मागची चकए चष्टगो ज्यांनी आवर्जुन वाचलीय (किंवा आता इथे लिहिलंय तर ज्यांनी नसेल वाचली ते पण बापडे वाचतील) ते म्हणत असतील जीवाचं कॅलिफ़ोर्निया करता करता जीवावर बेतलं आणि मंडळी डायरेक्ट मोरोक्कोच्या गप्पा करायला पण लागली..नाही काही भटकंती प्लान नाही. इन फ़ॅक्ट आता कोणी हरवु नये म्हणून सगळी मिळुन ग्रोसरीला पण एकत्र बाहेर जात नाहीत..ही पोस्ट आहे ती बरेच दिवस डोक्यात असलेल्या पण या ना त्या कारणाने राहुन गेलेल्या खादाडीची.
(म्हणजे खादाडी झालीय पण लिहायचं राहिलंय हो...)
(म्हणजे खादाडी झालीय पण लिहायचं राहिलंय हो...)
बाहेर खायला जायचं तर चेन रेस्टॉरन्टाऐवजी काही पर्याय आहे का ते आम्ही नेहमी पाहतो. अशा पाहणीत मिळालेलं हे एक मोरक्कन पद्धतीचं रेस्टॉरन्ट. तसं साधारण वीसेक हजार लोकवस्तीच्या आमच्या या गावाचं एक छोटं डाउनटाउन आहे, जिथे थोडं फ़ार खरेदी आणि खाणं करायची सोय आहे. पण त्यात असलेले पर्याय इथे असणारे नेहमीचे फ़ास्ट फ़ूड किंवा इतर चेन म्हणून खरं तर सुरुवातीला कुठे गेलोच नाही. मग आमच्याच गावच्या डाउनटाउन्च्या थोडं एक अलिकडचं वळण घेतलं तर असलेल्या एका छोट्या स्ट्रीप मॉलमध्ये नीट लक्षातही येणार नाही अशा पद्धतीने असलेली एका बोर्डाने बरेच दिवस लक्ष वेधुन घेतलं होतं.त्यात मोरक्कन असं कधी आधी खाल्लं नव्हतं.
कुठल्यातरी शुक्रवारी जेवण करायचा जाम कंटाळा आला आहे या कारणास्तव आणि केव्हापासून इथे जायचंय म्हणून दार-ए-सलामच्या दारात उभे ठाकलो..अरे हो वरच्या नमनात नेमकं नाव सांगायचं राहिलंच...पाहिलं, खायच्या गप्पा करायला घेतल्या की हे असं होतं..असो. तर आत शिरल्या शिरल्याच खास मोरोक्कोहुन आणलेलं फ़र्निचर आणि आतली सजावट आपसूक लक्ष वेधुन घेते.
दारात आल्या आल्या मालकाचं मोठं हसुन ’हाउ आर यु’ आणि जागा असेल त्याप्रमाणे स्थानापन्न झालं की थोड्याच वेळात आपल्यासाठी एका छोट्या प्लेटमध्ये थोड्या हमसबरोबर गरम पिटा ब्रेडचे छोटे त्रिकोणी तुकडे आपलं स्वागत करतात. ते खाता मेन्यु कार्ड पाहायचं. मला नव्या पद्धतीच्या खाण्याच्यावेळी ऑर्डर करताना खाद्यपदार्थाचं थोडं वर्णन केलं असेल तर आवडतं. इथलं डिनर मेन्यु तसं आहे. त्यामुळे "तजिनी"ने माझी उत्सुकता चाळवली. खरं तर ’तजिनी’ हे ज्या कोनाकृती झाकण असलेल्या मातीच्या भांड्यात ती (चिकन किंवा जे काही मांस असेल ते) स्लो कुक केलं जातं त्या भांड्याचं नाव आहे.
इथे बाकीच्या लोकांनी मागवलेल्या तजिनी सर्व्ह केल्या जात असताना ते भांडं प्रत्यक्षात पाहुनही जरा हे आपण मागवावं असं वाटलंच. त्यात इथे नेहमीच्या चिकनऐवजी कॉर्निश हेनचा पर्याय होता. बाजुला भाज्यांचे पर्यायही होते आणि एक फ़ळाची साईड. एकाच डिशमध्ये गार होऊ असं वाटत होतं. माझ्या नवर्याला बाहेर कुठे मिळत असेल तर लॅंब शॅंक खायला आवडतात त्यामुळे त्याने ते खायचं ठरवलं.
इथे बाकीच्या लोकांनी मागवलेल्या तजिनी सर्व्ह केल्या जात असताना ते भांडं प्रत्यक्षात पाहुनही जरा हे आपण मागवावं असं वाटलंच. त्यात इथे नेहमीच्या चिकनऐवजी कॉर्निश हेनचा पर्याय होता. बाजुला भाज्यांचे पर्यायही होते आणि एक फ़ळाची साईड. एकाच डिशमध्ये गार होऊ असं वाटत होतं. माझ्या नवर्याला बाहेर कुठे मिळत असेल तर लॅंब शॅंक खायला आवडतात त्यामुळे त्याने ते खायचं ठरवलं.
तजिनी बरोबर काही मुरवलेल्या भाज्या एका ट्रे मध्ये छान सजवुन देतात. या मोरक्कन पद्धतीने मुरवलेल्या किंवा खारवलेल्या चवीच्या तोंडीलावणं म्हणून छान लागतात.विशेष करुन यातलं गाजर मस्त लागतं.आतापर्यंत बाहेर खालेल्ल्या चिकनमधली फ़ार मसालेदार नसली तरी अतिशय चविष्ट चिकन म्हणून मी हिला वरच्या क्रमांकावर नक्कीच ठेवेन आणि स्लो कुकमुळे ती खाताना खूप मुलायम लागते. कधी संपते कळतच नाही. जोडीला पिटा ब्रेड होताच. नवरोबाच्या मते लॅंब शॅंकचं मीट फ़ोर्कने लगेच सुटुन येत होतं. जास्त तिखट खाणार्या खवय्यांसाठी तिथल्या शेफ़ची एक खास तिखट काळसर हिरवी चटणी बाजुला मागवता येते चकटफ़ु. आमचं खाऊन ती उरली की पार्सलमध्ये घरी पण येते.
इतकं सगळं खाउन पोट टम्म फ़ुगलं तरी डेझर्टमेन्युवरचा बदाम, ऑरेंज इसेंसवाला बकलावा साद घालत होता. इथली शेफ़ लाडाने त्याच्याबरोबर व्हॅनिला आइस्र्किम आणि एका चॉकोलेट सॉसची नक्षी काढुन सर्व्ह करते की पोटात आपोआपच जागा तयार होते. आणि हे सगळं खाल्लं की मग जायच्या आधी हातावर खास मोरोक्कोच्या इसेंसचा आपल्याकडे चांदीची अत्तर फ़वारण्याची झारी असते तशाप्रकारच्या झारीतून हातावर रोझ इसेंस मारलं की हाताला खूप छान वास येतो. माझ्या मुलाने तर त्याला ते दोन-तीनदा लावायला लावलं. आपल्याकडचा फ़िंगर बाऊल इथे कुठे दिसत नाही तर निदान याठिकाणी हा इसेंसचा पर्याय आम्हाला आवडला आणि मालकाने सांगितल्याप्रमाणे हा खास मोरोक्कोहुन मागवला आहे.
ही आमची पहिली-वहिली ट्रिप इतकी छान झाली की आम्ही नंतर खूप वेळा गेलो हे सांगणे नलगे. त्यामुळे आता त्यांची शेफ़ आणि मालक आम्हाला चांगलेच ओळखायलाही लागलेत की मागच्यावेळी लॅंब शॅकला शिजायला वेळ लागतो म्हणून आधी फ़ोन करुन सांगितलंत तर मी आधी करायला ठेवेन म्हणून मालकाने खास आवर्जुन सांगितलंही. म्हणजे मी लॅंब खात नाही त्यामुळे माझा पण वेळ वाचतो हे लक्षात आलं का त्याच्या माहित नाही पण सोयीचं होतं.
नंतर एक दोनदा लंच पण ट्राय केला. लंच मेन्यु अगदी आटोपशीर आहे. तजिनी वगैरे नाहीच फ़क्त कबाब, गायरो, सॅंडविच हेच पर्याय आहेत. कबाब भात किंवा कुसकुस सॅलडबरोबर घेता येतात आणि हवं असल्यास त्यात जादा पिटा ब्रेड मागवता येतो. कबाबची चव साधारण आपल्याकडे मिळणार्या रेशमी कबाब सारखी आहे पण त्याच्याबरोबर तहिनी सॉस असतो. आणि कुसकुस सॅलड थंड असल्याने काहीवेळा कमी आवडण्याची शक्यता आहे. नेमकं मागच्या लंचच्या वेळी आम्ही बकलावा घ्यायचा म्हटलं तर मागच्याच टेबलावर शेवटचा बकलावा विसावला होता. श्या! पहिल्यांदीच आम्हाला पूर्ण ऑर्डर एकाचवेळी न द्यायचा पश्चाताप झाला. त्यामुळे आता पुन्हा एकदा सगळं साग्रसंगीत जेवायला मोरोक्कोला आपलं ते दार-ए-सलामला जायला हवंय...