मुदलात ’फ़कस्त एक खादाडी’ इतकं महत्व असलेल्या या गोष्टीचा इतका बाउ (किंवा पोस्ट) करण्याइतकं काय झालं हे कळण्यासाठी मला ही गोष्ट सांगण्याआधी थोडं जरा या पोस्टसाठी कारण असलेल्या काही पात्रांचा परिचय करुन देणं आवश्यक आहे.(जमल्यास असतील तिथे लिंकापण द्यायचा प्रयत्न करेन पण नाहीच दिल्यात तर शिव्या पडू नयेत म्हणून एक कंस आधीच देऊन ठेवतेय...)
१. माझी आई - जिच्या वाढदिवसासाठी म्हणून मी हे खास स्वतः काहीतरी नवीन पदार्थ करण्याचं मनावर घेतलं (नाहीतर आई इथे असताना आमचं डिपार्टमेंट खाणार्यांचं)
२. श्रीताई - हो तीच ती सरदेसाईंच्या ब्लॉगवर इमाने इतबारे रेसिप्यांचं गाजर टाकुन लांब राहून आमच्यासारख्यांच्या निषेधाची मजा लुटणारी माझी मैत्रीण आणि त्यातुन अगदी अलिकडेच टाकलेली ही पोस्ट..(खरं म्हणजे पात्र म्हणून तिची पोस्टच देणार होते पण मग तिला निषेध करायची ही पोस्टसंधी वाया गेली असती नं...:D)
३ सुहास - हो तोच तो झेल्यांचा..रात्रपाळीमुळे रात्री आणि नेहमीप्रमाणे दिवसा असं चरत राहुन मग वर त्याच्या ब्लॉगवर ते टाकुन आम्हाला जळवण्याची खोड असलेला कार्टा..आता हा कारणीभूत, कारण काल नेमका एक बझ मी टाकला होता त्यावर याने खादाडी पोस्टेची फ़र्माईश करुन नवी खादाडी करायचा किडा डोक्यात सोडून दिला.
४. ऋषांक - धाकटं पिलु वय ९ महिने फ़क्त. ज्याचं आगमन या ब्लॉगवर जाहिररित्या आधीच झालंय. पण मुदलात वरच्या सर्व कारणांपेक्षा याने मला शनिवारच्या पहाटे साडे-पाच पासून उठवल्यामुळे "वेळ नसतो" ऐवजी ’बापरे साडे सातच वाजलेत काय करु?’ मुळे मी ती रेशिपी फ़ायनली करायला घेतली आणि मग ही पोस्ट लिहायला मला पुराव्या (वाचा: फ़ोटु) सकट कारण मिळालं...
आणि लाश्ट बट नॉट द लिश्ट...
५. फ़ॉलोअर्स उर्फ़ नेहमीचे यशस्वी वाचक - काल एकदम लक्षात आलं की सव्वाशे फ़ॉलोअर्स झाले आहेत.मग त्यांना ब्लॉगवरच एक छोटी ट्रिट देऊन जाहिर आभारप्रदर्शन का करु नयेत..म्हणून हे सगळं ब्लॉगवर मांडायचं कारण म्हणजे योगायोगाचा कहर आणि अर्थात मायबाप वाचकांचे आभार मानायची संधी हे आता वेगळं सांगायला नको.
हां तर कुठे आपण होतो ती रेसिपी...वाचली आणि अर्थातच वेगळी असल्यामुळे आवडली..नेहमीप्रमाणे करायलाच हवी (अशा खरं म्हणजे बर्याच खादाड्या आहेत लिस्टवर पण...) अशी मनातल्या मनात नोंद करुन ठेवली. अर्थात आईचा वाढदिवस आज असल्याचं लक्षात आलं आणि त्यातही श्रावणी शनिवार म्हणजे तिच्यासाठी काही करायचं तर ते शुद्ध शाकाहारी (नशीब तरी यंदा सगळे उपास नाही करत आहे ते...नाहीतर वादिलाच उपास...) म्हणून विचारचक्र सुरु होती पण तरी काही फ़िक्स होत नव्हतं. शेवटी केक आणि तोही शाकाहारी म्हणून फ़ायनल केलं आणि लढाईला आपलं ते श्रीताईचं डोकं खायला सुरुवात केली. ती पण बिचारी माझ्या फ़ाल्तुतल्या फ़ाल्तु शंकापण अगदी सविस्तर उत्तरं देत होती...म्हणजे याविषयी मी केलेल्या एक मेलचं तिचं खाली डकवलेलं उत्तर पाहिलं तर कळेल.
एका नॉर्मल साईज वाटीला ( आपली मायदेशातली वाटी घेणारेस की इथला छोटा काचेचा बाऊल? ) फ्राय पॅन मिडियम साईज चा घे. छोटा ऑमलेट पॅन लहान पडेल. माझ्याकडेही कॉईलच आहे ना... सो पाच वर ठेव सुरवातीला ... ( मिडियम हाय वर ) आणि सातआठ मिनिटे झाकण ठेव. नंतर झाकण काढून टाक कारण झाकणाचे पाणी पडत राहील म्हणून. केक कॉईलवर ठेवून इकडे तिकडे जाऊ नकोस. पटकन लागू शकतो. हा केक फार झटकन होतो सो समोरच थांब. कडा सुटू लागलेल्या तुला दिसतील आणि वासही सुटेल मग पुन्हा पाच मिनिटे झाकण ठेव म्हणजे मधला भाग पक्का शिजेल. ओलसर ( मॉईस्ट ) राहायला हवा पण पिठाचा ओलेपणा अजिबात नको. जनरली केक साईडने पटकन शिजतो आणि मधे ओला राहतो म्हणून पुन्हा एकदा झाकण ठेव. टुथपिकने टोचून पाहा मधला भाग कोरडी निघाली तर झाला. लगेच कॉईलवरून उतरवून थंड व्हायला ठेव. गार झाल्याशिवाय कापू नकोस. काही अडले तर विचार.
माझा पॅन १० इंच व्यासवाला आहे.
आता ही मेल आणि तिची पोस्ट इतकं दोन खिडक्यांमध्ये सुरु करुन मी (वर म्हटल्याप्रमाणे लेकाने लवकर उठल्यामुळे साडे सातलाच) केक करायला बसले खरं तर उभे राहिले म्हणणं जास्त चांगलं ठरेल. म्हणजे आधीच अपार्टमेंटची स्वयंपाकघरं इतकी बेतशीर असतात की त्या मोठ्या स्पार्टेकच्या लाद्या असतात तशा आडव्या तीन आणि उभ्या साडेचार म्हणजे डोक्यावरुन पाणी. त्यात आमच्या किचनमध्ये मुलाला आयत्यावेळी उच्चासनावर बसवलं की आपली कामं होतात म्हणून ठेवलेली हाय चेअर म्हणजे एकदा स्वयंपाकाला सुरुवात केली की शेवटपर्यंत उभंच..अगदीच लक्षात आलं तर ती हाय चेअर बसायला घेतली जाते पण अशी नवी निगुतीची रेसिपी असली की कुठं बसायला सुचतंय..असो..
तर नशीबाने लागणारं साहित्य सगळं सोपं आणि नेहमी घरी असतंच पैकी होतं त्यामुळे ते घेतलं. पण तरी तिचं १० इंच म्हणजे नक्की कुठला या प्रश्नाने का कुणास ठाऊक पण डोकं खाल्लं..म्हणजे लहान झाला तर केक उतु जाईल आणि मोठा झाला तर त्याची मारवाडी लोकं करतात तशी रोटली होईल ही भिती म्हणून गुगलुन पाहिलं तर त्यांच्या इमेजेसने इतकं काही कळत नव्हतं..मेले पॅनच्या उलट्या बाजुला दुनियाभरचं काय काय छापलं असतं तसं फ़क्त किती इंच टंकायला काय होतं देव जाणे हा एक जावईशोधही लावला पण तरी पाचेक मिन्टं माथाफ़ोडी करुन माझ्याकडच्या तीन पॅनपैकी मधला निवडला. श्रीताईनेही तस मिडीयम म्हटलं होतं ते पहिल्यांदीच डोळे उघडे ठेऊन वाचुन त्याप्रमाणे का नाही केलं पण माहित नाही बहुतेक सुटीच्या दिवशी खूप लवकर उठावं लागलं की डोकं जरा जास्त चालतं आणि काय?
चला पॅनचा प्रश्न मिटला, रवा,साखर आणि दही भिजवण्यासाठी डोकं कितीही चालवलं तरी काही वेगळं करण्यासारखं नसतं म्हणून नशीब.
त्यानंतर खरं तर चांगला अर्धा तास माझ्याकडे होता. त्यात थोडी ऋषांकची कामं केली आणि आणखी एकदा रेसिपी तिच्या मेलमधल्या सुचना नजरेखालुन घातल्या...म्हणजे आता काय फ़क्त सगळ्या पायर्या पाठ व्हायच्या बाकी आहेत इतकं सगळं माहित झालं होतं आणि मी उरलेल्या गोष्टी करायला घेतल्या. इतक्या सकाळी रेसिपी करते म्हणून श्रीताईला अजिबात फ़ोन करायचा नाही हे अगदी पक्कं केलं होतं. झालं एकदा केक पॅनमध्ये गेला आणि गॅस सुरु करुन मी पुन्हा तिच्या पत्रात डोकं घातलं अच्छा समोरच थांब म्हणून घड्याळही पाहिलं आणि पाच मिनिटांनि झाकण ठेवेन म्हणून तेही हातात घेतलं.
झाकण ठेवताना का कुणास ठाऊक थोडा गोंधळ झाल्यासारखा झाला..आणि मी पुन्हा एकदा रेसिपीकडे वळले.बापरे....खतरनाक....लागली वाट....अगदी रन्स काढताना दोघा खेळाडूंना एकाच बाजुला जावं लागतं तेव्हा पुन्हा सुलट बाजुला आउट होण्यासाठी धावणार्या खेळाडूला कसं वाटत असेल अगदी तस्संच....म्हणजे झालं असं की रेसिपी म्हणते एक लोखंडी तवा ठेवा आणि त्यावर केकचा पॅन..मी पत्र आणि रेसिपी वाचण्याच्या नादात त्या लोखंडी तव्याला पूर्ण विसरलेच होते..इन फ़ॅक्ट सुरुवातीला जेव्हा मी तिच्या पोस्टवर वाचलं होतं तेव्हा निव्वळ माझ्याकडे असलेल्या लोखंडी तव्याला निदान त्यासाठी तरी वापरता येईल म्हणूनही या रेसिपीला याददाशमध्ये ठेवलं होतं पण तिने मला नेमका त्याचवेळी दगा दिला आणि झालं आता काय म्हणजे उरलेल्या वेळासाठी तवा ठेऊ की या रेसिपीमध्ये डायरेक्ट तवा ठेवला तरी कॉइलचा गॅस असल्याकारणास्तव होते म्हणून नवा शोध लावु या द्विधा मनस्थितीत निव्वळ आईच्या वादिच्या दिवशी प्रयोग नको म्हणून शेवटी रेसिपीच्या मालकिणीलाच विचारण्यासाठी फ़ोन लावला. आणि अक्षरशः दोन मिन्टं पण नाही तिचा जास्त वेळ घेऊन तिची पण झोपमोड नको म्हणून विचारलं, ’मी तवा लावायला विसरले नाहीच लावला तर काय?’ बहुधा उडालीच तिची झोप ’अगं जळून जाईल’ ओके ओके लावते मी आता म्हणून ठेवलाच फ़ोन आणि लगोलग तवा लावला आणि आधी झाकण उघडून केकची सद्यस्थिती पाहिली. तसा फ़ार वाईट दिसत नव्हता म्हणजे तिने तिच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे कडा सुटायला लागल्या होत्या पण रंग जरा करपट दिसायला लागला होता..
आता म्हणजे अक्षरशः आलीया भोगासी वृत्तीने मी पाचेक मिन्टात चेक करेन (किंवा तसंही कुणी उठलं नाही आहे तर परस्पर विल्हेवाट लावेन )असा विचार करुन शेवटी बसले एकदाची...पण रेसिपीच्या मालकिणीला कुठे झोप लागायला..त्यातुन हा केक मी आईला सरप्राईज म्हणून करतेय तर तिला माझी काळजी असणारच..पाचव्या मिन्टाला माझा फ़ोन परत वाजला.
"लावलास का तवा"
"हो गं..पण आता हा झाला कसं कळणार? म्हणजे तुझ्याइतकं केशर नसेल घातलं मी बहुधा..ते मिश्रण होतं तसंच दिसतंय़.."
आता माझं सगळं वाचन सपाट झालंय हे तिलाही कळलं असेल..
"तू टुथपिक घातलीस का?"
"अरे हो राहिलीच...अगं सगळीकडून नीट बाहेर येतेय...आणि वीसेक मिन्टं झाली ना गं..."
"बापरे वीस मिन्टं...तू पहिले तो गॅस बंद कर"
"पण तसंही लोखंडी तवा नंतर तापला असेल नं...मग?? बंद करुन तसाच ठेवु का?"
"अं...ह्म्म....चालेल तसं..पण तू गॅस बंद कर..आणि आता थंड होईपर्यंत बिल्कुल हात लावु नकोस.."
ही अल्मोस्ट धमकीच असणार...."ह्म्म"
"आणि कळव मला कसा झाला ते"
"ओके बाय"...
असो शेवटी हळुहळू घरातली मंडळी उठली...आईला खरंच सरप्राइज होतं....मध्येच तिने कसलातरी वास येतो म्हणून विचारलं...तेव्हा फ़क्त चांगला की वाईट असं विचारुन मी आपलं थोडं चाचपुन घेतलं...पण तिने चांगला सांगितल्यामुळे हुश्श...आता थंडही झाला होता आणि पॅनमधुन सुळकन बाहेरही आला (क्रेडीट गोज टू सुरुवातीचं दणादण गॅसवरचं शिजवणं असं मला वाटतं..) पण आता ही पोस्ट लिहेपर्यंत केकचा कणही उरला नाहीये...एक वेगळा पदार्थ म्हणून सगळ्यांनी आवडीने खाल्लाय.फ़क्त रव्याचा केक मी कधीच केला नाहीये त्यामुळे तो तसा मैद्यासारखा लुसलुशीत नसतो हे थोडं सांगावं लागलं...पण ओव्हरऑल आजची सकाळ धमाल होती...
तसंही निव्वळ आयतं कोण देणार आपल्याला, म्हणून स्वयंपाकघरात प्रयोग करणारे आम्ही दोघं काहीना काही नवे अनुभव (वाचा:शोध) घेतंच असतो..पण आजची गोष्ट मात्र जरा हटके..शिवाय बॅटिंगला मी एकटीच...त्यामुळे लिहुन ठेवावीशी वाटली...
आज सव्वाशे फ़ॉलोअर्स आणि ही पोस्ट वाचणारे नवे-जुने वाचक यासाठी हे फ़ायनल प्रॉडक्ट...आभार....
तळटीप: ही गोष्ट खरं म्हणजे मी ज्यादिवशी हा बझवर सुसंवाद झाला त्यानंतर लगेच म्हणजे २० ऑगस्टला लिहीली होती. पण नेमकं त्याच्या दुसर्या दिवशी आम्ही फ़िरायला जाणार म्हणून कधी नव्हे ते वेळेवर कॅमेरा क्लिन करताना बेटर हाफ़ने फ़ोटो उडवले आणि खादाडीची गोष्ट फ़ोटुविना टाकवेना म्हणून थोडं थांबुन आज टाकली आहे...यंज्व्याय...