सध्या सगळीकडे घरांपुढे कोरलेले भोपळे आणि त्यात लावलेल्या मेणबत्या दिसतात. काही ठिकाणी वेगवेगळे रंग आणि आकाराचे भोपळे सुबकरित्या रचुन ठेवलेत..सरता उन्हाळा आणि कापणीचा हंगाम संपल्याच्या आठवणी आहेत. आता भले सगळीच जण शेती करत नाहीत. पण हे ऋतुप्रमाणे घरसजावटीची अमेरिकन पद्धत माझ्या आईलाही खूप आवडते..
मान गये..बरेच दिवस ठरवत होते त्यावर लिहिन आज सुदिन उगवलाच आहे तर लगे हातो तेही फ़ोटो टाकुन देते.
भोपळ्याची आठवण आजच यायचं कारण आज इथे अमेरिकतला एक सण "हॅलोविन" साजरा होतोय. त्यानिमित्ताने सगळीकडे कोरलेले भोपळे आणि त्यात ठेवलेल्या मेणबत्या इ. दिसतयं. कधी नव्हे ते आम्हीही मुलाच्या निमित्ताने "ट्रिक ऑर ट्रीट" साठी जाऊन आलो. अरे आपण हे आधीच का नाही केलं असं ती आलेली वेगवेगळ्या चवीची चॉकोलेट्स खाताना वाटतंय.
या सणामागचं नक्की शास्त्र माहित नाही आहे पण जे काही ऐकलंय त्यावरुन मला वाटतं या दिवसात रात्री मोठ्या होत्यात तसं भुताच्या आठवणी जाग्या होत असाव्यात. तर अशा वाईट मृतात्म्यांना पळवुन लावायचं म्हणजे स्वतःच वेगवेगळे शक्यतो भीतीदायक कपडे घालुन संध्याकाळ झाली की फ़िरायचं आणि घरोघरी जाऊन म्हणायचं "ट्रीक ऑर ट्रीट?" म्हणजे आता घाबरवु की तुम्ही मला काही देताय?? मग समोरचा निमुटपणे ट्रीट म्हणजे चॉकोलेट देतो. गावात एखादा भूतबंगलाही उभारला असतो. त्यात जायचं म्हणजे पण मजाच असते.
आजकाल काही काही लोकं चॉकोलेट ऐवजी मुलांच्या खेळायच्या वस्तुही जसं प्ले डो इ. देतात. समजणारी मुले ती इतकी गोळा केलेली चॉकोलेट्स हट्टाने खातात म्हणून असेल. आम्हाला काय ते टेंशन नव्हतं. म्हणजे सुरुवातीला आमच्या बाळाला कळत नव्हतं की हे काय चालु आहे म्हणुन तो असं लोकांकडून काय घ्यायचं म्हणून नुसताच पाहात होता. मग एक-दोन घरं झाल्यावर आम्ही त्याला एक चॉकोलेट खायला दिलं मग मात्र अंदाज आला त्यालाही या ट्रीटचा. त्याच्यापुढच्या घरात तो आपला स्वतःहुन अजुन हात पुढे करतोय. मजा आहे..
आम्ही त्याला एक डायनॉसोरसारखा कपडा आणला होता. तो घालुन आमच्या आसपासच्या काही ओळखीच्या आणि काही अनोळखी घरांमध्ये फ़िरलो. थोड्या वेळाने कंटाळा आल्यावर मात्र घरात आल्यावर त्याचं चॉकोलेटचं मडकं आम्ही लपवुन ठेवलंय. तो झोपला की आम्ही ती हळूहळू खाऊ...किती दुष्ट आई-बाप आहोत ना?? अहो पण याच वर्षी. पुढच्या वर्षी त्याची चॉकोलेट्स ढापायची काही नवीन ट्रीक आम्हालाच शोधावी लागेल.