आज
सरदेसाईंच्या ब्लॉगवर दुपार दुपारी बटाटावड्याचा ताजा फ़ोटो पाहिला आणि एकदम संध्याकाळ झाली की काय असं वाटुन पोटोबाने गजर दिला...भारताबाहेर म्हणण्यापेक्षा मुंबईबाहेर राहिल्यावर सर्वात जास्त ज्या खादाडीची आठवण येते ती म्हणजे बटाटावडा...
लहानपणापासुन बटाट्यावड्याशी नाळ जुळली आहे जी कधी तुटणार नाही..अगदी पुर्वी तिथे राहायचो त्या इमारतीखाली एका रिकाम्या पटांगणात बाजार भरायचा आणि तिथेच पांडू आपली वड्याची गाडी लावायचा.
मध्ये काही वर्ष त्याला नोकरी मिळाली तेव्हा बंद झाला होता पण नंतर पुन्हा घरच्या परिस्थितीमुळे बहुधा त्याने पुन्हा ती सुरू केली. साधारण साडेपाचच्या सुमारास तो उकडलेले बटाटे घेऊन बाकी सर्व सामान गाडीवर लावुन शांतपणे वडे करण्याच्या तयारीला लागला की चाळीच्या गॅलरीतुन आणि आसपासच्या घराच्या खिडकीतुन माझ्यासारखी शाळा सुटुन आलेली मुलं ते कितीतरी वेळ पाहात बसत. त्याच्या त्या पितळी मोठ्या थाळीत साधारण मध्यम आकाराच्या चिकुएवढाले गोळे गोलाकारात लावले जात आणि एका बाजुला काळ्याढुस मोठ्या कढईत (बहुधा कालचं उरलेलं) तेल उकळायला लागे. सवा-सहा साडे सहाच्या सुमारास त्या छोट्या गावातल्या त्या छोट्याशा बाजारात कोळणी आपल्या पाट्या घेऊन टांग्यातुन उतरत आणि गावातलेच एक दोन भाजीवाले आपल्या भाजीच्या गाड्या घेऊन येत तसतशी गर्दी वाढे आणि भाजी-बाजार घेऊन झालेलं गिर्हाइक आपसुक पांडुकडे वळत.
तोपर्यंत त्याचे एक-दोन घाणे तळले गेले असत आणि वड्याच्या तळणीचा वास सुटला असे. मग बसस्टॉपवर कामावरुन परत आलेले लोकही घरी काही खाऊ म्हणून हाच वडा घेऊन जात. रात्री परतीच्या टांग्याची वाट पाहताना पोटाला आधार म्हणून वडा घेणार्या कोळणी त्याचं सर्वात शेवटचं गिर्हाइक असावं. त्याच्या वड्याचं नावच मुळी "पांडुवडा" होतं. आकाराला थोडा छोटा असला तरी हा वडा असा बाहेरच्या हवेवर तळल्यामुळे की काय माहित नाही पण सॉलिड चविष्ट होता. मुख्य म्हणजे बाकीच्या वडेवाल्यांसारखं त्याने कधी आपल्या वड्याच्या गाडीवर दुसरीकडे चहा, लाडु अमकं-तमकं विकायला सुरुवात नाही केली. माझ्या माहितीतला एकनिष्ठ वडेवाला म्हणजे आमचा पांडु वडेवाला.
माझी आई बाहेर खाण्याला तसा बर्यापैकी विरोध करणारी त्यामुळे त्याचे वडे खायचे म्हणजे बाबा कधीतरी घरी येता येता घेऊन येत तेव्हा ती काही विरोध करु शकत नसे तेव्हाच. आणि लहानपणी आम्ही स्वतःच असं बाहेर जाऊन एकटं काही विकत घेऊन खाल्याचं आठवत नाही. तर असा हा कधीतरी खालेल्ला पांडुवडा माझ्या आयुष्यातल्या असंख्य वड्यांपैकी पहिला आणि मानाचा.
त्यानंतर रुपारेलला गेल्यामुळे दादरला जाणं वाढलं आणि श्रीकृष्ण वडेवाल्याचा छबिलदास गल्लीतला उभा वडा आयुष्यात आला. तसा रुपारेलच्या कॅंटिनचा वडाही छान असतो पण तिथे समोसा-पावाची जोडी जास्त चलतीत होती. पण त्याबद्दल नंतर कधी. तर हा श्रीकृष्णचा वडा मला इतका आवडतो की मी माझ्या प्रत्येक मुंबई दौर्यात तो आवर्जुन खाते. फ़क्त त्याने आता वड्याबरोबरच इतर सगळे पदार्थ विकायला सुरुवात केलीय आणि तिथे जवळ जवळ उभं रेस्टॉरन्ट झालंय पण त्याचा वडा मला अद्याप आवडतो. बारावीला असताना चर्नीरोडला राहिले होते, तेव्हा मी आणि माझी मैत्रीण तिथल्या सखीचा वडापावही आवर्जुन खात असु.
नंतर माझ्या एका इंजिनियरिंगच्या मैत्रीणीबरोबर पहिल्यांदा पुण्याला जाताना कर्जतचा चपटा वडा खाल्ला आणि मग कर्जतच्या बाजुने कधीही गेलं तर हाही वडा हक्काचा . थोडा तिखट आणि त्यांची चटणी नेहमी त्याला लागलेलीच असते असं मला आठवतय. गेले आठेक वर्षंतरी हा वडा खाण्याचा योग आला नाही. आता लिस्टवर टाकावा लागेल.
कर्जतप्रमाणे ट्रेकसाठी कुठेही गेलो तर त्या त्या स्टेशनवर मिळणारे वडेही आमच्या ग्रुपने चवीने खाल्ले आहेत. प्रत्येक वड्याचं आपलं एक वेगळं अस्तित्व असतं आणि त्या त्या ठिकाणी त्याचे चाहते असतात असं मलातरी वाटतं. ठाण्यातही माझ्या मावसबहिणीने असाच एका ठिकाणचा वडा खिलवला होता पण आता नाव विसरले.
नंतर नोकरीसाठी आर बी आय माझा क्लायन्ट होता तेव्हा मी आणि माझा कलिग योगेश कधीकधी दहाच्या सुमारास न्याहरीला त्यांच्याकडचा वडा खायला जायचो. आणि परतताना कधी प्रचंड भूक लागली असली की चर्चगेट स्टेशनला गाडी लागली की डब्यात एक बाई स्टीलच्या डब्यातुन बनवलेले वडे घेऊन येई. मला वाटतं पाच रुपयाला दोन का काय तेही मी खूपदा खाई. संध्याकाळच्या एका फ़ास्ट लोकलच्या लेडिज फ़र्स्ट क्लासचा एक ग्रुप होता त्यांच्यातील एक बाई दादरला चढे. पुष्कळदा तिला उभा वडा घेऊन यायला सांगितलं असे मग ती आली की सगळा ग्रुप चवीने गाडीत हा वडा खाई. आणि अर्थातच तिला वड्याचे नंतर पैसे देत. फ़क्त त्या वड्यासाठी मी एक-दोनदा माझाही नंबर त्यांच्यात लावला होता.
वड्यांचा विषय निघाला आणि माझ्या बाबांचा मी उल्लेख केला नाही तर ही पोस्ट पुर्ण होणार नाही. आमच्याकडे मी वर म्हटल्याप्रमाणे आईला बाहेर खायचं वावडं आणि माझ्या बाबांना तळकट खाणं प्रचंड प्रिय मग या दोघांनी एक तडजोड केली होती ती म्हणजे मग अशा गोष्टी घरीच करणं. मग अशाच एखाद्या रविवारी चारच्या चहाच्या आधी बाबा सांगत चला आज वडे करुया आणि एक त्यांची चांगली गोष्ट म्हणजे ते आईला या कामाला लावत नसत. स्वतः लसुण सोलण्यापासुन सुरुवात. बाबांनी साग्रसंगीत बनवलेले वडे इतके छान लागत की कित्येक रविवारी रात्रीच्या जेवणालाही मी त्यातला उरलेला वडा खाऊन आईचा ओरडा नको म्हणून उगाच थोडा वरणभात असंही जेवलेलं आठवतयं.
असा हा इतका प्रिय वडा आता आपल्या आयुष्यात नाही हे जेव्हा लग्नानंतर आम्ही शिकागोला आलो तेव्हाच्या पहिल्याच रविवारी जाणवलं आणि मी माझ्या नवर्याला म्हणाले इथं वडा नाही ना मिळणार आपल्याला कुठे?? तो तसा माझ्या तिनेक वर्ष आधी आलेला त्यामुळे सरावलेला आणि मुख्य म्हणजे शिकागोला बर्यापैकी भारतीय दुकाने, रेस्टॉरन्टस आहेत. मला म्हणाला आहे एका ठिकाणी आणि आम्ही त्या भारतीय दुकानाला जोडुनच एक छोटं फ़ास्टफ़ुड कॉर्नरसारखं होतं तिथे गेलो. तिथल्या मुलीने आम्ही तिथे खाणार म्हटल्यावर चक्क आमच्यासमोर ती वड्याची प्लेट मायक्रोवेव्हमध्ये टाकल्यावर मला कसतरीच झालं. मी याला म्हटलं अरे हे काय? तो काय म्हणणार.. तो सरावलेला (आणि आता मीही) खर सांगते मला तो होपलेस वडा बिल्कुल आवडला नाही. तरी मी स्वतः करुया वगैरे विचार केला नाही कारण माझं स्वयंपाकघरातल ज्ञान यथातथाच होतं आणि करायचा कंटाळा.
पण असं किती दिवस चालणार शेवटी कधीतरी एकदा बाबांना विचारुन आम्ही दोघांनी मिळून घरीच वडा केला आणि अर्थातच त्यात गाडीवाल्याचा निढळाचा घाम नाही ना म्हणून तो तसा लागणार नाही असं मनाचं समाधानही. नशीबाने माझा नवराही वड्याच्या बाबतीत माझ्यासारखाच आहे त्यामुळे आम्ही दोघंमिळुन अधुन मधुन वडा घरीच बनवत असतो तर आताशा जरा बराही होतो. वडा जरी बरा झाला ना तरी वडा-पाव मात्र इथे कधीच आपल्या भारतासारखा लागत नाही कारण तो पाव तसा इथं मिळत नाही.
मला आठवतं माझ्या नवर्याने माझ्या आई-बाबांना तिथुन इथे येताना वडा-पाव घेऊन यायला सांगितलं होतं आणि त्यांनी असे शिळे काय आणायचे म्हणून आणलेच नव्हते. मग नंतर त्याचा एक भाचा इथे आला होता त्यालाही वडा-पावच घेऊन यायला सांगितलं होतं आणि तो मस्त कुठच्या तरी गाडीवरचे त्याच्या ओरिजिनल कागदासकट घेऊन आला होता. आणि ते खाताना आम्ही हम्म्म्म्म्म आता कसं आपल्यासारखं वाटतोय असं एकदमच म्हणालो होतो.
माझे आई-बाबा जेव्हा इथं आले होते तेव्हा माझी खूप दिवसांची इच्छा म्हणजे बाबांना माझ्या हातचे वडे खाऊ घालणं ही मी त्यांना स्टॅच्यु ऑफ़ लिबर्टीला नेलं तेव्हा पुर्ण केली. इथे बाहेर काही खायचं म्हणजे त्यांना नेहमीच आवडत नसे. त्यादिवशी मात्र एलिस आयलंडला बसुन सगळ्यांनी मजेत वडा-पाव खाल्ला होता. वडेही त्यादिवशी मस्त झाले होते. एका वड्याच्या रेसिपीच्या पोस्टने मी इतकी भरकटुन आले की आता मला वाटतं या रविवारी संध्याकाळी वडे केलेच पाहिजेत नाहीतर पोटोबाचं काही खरं नाही. कुणी सांगितलं होतं इथे वडा न मिळणार्या देशात येऊन राहायला??? काय??