम्ही नशीबाने हे आकडा प्रकरण महागात पडता पडता वाचलो.
त्याचं झालं असं, म्हणजे घरातलं दूध जवळजवळ संपतंय आणि घरात दोन मुलं आहेत तर वेळकाळ न पाहता दूध आणायला जायचं होतं. आता हे एक वेळ समजलं आणि त्यात अनायासे गाडीची चक्कर होतेय तर मूलं झोपतील हा सुप्त हेतू होताच पण त्यातही सगळी काम करून संपली तरी दोन्ही मुलं जागी. अशावेळी आम्ही डोकं कुठे चालवावं?
तर आता इतक्या रात्री पार्किंग लॉटमधून गाडी काढता काढता नेमकं आइसक्रीम खायची इच्छा व्हावी याला अक्षरशः काही म्हणजे काही इलाजच नाही. बरं घरी बारा महिने कुठलं नं कुठलं आईस्क्रीम फ़्रीजमध्ये असतं, ज्या दुकानात दूध घेतलं तिथेच आईस्क्रीमही घेता आलं असतं. म्हणजे घरच्यापेक्षा काही वेगळा फ़्लेवर वगैरे...पण नाही? "खाईन तर तुपाशी"वाली लोकं असतात त्यांना रात्रीचे सव्वा दहा वाजले तरी फ़क्त आणि फ़क्त "डेअरी क्वीन"चंच आइस्र्किम आणि तेही फ़क्त आणि फ़क्त "हवायन ब्लिझर्डच" हवं असतं. मग काय माणसानेच निर्मिलेल्या स्मार्ट फ़ोनच्या अॅपने अशावेळी पंधरा मिनिटांनी दुकान बंद होतंयची वॉर्निंग दिली तरी आणि त्यात आम्हाला तिकडून साधारण सारख्याच अंतरावर असलेल्या दोन दुकानांपैकी कधीही न गेलेल्या दुकानाचीच आम्ही निवड करावी हे निव्वळ संकेत.बरं मला काय घरी जाऊन झोपायचं खेरीज काही काम नसणार होतं. निदान तिथे पोहोचेपर्यंत मुलं झोपतील म्हणजे जरा निवांतपणे जुने दिवस आठवत आइस्र्कीम खाता येईल असा एक साधा सरळ (आणि स्वार्थी) विचार करून मी पण नव्या जागी पंधरा मिन्टात पोचायचं आव्हान स्विकारायला काही कटकट केली नाही (हो म्हणजे इतरवेळी कटकट करणे हा समोरच्या पार्टीचा लग्नसिद्ध हक्क असतोच नाही का?)
रात्रीच्या पारी गावांमध्ये दिवाबत्तीची सोय कुणी करावी या भारतात कुठच्या तरी विषयात (इतिहास असणार बहुतेक) शिकलेलं "ग्रामपंचायत किंवा मुन्सिपाल्टीने" हे उत्तर उल्ट्या अमेरीकेत "कुणीच नाही" या धर्तीवरचे काळोखे रस्ते कापत गाडीवान आणि मिनिटांकडे पाहात मी घालमेल न दाखवता वेळ घालवत होते...म्हणजे एकीकडे जिपिएसची रिमेनिंग मिनिट्र्स आणि दुसरीकडे गाडीतलंच घड्याळ यांच्यात वजाबाकीचा खेळ खेळणारी मी आणि मनातल्या मनात नव्या जागचं दुकान शोधताना दहा एकतीस झाले की झालं सगळं मुसळ केरात अशा विचारात.
खाली पाहता पाहता अचानक वळणावर गाडी वळणं आणि वेग यांच्यात "अर्धगोल-अर्धगोल" आणि "जास्त-कमी-साट्कन कमी" असा खेळ खेळल्याचा भास झाल्याचं वाटून एका प्रचंड काळोख्या वळणावर आता हा ठोकणार असं वाटून ती वजाबाकी सोडून वर पाहिलं आणि एक कावळा, आपलं ते मामा, आपलं ते पोलिस बाजुच्या रस्त्याला जवळजवळ चिकटून आणि प्रचंड काळोखात असलेल्या स्ट्रिप मॉलमधून त्याच्या गाडीत चढताना दिसला. त्याला गाडी लागू नये इतक्या लिलया वळणावर गाडी चालवणार्या नवर्याचं "कसा दिसला रे तुला तो गाडीत चढताना" असं म्हणून कौतुक करणार तोच अंधारात आमच्या एकमेव चालणार्या गाडीवर मागून आलेल्या पांढर्या-निळ्या-लाल प्रकाशझोताने माझी ट्युब एकदम पेटली. कौतुकाची जागा लगेच थोडा त्रागा आणि काउन्सिलिंगने घेतली. "सांग त्याला. दोन मूलं आहेत मागे. ती त्रास देत होती." मजा म्हणजे मोठा अजून जागाच होता फ़क्त लहान्याचा निद्रादेवीने ताबा घेतला होता. तेवढ्यातल्या तेवढ्यात मी "आरुष पाहिलंस? तू लवकर झोपत नाहीस म्हणून आला बघ पोलिस" हेही म्हणून घेतलं.
आमच्यामागे दिवे आणि गाडीत आधी मागून मग पुढपर्यंत टॉर्च मारत मामासाहेब अवतरले.बाकी काही विचारायच्या आधीच त्याने पंचवीसच्या स्पीड लिमिटला तुम्ही पस्तीसवर होता हे पाहिलंत का म्हणून आमची हवा काढून टाकली. आता कागदपत्रांचा पण थोडा झोल होता म्हणजे आमचं कार इंशुरन्सचं लेटेस्ट कागद आम्ही इंश्युरन्सच्या साइटवरुन प्रिंट करून ठेवलं नव्हतं. अंधारात चमकणार्या गोर्या मामासाहेबाने आधीच "मी हे सगळं रेकॉर्ड करतोय सांगून" माझ्या जागं असणार्या मुलाला झोपवायचं काम पण करून ठेवलं होतं.
मग आधी गाडीचे कागदपत्र, लायसन्स क्रमांक हे जवळच्या वॉकी टॉकीवरुन त्याच्या गाडीतल्या सहकार्याला सांगून आमच्या आइस्क्रिमच्या बिलाची तयारी सुरू केली असं मी मनातल्या मनात विचार करत होते आणि कधी नव्हे ते नवर्याने त्याच्याकडे थोडी बाजू मांडायचा प्रयत्न केला. त्याने गाडी चालवताना पाहिलं होतं की त्या रस्त्यावर बराच वेळ असलेलं ४५ चं लिमिट ३५ आणि २५ असं पटापट उतरत होतं आणि नवा रस्ता असल्याने ते झटक्यात पंचवीसवर आणायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न फ़सला होता. हे तसं पटण्यासारखं होतं आणि बालबच्चेवाले म्हणून असेल नशीबाने त्याने विचारलं इथे इतक्या रात्री काय करताय त्यावेळी आम्ही डेअरी क्विनचा दाखला दिला आणि वर ते आता बंद झालं हेही सांगितलं.
आइस्क्रीमचं नाव ऐकुन बहुदा त्याचं डोकं थंड झाल्याने आमचं लॉजिक पटलं असावं पण कर्तव्य म्हणून आम्हाला वॉर्निंग देऊन सोडलं. आणि ती वॉर्निंग अशी होती की रस्त्याचं लिमिट जरी झटाझट खाली येतंय तरी तुम्ही मुळातच नव्या रस्त्यावर गाडी चालवत असाल तर वेगाला सांभाळून चालवा. आता आइस्क्रीम पण नाही तर या विषयावर आणखी काही बोलून नवी फ़ोडणी पडण्यापेक्षा आम्ही आपलं "व्हय महाराजा" म्हटलं आणि दुकानाचं अपेक्षीत बंद दार उगा आमच्यासाठी उघडतंय का?चा क्षीण प्रयत्न करून घरी आलो.
परत जाताना मी व्यवस्थित पाहिलं २५ - ३५ - ४५ हे उलट्या दिशेचे वेगाचे बोर्ड आणि अर्थातचं दिवाबत्तीची सोय नसलेला वळणांचा रस्ता. गाडीमध्ये होती एक प्रवासाने आणि एक आपल्याला झोपत नाही म्हणून पोलिस पाहायला आला या विचाराने झोपलेलं, अशी माझी दोन छोटी बाळं त्यानंतर अर्थातच आताच वॉर्निंगने सुधारलेला अगदी पोटातलं पाणी न हलता वळण घेणारा सारथी आणि वजाबाकीचा खेळ संपूनही हातात आइस्र्किमचं ब्लिझर्ड न आल्याने काय करावं हे लक्षात न आल्याने ते आकडे पाहून झाल्या प्रसंगाची उजळणी करत खिदळणारी मी.
Labels:
इतर,
इनोदी,
उगीच,
गमतीजमती,
हलकंफ़ुलकं
Friday, August 24, 2012
खिडकीपासची चिमुरडी "तोत्तोचान"
पहिलीत शिकणारी एक छोटीशी जपानी मुलगी. तिच्या वयाला साजेशी खोडकर बरं का? शाळेच्या वर्गात तास सुरू असताना तिला मध्येच खिडकीतून दिसणारे बॅंडवाले आणि त्यांना हाक मारायची तिची सवय किंवा मध्येच चिमण्यांना "तुम्ही काय करता?" असं विचारणं. परिणाम शाळेतून काढून टाकलं जाणं. कसं होणार आता असा विचार करता करता आपण तिच्याबरोबर पोहोचतो तिच्या नव्या शाळेत. हिची नवीन शाळा म्हणजे "तोमोई" कशी असेल आणि तिथे ही मुलगी नव्याने आपलं शालेय जीवन सुरू करताना आलेले अनुभव कसे असतील या पार्श्वभूमीवर जपानची एक आगळीवेगळी शाळा एक वेगळं विश्व घेऊन आपल्यासमोर येते. मूळ जपानी लेखिका "तेत्सुको कुरोयानागी" ही ती वर उल्लेखलेली पहिलीतली मुलगी "तोत्तोचान" आणि या सुंदर पुस्तकाचा तितकाच ओघवता अनुवाद आपल्यासाठी केलाय "चेतना सरदेशमुख गोसावी" यांनी. नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाने केवळ पन्नास रूपयात उपलब्ध करुन दिलेलं हे पुस्तक मूळ लेखिकेने म्हटल्याप्रमाणे अगदी ५ वर्षांच्या मूलांपासून ते १०३ वर्षांच्या लोकांपर्यंत अगदी सर्वांसाठीच आहे.
पाच वर्षांच्या आपल्या चिमुरडीला नव्या शाळेत नेताना तिच्या आईबरोबर झालेल्या मजेदार संवादांनी हे पुस्तक सुरू होतं. बरं नव्या शाळेचं प्रयोजन अशासाठी की आधीच्या शाळेतून हिला काढून टाकलंय. त्यामुळे आईच्या जीवाची आपल्या मुलीचं कसं होणार याची घालमेल तर लेक मात्र काल गुप्तहेर व्हायचं ठरवलं होतं आणि आज मात्र तिकिट कलेक्टर व्हावं का या गहन विचारात. मध्येच तिच्या सुपीक डोक्यात तिच्या कल्पनेतली तिकिट विकणारी जी खरी गुप्तहेर असेल असं काहीसं झालं तरची कल्पना आणि शाळा यायच्या आधीपर्यंत हे सगळं डोक्यातून जाऊन त्याची जागा "रस्त्यावरून जाहिरात करत जाणारे बॅंडवाले" यांनी घेतलेली असते. हेच ते आधी उल्लेख केलेले बॅंडवाले. या बॅंडवाल्यामुळे खरं तर आईला तिचं आधीच्या शाळेतलं खिडकीतून बॅंडवाल्यांशी बोलणं न आठवलं तर नवलच. त्या शाळेतून काढलेल्या असंख्य कारणांपैकी हेही एकच. आपण तिच्या आईच्या घालमेलीत अडकलो असतानाच तिच्यासारखंच बाकीची छोटी मुलं कसंकसं डोकं चालवत असतील असा विचार करत खुदकन हसतो. वाचता वाचता हळूहळू आपणच तोत्तोचानच्या वयाचे होतो. म्हणजे काय हरकत आहे नं चित्र काढता काढता झेंडा काढायला जागा पुरली नाही कागदावरून डेस्कवरची जागा व्यापली तर किंवा तास सुरू असताना मध्येच चिमण्यांना "तुम्ही काय करता आहात?" म्हणून विचारणं. अगदी प्रत्यक्षात नसेल पण आपण पहिलीच्या वर्गात असताना हे असं सगळं भरकटायचं कदाचीत आपल्याही बाबतीत झालं असेल.
फ़क्त आपण एका टिपिकल शालेय जीवनाचा भाग होऊन राहिल्याने असं स्वच्छंदी मन नंतर कुठेतरी हरवून आपणही "क ला काना का" गिरवीत जे इतरांनी वर्षानुवर्षे शाळेत जाऊन केलं तेच करून नंतर मग तीच ती दहावी आणि पुढचं शिक्षण, नोकरी या चाकोरीत अडकलो असू. तोत्तोचानचं नशीब इतकं की तिला अशा शाळेतून काढून टाकण्यात आलं आणि त्याहीपुढे जाऊन म्हणायचं तर तिच्या देशात अशी एक शाळा होती जिथं पाठ्यपुस्तकमुक्त अभ्यासक्रम ठेऊन मुलांना मुक्त पद्धतीने आणि त्यांचं भावविश्व खुलेल असं वातावरण होतं.
दोन झाडांच्या खांबांचं गेट आणि आगगाडीच्या डब्ब्यांचे वर्ग असणारी शाळा कुणाला आवडणार नाही? शिवाय बाकीच्या शाळांपेक्षा वेगळं म्हणजे इथे दिवसाचे तास विषयावार ठरलेले नसत. सकाळी बाई त्या दिवसात काय काय करायचं त्याची यादी करुन मग मुलंच आपलं आपलं काय करायचं ते ठरवत. त्यामुळे एकाच वेळी कुणी निबंध लिहित असे तर कुणी गणित सोडवी. यामुळे शिक्षकांना मुलांचं निरीक्षण करता यायचं आणि त्यांचा विचार करायची पद्धत अधिक जवळून समजून त्यांना मार्गदर्शन करणं सोपं व्हायचं. तर मुलांच्या बाबतीत त्यांना आवडत्या विषयाने सुरूवात करायला आवडे आणि नावडत्या विषयासाठी अख्खा दिवस असे. त्यामुळे कसंबसं का होईना सगळं पूर्ण व्हायचं. सगळा अभ्यास स्वतंत्र करायची सवयही लागे आणि हवं तिथे शिक्षकांची मदतही घेता येई. त्यामुळे विद्यार्थी नुसतंच बसून ऐकताहेत असं नसायचं.
शाळेच्या पहिल्याच दिवशी तोत्तोचानची ओळख यासुआकी यामामोतो नावाच्या एका मुलाशी झाली. त्याला पायाला आणि हाताला पोलिओ झाला होता. तोत्तोचानसाठी हे नवीन होतं. पण पहिल्याच दिवशी झालेला हा मित्र नंतर तिच्या मदतीमुळे आयुष्यात पहिलं आणि शेवटचं झाडावर चढतो तो प्रसंग पुस्तकात वाचताना आपण नकळत त्या दोन छोट्या मित्रांसाठी हळवं करतो. हाच यासुकीचान जातो तेव्हाचा तोत्तोचानचा भाबडेपणा आपल्याही गालावर अश्रू ओघळतो.
शाळा म्हटली की आपल्या मनात अभ्यासाव्यतिरिक्त आणखी येतं ते म्हणजे शाळेत एकत्र खाल्ला जाणारा डब्बा. तोमोईचा नियम होता की रोज काहीतरी डोंगरावरचं आणि काहीतरी समुद्रातलं आणायचं. म्हणजे आपल्या साध्या भाषेत सांगायचं तर धान्य किंवा भाज्या आणि प्रथिनं. किती सोप्या शब्दात हे कोबायशींनी मुलांना शिकवलं. शिवाय ते स्वतः आपल्या पत्नीबरोबर मुलानी काय आणलंय हे पाहायचे. त्यात एखाद्या मुलाकडे यातला एखादा प्रकार नसेल तर त्यांची पत्नी ती भर घालत असे. त्या कोबायशींबरोबर एक माशांच्या सुरळ्यांचं आणि एक बटाटाच्या कापांचं ताट घेऊन फ़िरत. त्याचप्रमाणे प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खायचं एक गाणंही त्यांनी बनवलं होतं. जे रोज गाऊन मग जपानीत कृतज्ञता व्यक्त करून हसतखेळत जेवणं व्हायची.
अशा या आगळ्यावेगळ्या शाळेतले तोत्तोचानचे अनुभव वाचणं आपल्याला तिच्या बालपणात घेऊन जातो. एकदा तोत्तोचानचा बटवा संडासात पडतो त्यावेळी तिला शांतपणे तो काढायची परवानगी द्यायचा प्रसंग असो किंवा तिला वीस पैसे देऊन एका भोंदूबाबाकडून आणलेल्या सालीचा प्रसंग असो, या शाळेने तिच्यासारख्या एका द्वाड ठरवलेल्या मुलीला तिचं मन सांभाळून घेऊन तिच्यावर केले जाणारे संस्कार आपसूक नजरेत भरतात. एका प्रसंगात मोठं झाल्यावर याच शाळेत शिकवायचं वचनही ती कोबायशींना देते.
छोट्या छोट्या गोष्टीतून या शाळेचे मुख्याध्यापक कोबायशी यांनी लहान मुलांशी कशी नाळ जोडली आहे याचा पदोपदी प्रत्यय येतो. लहान मुलांचं भाबडं जग तसंच ठेऊन त्यांना छोट्या छोट्या शिकवणूकी द्यायची पद्धत मुलांना कडक शिक्षा करणार्या इतर पद्धतींपेक्षा ती खूप वेगळी आहे हेही लक्षात येतं. उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्या मुलांना एकत्र पोहायच्या तलावावर कपड्यांचं बंधन न ठेवता पोहायचं स्वातंत्र्य देताना त्यांना एकमेकांच्या शरीरांकडे निकोपपणे पाहायचा दृष्टीकोन देणं हे फ़ारच कौतुकास्पद आहे. जसं यामुळे मुलामुलींच्या शरीरात काही विकृत कुतूहल असायचं टळू शकतं तसंच या शाळेत काही व्यंग असणारी मुलंही होती. त्यांना आपल्या शरीराची लाज वाटून न्यूनगंडही निर्माण होणार नाही हा भाव होता. आजकालच्या काळात एकंदरीत स्त्रियांवरील शारीरिक अत्याचाराच्या बातम्या वाचतो तेव्हा अशा व्यक्तींना जर अशा प्रकारचे संस्कार त्यांच्या लहानपणी झाले असते तर या गोष्टी टळू शकल्या असत्या का असं उगाच मनात येतं.
यातले अनुभव मुख्यतः तोत्तोचानचे असले तरीही तिच्यावरची कोबायशींची छाप आपल्याला दिसते. उन्हाळी सुट्टीमध्ये शाळेतल्याच सभागृहात तंबू उभारून सर्वांनी एकत्र केलेल्या गप्पांबद्दल वाचताना मुलांबरोबर मिसळायचं त्यांचं वेगळं तंत्र आपल्या नजरेत भरतं. संगीत कवायत अर्थात "युरिथमिक्स"चा शाळेच्या अभ्यासक्रमात समावेश करून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासास मदत करायची त्यांची कल्पनाही खूप मस्त आहे. क्रीडादिन साजरा करतानाचे त्यांचे काही खेळ म्हणजे "आईला शोधा", "माशांची शर्यत" खेळायला कोणाला मजा येणार नाही? आणि मग बक्षिस म्हणून भाज्या नेताना मूलं कंटाळली तर "तुम्ही स्वतःच्या कष्टाने या भाज्या मिळवल्यात आणि तुमच्याबरोबर घरच्यांसाठीसुद्धा जेवण मिळवलंय" असं सांगणारे कोबायशी आपल्यालाही मुख्याध्यापक म्हणून लाभले असते तर? असं मनात नक्कीच येतं.
खरं तर या छोटेखानी पुस्तकातला प्रत्येक प्रसंग तुम्हाआम्हाला काही ना काही शिकवून जातो. लिहायचंच झालं तर त्यातल्या प्रत्येक प्रसंगाला साधारण समान स्थान द्यायला हवं. पहिली ते तिसरी या शालेय वर्षांत या मुलीने एवढ्या छोट्या वयात किती आगळेवेगळे अनुभव घेतलेत याचा हे पुस्तक वाचताना पदोपदी प्रत्यय येतो. तिचा रॉकी कुत्राही या पुस्तकातले एक महत्वाचे पात्र आहे.
चांगल्या गोष्टी आपल्याबरोबर दुर्दैवी शेवटाचा शाप घेऊन येतात का असं मला बरेचदा वाटतं. तो शेवट लिहून मला हे लिखाण उदासवाणं करायचं नाहीये. हे पुस्तक जेव्हा वाचलं जाईल तेव्हा ओघाने ते कळेलच.
तूर्तास आपण सगळीजण हे लक्षात ठेऊया की जगाच्या पाठीवर लहान मुलांना त्यांच्या भावविश्वात रममाण करून त्यांना बाहेरच्या जगासाठी तयार करणारी एक शाळा होती. या शाळेचं नाव होतं "तोमोई" आणि तिथले मुख्याध्यापक होते "कोबायशी". हेच ते मुख्याध्यापक ज्यांनी तोत्तोचानच्या पहिल्या दिवशी "हं तुला तुझ्याबद्दल मला हवं ते सांग" असं म्हणून सकाळचे आठ ते दुपारची जेवणाची वेळ होईस्तो म्हणजे तब्बल चार तास तिची बडबड ऐकून मग "आजपासून तू या शाळेची विद्यार्थिनी झालीस हं" असं म्हटलं होतं. त्यांच्या या प्रसंगात ही शाळा निव्वळ तोत्तोचानचीच नाही तर वाचकांसाठीही त्यांचीच शाळा होते. अशी एक शाळा जिथे शिकायला मलातरी नक्कीच आवडलं असतं.
Tuesday, August 21, 2012
पाऊस
उन्हाची काहिली वाढून तो अवेळी येतो...वळीव म्हणतात त्याला....त्यावेळी येणार्या मृदगंधाने जीव वेडावतो...पण तो लगेच येत नाही...सजणीला भेटायला येणार्या साजणाने तिला झुरवावे तसा तो धरित्रीला झुरवतो....त्यानंतर उष्मा आणखी वाढतो..त्याच्या आठवणीने जमीन आणखी कोरडी पडते....त्याची वाट पाहात राहते...आणि मग नगारे वाजवत तो येतो आणि त्याच्या आगमनाची ग्वाही हिरवा शालू लेवून तीही सजते....
वळीव आणि नंतर मग आलेला हा पाऊस नेहमीचा झाला की आपणही सुखावतो....त्याच्याबरोबर भटकायला बाहेर पडतो....मान्सुनमधला पाऊस हा असाच असतो नाही???....हवाहवासा? त्याच्याबरोबर दूर हरवून जावं असाच..
मग तो कधीतरी दूरदेशी अचानक कुठेही भेटतो. त्याच्या आगमनाला इथे ऋतुचा संकेत नसतो. स्प्रिंग येणार म्हणून पाऊस, समर जास्त होतोय म्हणून पाऊस, रंगवलेल्या झाडांची नक्षी उतरवायला फ़ॉलमध्ये येणारा पाऊस आणि तापमान शून्याच्या खाली नाहीये म्हणून बर्फ़ाऐवजी येणारा विंटरमधलाही पाऊसच...त्याला खरं तर पाऊसही म्हणवत नाही...त्याची बोळवण, "आजचा दिवस धुपलाय" किंवा "फ़ारच रेनी आहे" अशी होते...तेव्हाही तो आवडत नाहीच असं नाही. पण त्याचा त्रास मात्र जास्त जाणवतो...कदाचित देशातल्या मान्सुनची सवय आणि काय?
एखादा संपूर्ण आठवडा पावसाळी असणार हे बातम्यांमध्ये वाचून माहित झालेलं असतं......तरी सोमवारच्या सकाळपासून मळभ पाहून फ़ार विचित्र व्हायला होतं...त्याची दिवसभरची पिरपिर अस्वस्थ करते...अशावेळी माझी जुनी दुखणी "पाठ" नावाच्या अवयवाची सेकंदा सेकंदाला जाणीव करून देतं...पण ही अस्वस्थता या दुखण्याची नाहीये असं सारखं वाटतं...मन संध्याकाळच्या मुलांबरोबरच्या रूटिनमध्ये गुंतायला पाहातं आणि एका वाईट बातमीची मेल येते....
ती बातमी मनात सलत असताना मी माझी मुलांसोबतची नित्यकर्म आवरते आणि दमून बसणार तोच बाहेरचा दिवसभर रिपरिप पडणारा पाऊस थैमान घालायला लागतो..खरं तर इथे त्याचं जोरदार कोसळणं असं नित्याचं नाही..इथला आणि विशेषत: या मोसमातला त्याचा नेहमीचा बाज शांतपणे बरसण्याचा..पण आज जसं मनात विचारांनी कल्लोळ करायला सुरूवात केली तसाच पावसाचा आवाज वाढत जातो...त्याने मनातला गोंधळ शांत होईल का? माहित नाही..
दुसर्या दिवशी दुपारपर्यंत खरं तर पाऊस थांबून लख्ख सूर्यप्रकाश येतो...पण मनात मात्र कालचा ढगाळ दिवस तसाच असतो.....
अपर्णा,
५ जून २०१२
Sunday, August 5, 2012
मैत्रीच्या धूसर सीमारेषा
कुठल्या तरी सुट्टीत "मैने प्यार किया" पाहिला होता..वरळीच्या सत्यम, शिवम, सुंदरमला..हे इतकं आठवतंय कारण ती सुट्टी बरेच दिवस परळला राहिले होते आणि मुंबई अंगात भिनली होती..त्यानंतर मग बारावीचं वर्ष चर्नीरोड त्यामुळे ती आणखीच भिनली...राणीच्या नेकलेसला रोज रात्री पाहायची सवय खरं तर चांगली (आणि परवडणारी) नाही...आता जेव्हा जगातल्या आणखी फ़ेमस शहरांना भेटी दिल्या जातात तेव्हाही आठवते ती मुंबईच....अरेच्च्या कुठे हरवले मी?? असं होतं हे मुंबईची आठवण आली की.....:)
हा तर तो "एमपीके", त्यातलं एक वाक्य चांगलं लक्षात आहे कारण मी त्याच्याशी कधीच सहमत नसते..मला वाटतं त्या सिनेमात बहुतेक सलमानचे पिक्चरमधले बाबा (चुभुद्याघ्या) म्हणतात "एक लडका और एक लडकी कभी दोस्त नहीं हो सकते". मला माहित नाही का ते पण मला ते अतिरेक टोकाचं विधान वाटलं होतं...
म्हणजे खरं तर तोवर माझे मित्र म्हणजे माझी मावसभावंडंच होती आणि कॉलेजमध्ये पण अकरावी बारावीला दोस्ती होण्याइतपत मुलांशी संबंध आलाही नाही.पण त्यानंतर मात्र व्यावसायिक शिक्षणक्रमाच्या निमित्ताने डिप्लोमा आणि डिग्रीला मैत्रीणी मिळाल्या तसेच मित्रही मिळाले...अगदी जीवाभावाचे.....त्यांच्याशी ओळख करून घेतानाही कधी काही दुसरे विचार मनात आले नाही...याचा अर्थ मुलं आवडलीच नाहीत असा नाही पण जसं मित्र हा एक वर्ग असतो तसा क्रश हा एक वेगळा वर्ग असतो...नोकरी करतानाही टीममधल्या एखाद्या मुलाबरोबर मैत्री व्हायचे प्रसंगही येतात...या सगळ्या मैत्रींना त्या वर उल्लेखलेल्या वाक्यात टाकलं तर मग काही खरं नाही न?
मैत्री ही कुठल्याही वयात आपल्या आयुष्यात येऊ शकते आणि ती येतानाच तिचं भविष्य घेऊन येते..काही ओळखी होता होता राहतात..म्हणजे आपल्याला ती व्यक्ती आवडत नसते असं नसतं पण ती ओळख मर्यादित स्वरूपात राहणार असेल तर ती तशीच राहते आणि धूसरही होऊन जाते...याउलट एखादी ओळख मग तो मित्र असो वा मैत्रीण जेव्हा पहिल्या भेटीदरम्यान न संपता येणार्या गप्पांनी सुरू होते ती काळाच्या ओघात नक्की टिकणार याची खात्री असते...अशा मैत्रीला वय/लिंगाच्या मर्यादा नसतात...
मला जितकं सहज एखाद्या माझ्या वयाच्या व्यक्तीशी बोलता येतं, त्याच सहजतेने मी माझ्यापेक्षा दशकाने लहान असलेल्या व्यक्तीशीही सूर जुळवू शकते....माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तीला मात्र तसे संस्कार घेऊन आपण लहानपणापासून वाढतो म्हणून मान हा दिलाच जातो. पण एकदा सुरुवातीचे ते एकमेकांचा अंदाज घ्यायचे दिवस संपले की मग मात्र अशा मैत्रीचाही निखळ आनंद उपभोगता येतो...
वेगवेगळ्या वयांशी मैत्री असल्याचा फ़ायदा हा की आपल्याला आपल्यापेक्षा मोठ्या मित्र-मैत्रीणींच्या अनुभवाचा सल्ला उपयोगी पडू शकतो, त्यांच्याकडून आपण काही चांगल्या गोष्टी शिकू शकतो तर आपल्यापेक्षा वयाने लहान असणारे मित्र-मैत्रीणी आपलं लहानपण टिकवून ठेवतात.
माझ्या भाच्यांना कदाचित म्हणूनच मी नावाने हाक मारायला शिकवलं..आमच्यातल्या मैत्रीमुळे मला अजून माझ्या भाचीबरोबर भातुकली खेळताना लहान होता येतं..माझ्या मुलांबरोबर तर मला उशांनी भांडताही येतं...
तसंच काहीसं मित्रांचं...म्हणजे मी मुलगी आहे त्यामुळे मित्रांशी बोलतानाची एक विशिष्ट मर्यादा आपसूक राखली जाते किंवा अगदी खरं सांगायचं तर ती मित्राकडूनही राखली जाते..कुणी कुणाशी किती मोकळं व्हावं याचे काही अलिखित नियम असतात आणि ते अशा ठिकाणी आपसूक पाळले जातात. फ़क्त तरीही समाजात अशा मैत्रीकडे निकोप दृष्टीने पाहिलं जात नाही...एखादा मुलगा आणि मुलगी एकत्र (आणि तेही जास्त वेळा एकत्र) दिसले, त्यातही ते एकत्र बाहेर खायला, फ़िरायला जाताना दिसले की यांचं जुळलंय अशाच भावनेने सर्वसाधारणपणे पाहिलं जातं.
प्रत्यक्षात ते तसं असायलाच हवं असं नाही. मग कधीतरी त्यापैकी कुणाला तसं सरळ विचारलंही जातं. एखादा बेधडक असेल तर तो अशा प्रश्नांना उडवून लावील पण एखादी साधी अशावेळी अति कॉशस होऊन आपली मैत्रीही कमी करायला सुरुवात करील..आणि मग समाज म्हणून मैत्रीवर संशय घेणारी व्यक्ती कदाचित त्यावेळी नक्कीच खजील होईल..
हे सगळं अशा प्रकारे घडण्यापेक्षा मैत्री दिनाच्या निमित्ताने आपणही निकोप मैत्री जोपासायला शिकुया...."तुमची फ़क्त मैत्री आहे नं? मग तुम्ही कशाला समाजाला घाबरता?" असं बोलणं खूप सोपं आहे पण एक स्त्री म्हणून याकडे पाहताना यातलेही धोके मला जाणवताहेत...आणि केवळ तेवढ्यासाठी अनेक द्राविडी प्राणायाम करून मैत्रीच्या धूसर सीमारेषांची जाणीव करून देण्याच्या समेवर आणण्याचा प्रयत्न करणारी ही एक छोटी पोस्ट...
मैत्रीदिनाच्या खूप खूप शुभेच्छा... :)
Labels:
अनुदिनी,
मैत्री,
स्वैर....,
हलकंफ़ुलकं
Wednesday, August 1, 2012
वातावरण...फ़ोडणीतला एक आवश्यक घटक....
मी मुंबईत नोकरी करत असताना कॉन्फ़रन्स कॉलवर माझा अमेरीकेतला क्लायन्ट नेहमी विचारायचा..."हौज द वेदर?"...त्याच्या एका प्रश्नापुढे माझ्या मनात तीन चार प्रश्नचिन्ह ...????...काय वेदर?? "कालच्या पेक्षा आज थोडं कमी गरम होतंय का हे (जास्त कामाने) गरम झालेल्या डोक्याला विचारते", असं म्हणू की "नाही रे..रोज रोज पांढरे कपडे काय घालायचे? उगाच कशाला "चांदनी ओ मेरी चांदनी" वाल्यांशी स्पर्धा? म्हणून आज थोडा लाइट क्रिम निवडलाय उन्हाशी मुकाबला करायला" असं सांगायचं? होता होता एक मुहुर्त काढून तोच आमच्या ऑफ़िसमध्ये येऊन गेला आणि मग पुन्हा कधीच त्याने मला हौज वेदर बिदर काही विचारलं नाही....म्हणजे हा विषय इतक्या सहजतेने संपेल असं मला निदान तेव्हातरी वाटलं होतं...पण नाही...
त्यानंतर अस्मादिकांचे चरणकमल पार उत्तर अमेरिकेच्या पश्चिमाध्य़ (हे मिडवेस्टचं माझं अतिप्रचंड मराठीकरण) भागात शिकागो नामे शहरी लागले आणि मे महिन्यातच मिशिगन लेकवरून येणार्या वार्यांनी डोक्यापासून पायापर्यंत एक शिरशिरी गेली...(बहुदा) तिथुनच सुरू झालं हे....उठसूठ वातावरण वातावरण या विषयावर बोलणं...
आईला पहिले फ़ोन केला तेव्हा खरं तर तिला काही हे माहित नव्हतं..तिने आपलं एक मोघम "कशी आहे अमेरीका?" असं काहीसं विचारलं आणि मी निदान पंधरा मिनिटं तरी इथलं (म्हणजे शिकागोमधलं) वातावरण या विषयावर तिचं डोकं पिकवलं.....त्यानंतर ती माझ्याकडे काही वर्षांनी माझ्याकडे आली तेव्हा तिच्या डोक्यावरचे केस इतके का पिकले(म्हणजे मी पिकवले...आतापर्यंत लोकं धान्य पिकवतात असं काहीसं माहीत होतं पण आमच्यात केस पण पिकवतात बरं?) हे खरं तर माझ्या ध्यानात यायला हवं होतं नाही ...शिवाय परत जाताना पिकलेल्या केसांची संख्याही वाढली असणार....असो...
तर सांगायचं काय सुपातले जात्यात आलो आणि मग जात्यातल्यांनी जे केलं तेच मीही गेली कित्येक वर्षे मीही करतेय..
म्हणजे इतकी वर्षे मी म्हणायचे हे पाश्चात्य रोज रोज फ़क्त वेदर या एकाच विषयावर किती बोलतात नाही....म्हणजे क्लायन्ट वेगळा असला, तिथे कुणी नवीन टिम मेंबर आला की पहिले एक वेदर पुराण सांगितल्याशिवाय गाडी काही मूळ विषयाकडे येत नाही...नाही म्हणजे "टीम बिल्डींग" वगैरे ठीक आहे पण तरी मुंबईत राहून ते ऐकताना नेहमीच आश्चर्य वाटे की काय आहे काय बाबा हे वेदर प्रकरण.....म्हणजे आपल्या मराठीत वातावरण.....वरण या शब्दात फ़ोडणीचा भास आहे का माहीत नाही (कदाचित इतक्यात फ़ोडणीच्या वरणाची चटक लागलेला माझा लहान मुलगा कदाचीत या प्रश्नाचं उत्तर चांगलं देऊ शकेल पण असो आतापासून त्याला या वरणात नको...तो तिथे वरण-भातातल्या वरणातच बरा आहे) हां तर वरण या शब्दात फ़ोडणीचा भास आहे का माहित नाही, पण वातावरणाच्या गप्पा इतक्या चटकदार असू शकतात हे मला अमेरीकेतल्या काही महिन्यांतच कळलं...विशेष करून उन्हाळ्यातले मिशिगनवरून येणारे वारे नंतर फ़ॉल आणि विंटरमध्ये आपले आणखी बोचरे रंग दाखवून गेले तेव्हा तर वातावरणाची फ़ोडणी आणखीच गहिरी (की थंड) झाली....
अशाच वातावरणरूपी फ़ोडणी दिलेले काही मोजके अनुभव सांगायचे तर एक पोस्ट अपुरीच पडेल पण आता हा विषय आलाच आहे (म्हणजे तो येतोच...त्याला काही पर्याय नाही) तर मग थोडी फ़ोडणी आपणही दिली तर हाय काय आणि नाय काय??
हां तर ते शिकागो, तिथे तर अर्थातच वेदरमध्ये "विंडी इफ़ेक्ट" ह्म्म..तेच ते मिशिगन लेकची हवा-बिवा अशी फ़ोडणीतल्या जिर्यासारखी नेहमीच घुसते आणि मग आजचं तपमान पेक्षा "आजचं फ़िल्स लाइक"ला जास्त महत्व प्राप्त होतं...म्हणजे थोडं हिंगासारखं....टाकलंय का हे नक्की कळत नाही पण नाहीच टाकलं तर त्याचा इफ़ेक्ट नंतर कळेलच तसं काहीसं....हा प्रसंग कदाचीत अतिरेक वाटू शकेल पण एका अशाच बाहेर टक्क ऊन असणार्या दिवशी वेदर-बिदर न बघता मी पार्किंग लॉट ते एका हॉटेलची लॉबी हे अंतर हातमोजे न घालता पटकन जाऊया म्हणून गेले आणि हात अक्षरशः कडक होताहेत का असं वाटून लगेच लॉबीतल्या रिसेप्शनीस्टला सहज विचारलं कसं आहे वेदर आणि मग तिने ते फ़िल्स लाइक वगैरे फ़ोडणी देऊन जेव्हा मला "उणे वीस सेल्सियस"चा आकडा सांगितला तेव्हा मला तर आकडीच आली....अर्थात हे उणे मी लगेच कन्व्हर्ट केलंय अर्थात नाहीतर फ़ॅरनहीटमुळे आरामात ३२ म्हणजे खरं आपलं शून्य हा जागतिक गोंधळ आहेच. पण त्यानंतर पुन्हा कधीच थंडीत हातमोजे न घालायची चूक मी केली नाही.
मध्य भागात बर्याच फ़ोडण्या देऊन (की खाऊन) झाल्यावर आमचं इमान आम्ही जरा पूर्वेस आणलं म्हणजे हो तेच ते फ़िलीच्या आसपास...तिकडे आमचं आगमन झालं तेच एका प्रचंड स्नो स्टॉर्मच्या दिवशी...घ्या शिकागोच्या थंडीच्या जाचातून सुटणार वाटत असतानाच फ़ोर सिझन्स मध्ये अडकलो.. इथे म्हणजे चार ठळक ॠतू..जे तसे सगळीकडेच आहेत म्हणा. पण म्हणजे ते येणार, यायच्या आधी, आल्यावर, जाताना आणि मध्येच नीट न आल्यामुळे याला चारने गुणून जे काही उत्तर येईल तितक्यांदा आम्ही वेदरच्या फ़ोडण्या देणार...आल्या आल्या शिकागोहून आल्याबद्दल कामावर आमचं हबिनंदन झाल्यावर लगोलग इथल्या(ही) विंटरचं कौतुक करण्यात माझा कामावरचा पहिला दिवस गेला होता..त्यानंतर "वेट अनटिल समर" म्हणून मग मध्ये एप्रिलचा पाऊस झाल्यावर उगवलेल्या ट्युलिप्स, डॅफ़ोडिल्सने स्प्रिंग आणि अर्थात स्प्रिंग अॅलर्जी (हो तोवर शरीरानेही इथल्या वातावरणाची फ़ोडणी जरा अम्मळ मनावरच घेतली होती) अशाप्रकारे फ़ोडणीत धने, मेथीदाणे झालंच तर तमालपत्र आणि तत्सम खडा मसालाही आणायला सुरूवात केली.
समर म्हणजे तर हीट वेव्ह वगैरे आली की समरांगणच ते आणि तिकडे फ़्लोरिडातला हरिकेन सिझन आल्यामुळे इकडे येणारा वादळी पाऊस म्हणजे वातावरणाला फ़ोडणीच फ़ोडणी. हे असे तावून सुलाखून बाहेर पडलं की मग पानांवर रंगाची लाली आणणारा फ़ॉल...अहाहा! पण इथेही वातावरणाचं विशिष्ट गणित जुळलं नाही तर ते रंग नीट येत नाहीत किंवा लवकर गळून जातात इ.इ. बोलताना पुन्हा आहेच का आपलं ते वेदर...आणि मगची थंडी तर काय? तिथेच तर सगळे संवाद सुरू झाले होते नं? म्हणजे मागच्या वर्षी केले तरी पुन्हा करायचे नाहीत असं कुठे आहे? पुन्हा आहेच आपलं शेजारी, कामावर कुणी भेटला की पहिले हे पंधरा-वीस मिनिटं आजचं, कालचं, विकेंडचं आणि या सध्याच्या सिझनचं बोलणं (की बोलणंच बोलण). मूळ विषयाला बाजूला सारेल अशा मैफ़िली फ़क्त वेदर या विषयावरून होणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरजच नाही.
हे फ़ोर सिझनच्या फ़ोडण्यांनी पोट भरलं नव्हतं म्हणून आम्ही वेस्टाला आपलं ते नॉर्थ वेस्टालाही संधी दिलीच. इथे खूप पाऊस पडतो अशा फ़ोडणीने सुरू झालेला माझा प्रवास इथे चारही सिझन्स पण आहेत गं..फ़क्त प्रत्येक वर्षी ते थोडे वेगळे असतात....या आणि अशा वाक्याने ज्याच्या त्याच्याशी बोलताना फ़ोडणीत येतातच. नुसताच पाऊस असं असेल असं उगा सुरूवातीला वाटलं होतं. पण ते वर उल्लेखलेल्यातलं फ़क्त तमालपत्र म्हणजे आपलं ते चरचरीत ऊन सोडलं तर फ़ोडणीचे सगळे घटक कुठे न कुठे तरी लागताच.
ही फ़ोडणी कधी सकाळ थंड, रात्री अति थंड आणि दुपार निम थंड अशी मोहरी, जिरं, धने घेऊन येते तर कधी नुस्तंच मोहरी किंवा कधी त्यात थोडा खडा मसाला छोटं स्नो स्टॉर्म घेऊन हजर असतो. सध्या मला धन्याची प्रचंड गरज आहे(हे फ़ोडणीतलं उगाच श्लेष वगैरे नको हं) खरं तर तमालपत्रही चालेल पण यंदा ते आलंच तर एखादा विकेंडपुरता येईल असं चिन्ह दिसतंय....बरं हा सगळा संवाद ज्यांना कळलाय त्यांना मी कुठल्याही खादाडीवर बोलत नसून ही एक वेगळीच फ़ोडणी आहे याची कल्पना आलीच आहे..आणि वेदरबद्दल बोलायचं तर हे हवंच नं?
ओरेगावातली मी न्युयॉर्कमधल्या माझ्या एका क्लायन्टकडे जाते तेव्हा ओरेगावचा पाऊस या विषयावर मी पंधरा मिनिटं आणि न्युयॉर्कमधलं कधीही बदलणारं आणि हडसनमुळे अम्मळ थंड असणारं वातावरण याबद्दल तो कितीही मिनिटं आत्मीयतेने बोलत राहतो....बरं तो आणि मी निदान कामानिमित्ताने याआधी आणि नंतर बोलणार आहोतच पण त्याच्या दोन क्युब पलिकडे बसलेला जॉन नंतर मला लंच टाइममध्ये कॅफ़ेटेरियाच्या लाइनमध्ये भेटतो तेव्हा आधी आमची तोंडओळख असल्याच्या अधिकाराने पुन्हा एकदा यावर्षी (न पडलेली) थंडी आणि मी आमच्याकडे मार्चपर्यंत पडलेला बर्फ़ या विषयावर कॅफ़ेच्या लाइनमध्ये बोलत राहतो..हे आटपून मी परत माझ्या ओरेगावात आले की मी इथे नसल्याने ताण पडलेली पाळणाघरातली मंडळी "हौ वॉज द वेदर? डीड यु मिस द रेन?" म्हणून माझं तिकडचं आणि मी तिथे असताना इथलं असं अपडेट देत राहतो..पुन्हा हीच टकळी शेजारणीकडे, जमलंच तर त्याचवेळी कुणीही फ़ोन केला तर तिकडे आणि सगळीकडे वाजत राहते...
म्हणजे आताच पहा नं? मुंबईतला पाऊस सुरू झाला असेल असा विचार करून काही वेगळं लिहायला बसले होते तोच वातावरणाच्या फ़ोडणीचा विचार मनात आला...
विचार कसला मोठी फ़ोडणीच बसलीय या पोस्टरूपाने वाचकांना..नाही का??
Labels:
इतर,
गमतीजमती,
ललित,
वगैरा..वगैरा...,
वातावरण,
स्वैर....,
हलकंफ़ुलकं
Friday, July 20, 2012
छोटीसी आशा
माझ्यासाठी अमुल्य असणार्या पोस्ट वाचणार्या, त्यावर आवर्जून लिहिणार्या ब्लॉगवाचकांसाठी एक खूप छान बातमी आहे...तसं तर मागच्या एका अपरिहार्य पोस्टच्या तळटीपेत थोडा उल्लेख आला आहे पण या आठवड्यापासून ती नियमीत कामावर येऊ लागलीय अर्थात तिच्या आणखी काही हॉस्पिटल व्हिजिट्स असतील ते दिवस सोडून....
त्याआधी पाळणाघराच्या वार्षिक प्रेझेंटेशनच्या वेळी भेटून मी तिला माझ्या मागच्या पोस्टबद्दल आणि सगळ्या वाचकांनी तिच्यासाठी चिंतलेल्या शुभेच्छांबद्दल सांगितलं. "My Cancer is gone, however I have a few more radiation visits untill August" हे सांगताना तिचा उजळलेला चेहरा आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रार्थनांबद्दल ऐकताना तिच्या डोळ्यात तरळलेलं पाणी..
छोटीच गोष्ट पण तरी स्पष्ट सांगायचं तर टोशा परत आलीय..मुळात छोट्या चणीची आणि अजून सगळे केस परत आले नसल्यामुळे टोपीत छोटीसीच दिसणारी तिची मूर्ती डोळ्यातून "छोटीसी आशा" नक्की दाखवते. माझे केस परत येताहेत हे सांगताना खट्याळ असणारं तिचं सध्याचं हसू मला सुखावून जातं...
माझं दडपण माझ्याबरोबर तिच्यासाठी जगताना ज्या वाचकांनी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष लिहून/वाचून तिच्यासाठी प्रार्थना केली त्यांना ही एक सुखद बातमी देताना आभार प्रदर्शनाचं तिचंच एक पत्र....या ब्लॉगच्या सर्वच वाचकांसाठी.....तिला अर्थातच सर्वांच्याच ऋणात राहायचंय आणि मला तुम्हा सर्वांच्या....कदाचीत ती पोस्ट मी त्यादिवशी लिहिली नसती तर ते साचलेलं बाहेर न आल्यामुळे झालेला त्रास जास्त झाला असता...कुठेतरी ते व्यक्त होणं जरूरी तसंच आता सगळं ठीक होतंय तर हेही... नाही का?
Tuesday, July 10, 2012
गाणी आणि आठवणी १२ - किसको ऐसी बात, बात कहें
एक प्रसन्न सकाळ.....बरेच दिवसांनी थोडं उबदार वातावरण मिळतंय..सध्याच्या माझ्याकडच्या थंड स्प्रिंगपेक्षा हा इस्ट कोस्टमधला स्प्रिंग मला नेहमीच आवडतो....ना खूप गरम ना खूप थंड....मैत्रीणींशी भेटही जवळजवळ दोन अडीच वर्षांनी.....रात्री एका रेस्टॉरंटवाल्यांनी "चला आवरा आता" म्हणेपर्यंत खिदळत बसून मग परत तिच्या घरी आल्यावरही आणखी काही गप्पा मारून उशिरा झोपून बर्यापैकी वेळेत उठण्यात (किंवा उठवण्यात) आलेली सकाळ.....निवांत न्याहारी झाल्यावर आता मात्र काही कामाची कामं करूयात म्हणून सचैल स्नान करून दिवस सुरु करतेय.....
पण तरी पुन्हा या भागात फ़ेरी होईल किंवा नाही, म्हणून आम्ही पूर्वी इथे राहात असतानाचं आमचं देऊळ जवळपास आहे, तिथे एक नमस्कार करून जाऊया म्हणून बदलेला रस्ता....खरं तर काही अपवाद वगळता यावेळी रस्ते तसेच होते....बदललं होतं किंवा आणखी बदलत होतं ते देऊळ...अर्ध्या बांधकामातून मागच्या रस्त्याने आत जाऊन तिथल्या देवाला नमस्कार करून का कुणास ठाऊक मला तिथे फ़ार वेळ नाही बसवलं....पुजार्याने बहुदा चेहरा ओळखला असेल....त्याने सकाळी सकाळी मला प्रसादाचा दही-भात घेऊन जायला आठवण केली..त्याचं प्रसन्न हसू पाहून बरं वाटलं...
मग मात्र डोक्यात उरलेले रस्ते....कामं...आणखी काही भेटी......सरावाच्या ठिकाणी गाडीत तेल घालून...४९५, ९५ असं जायचं होतं....त्याचवेळी मी मला मागच्या वर्षी आईबरोबर खास मुंबईहून आलेली सिडी रॅंडम मोडला लावते...या प्रवासात भाड्याच्या गाडीने प्रवास करायचा असल्याने मी माझ्यापुरता ही आणि अजून एक अशा दोन सिडी घेऊन फ़िरतेय..
हा हायवे, इथला मर्ज आणि तिथलं माझं ब्लाइंड स्पॉट तपासणं सगळंच सरावाचं...पण आता नाही तर दोन अडीच वर्षांपुर्वीच्या सरावाचं....आणि मधल्या काळात फ़ारसं काही बदललं नसल्याने मी पुन्हा त्याच पुर्वीच्या सवयीने लेन चेंज करताना अचानक सिडीतला फ़ोल्डर बदलतो, नाट्यसंगीत हा विभाग खरं तर या सिडीत आहे, पण मी फ़ारसा न ऐकलेला त्यामुळे पुढे करू का असा विचार करत असतानाच तबल्याचे बोल आणि मनाचा ठाव घेणारी सरगम आणि कानावर पडतं.....सिडी बनवताना दिपूने गोंधळ घातलाय हे कळलंच. नाहीतर इतकी सुंदर बंदिश ऐकण्यासाठी मी गेले वर्षभर थांबून आणि तेही तीन हजार मैल दूर आल्यावर का बरं ऐकली गेली असावी??? असो.......
तर तबल्याचे बोल आणि मनाचा ठाव घेणारी सरगम कानावर पडते....
सा रे ग म ... ग म ग ग सा...........
किसको ऐसी बात, बात कहें
ही एकच ओळ सुरूवातीला ज्या प्रकारे आळवली आहे त्याने या बंदिशीत आणखी रस येतो.....काय म्हटलंय बरं पुढे असं म्हणत मी एका हायवेवरून दुसरीकडे सटासट मर्ज व्हायचा आनंदही घेतेय.....सकाळच्या टिपिकल इस्ट कोस्ट ट्रॅफ़िकमध्ये आपली गाडी पुढे दामटायचा एक आनंद आणि त्यात साथीला पं. सत्यशीलजींचा आवाज सांगतोय ते "बा....त......." तो तबला आणि सतार....यांची प्रचंड सांगड मनाला एक वेगळीच अनुभूती येताना पुढचं वाक्य सामोरं येतं...
करे मौज पिया संग जो अपने
उसपर करम परवर दिगार |
खरं तर शृंगाररसच म्हणायचा...पण तरी हे गायन ठाव घेतं.....मला तसंही कवितांचे गूढ अर्थ वगैरे नाही कळत आणि शास्त्रीयही टेक्निकली कळत नाही....पण तरी सूरांनी घेतलेला हा ठाव नेहमीपेक्षा वेगळाच....मग पुढचं...
मय भी हो, मीना भी हो
मौसम - ए - बरसात हो
उसका यारों क्या कहना
जिसका दिल बरसात (दिलबर साथ) हो |
योगायोगाची गोष्ट म्हणजे आदल्या रात्री इथे थोडा रिपरिप पाऊस होऊन गेला होता आणि त्यामुळे थोडीशी भिजलेली जमीन, सकाळच्या आंघोळीने प्रसन्न असलेलं शरीर, अजून थोडे ओले असणारे आणि गाडीच्या वेगाने लेन बदलताना मानेच्या होणार्या हालचालीने कपाळावर येणारे ओले केस मागे घेताना ’जिसका दिल बरसात हो" ची एक वेगळीच ओळख स्वतःलाच....
या सुरात गुंफ़ून घेताना नक्की काय वाटलं खरं शब्दात मांडणं कठीण आहे....म्हणजे एखादा पुरूष हा भाव किती कोमलपणे मांडू शकतो आणि त्यामुळे शास्त्रीय नाही कळलं तरी यातली प्रत्येक लकेर, तान आपल्याला एक वेगळाच अनुभव देऊन जाते याचा एक प्रत्यय मला त्या सकाळी आला....आणि उरलेला दिवस मलाही "किसको ऐसी बात कहें" गुणगुणत राहावंसं वाटलं....
असे बरेच रस्ते आहेत जिथे विशिष्ट गाणी, अल्बम ऐकले गेल्याने ती वळणं आठवतात....तसं या गाण्याने मला ४९५, ९५ चं लेन चेंजींग आणि एक प्रसन्न सकाळ आठवेल.. आधी रॅंडम मोडमधून लागलेलं हे गाणं त्यादिवशी मी रिपीट मोडला लावून किती वेळा ऐकलं त्याची गणनाच नाही....
हा सगळा प्रवास म्हणजे देऊळ, नंतर माझं जुनं घर तिथून आणखी एका मित्राचं घर आणि मग नवीन जर्सी हे सगळं मी कोणे एके काळी नित्यनियमाने माझ्या बेटर हाफ़बरोबर केलंय...यावेळी मात्र मी एकटीने इथे आले आणि सगळी पाच राज्य एकटी कामं करत गेले...ऑफ़िसच्या कामांचं ठीक आहे पण घरगुती पद्धतीची कामं पण एकटीनेच....ते पूर्वी एकत्र करत असण्याचे प्रवास आठवताना कदाचित त्याची साथ या गाण्याने मला मिळाली का असं घरी आल्यावर मला वाटलं.....
आपले मित्र, मैत्रीण, सखा, सोबती यांच्याबरोबर बर्याच गोष्टी आपण एकत्र मिळून करतो.......कधीतरी तेच सगळं त्यांच्या साथीविना करुन पाहावं.....मग अचानक आधीचं सगळं आपल्यासाठी किती खास होतं ते पटतं....नात्यांमध्ये अत्यावश्यक नसेलही कदाचित पण एकदा असंही करून पाहावं किंवा माझ्याबाबतीत यावेळी झालं तसं करावं लागलं, म्हणून तेच सगळं एकटीने केलं.....आपल्याभोवती असणार्या मंडळीचं आपल्यासाठी असणं काहीवेळा कसं आपणही गॄहित धरलं होतं असं काहीसं जाणवतं आणि मग ते नातं घट्ट व्हायला मदत होते.....पुन्हा सगळं एकत्र करतानाचे बंध घट्ट होतात.....
जितकं हे गाणं शृंगाररस दाखवतं त्याहीपेक्षा जास्त ते नातं घट्ट करण्यासाठीचा आवश्यक विरह आहे त्याकडेही निर्देश करतं, निदान माझ्यासाठी.....असं मी जेव्हा ते त्या ट्रिपमध्ये वारंवार ऐकलं तेव्हा मला जाणवलं...म्हणजे वर ते कंसातलं दिलबर साथ आहे ते बाहेर काढून
उसका यारों अजी क्या कहना
जिसका दिलबर साथ हो....... हे एकदा जिसका मधल्या "का" वर जोर देऊन साथ मधला "सा" थोडा लांबवला की आपोआप प्रत्यय येतो.......
ऐकायचंय का तुम्हालाही हे गाणं?? तुमच्यासाठी आणखी एक वेगळा अर्थ घेऊन सामोरं येईल....
या लिंकवर ऑनलाइन ऐकायची सोय आहेच शिवाय फ़क्त एकच गाणं विकत हवं असेल तर माफ़क दरात तेही उपलब्ध आहे...जरूर ऐका.....
शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी त्यातलं शास्त्र नेहमीच कळायला हवं असं नाही...मी तर बरेचदा कुठचंही गाणं, "गाणं" म्हणून ऐकते आणि खूपदा मला त्याचा लागलेला अर्थ हा लौकिक अर्थापेक्षा वेगळाच असतो...पण तो माझ्यासाठी नेहमीच खास...ते गाणं ऐकायचा सगळाच प्रसंग मग आठवणीत जातो.....अशाच काही खास गाण्यांपैकी हे एक....
तळटीप - एप्रिलमध्ये केलेल्या बिझिनेस ट्रीपमध्ये ऐकलेल्या गाण्याची आठवण लिहिण्यासाठी जुलैची आणखी एक तशीच ट्रीप उजाडावी हा आणखी एक छोटासा योगायोगच, नाही का? खरं तर पुन्हा तिच सिडी घेऊन आलेय हेच मान्य करते कसं....:)
Monday, July 2, 2012
इमो इमो
गेले काही दिवस आमच्या मुलांच्या पाळणाघरात पुढच्या वर्षीचं प्लानिंग नावाखाली मेल्स येताहेत. यंदा सगळीकडे अर्थात तीच बोंब आहे इकॉनॉमी,(नसलेलं) बजेट आणि असंच काही.शिवाय इकडच्या भागात एक नवीन सरकारी शाळा उघडताहेत.तिथे प्रिस्कूल सुद्धा आहे. साधारणतः या शाळा किंडरगार्टन पासून असतात पण ही जरा अपवाद दिसतेय.
ज्या आया घरी आहेत त्यांच्यासाठी तो पर्याय अर्थात आमच्या पाळणाघर कम प्रिस्कुलपेक्षा अर्थातच किफ़ायतशीर आहेच.शिवाय मुलं पुन्हा किंडरगार्टनला तिथेच जाणार म्हटल्यावर त्यांच्या आधीपासून तिथे रूळायचा फ़ायदा आहेच.
ही माहिती स्वतः वाचताना मला उगाचच आता इथली मुलं कमी होणार किंवा आमच्यासारखे अत्यंत गरजवंत पालकच इथे मुलांना ठेवणार हे सत्य साधारण समजतंय. याचा परीणाम काय हेही ढळढळीत सत्यच आहे..तिथे पण जॉब कट....:(
कधीतरी मलाही वाटतं की मी माझ्या मोठ्या मुलाला ते सरकारी, थोडं स्वस्त प्रिस्कूल आणि मग घरी एखादी नॅनी असं करावं का? मग उगीच त्या सगळ्या प्रेमळ शिक्षिका डोळ्यासमोर येतात ज्यांनी त्याला गेली दोन वर्षे जीव लावला. त्याला माझी खूप सवय होती आणि तिथे सुरूवातीला पाळणाघरात जायला तो सारखं रडायचा पण त्याचं सगळं रडगाणं, हट्ट सहन करून त्याला माझ्याशिवाय रमायला शिकवलं. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचं डिटेल्ड डॉक्युमेंटेशन करून आम्हाला पाठवलं, त्यातलं निवडक काही शाळेतही लावलं. सगळ्यात मुख्य त्याला स्वतःला पुढच्या वर्षी म्हणजे इथलं शैक्षणीक वर्ष जे येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होईल तेव्हा आपण इथल्याच प्रिस्कूलला जाणार हे माहीत आहे. मग मी तो आधी म्हटलेला विचार डोक्यातून काढून टाकते. एका वर्षासाठी कदाचीत थोडं स्वस्त प्रिस्कूल आणि मुलाचं मानसिक समाधान यात त्याच्या (आणि माझ्याही) मानसिक समाधानाची निवड करते.
शिवाय आमचा छोटाही तिथेच पाळणाघरात जातो. त्याला तर तिथल्या शिक्षिकांनी नऊ महिन्याचं बाळ असताना त्यांच्याकडे सांभाळलाय, त्याच्यासाठी ते आमचे काही शब्द शिकले, त्याच्या आजोबांच्या आवाजातली गाणी पण त्यांना हवी होती म्हणजे त्याला तिथेही घरच्यासारखं वाटेल...खरंच खूप सारे पैसे दिले तरी सुविधा मिळतीलच याची खात्री असते का? ती इथे हमखास आहे त्यामुळे निश्चिंत होऊन आम्ही दोघं आमच्या डेस्कला काम करू शकतो..माझ्याकडेही यंदा अप्रेजलच्या नावाने शंख आहे पण निदान नोकरी आहे..इथे मात्र वारे कधीच उलट्या दिशेने वाहू लागलेत.
कधीकधी वाटतं की आपण खरंच इतकं इमोशनल असायला हवंच का? का असं होतं की आपल्याला कुणाकडूनही काही वाईट बातमी ऐकली की कासावीस व्हायला हवं असतं? आज ही पोस्ट लिहायचं कारण सप्टेंबरची प्लानिंग मेल आली आणि त्यात माझ्या दोन्ही मुलांना सांभाळणार्या दोन गुणी शिक्षिकांची नावं नाही आहेत. त्यातल्या एकीचं बाळ आता सहा महिन्याचं होईल आणि ते बाळ झालं तेव्हाच तिच्या नवर्याची नोकरी गेली. हे आम्हाला कळल्यामुळे माझ्या तिच्या बाळापेक्षा बरोबर वर्षाने मोठ्या असलेल्या लेकाच्या कपडे/खेळणी यांचं काय करायचं हे आम्ही तेव्हाच ठरवलं....दुसरी तर इथे कित्येक वर्षे आहे म्हणजे तिने स्वतःच कदाचीत हे सोडून दुसरं कुठलं ठिकाण असा गेले दशकभरतरी विचार केला नसेल..
कसं बरं जायचं उद्या तिथे मुलांना सोडायला...इतके दिवस हे कदाचीत फ़क्त त्यांनाच माहित आहे पण आता आम्हालाही हे ऑफ़िशियली कळवलं गेलंय हे त्यांना माहित असणार..कसं बरं सामोरं जायचं??? श्या, काही केल्या बरंच वाटत नाहीये...
निरोप देणं हे मला काय सर्वांनाच नेहमी जड जातं.पण हा निरोप सगळ्यात जास्त जड वाटतो मला.कधीतरी एक सेंड ऑफ़ होईल आणि तेव्हा डोळ्यातलं पाणी बिल्कुल न दाखवता "सी यु समटाइम्स... विश यु लक ऑन युअर नेक्स्ट अॅडव्हेंचर" असं एलिशिया आणि सेरा या दोघींना म्हणताना दाटून आलेला गळा..मला तर आत्ताच खूप इमो इमो होतंय...:(
तळटीप :- त्यातल्या त्यात चांगली बातमी म्हणजे मागे मी टोशाची पोस्ट लिहिली होती त्याबद्दल काही चांगले अपडेट्स आहेत. तिची शस्त्रक्रिया सुरळीत होऊन ती आणखी एक दोन आठवड्यातच पुन्हा पाळणाघरात आपलं काम सुरू करेल...:)
अपर्णा,
२ जुलै २०१२
Subscribe to:
Posts (Atom)