Wednesday, September 30, 2009

गोष्ट छोटी डोंगराएवढी

सध्या आईचा मुक्काम इथे आहे त्यामुळे फ़ारसा विचार न करता मराठी चित्रपट लावते. जास्तीत जास्त काय तर तेच तेच गावरान विनोद नाही आवडले तर नेट सर्फ़ करणं किंवा दुसरं काही काम करणं हा पर्याय असतो. तसंच वाटलं होतं जेव्हा मकरंद अनासपुरेचं नाव सुरुवातीला पाहिलं पण एका संवेदनाशील विषयावरचा गंभीर चित्रपट आहे हा "गोष्ट मोठी डोंगराएवढी". नाही मी पुर्ण कथा वगैरे नाही सांगणार कारण एकतर मुळात मी जास्त चित्रपट पाहात नाही फ़क्त मायदेशात सध्या नसल्यामुळे पाहाणं होतं. पण असे काही विषय असले की तो चित्रपट आपसुक पाहिला जातो.पण ते कथा सांगणं मला जमत नाही.

तर "गोष्ट छोटी डोंगराएवढी" मध्ये मुख्य प्रश्न शेतकर्यांच्या आत्महत्या हा आहे आणि त्या अनुषंगाने चालु असलेल्या इतर काही प्रश्नांनाही वाचा फ़ोडण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातुन शेतकी शिकुन परत गावात गेलेल्या मकरंद अनासपुरेला साधं शेतात विहिर खणायला कर्ज काढताना येणार्या अडचणी, सरकारी खात्यातल्या भ्रष्टाचार ज्या प्रकारे मांडलय त्याने आतुन काळीज हलतं. आपल्याकडच्या शेतकर्यांचा खरंच कोण वाली असावा असा प्रश्न नक्की पडेल हा चित्रपट पाहताना. गावातला त्याचा जिवलग मित्र दुसरा एक शेतकरी आधी एक बैल विकतो मग नांगराच्या दुसर्या बाजुला स्वतःच उभा राहातो. मकरंद त्याला स्वतःचा बैल देऊन मदतही करतो. पण तरी आभाळालाच ठिगळ पडलंय; मग घरावर जप्ती आणि दुसराही बैल सावकाराच्या दारात आणि तिथेही अपमान, बहिणीच्या इज्जतीवरुन.

"मातीत जगणं, मातीत मरणं, आपुल्या हातानी रचिलं सरणं" हे गाणं खूप काही सांगुन जातं. पण मरणानंतरही पोस्टमार्टेमसाठीसुद्धा लाच??? आणि पोस्टमार्टेमशिवाय त्याच्या कुटुंबाला सरकारी मदत मिळणार नाही. कागदावर सरकार शेतकर्यांच्या आत्महत्येच्या केसेस एकतर दाखवत नाही आणि दाखवायच्या असतील तर मग पोलिसखात्याला पैसे चारा म्हणजे पोस्टमार्टेम करुन ते पुढंच थोडं बघतील. मरणानंतर असं मग जगतानाचं लाचखाऊपणाचं चक्र गरिबी आणि परिस्थितीमुळे न भेदता आल्यामुळे शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय??

आपण भारत महासत्ता बनण्याच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे आपल्या कृषीप्रधान देशातल्या भुमिपुत्राची ही अवस्था बदलण्यासाठी काही चालु आहे का? आधी हे लाचखाऊपणाचं चक्रव्युह कसं भेदायचं?? एक नागरीक म्हणुन मी काय करु शकते?? याचा आज माझा स्वतःशी संघर्ष चाललाय. मला हे भीषण सत्य नुसतं चित्रपटातही पाहावत नाहीये आणि कुणीतरी रोज त्याला सामोरं जातयं ही कल्पनाही करवत नाहीये. एक सुजाण, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणारा माझासारखा भारतीय नागरीक यासाठी काहीच करु शकणार नाही का? सरकार सरकार म्हणुन अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच खारीचा वाटा म्हणुनतरी काही ठोस करायला हवय ही भावना आजची रात्र झोप लागु देणार नाही. सध्या आपल्याइथे निवडणुकीचे वारे वाहताहेत त्या पार्श्वभुमीवर नक्कीच हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहिला गेला पाहिजे निदान एक सुजाण नागरीक म्हणुन आपण आपलं पवित्र कार्य बजावताना डोळसवृत्तीने निर्णय घेण्यासाठी.
जाता जाता या चित्रपटातील शेतकर्याचं गार्हाणं सारेखं आठवतयं....

"मातीच्या लेकरांचं मातीमधी मनं सारं.....
वारीत चाललो मी आभाळात ध्यान सारं..... "

Sunday, September 27, 2009

आठवणी दसर्‍याच्या ...

दसरा म्हटलं की फ़क्त प्राथमिक शाळेच्या आठवणी सर्वप्रथम डोळ्यापुढे येतात. उपनगरातील एका छोट्या गावातली ही एक जि.प.ची शाळा असल्यामुळे तिथे पाटीपुजन असायचं. चौथीपर्यंत मी या शाळेत होते. दसर्‍याच्या  आदल्या रात्रीच बाबा काळ्या पाटीला स्वच्छ धुऊन पुसुन खडुने १ आकडा वापरुन सरस्वतीचं चित्र काढुन देत आणि मग नेहमीपेक्षा लवकर सकाळी शाळेत ही पाटी, बरोबर झेंडुची फ़ुलं आणि नारळ असं घेऊन शाळेत जाऊ. त्या दिवशी अभ्यास (मुख्य म्हणजे चौथीतला गणिताचा तास) नसे ह्याचं मुख्य आकर्षण असे. खरंच शाळेत असताना खूपदा दसरा,स्वातंत्रदिन, प्रजासत्ताक दिन यादिवसांच्या महत्वापेक्षाही त्यादिवशी शाळेत जाऊनही शिक्षक आपल्यावर साहेबगिरी करु शकत नाहीत याचा आसुरी आनंद जास्त असे. तरी काही शिक्षक सवयीप्रमाणे निदान रांगेत सरळ न उभं राहाणे किंवा इतर व्यक्तींची भाषणे चालु असताना गप्पा मारणे इ. फ़ुटकळ कारणांसाठी ओरडुन त्यांचा जन्मसिद्ध हक्क सिद्ध करुन जात. असो.

तर पहिली ते चौथी दसर्‍याला पाटीपुजन करताना छान वाटायचे. बाईंनी आणलेली सरस्वतीची तसबीर टेबलावर ठेवलेली असे आणि आपण नेलेली पाटीवरची सरस्वती आपल्यासमोर. स्वतःची आणि मैत्रीणींनी आणलेली फ़ुलं, थोडी बाईंनी दिलेली अशी, आणि थोडं हळद-कुंकु असं ल्यालेली पाटीवरची सरस्वती अगदी दागिन्यांनी नटलेली वाटे. पुजा झाल्यावर आरती आणि मग आम्हीच आणलेल्या नारळाचा, साखर घालुन केलेला प्रसाद खाऊन हात चिक्कट होतं. माध्यमिकची शाळा मात्र ख्रिस्ती मिशनर्यांनी चालवलेली (पण मराठी माध्यमातीलच) असल्याने तिथे हे सण साजरे होत नसे. मला त्यावेळी माझ्या आधीच्या शाळेची खूप आठवण येई. दसर्याला म्हटलेली "हे सरस्वती नमन तुझ्या पदकमली" आता पुर्ण येत नाही पण आठवते.
आई-बाबा दोघेही शिक्षक असल्याने तेही पाटीपुजनाला गेलेले असत. साधारण नऊ-दहा वाजता शाळा सुटे आणि मग दुपारपर्यंत आई-बाबा पण घरी येत. त्यांचा शाळेतला प्रसादही ते आमच्यासाठी घेऊन येत. मग जेवणं होईपर्यंत गुळ किंवा साखर-खोबरं खायला मला फ़ार फ़ार आवडे. इथे फ़्रोजन नारळ्याच्या ओल्या किसात साखर घातली तर उगाच गोडुस चोथा खाल्यासारखं वाटतं. शिवाय कोलेस्टेरॉलचं भुत मानगुटीवर असतं ते वेगळंच. खरंच अशावेळी बालपणीचा काळ सुखाचा हे पुन्हा पुन्हा पटतं नाही??
दसर्‍याला जेवणं काहीतरी गोडाचं असे बहुतेक वेळा नव्या तांदळाची खीर नाहीतर पुरणपोळी. मला गोड तेव्हातरी विशेष आवडत नसे. पण सगळीजणं दुपारच्या जेवणाला एकत्र असली की मला नेहमीच आवडे. या दुपारी आई-बाबा घरी असत, जरा सुस्तावलेली दुपार अजुनही आठवते. मग संध्याकाळी आई नेहमी सिमोल्लंघनाची आठवण करी, शेजारी-पाजारी सोनं वाटायला जात असू. आमचे शेजारचे एक काका मला नेहमी हे घे सोनं आणि तुला बांगडी कर असं म्हणतं. दरवर्षी दागिने बदलले असत. त्या तशा दागिन्याने आतापर्यंत मला वाटतं मी नखशिखान्त नटले असते. पण मजा यायची ते सोनं द्यायला. मागच्या वर्षी माझ्या भाचीला तसलंच काही सांगताना मला फ़ार मजा आली.
कॉलेजला वगैरे मात्र दसरा सुट्टी असणे याखेरीज जास्त काही आठवत नाही. मात्र घरी पुस्तकांची पुजा आवर्जुन करायचो. घरचे संस्कार. अजुनही लॅपटॉप, पुस्तकांचं कपाट याची पुजा करते. इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षी एका छोट्या कंपनीत माझं शेवटचं प्रोजेक्ट होतं, तिथलं टिपिकल मराठमोळं वातावरण. त्यावर्षी मात्र दसर्याच्या पुजेला कंपनीत मलाही आमंत्रण होतं. पुन्हा एकदा शाळेची आठवण आली. दसरा थोड्या वेगळ्या पद्धतीने का होईना पण साजरा झाला. दिवाळीचं गिफ़्ट दसर्‍याला वाटायची त्यांची पद्धत होती म्हणजे दिवाळीला ते उपयोगी पडेल असं काहीसं. मग त्यावर्षी मलाही एक मिठाईचा पुडा मिळाला होता. माझ्या कॉलेजमधल्या एक-दोन मित्रांनी "तुझे काय बाबा जाशील तिथे लाड" अशी प्रतिक्रियाही दिलेली आठवते.
आमच्या भागात अगदी जवळपास कुठे रावण वगैरे जाळत नसत. त्यामुळे प्रत्येक दसर्याच्या की त्यानंतरच्या दिवसाच्या नक्की आठवत नाही पण बातम्यांमध्ये गिरगाव चौपाटीवरचा रावण जाळताना दाखवत तो मात्र आठवणीने पाही. तेव्हा नेहमी मला एकदा तरी गिरगावला तेव्हा गेलं पाहिजे असं फ़ार वाटे पण बारावीत असताना मी चर्नीरोडला राहिले तेव्हा त्या दसर्याला मी काय करत होते ते मात्र अजिबात आठवत नाही. कदाचित सुटीसाठी घरीच गेले असेन. असो. दसरा गेला की दिवाळी अशी हाकेवर आल्यासारखं वाटे. त्यामुळे कधी एकदा सहामाही परिक्षा उरकते आणि शाळेला दिवाळीची सुट्टी पडते असं होई. नशीब माझी शाळेतली प्रगती चांगली होती नाहीतर या मानसिकतेने फ़क्त सुट्या आणि शाळेचे न शिकणार्या दिवसातच रमुन आतापर्यंत पुढचा सगळा बट्ट्याबोळ झाला असता.
आजच्या दसर्‍याला हे सर्व आठवुन विद्यादेवीची पुन्हा एकदा उपासना करायचं ठरवतेय. सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा.

Wednesday, September 23, 2009

५००० +



ब्लॉग लिहिणारा लिहित राहतो. कुठेतरी कौतुक प्रत्येकाला हव असतं. काहींना त्याची सवय होते. माझ्या बाबतीत काय आहे याचा विचार मी काही दिवस करत होते. कधी कधी पटापट प्रतिक्रिया येत राहतात कधी लोक नुसतंच वाचुन जातात. मग कधीतरी काउन्टर टाकला. अर्थात सुरुवातीचं ब्लॉगींग म्हणजे आपल्याला लिहितं राहिलं पाहिजे याकडे जास्त लक्ष होतं म्हणून काउंटर टाकेपर्यंत एखादा महिना गेला असेल. पण नंतर सवय लागली प्रतिक्रियांना उत्तर द्यायला किंवा नवा ब्लॉग टाकायला आलं की आकडा पाहायचा. आणि आज योगायोगाने सहजच आले आणि खूप बरं वाटतंय ५००१ आकडा पाहायला.
मुद्दाम स्र्कीन शॉट घेऊन ठेवलाय. या ब्लॉगवर भेट देणार्या सर्वांचे त्यासाठी आभार मानण्यासाठी आजची ही पोस्ट. आणि हो जास्त धन्यवाद ज्यांनी आपल्या अमुल्य प्रतिक्रिया देऊन हा ब्लॉग जागता ठेवायची उमेद वाढवलीत त्यांचे.
सध्या बर्याच गोष्टींच गणित बिघडलय; कदाचित माझ्या आधीच्या पोस्टवरुन लक्षात आलं असेल. पण आज मात्र दिवस संपताना फ़ार छान वाटतय.असाच लोभ राहु द्या.



Tuesday, September 22, 2009

मना तुझे मनोगत मला कधी कळेल का??

कुणी नुसतं "काय होतंय तुला?" विचारावं आणि बांध फ़ुटावा अशी मनाची अवस्था फ़ार विचित्र असते. नक्की काय बिनसलंय कळत नाही. असं कधीपासुन होतंय आठवत नाही. हे सगळं असंच चालु राहिल, असं नसतं पण आत्ता या क्षणी ते कळत नाही. असं वाटत की ही सगळं काही थांबल्याची जाणीव अशीच पाठी लागणार. आता यातुन सुटका नाही.
मग मात्र सारखा एकटेपण जाणवायला लागतं. गर्दीत असलं तरी हरवल्यासारखं. सवयीने रोजची कामं तीच तशीच म्हणून करतो आणि आजचा दिवस संपला म्हणून रात्री पाठ टेकतो. आजुबाजुच्या परिस्थितीत आपल्याला हवा तसा बदल घडवून आणण्यासाठी काय केलं पाहिजे याचा शोध घेतो आणि त्यातुन काही निष्पन्न होत नाही म्हणून अजुन अजुन मन उदास होतं.
हे सर्व दुष्टचक्र इतकं विचित्र की आपल्या मनात काय चाललंय याचा थांग आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला, मित्राला कुण्णाकुण्णाला लागु देत नाही. वरवर सगळीकडे पुर्वीसारखंच वागत राहतो पण आतुन मात्र कुठेतरी काही तरी ढवळून निघालेलं असतं. यशाच्या व्याख्या शोधत राहातो आणि मग आपण कुठे कमी पडतोय त्याचाच शोध घेत राहातो. पाण्यात बुडणारा शेवटचा उपाय म्हणून सगळीकडे हात-पाय मारेल तसंही करुन पाहातो. नेहमीच त्यातुन वर यायला होईल असंच नाही पण प्रयत्न करत राहतो.
अरे आपल्या बाबतीत कसं असं घडतयं?? बाकीच्यांचं कसं व्यवस्थित चाललंय असं उगाच वाटतं. काही काही प्रश्न तर असे असतात की यावर आपण स्वतः काहीच उपाय करु शकत नाही हे माहितही असतं पण या सर्वांनी होणारा त्रागा काही संपत नाही.
अशावेळी ऐकलेली गाणी डोळ्यात पाणी आणतात, वाचन अंतर्मुख करतं आणि भावनांचा कल्लोळ अजुनच वाढतो. सगळं वरवरुन शांत आणि आतुन खूप खूप ढवळलेलं. अशावेळीच खरं तर मनाला सांभाळणं फ़ार गरजेच असतं. न कोसळता आहे त्या परिस्थितीचा सामना करत राहुन हेही दिवस जातील आणी यातुनही आपण काही नवं शिकुन बाहेर येऊ असा काहीसा विचार स्वतःच स्वतःला द्यायचा असतो. परिस्थितीनुसार य़शापय़शाचे मापदंड बदलणे आणि आपलं आपणच अशा कोंडीतुन बाहेर येणं हेच हाती असतं.
तरी चंचल मन पुन्हा पुन्हा त्याच त्याच विचारात जातं मग काय उरला एकच प्रश्न मना तुझे मनोगत मला कधी कळेल का??

Sunday, September 13, 2009

एका आईचं पुनरागमन

गेले सत्तावीस महिने ती आपली मुलगी आणि घर यात आनंदाने रमली. इतके दिवस तिने टेनिसचा एकही सामना पाहिला नाही. तिला जमलं नसतं असं नाही पण तिने पुर्णवेळ आपल्या बाळीलाच दिला. आणि आता ही पोस्ट लिहिण्याच्या काही क्षण आधी ती पहिली स्पर्धक आहे की जी वाइल्ड कार्डमधुन खेळुन यु. एस. ओपनच्या फ़ायनला नुसती पोहोचलीच नाही तर तिच्या विरोधातली तरुण तडफ़दार स्पर्धक कॅरोलाइन वोजनियाकी हिचा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवून दिमाखात अमेरिकन ओपनचा चषक आपल्या हातात उंचावतेय. "किम क्लाईस्टर्स" २००९ ची अमेरिकन ओपनची विजेती. आजची रात्र तिच्यासाठी आणि तिच्यासारख्या पुनरागमन करणार्या सर्वच आया यांच्यासाठी खास...

तसं तिच्या कारकिर्दीतलं हे दुसरं मोठं पदक. पहिलं इथेच २००५ ला घेतलं होतं आणि योगायोगाने पुनरागमनातही तिने इथेच श्रीगणेशा केला. आणि १९८० नंतर टेनिसमधलं कुठलंही मोठं पदक मिळवणारी ही पहिली आई आहे. टेनिसच्या जगतात एका आईसाठी हे नक्कीच कठिण आहे कारण एका बाळाच्या जन्मानंतर पाठीची अवस्था आणि पोटाच्या स्नायुमध्ये आलेली शिथीलता याने टेनिसचा कणा म्हणजे सर्विस करताना its just not the same again. शिवाय या सत्तावीस महिन्यात सगळ्या नव्या दमाच्या तारकांशी सामना करायला तो स्टॅमिनाही हवा. तिला वाइल्ड कार्डजरी मिळालं असलं तरी तिचा ड्रॉ अतिशय कठिण होता आणि उपान्त्य फ़ेरीमध्ये तर विनस विल्यम्सबरोबर तिचा सामना होता. अंतिम फ़ेरीच्या या मॅचमध्ये सुरुवातीला कॅरोलिनाने किमची सर्विस ब्रेक करुन पुढचा रस्ता कठीण आहे याची जाणीव तिला करुन दिली होती. हा सेट जाणार असे कागदावर वाटत असतानाच या कणखर मातेनं ७-५ असा अक्षरश: खेचुन आणला आणि दुसर्या सेटमध्ये मात्र कॅरोलिनाला डोकं वर काढायला दिलं नाही. हा सेट तिने अगदी ६-३ असा अलगद खिशात घातला आणि मग मात्र तिला अश्रु आवरेनासे झाले.

तिची अठरा महिन्यांची छोटी मुलगी जेडसुद्धा मॅच पाहायला आली होती आणि तिच्या चषक घेतानाच्या मुलाखतीत त्याबद्द्ल विचारलं त्यावेळी इतर कुठल्याही पालकाप्रमाणे ती निरागसपणे म्हणाली की आज आम्ही आमच्या मुलीची दुपारची झोप थोडी उशीरा केली म्हणजे ती ही मॅच पाहायला जागी राहील. आणि उद्यापासून मला पुन्हा तिला रुटीन नीट करावं लागेल. तिला तिचं नेहमीचं आईपणाचं आयुष्य उद्यापासून पुन्हा हवय हेही तितकंच महत्वाचं नाही का?
टेनिसच्या इतिहासात मी पहिल्यांदाच चषक वितरण झाल्यानंतर एक संपुर्ण कुटुंब कोर्टवर पाहतेय. त्या छोट्या मुलीला आपल्या आईने काय मिळवलंय हे नक्कीच इतक्यात कळणार नाही पण ती चकाकणारी वस्तु काय आहे याची उत्कंठा नक्कीच आहे आणि त्या आईच्या डोळ्यात आपल्या लेकीची प्रतिक्रिया पाहण्याचा आनंद.
अशा अनेक छोट्या मोठ्या क्षेत्रात आपल्या जिद्दीवर आपलं घर सांभाळुन करिअर मध्ये पुनरागमन करणार्या अनेक मातांना हजारो सलाम....

Thursday, September 10, 2009

बटाटावडा..

आज सरदेसाईंच्या ब्लॉगवर दुपार दुपारी बटाटावड्याचा ताजा फ़ोटो पाहिला आणि एकदम संध्याकाळ झाली की काय असं वाटुन पोटोबाने गजर दिला...भारताबाहेर म्हणण्यापेक्षा मुंबईबाहेर राहिल्यावर सर्वात जास्त ज्या खादाडीची आठवण येते ती म्हणजे बटाटावडा...
लहानपणापासुन बटाट्यावड्याशी नाळ जुळली आहे जी कधी तुटणार नाही..अगदी पुर्वी तिथे राहायचो त्या इमारतीखाली एका रिकाम्या पटांगणात बाजार भरायचा आणि तिथेच पांडू आपली वड्याची गाडी लावायचा.

मध्ये काही वर्ष त्याला नोकरी मिळाली तेव्हा बंद झाला होता पण नंतर पुन्हा घरच्या परिस्थितीमुळे बहुधा त्याने पुन्हा ती सुरू केली. साधारण साडेपाचच्या सुमारास तो उकडलेले बटाटे घेऊन बाकी सर्व सामान गाडीवर लावुन शांतपणे वडे करण्याच्या तयारीला लागला की चाळीच्या गॅलरीतुन आणि आसपासच्या घराच्या खिडकीतुन माझ्यासारखी शाळा सुटुन आलेली मुलं ते कितीतरी वेळ पाहात बसत. त्याच्या त्या पितळी मोठ्या थाळीत साधारण मध्यम आकाराच्या चिकुएवढाले गोळे गोलाकारात लावले जात आणि एका बाजुला काळ्याढुस मोठ्या कढईत (बहुधा कालचं उरलेलं) तेल उकळायला लागे. सवा-सहा साडे सहाच्या सुमारास त्या छोट्या गावातल्या त्या छोट्याशा बाजारात कोळणी आपल्या पाट्या घेऊन टांग्यातुन उतरत आणि गावातलेच एक दोन भाजीवाले आपल्या भाजीच्या गाड्या घेऊन येत तसतशी गर्दी वाढे आणि भाजी-बाजार घेऊन झालेलं गिर्हाइक आपसुक पांडुकडे वळत.

तोपर्यंत त्याचे एक-दोन घाणे तळले गेले असत आणि वड्याच्या तळणीचा वास सुटला असे. मग बसस्टॉपवर कामावरुन परत आलेले लोकही घरी काही खाऊ म्हणून हाच वडा घेऊन जात. रात्री परतीच्या टांग्याची वाट पाहताना पोटाला आधार म्हणून वडा घेणार्या कोळणी त्याचं सर्वात शेवटचं गिर्हाइक असावं. त्याच्या वड्याचं नावच मुळी "पांडुवडा" होतं. आकाराला थोडा छोटा असला तरी हा वडा असा बाहेरच्या हवेवर तळल्यामुळे की काय माहित नाही पण सॉलिड चविष्ट होता. मुख्य म्हणजे बाकीच्या वडेवाल्यांसारखं त्याने कधी आपल्या वड्याच्या गाडीवर दुसरीकडे चहा, लाडु अमकं-तमकं विकायला सुरुवात नाही केली. माझ्या माहितीतला एकनिष्ठ वडेवाला म्हणजे आमचा पांडु वडेवाला.
माझी आई बाहेर खाण्याला तसा बर्यापैकी विरोध करणारी त्यामुळे त्याचे वडे खायचे म्हणजे बाबा कधीतरी घरी येता येता घेऊन येत तेव्हा ती काही विरोध करु शकत नसे तेव्हाच. आणि लहानपणी आम्ही स्वतःच असं बाहेर जाऊन एकटं काही विकत घेऊन खाल्याचं आठवत नाही. तर असा हा कधीतरी खालेल्ला पांडुवडा माझ्या आयुष्यातल्या असंख्य वड्यांपैकी पहिला आणि मानाचा.
त्यानंतर रुपारेलला गेल्यामुळे दादरला जाणं वाढलं आणि श्रीकृष्ण वडेवाल्याचा छबिलदास गल्लीतला उभा वडा आयुष्यात आला. तसा रुपारेलच्या कॅंटिनचा वडाही छान असतो पण तिथे समोसा-पावाची जोडी जास्त चलतीत होती. पण त्याबद्दल नंतर कधी. तर हा श्रीकृष्णचा वडा मला इतका आवडतो की मी माझ्या प्रत्येक मुंबई दौर्यात तो आवर्जुन खाते. फ़क्त त्याने आता वड्याबरोबरच इतर सगळे पदार्थ विकायला सुरुवात केलीय आणि तिथे जवळ जवळ उभं रेस्टॉरन्ट झालंय पण त्याचा वडा मला अद्याप आवडतो. बारावीला असताना चर्नीरोडला राहिले होते, तेव्हा मी आणि माझी मैत्रीण तिथल्या सखीचा वडापावही आवर्जुन खात असु.

नंतर माझ्या एका इंजिनियरिंगच्या मैत्रीणीबरोबर पहिल्यांदा पुण्याला जाताना कर्जतचा चपटा वडा खाल्ला आणि मग कर्जतच्या बाजुने कधीही गेलं तर हाही वडा हक्काचा . थोडा तिखट आणि त्यांची चटणी नेहमी त्याला लागलेलीच असते असं मला आठवतय. गेले आठेक वर्षंतरी हा वडा खाण्याचा योग आला नाही. आता लिस्टवर टाकावा लागेल.
कर्जतप्रमाणे ट्रेकसाठी कुठेही गेलो तर त्या त्या स्टेशनवर मिळणारे वडेही आमच्या ग्रुपने चवीने खाल्ले आहेत. प्रत्येक वड्याचं आपलं एक वेगळं अस्तित्व असतं आणि त्या त्या ठिकाणी त्याचे चाहते असतात असं मलातरी वाटतं. ठाण्यातही माझ्या मावसबहिणीने असाच एका ठिकाणचा वडा खिलवला होता पण आता नाव विसरले.
नंतर नोकरीसाठी आर बी आय माझा क्लायन्ट होता तेव्हा मी आणि माझा कलिग योगेश कधीकधी दहाच्या सुमारास न्याहरीला त्यांच्याकडचा वडा खायला जायचो. आणि परतताना कधी प्रचंड भूक लागली असली की चर्चगेट स्टेशनला गाडी लागली की डब्यात एक बाई स्टीलच्या डब्यातुन बनवलेले वडे घेऊन येई. मला वाटतं पाच रुपयाला दोन का काय तेही मी खूपदा खाई. संध्याकाळच्या एका फ़ास्ट लोकलच्या लेडिज फ़र्स्ट क्लासचा एक ग्रुप होता त्यांच्यातील एक बाई दादरला चढे. पुष्कळदा तिला उभा वडा घेऊन यायला सांगितलं असे मग ती आली की सगळा ग्रुप चवीने गाडीत हा वडा खाई. आणि अर्थातच तिला वड्याचे नंतर पैसे देत. फ़क्त त्या वड्यासाठी मी एक-दोनदा माझाही नंबर त्यांच्यात लावला होता.
वड्यांचा विषय निघाला आणि माझ्या बाबांचा मी उल्लेख केला नाही तर ही पोस्ट पुर्ण होणार नाही. आमच्याकडे मी वर म्हटल्याप्रमाणे आईला बाहेर खायचं वावडं आणि माझ्या बाबांना तळकट खाणं प्रचंड प्रिय मग या दोघांनी एक तडजोड केली होती ती म्हणजे मग अशा गोष्टी घरीच करणं. मग अशाच एखाद्या रविवारी चारच्या चहाच्या आधी बाबा सांगत चला आज वडे करुया आणि एक त्यांची चांगली गोष्ट म्हणजे ते आईला या कामाला लावत नसत. स्वतः लसुण सोलण्यापासुन सुरुवात. बाबांनी साग्रसंगीत बनवलेले वडे इतके छान लागत की कित्येक रविवारी रात्रीच्या जेवणालाही मी त्यातला उरलेला वडा खाऊन आईचा ओरडा नको म्हणून उगाच थोडा वरणभात असंही जेवलेलं आठवतयं.
असा हा इतका प्रिय वडा आता आपल्या आयुष्यात नाही हे जेव्हा लग्नानंतर आम्ही शिकागोला आलो तेव्हाच्या पहिल्याच रविवारी जाणवलं आणि मी माझ्या नवर्याला म्हणाले इथं वडा नाही ना मिळणार आपल्याला कुठे?? तो तसा माझ्या तिनेक वर्ष आधी आलेला त्यामुळे सरावलेला आणि मुख्य म्हणजे शिकागोला बर्यापैकी भारतीय दुकाने, रेस्टॉरन्टस आहेत. मला म्हणाला आहे एका ठिकाणी आणि आम्ही त्या भारतीय दुकानाला जोडुनच एक छोटं फ़ास्टफ़ुड कॉर्नरसारखं होतं तिथे गेलो. तिथल्या मुलीने आम्ही तिथे खाणार म्हटल्यावर चक्क आमच्यासमोर ती वड्याची प्लेट मायक्रोवेव्हमध्ये टाकल्यावर मला कसतरीच झालं. मी याला म्हटलं अरे हे काय? तो काय म्हणणार.. तो सरावलेला (आणि आता मीही) खर सांगते मला तो होपलेस वडा बिल्कुल आवडला नाही. तरी मी स्वतः करुया वगैरे विचार केला नाही कारण माझं स्वयंपाकघरातल ज्ञान यथातथाच होतं आणि करायचा कंटाळा.

पण असं किती दिवस चालणार शेवटी कधीतरी एकदा बाबांना विचारुन आम्ही दोघांनी मिळून घरीच वडा केला आणि अर्थातच त्यात गाडीवाल्याचा निढळाचा घाम नाही ना म्हणून तो तसा लागणार नाही असं मनाचं समाधानही. नशीबाने माझा नवराही वड्याच्या बाबतीत माझ्यासारखाच आहे त्यामुळे आम्ही दोघंमिळुन अधुन मधुन वडा घरीच बनवत असतो तर आताशा जरा बराही होतो. वडा जरी बरा झाला ना तरी वडा-पाव मात्र इथे कधीच आपल्या भारतासारखा लागत नाही कारण तो पाव तसा इथं मिळत नाही.
मला आठवतं माझ्या नवर्याने माझ्या आई-बाबांना तिथुन इथे येताना वडा-पाव घेऊन यायला सांगितलं होतं आणि त्यांनी असे शिळे काय आणायचे म्हणून आणलेच नव्हते. मग नंतर त्याचा एक भाचा इथे आला होता त्यालाही वडा-पावच घेऊन यायला सांगितलं होतं आणि तो मस्त कुठच्या तरी गाडीवरचे त्याच्या ओरिजिनल कागदासकट घेऊन आला होता. आणि ते खाताना आम्ही हम्म्म्म्म्म आता कसं आपल्यासारखं वाटतोय असं एकदमच म्हणालो होतो.
माझे आई-बाबा जेव्हा इथं आले होते तेव्हा माझी खूप दिवसांची इच्छा म्हणजे बाबांना माझ्या हातचे वडे खाऊ घालणं ही मी त्यांना स्टॅच्यु ऑफ़ लिबर्टीला नेलं तेव्हा पुर्ण केली. इथे बाहेर काही खायचं म्हणजे त्यांना नेहमीच आवडत नसे. त्यादिवशी मात्र एलिस आयलंडला बसुन सगळ्यांनी मजेत वडा-पाव खाल्ला होता. वडेही त्यादिवशी मस्त झाले होते. एका वड्याच्या रेसिपीच्या पोस्टने मी इतकी भरकटुन आले की आता मला वाटतं या रविवारी संध्याकाळी वडे केलेच पाहिजेत नाहीतर पोटोबाचं काही खरं नाही. कुणी सांगितलं होतं इथे वडा न मिळणार्या देशात येऊन राहायला??? काय??

Monday, September 7, 2009

शिक्षकदिनी भेटलेली शिक्षिका

आपल्या घरातली नको असलेली वस्तु टाकुन द्यायची नसेल आणि कुणाला द्यायची असा प्रश्न पडला असेल तर उत्तम ठिकाण म्हणजे मायाजाल अर्थात इंटरनेट. वस्तुला नवा मालक मिळतो, तिचा उगाच कचरा होण्याचं टळलं जातं आणि मालकाला थोडेफ़ार पैसे मिळतात. त्यासाठी काही खास लोकल साईट्स पण आहेत. तर अशाच एका साईटवर मी घरातले काही जाजम विकायला ठेवले होते. मुलगा जेव्हा नुकताच रांगायला लागला होता तेव्हा आमच्या घरात खाली डायनिंग एरिया आणि लिव्हिंग रुमला हार्डवुड आहे तिथे तो पडून त्याला लागेल म्हणून दोन मोठे जादा रग्ज घेतले होते. माझ्या अंदाजापेक्षा त्याला कुठे पडल्यावर लागेल ते लवकरच कळायला लागलं शिवाय आता तर तो जवळजवळ धावतच असतो. त्यामुळे अर्थातच आता हे रग्ज काय करायचे त्याचा प्रश्न पडला होता म्हणून मग शेवटी ते विकण्यासाठी ठेवले.

मी शुक्रवारी ते टाकले आणि संध्याकाळीच त्यांचे फ़ोटो पाठवण्यासंबंधी एक-दोन मेल्स आले. त्यातच एक होतं "बेकी" नावाच्या एका बाईचं. पहिल्या मेलमध्ये ती फ़ोटो पाहायचे आहेत हे विचारायलाच विसरली होती मग लगेच नंतर दुसर्या मेलमध्ये तीही चौकशी केली होती. तिच्या पहिल्या मेलमध्ये तिने मला लिहिलं होतं की ती मुलांना स्टोरी टाइमसाठी बसायला अशा रग्ज शोधते आहे. मला वाटलं एखादी पाळणाघरवाली असेल. असो. त्यानंतर मी तिला आणि अजुन एक-दोघांना ते फ़ोटो पाठवले.

शनिवारी सक्काळ-सकाळी तिचं उत्तर होतं हे माझ्या मुलांसाठी अगदी योग्य आहेत. आज तुला वेळ आहे का? मी तिला माझा फ़ोन नंबर देऊन फ़ोन कर म्हणून सांगितलं. त्यानंतर आमचा आपला शनिवार नेहमीप्रमाणे चालला होता. संध्याकाळी समुद्रकिनारी जायचं ठरत होतं त्याची तयारी पण चालली होती आणि साधारण तीनेक वाजता तिचा फ़ोन आला, आत्ता येऊ का? मी पत्ता देऊन म्हटलं लगेच आलीस तर बरंच आहे, म्हणजे नंतर आम्हाला बाहेर जायचं असेल तर निघता येईल.

दहा मिनिटात तिची शेव्ही आमच्या ड्राइव्हवेला आली. नवरा चालवत होता. टिपिकल अमेरिकन, गोरी आणि अतिशय जाडी. नवरा मात्र एकदम बारीक. दोघं अगदी लॉरेल आणि हार्डीसारखी. तिचं हसणं मात्र एकदम प्रसन्न होतं आणि बोलणंही खूप लाघवी. तिला मी ते रग्ज दाखवले आणि तिने लगेच मी जितके लिहिले होते तितकेच पैसे देऊन नवर्याने ते लगेच गुंडाळी करुन उचललेसुद्धा. हे सर्व चालत असताना आमचं थोडं बोलणंही होत होतं. मी तिलाही म्हटलं की मुलगा रांगायला लागला म्हणून हे घेतले. आणि ती लगेच हसून म्हणाली नाही तरी मुलगे जास्त दिवस रांगत नाहीतच. ते लगेच धावायला लागतात. मी म्हटलं तेही खरचं आहे.

ती निघताना दरवाज्यात पुन्हा म्हणाली की हे रग्ज मुलांना खूप आवडतील.तेव्हा मला उगाच विचारावसं वाटलं की तिचं पाळणाघर आहे का?? सुप्त हेतु माझ्या मुलाला मध्ये पाठवायची वेळ आली तर उपयोगी पडेल का हाही होता. आणि तिचं उत्तर ऐकुन मी चकितच झाले. आमच्या इथल्याच एका शाळेतली ती शिक्षिका होती. तिच्या शाळेतल्या मुलांसाठी ती हे नेत होती. आणि इतकं बोलुन ती दोघं झटकन निघाली. घरात आल्यावर मी या प्रसंगाचा विचार करत होते. मी लहान असताना मला आठवतं शाळा सुरू व्हायला आल्या की आई-बाबांना त्यांच्या शाळेतल्या मुलांना काहीबाही न्यायचं असे. कधी गोष्टींची पुस्तकं, जुने कपडे, मागच्या वर्षीच्या राहिलेल्या कोर्या पानांच्या बाईंड करुन बनवलेल्या वह्या. काही सणासुदीला घरी बनवलेले खायचे पदार्थ आणि पावसाळ्यात तर बाबा झाडांची रोपेपण नेत. आमचं चाळीतलं छोटं घर लावायला जागा नसे पण अशी असंख्य रोपे दर पावसाळ्यात बाबा त्यांच्या मुलांना लावायला देत नाहीतर शाळेच्या अंगणात लावत.

अमेरिकेतल्या पब्लिक स्कुल सिस्टिममध्ये खरं तर सर्व थरांमधली मुलं जातात पण मला प्रत्यक्ष अनुभव नसल्याने माहित नाही आहे. सध्या रेडिओवर इथल्या मंदिमुळे बरीच अर्थकपात चालु आहे आणि काही शाळा बंद करुन नाहीतर विभागातल्या शाळा कमी करणं वगैरे चालु आहे हे ऐकतेय. आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात इथल्या शाळा उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीनंतर पुन्हा उघडतील. त्यासाठीच बेकीने ही खरेदी केलेली दिसतेय.अशा प्रकारे एका शिक्षिकेने शाळेतल्या मुलांना गोष्टीच्या तासाला बसण्यासाठी स्वतःची पदरमोड करुन अशा प्रकारे जाजम विकत घेतल्याचे पाहुन मला उगाचच आपल्या इथल्या पालिका शाळांची अवस्था वगैरे सर्व आठवलं. इथंही शिक्षक असे प्रकार करतात असं दिसतयं. शेवटी "घरोघरी मातीच्या चुली."

मागची शिक्षकदिनाची पोस्ट लिहुन झाल्यावर साधारण तासेकभरातच हा प्रसंग घडला त्यामुळे थोडं विचित्र वाटत होतं. आधी विचारलं असतं तर तिला असेच ते रग्ज देऊन टाकले असते असही मनात आलं. कारण काही असो पण नेमकं पाच सप्टेंबरलाच असं झालं हे आता नेहमीच लक्षात राहिल.

Saturday, September 5, 2009

शिक्षकांची मुलं....

लहानपणापासुन असं एकही वर्ष गेलं नाही की शिक्षकदिनाच्या चर्चा घरात झाल्या नाहीत. मुख्य कारण आई-बाबा दोघंही शिक्षक. आणि हे प्रकरण तेवढ्यावरच थांबलं नाहिये तर दोन मावशा, एक काका, दोन मावसबहिणी, तीन चुलतभाऊ, चार मामेबहिणी, एक मामेभाऊ, दोन आतेभाऊ....ई.ई....मोssssठठी यादीही शिक्षकच....खर तर आमच्या आई आणि बाबा दोन्हीकडे शिक्षक नसलेल्यांची यादी केली तर मग उरलेले शिक्षक असं सांगितलं तर जास्त सोप्प आणि थोडक्यात होईल.

तर हे सगळे शिक्षक पण जर ही यादी नीट पाहिली तर माझ्या एक लक्षात एक गम्मत आली ती म्हणजे जे स्वतः शिक्षक आहेत त्यांची पुढची पिढी शिक्षकी पेशामध्ये नाहीये. आणि या उलट म्हणजे जी पुढची पिढी शिक्षणक्षेत्रात आहे त्यांचे पालक शिक्षक नाहीत. म्हणजे पाहा माझ्या घरी दोघं शिक्षक आणि आम्ही एकही भावंड शिक्षणाशी संबंधीत क्षेत्रात नाही. अगदी कॉलेजजीवनात मी शिकवण्या केल्या पण त्यातही थोडे इंजिनियरिंगची पुस्तकं इ. विकत घ्यायला मिळावं इतकाच भाव. त्यापलिकडे काही नाही. माझ्या ज्या दोन मावशा शिक्षिका आहेत त्यांच्या मुलांचंही तसंच. मात्र ज्या दोन मावसबहिणी शिक्षिका आहेत ती माझी मावशी मात्र गाण्याची आवड असणारी सुगृहिणी. एक काका देशसेवेचे व्रत घेतलेला मात्र त्याचा मुलगा प्राध्यापक. तसच आत्या आणि मामांकडेही.

सहज विचार करताना वाटतं का असं झालं असावं? म्हणजे डॉक्टरचा मुलगा जसा डॉक्टर असं आपण जास्त अभिमानाने सांगतो तसं कधीच शिक्षकाचा मुलगा शिक्षक अशी जोडी जुळवतो का?? आमच्या घराबद्द्ल फ़क्त बोलायचं तर ज्यावेळी माझे आई-बाबा शिक्षक होते त्या काळातला त्यांचा (प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा) पगार पाहिला आणि त्याची तुलना माझ्या वर्गातल्या कुठल्याही मुलांच्या पालकांच्या मिळकतीपेक्षा केली तर ती कमीच असणार हे सांगायला नको. मी माझ्या शाळेतल्या सहलींना जायच्या ऐवजी खूपदा आई किंवा बाबांच्या शाळेच्या सहलींनाच जाई कारण ते स्वस्त पण असे. आणि उगाच मारुन मुटकुन स्वतःच्या शाळेतल्या सहलींना गेलं तरी बाकी मुलं बाहेर खर्च करु शकतात आपल्याला माहित असतं आपल्याला काय परवडणार ते...स्वतःलाच तो वायफ़ळ वाटतो आणि मग समुहापासुन वेगळं पडणं इ.इ. पासूनही सुटका...असो.

हे सगळं लिहिण्यामागे कुठेही पैशाला महत्व देणं असं काही नाही पण त्यावेळी खरच खूपदा वाटायचं की आपले बाबा जर एखाद्या महिंन्र्दा नाहीतर एल ऍन्ड टी मध्ये असते तर कसा छान दिवाळी बोनस मिळाला असता किंवा आई एखाद वेळेस मंत्रालय नाहीतर इन्कमटॅक्स मध्ये असती तर वा वगैरे...त्याचा परिणाम असेल कदाचित आम्ही भावंडांनी साधारण ठरवलं होतं की काहीही होवो पण शिक्षक अजिबात व्हायचं नाही. आमच्या आई-वडिलांनाही त्यांना जास्त शिक्षण घ्यायला मिळालं नाही म्हणूनही असेल पण आम्ही जास्तीत जास्त कसं शिकु हेच पाहिलं. त्यात आम्ही प्राध्यापक वगैरे तरी व्हावं किंवा नाही असा कधी विषय नव्हता. शेवटी कुठेतरी आमच्या घरात तरी शिक्षकी परंपरा अशी सरळ पुढच्या पिढीत आली नाही. पण तरी घरातल्या घरात बरेच शिक्षक आहेत हेही खरयं.

असो. आता परिस्थिती बरीच बदलली आहे. आमची जी मावस,चुलत भावंडं शिक्षक आहेत त्यांचं आर्थिक दृष्ट्याही छान आहे शिवाय त्यांना तो मोठमोठ्या सुट्या (दिवाळी, मे ई.) मिळण्याचा फ़ायदा आहे. काळ बदलला आहे. पण जेव्हा जेव्हा शिक्षकदिन येतो; मी माझे आई-वडिल, मावशा सगळयांना शुभेच्छा देते तेव्हा नकळत आम्ही कुणी त्या पेशात गेलो नाही हा विचार मनात रेंगाळतो आणि मग मन आठवणींच्या पापण्या फ़डकावत राहातं.