प्रिय अपर्णास,
आत्ताच तुझा ऋषांक पालथा पडतोय हा बझ पाहिला आणि "यार मला यावेळीतरी मुलगी हवी होती रे" वाला आपला फ़ोन आठवला. हे पत्र लिहिताना आता किती वर्षे झाली आपल्या मैत्रीला हा प्रश्न अर्थातच आपण मुदलात आणत नाही कारण ते मोजायचं नाही हे आपलं कधीच ठरलंय...(आता इथे माझा पहिला वन-वे ब्रेक-अप आणि नंतर सारख्याच वेगवेगळ्या मुली आवडल्यामुळे सारखे-सारखे झालेले वन-वे ब्रेकअप याचा हिशेब काय करतेस?? माहितेय त्यात माझ्या लग्नाला झालेली वर्षे मिळवली की तितक्या वर्षांची आपली मैत्री....जाऊदे नं पण याची चर्चा तुझ्या ब्लॉगवर कशाला गं?? शेवटी प्रत्येकवेळी माझ्या पैशाने ते आपण कॅफ़े अल्फ़ातल्या पाव-भाजी आणि फ़ालुद्यात बुडवले त्याचा हिशेब कुठे मी करतोय... असो,तुझ्या ब्लॉगसाठी पत्र लिहायला बसलो म्हणून हे तेल च्यायला मध्येच ओततोय झालं) हा तर मूळ मुद्दा, तुझा जुना मित्र म्हणूनच नव्हे तर एका मुलीचा बाप या नात्याने दुसरा मुलगा झाल्याबद्द्ल तुझं अभिनंदन करायची ही संधी मी घेतोय(म्हणजे जाहिररित्या गं... ट्युबलाइट).
हे बघ सर्वप्रथम हे लक्षात ठेव की मला चांगलं ठाऊक आहे की तुला मुली (किंवा तुझ्याच शब्दात मुली"च") आवडतात. या पार्श्वभूमीवर आता दुसरा(ही) मुलगा झाल्याचे काही फ़ायदे मला स्वतःला एक मुलगी आहे या अनुभवाधारे सांगावे म्हणतो.
हे बघ तुला मुलीला सजवायला आवडेल असा तुझा जो गैरसमज आहे तो ती मुलगी चुटूचुटू बोलायला लागली की लगेचच दूर होईल. कारण मग तुला तिला फ़क्त कपाटातच नव्हे तर दुकानातही कपडे, दागिने, टिकल्या, पर्स आणि जे काही तयारी या प्रकारात मोडतं ते तिच्याच मर्जीने घ्यावे लागेल. त्यात निव्वळ तुझी ती मुलगी सजवायची इच्छाच कमी होईल असंही नाही पण हे सर्व आताशा खूप वेळखाऊही होतंय ही नवी तक्रार तू करशील याची तुझा जवळचा मित्र म्हणून माझी खात्री आहे. कॉलेजमध्ये तुच तर आमच्या ग्रुपमधली टॉम बॉय होतीस नं जिला आम्ही आतापर्यंत आमची सगळी सिक्रेट्स सांगितली. ती काय तू तशी टिपिकल मुलगी होतीस म्हणून नव्हे तर तू आमच्याच पक्षातली जास्त होतीस..असो..या विषयावर नंतर जमेल तसं विषयांतर करेनच.
बघ आता सजवायची हौस अशी दोनेक वर्षांतच भागल्यामुळे पुढची वर्षे किती हालात जातील याची जरा कल्पना कर. त्यातुन काही अज्ञात कारणांमुळे तुझा परदेशातला मुक्काम पंचवार्षिक दराने वाढतोय. तो असाच वाढला आणि ही मुलगी तिथेच वाढली तर विचार कर ती लवकरच डेटिंग, प्रायव्हसी अशा मागण्या करील तेव्हा काय होईल? अर्थात मुलगे असं करणार नाहीत असं मी अजिबात म्हणत नाही. पण तरी आठव तुच मागे म्हणाली होतीस तुझ्या तिथल्या एका ओळखीच्या कुटूंबातील चार-पाच वर्षांच्या मुलीने आईकडे उन्हाळ्यात बिकीनीशिवाय पुलवर कसं जायचं विचारलं होतं आणि त्यांच्यापेक्षा तुलाच टेंशन आलं होतं ते.... मुलगे असल्यामुळे ही पंचवार्षिक योजना वाढवायची झाल्यास तुला थोडी तरी उसंत मिळेल.
तू जरी आमच्या सर्वांची खूप छान मैत्रीण असलीस तरी असं नॉर्मली (म्हणजे नॉर्मल मुलगी) आणि मुलगा यांच्यात सुरुवातीला भांडणं जास्तच होतात हा एक मुद्दा लक्षात घेतलास तर आता आरुषला त्याच्या खेळात सहभागी व्हायला एक मुलगाच मिळतोय याचा फ़ायदाही लक्षात घे. त्याची जुनी मुलांची खेळणी उपयोगात तर येतीलच (माहितेय मला तुला संपुर्ण भातुकली, बाहुलीचं घर इ.इ. घ्यायचं होतं...पण ते दुसर्या कुठल्याही मुलीला घेऊन दे गं(मी घेतलंय कधीच नाहीतर उगाच माझ्याकडचा पसारा वाढवशील)..नाहीतर असंच आणून ठेव) पण तू आरुषला थोडंस चढवलंस तर तो आपल्या लहान भावाला त्याच खेळण्यांबरोबर खेळायला मदतही करील. शिवाय बघ आपण याच्यासाठी नवीन नाही आणत आहोत असं सांगुन तू त्याला आणखी चढवू शकशील.मुलांना चढवायला वेळ लागत नाही (तिथेही मुलीच जास्त वेळखाऊ असतात) हा मुद्दा तुझ्यासारख्या सुज्ञीस सांगणे न लगे काय??
दोन दोन मुलगे असण्याचे काही तोटेही आहेत आणि एक मित्र म्हणून त्यांचीही जाणीव तुला करुन द्यावी म्हणतो.मुलांची भूक मोठी असते आणि तुझं स्वयंपाकघरातलं कौशल्य आणि आवडही (म्हणजे खायची गं) मला चांगली माहितेय. तर तुला करता येत नाहीत म्हणजे तुझ्या मुलांना पोळ्याच आवडणार हे लक्षात ठेव आणि त्याची सोय आधीच करुन ठेव. किंवा तुझ्या पंचवार्षिक योजना संपवुन परत यायचं अशा दरम्यान प्लान कर की त्यांची वाढती भूक आणि आपल्या देशात मिळणारी पोळीवाली बाई (ती आधीच तुझ्या रोज स्वप्नात येत असेलच) यांच्या वेळेचा योग्य ताळमेळ घालता येईल. शिवाय दुसरा मुलगा आल्यामुळे तुझ्या घरात आता तू फ़ॉर गुड मायनॉरिटीमध्ये आहेस हे लक्षात ठेव. पण फ़ंद-फ़ितुरीचा योग्यवेळी लाभ घेता आल्यास हा तोटा थोडाफ़ार कमी करता येईल. शिवाय समज तुला अगदी मुलीच जातात अशा कार्यक्रमाला जायचं असेल तर तुला प्रायव्हसी मिळण्याचा (आणि एक दिवस हक्काने पोरांना बाबाकडेच द्यायचा)आपोआपच फ़ायदा होईल.
बाबाचं नाव निघालंच आहे तर परत एकदा फ़ायद्यांकडेच वळावंसं वाटतं..अगं आता तुला बाहेर गेल्यावर मुलांना शी-शुला न्यायला (पुन्हा एकदा) हक्काने बाबाकडे पाहता येईल. आरुषमुळे तशीही त्याला सवय झालीच आहे त्यामुळे तोही काही नाही म्हणणार नाही. खरेदीच्या वेळीही तुला त्यांचे तेच तेच कपडे पाहायचा कंटाळा आल्यास बाबाला तुला मुलांच्या खरेदीतलं कळतं मग तू निवांत तुमच्या मुलींच्या सेक्शनकडे टाइमपास करुन आलीस तरी चालेल. अगं तसंही तू त्यांची खरेदी केलीस तरी तुझ्याच शब्दात सांगायचं तर कपडे काय घेणार शर्टच्या ऐवजी टी-शर्ट, हात सिझनप्रमाणे मोठे किंवा छोटे, रंग तेच मुख्य निळ्याच्या शेड्स नाहीतर एखादा पिवळा,हिरवा किंवा गेला बाजार भगवा, पट्ट्या उभ्या आडव्या किंवा चौकडी आणि पॅंट या प्रकाराबद्दल तर चर्चाच नको. हाफ़ की फ़ुल ते ठरवलं की फ़क्त काळा, निळा की उजळमध्ये फ़ेंट चॉकलेटी नाहीतर जीन्स...बास....त्यावर दागिने,पर्स, टिकल्या काहीही नको...इन फ़ॅक्ट हेच बजेट तू तुझ्यावर खर्च करु शकतेस. आहे की नाही फ़ायदा.
आणि हे बघ मुलगा झाला तरी शेवटी तो आपल्या आईचा लाडका असतो आणि मुख्य आईच्या तेवढ्याच जवळ असतो. पुढे मागे बायकोमुळे त्याला आईला वेळ देता नाही आला तरी आईसाठीचं प्रेम हे असतंच ते आतापास्नं त्याच्या मनात कसं जोपासायचं ते तू बघ. मुली आपल्या जागी असल्यातरी मुलगाही खंबीरपणे आई-बाबांच्या पाठी उभा राहू शकतो.
आईवरुन आठवलं.. आता आई आहे नं तुझ्याकडे आणि ती जे करु शकते ते मी तिच्या वयात (जर पोहोचले तर अर्थात) करू शकेन की नाही असं नेहमी म्हणतेस नं? मग फ़ायदा आहे नं तुझा..अगं जेव्हा (मी "जेव्हा" म्हणतोस नाहीतर वस्सकन अंगावर येशील) तू आजी होशील तेव्हा ती जबाबदारी कदाचित आपसूकपणे परस्पर तुझी विहीण उचलेल नं....आई गं...जास्तच आगाऊपणा करतोय का मी??
असो. सांगायचा मुद्दा म्हणजे आता मुलगी हा शब्द फ़क्त स्वतःकरता ठेव आणि आपल्या ग्रुपमध्ये जसा दंगा व्हायचा तोच घरात पण करायला तयार रहा..आम्ही मुलीवाले आहोतच तुझ्या घरगुती गमती-जमती ऐकायला. तसंही आरुष तुला "आई तू काय कत्तो?" म्हणताना ऐकलंय मी. खरं सांगतो कॉलेजमधले दिवस आठवले...
असो नमनाला आणि सगळे मुद्दे संपले तरी न संपलेलं तेल खपवायला माझ्याकडे इतका वेळ नाहीए गं..शेवटी एका मुलीचा बाप आहे मी..त्यामुळे सध्या घरातला वेळ हा फ़क्त तिनं डोकं खायला राखुन ठेवला आहे....
हा तर आता वरच्या पत्रातलं फ़क्त मुद्द्याचं (हो तेच ते कंस आणि तेल सोडून बाकीचं) वाचलंस तर तुला कळेल की एक काय दोन काय मुलगा व्हायचे बरेच फ़ायदेही आहेत तेव्हा त्याचा विचार कर आणि शांतपणे आज आरुष लवकर झोपलायस म्हटलं तर निवांत झोप...तुझ्याकडे तुझी काळजी करायला थ्री इडियट्स समर्थ आहेत आणि त्या वासरात एकटीच शहाणी गाय व्हायच्या संधीचा फ़ायदा घे....
प्रत्येक मुलीकडून पोळल्यावर (अगदी स्वतःच्या पण) तुझी मदत घेणारा,
तुझाच मित्र.....