Wednesday, October 14, 2009

दिपावलीच्या शुभेच्छा..

दिवाळी सण मोठा
नाही आनंदा तोटा

या दिपावलीच्या निमित्ताने इथे आलेल्या प्रत्येक पाहुण्याला दिपावलीच्या अनेक अनेक शुभेच्छा... फ़राळाचं एक अप्रतिम ताट मायाजालावर मिळालंय तेही ठेवलंय. गोड मानुन घ्या आणि असाच लोभ राहु द्या.


आपल्या येण्याने, प्रतिक्रिया देण्याने अजुन काही लिहावंसं वाटतं म्हणून आज जास्त काही लिहित नाही....फ़क्त एकच प्रेमाची विनंती... आवाज आणि प्रदुषण करणारे फ़टाके फ़ोडताना जरा थोडा आपल्या पर्यावरणाचा विचार करा. दिवाळीतल्या रांगोळीतल्या रंगासारखे थोडे रंग काही फ़ुलझाडे अंगणात लावुन साजरे करता आले तर नक्कीच फ़ायदा होईल पर्यावरणाला आणि आपल्या चित्तवृत्तीला प्रसन्न करण्यासाठी...

Friday, October 9, 2009

रंगांचा बहर....

उत्तर गोलार्धातला मोठा हिवाळा संपुन सारी सृष्टी हिरवा शालु नेसुन बसली की हे तिचं रुपडं पाहायला सुर्यदेव आपला मुक्काम खास वाढवतात. लांबच लांब पसरलेल्या हिरव्या रांगा पाहात मोठे दिवस कसे जातात कळत नाही....


या हिरव्यागार वातावरणाची सवय होत असतानाच नेहमीच्याच रस्त्यावरुन चालताना हिरव्या झुडुपातून डोकावणारं एखादं केशरी पान दिसलं की चटकन लक्ष जातं

पण तरी उगाच आपण लक्ष नं दिल्यासारखं करावं तर एक-दोन दिवसात बाजुचं दुसरं एखादं झुडुप केशरी शालच पांघरुन बसतं. आता मात्र मान्य करायलाच हवं असं आपण म्हणतो. हवाही तशी थोडी थोडी थंड व्हायला लागली असते.


मग मात्र एका झाडाकडुन दुसरीकडे अशी रंगाची माळ सर्वदुर पसरायला सुरुवात होते.
हिरव्या रंगातल्या सृष्टीला पाहायची सवय असलेल्या सुर्यदेवांना हे थोडं नवं असतं ना..अजुन पुढे काय असेल बरं असा विचार करत पुढे पुढे जाणार्या सुर्यमहाराजांना कळतंच नाही आजकाल आपण अंमळ कमीवेळ राहतोय म्हणुन....दिवस हळुहळु लहान होत जातो तो असा...


सृष्टीने मात्र सुर्याला आणि खरं तर सर्वांना मोहवुन टाकायचा विडाच उचलला असतो जणु...मग ती वेगवेगळ्या रंगांचे ठेवणीतले शालु, साड्या नेसायला सुरुवार करते....तिचं रुपच असं की जातीच्या सुंदराला काहीही शोभतं तसं पिवळ्या, केशरी, किरमिजी रंगाच्या छटांनी कुठे कुठे पाहु असं होऊन जातं...अजुन काही आठवडे तरी हा साज लेऊन बसलेलं तिचं रुप पाहाताना आसपासची थंडी जाणवतही नाही...


आणि मग कधीतरी सुर्य आणि धरेचा मित्र-परिवार वारा आणि पाऊस हे कधी एकटे तर कधी एकत्र येऊन तिला त्रास द्यायला सुरुवात करतात...एखाद्या जिवलग मैत्रीणीला पिडावं तसंच ते तिला पडतात. किती तोल सावरणार आपला...सगळा साजशृंगार उतरला जातो आणि झाडांखालची पानगळ खारी गेल्या की कोल्हापुरी वहाणांसारखी करकरते...
अरे पण आता कुठे तर रंगांचा बहर सुरु झालाय...सगळीकडे आपल्याच नादात रंगलेली झाडं दिसताहेत आणि मी इतक्यात निष्पर्ण झाड आणि थंडीच्या आठवणी का काढतेय....


चला एखाद्या डोंगरावर जाऊन रंगांची उधळण पाहुन येऊया....

Tuesday, October 6, 2009

नदीच्या दुसर्‍या किनारी असताना...

२००४ ते २००६ मी फ़िरतीची नोकरी केली. फ़िरतीची म्हणजे अगदी १००% प्रवास...रविवार संध्याकाळ किंवा सोमवारी पहाटे निघुन आठवडाभर क्लायन्टकडे काम करुन मग गुरुवारी किंवा शुक्रवारी विकेन्डसाठी घरी. सुरुवातीला वाटलं होतं की काय आपण आपलं खाजगी आयुष्य सोडुन भटकतोय. पण नंतर तशी सवय झाली. मला तशी स्वयंपाकघरात गती नव्हती. आता काय पळ काढायला निमित्त होतं. शिवाय प्रत्येक नव्या प्रोजेक्टला नवी जागा, नवे सहकारी आणि नवी लोकल रेस्टॊरन्ट्स. शिवाय हॉटेल मधली रुम सर्विसने आवरलेली खोली त्यामुळे तिथेही काम नाही. घरी आल्यावर कधीकधी इतका पसारा वाटायचा. पण तरी घरी आल्यावर तो बॅक होम फ़ील असायचा त्याची तुलना नाही.
जाताना नवरा मला एअरपोर्टला सोडायला यायचा ना तेव्हा नेहमी त्याच्या सुचना आणि मग चेक-इन झालं का ते अगदी मोबाईल बंद करेपर्यंत काही ना काही बोलणं. त्यातल्या त्यात एक बरं होतं ते सर्व प्रोजेक्ट्स क्लायन्ट स्पॉन्सर्ड होते त्यामुळे त्यांच्या खर्चाने प्रत्येक आठवड्याच्या शेवटी घरी येता यायचं. त्यामुळे कितीही घरची आठवण आली तरी पुन्हा लवकरच जाऊ अशी सोनेरी किनार त्याला होती. आणि संपुर्ण आठवडा कामात जायचा त्यामुळे इतकं कळायचं नाही. संध्याकाळी रुमवर आल्यावर वाटलं तरी पुष्कळदा रात्री कधी संपुर्ण टिम नाहीतर कधी एखाद्या कलीग बरोबर जेवायला जायचं असायचं आणि आल्यावर चिक्कार झोप आलेली असायची. काही प्रोजेक्टसला दिवसाचे दहा तास भरुन गुरुवारी रात्री निघायचं असे मग तर विचार करायलाही वेळ नसे. सकाळी ७ ते रात्री ७ कामावर मग थोडं फ़्रेश होऊन जेवण, झोप आणि मग लगेच पहाटे उठा असं. श्वास घेतोय का कळत नाही असा दिनक्रम. शुक्रवार ते रविवारची संध्याकाळ तर कळत नसे कसा पटापट वेळ जाई. कधी कधी मी नवर्याला विचारत असे कसं वाटतं रे तुला घरी? मग तोही म्हणे कंटाळा येतो पण मी जास्तीत जास्त वेळ कामात राहतो आणि घरी टि.व्हि. पाहतो. तेव्हा मला त्याच्या नुसत्या बोलण्यातुन कळत नसे की मग घरी नक्की कसं वाटतंय.
पण आता गेली काही महिन्यांपासुन फ़ासे पलटलेत. आणि शिवाय आता घरी एक छोटं बाळही आहे. तो नोकरीसाठी लांब गेलाय आणि आम्ही घरी त्याची वाट पाहतोय. शिवाय त्याच्या येण्याजाण्याचा खर्च कंपनी करणार नाही त्यामुळे तो प्रत्येक आठवड्याच्या शेवटी य़ेणार नाही. पहिल्या वेळी गेला तर नंतर एक सुटीचा सोमवार येत होता तेव्हाच उगवला; म्हणजे जवळ्जवळ तीन आठवड्यांनी. मला आठवतं मी त्याला एअरपोर्टवरुन घेऊन आले तर माझा मुलगा त्याने उचलल्यावर पाच मिनिटे आमच्याकडे पाहात नुसता हसत होता. त्याला किती आनंद झाला होता ते त्याला फ़क्त हसण्यातुनच व्यक्त करता य़ेणार होतं.
इथे या भल्या मोठ्या आडव्या पसरलेल्या देशाचा एका कोपर्‍यात तो आहे आणि दुसर्या कोपर्‍यात आम्ही. आमच्यात तीन तासाच्या वेळेचा फ़रकही आहे म्हणजे इतरवेळीही आमचं फ़ोनवर बोलणं फ़ारवेळ होत नाही कारण त्याला निवांत वेळ मिळेपर्यंत आमची मध्यरात्र. परवाच्या रविवारी त्याला विमानतळावर सोडायला गेल्यावर पुन्हा तीच विचित्र फ़िलिंग त्रास देऊ लागली. गाडी जमेल तितकी सावकाश चालवुन म्हणजे अगदी मामा येऊन सांगेल बाई स्पिड लिमिट ५५ आहे तू काटा वाढव आणि सगळे सिग्नल शांतपणे घेऊनही लवकर पोहोचल्यासारखं झालं. येता येता नेमकं सीडी लावली तर गाणही "गाडी सुटली रुमाल हलले...."इतकं पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटलं ना...आता मुलाचं रुटिन सांभाळा, त्यात स्वतःचं काही करा आणि इतकं सगळ करुन दिवसाच्या शेवटी निवांतपणे चार क्षण बसायचं असलं तर तेही तसं एकटंच. आज अचानक मला माझं दोन वर्षांपुर्वीचं रुटिन आठवलं आणि इतक्यांदा आपल्याला सोडुन रिकाम्या घरी परत आलेल्या नवर्‍याला कसं वाटलं असेल ते प्रथमच जाणवलं. त्याला सोडून परत आलं की आधी भरलेल्या घरात पुर्वी नसलेली ही पोकळी कशी पटकन अंगावर येते आणि खूप काही कामं समोर असली तरी एक विचित्र उदासी आल्यामुळे कशातच मन रमत नाही. अगदी यंत्रवत आपण नंतर काहीबाही करतो आणि स्वतःलाच समजावतो की हेही दिवस जातील.
कसं असतं ना grass is green on the other side असं म्हणतात. अगदी शंभर टक्के खरयं ते. नदीच्या या किनारी मी प्रथमच आलेय. त्या किनार्यावर असताना कधी न जाणवलेली एकटेपणाची भावना आणि ज्यांना खरंच आपला संसार एकट्यानी चालवावा लागत असेल त्यांची मनस्थिती समजतेय. एका मैत्रिणीशी या विषयावर बोलताना मी म्हटलंही की अगं इथे त्या single moms (इथे अगदी खर्‍या अर्थाने एकट्या असतात ना इथे नशिबाने आई काही दिवसांसाठी आलीये सोबतीला) कसं बरं करत असतील सर्व. त्यावर तिचं उत्तर होतं की अगं त्या सर्व स्वतःच करत नाही विशेषकरुन मुलांचं. त्या रेडिमेड जेवण इ. देतात आणि पाळणाघरात ठेवतात मग जो थोडा-फ़ार वेळ मिळतो तो कसा जात असेल कळतही नसेल...असेलही..
पण तरी नको रे हे देशातल्या देशात "दूरदेशी गेला बाबा" टाइपचं जीणं असं झालंय...लवकरच यावर तोडगा काढतोय. पण सध्या तरी एअरपोर्टवरुन परतताना एक विचित्र पोकळी घेऊन येणारे हे रविवार माझ्या कायम लक्षात राहतील.

Wednesday, September 30, 2009

गोष्ट छोटी डोंगराएवढी

सध्या आईचा मुक्काम इथे आहे त्यामुळे फ़ारसा विचार न करता मराठी चित्रपट लावते. जास्तीत जास्त काय तर तेच तेच गावरान विनोद नाही आवडले तर नेट सर्फ़ करणं किंवा दुसरं काही काम करणं हा पर्याय असतो. तसंच वाटलं होतं जेव्हा मकरंद अनासपुरेचं नाव सुरुवातीला पाहिलं पण एका संवेदनाशील विषयावरचा गंभीर चित्रपट आहे हा "गोष्ट मोठी डोंगराएवढी". नाही मी पुर्ण कथा वगैरे नाही सांगणार कारण एकतर मुळात मी जास्त चित्रपट पाहात नाही फ़क्त मायदेशात सध्या नसल्यामुळे पाहाणं होतं. पण असे काही विषय असले की तो चित्रपट आपसुक पाहिला जातो.पण ते कथा सांगणं मला जमत नाही.

तर "गोष्ट छोटी डोंगराएवढी" मध्ये मुख्य प्रश्न शेतकर्यांच्या आत्महत्या हा आहे आणि त्या अनुषंगाने चालु असलेल्या इतर काही प्रश्नांनाही वाचा फ़ोडण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातुन शेतकी शिकुन परत गावात गेलेल्या मकरंद अनासपुरेला साधं शेतात विहिर खणायला कर्ज काढताना येणार्या अडचणी, सरकारी खात्यातल्या भ्रष्टाचार ज्या प्रकारे मांडलय त्याने आतुन काळीज हलतं. आपल्याकडच्या शेतकर्यांचा खरंच कोण वाली असावा असा प्रश्न नक्की पडेल हा चित्रपट पाहताना. गावातला त्याचा जिवलग मित्र दुसरा एक शेतकरी आधी एक बैल विकतो मग नांगराच्या दुसर्या बाजुला स्वतःच उभा राहातो. मकरंद त्याला स्वतःचा बैल देऊन मदतही करतो. पण तरी आभाळालाच ठिगळ पडलंय; मग घरावर जप्ती आणि दुसराही बैल सावकाराच्या दारात आणि तिथेही अपमान, बहिणीच्या इज्जतीवरुन.

"मातीत जगणं, मातीत मरणं, आपुल्या हातानी रचिलं सरणं" हे गाणं खूप काही सांगुन जातं. पण मरणानंतरही पोस्टमार्टेमसाठीसुद्धा लाच??? आणि पोस्टमार्टेमशिवाय त्याच्या कुटुंबाला सरकारी मदत मिळणार नाही. कागदावर सरकार शेतकर्यांच्या आत्महत्येच्या केसेस एकतर दाखवत नाही आणि दाखवायच्या असतील तर मग पोलिसखात्याला पैसे चारा म्हणजे पोस्टमार्टेम करुन ते पुढंच थोडं बघतील. मरणानंतर असं मग जगतानाचं लाचखाऊपणाचं चक्र गरिबी आणि परिस्थितीमुळे न भेदता आल्यामुळे शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय??

आपण भारत महासत्ता बनण्याच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे आपल्या कृषीप्रधान देशातल्या भुमिपुत्राची ही अवस्था बदलण्यासाठी काही चालु आहे का? आधी हे लाचखाऊपणाचं चक्रव्युह कसं भेदायचं?? एक नागरीक म्हणुन मी काय करु शकते?? याचा आज माझा स्वतःशी संघर्ष चाललाय. मला हे भीषण सत्य नुसतं चित्रपटातही पाहावत नाहीये आणि कुणीतरी रोज त्याला सामोरं जातयं ही कल्पनाही करवत नाहीये. एक सुजाण, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणारा माझासारखा भारतीय नागरीक यासाठी काहीच करु शकणार नाही का? सरकार सरकार म्हणुन अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच खारीचा वाटा म्हणुनतरी काही ठोस करायला हवय ही भावना आजची रात्र झोप लागु देणार नाही. सध्या आपल्याइथे निवडणुकीचे वारे वाहताहेत त्या पार्श्वभुमीवर नक्कीच हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहिला गेला पाहिजे निदान एक सुजाण नागरीक म्हणुन आपण आपलं पवित्र कार्य बजावताना डोळसवृत्तीने निर्णय घेण्यासाठी.
जाता जाता या चित्रपटातील शेतकर्याचं गार्हाणं सारेखं आठवतयं....

"मातीच्या लेकरांचं मातीमधी मनं सारं.....
वारीत चाललो मी आभाळात ध्यान सारं..... "

Sunday, September 27, 2009

आठवणी दसर्‍याच्या ...

दसरा म्हटलं की फ़क्त प्राथमिक शाळेच्या आठवणी सर्वप्रथम डोळ्यापुढे येतात. उपनगरातील एका छोट्या गावातली ही एक जि.प.ची शाळा असल्यामुळे तिथे पाटीपुजन असायचं. चौथीपर्यंत मी या शाळेत होते. दसर्‍याच्या  आदल्या रात्रीच बाबा काळ्या पाटीला स्वच्छ धुऊन पुसुन खडुने १ आकडा वापरुन सरस्वतीचं चित्र काढुन देत आणि मग नेहमीपेक्षा लवकर सकाळी शाळेत ही पाटी, बरोबर झेंडुची फ़ुलं आणि नारळ असं घेऊन शाळेत जाऊ. त्या दिवशी अभ्यास (मुख्य म्हणजे चौथीतला गणिताचा तास) नसे ह्याचं मुख्य आकर्षण असे. खरंच शाळेत असताना खूपदा दसरा,स्वातंत्रदिन, प्रजासत्ताक दिन यादिवसांच्या महत्वापेक्षाही त्यादिवशी शाळेत जाऊनही शिक्षक आपल्यावर साहेबगिरी करु शकत नाहीत याचा आसुरी आनंद जास्त असे. तरी काही शिक्षक सवयीप्रमाणे निदान रांगेत सरळ न उभं राहाणे किंवा इतर व्यक्तींची भाषणे चालु असताना गप्पा मारणे इ. फ़ुटकळ कारणांसाठी ओरडुन त्यांचा जन्मसिद्ध हक्क सिद्ध करुन जात. असो.

तर पहिली ते चौथी दसर्‍याला पाटीपुजन करताना छान वाटायचे. बाईंनी आणलेली सरस्वतीची तसबीर टेबलावर ठेवलेली असे आणि आपण नेलेली पाटीवरची सरस्वती आपल्यासमोर. स्वतःची आणि मैत्रीणींनी आणलेली फ़ुलं, थोडी बाईंनी दिलेली अशी, आणि थोडं हळद-कुंकु असं ल्यालेली पाटीवरची सरस्वती अगदी दागिन्यांनी नटलेली वाटे. पुजा झाल्यावर आरती आणि मग आम्हीच आणलेल्या नारळाचा, साखर घालुन केलेला प्रसाद खाऊन हात चिक्कट होतं. माध्यमिकची शाळा मात्र ख्रिस्ती मिशनर्यांनी चालवलेली (पण मराठी माध्यमातीलच) असल्याने तिथे हे सण साजरे होत नसे. मला त्यावेळी माझ्या आधीच्या शाळेची खूप आठवण येई. दसर्याला म्हटलेली "हे सरस्वती नमन तुझ्या पदकमली" आता पुर्ण येत नाही पण आठवते.
आई-बाबा दोघेही शिक्षक असल्याने तेही पाटीपुजनाला गेलेले असत. साधारण नऊ-दहा वाजता शाळा सुटे आणि मग दुपारपर्यंत आई-बाबा पण घरी येत. त्यांचा शाळेतला प्रसादही ते आमच्यासाठी घेऊन येत. मग जेवणं होईपर्यंत गुळ किंवा साखर-खोबरं खायला मला फ़ार फ़ार आवडे. इथे फ़्रोजन नारळ्याच्या ओल्या किसात साखर घातली तर उगाच गोडुस चोथा खाल्यासारखं वाटतं. शिवाय कोलेस्टेरॉलचं भुत मानगुटीवर असतं ते वेगळंच. खरंच अशावेळी बालपणीचा काळ सुखाचा हे पुन्हा पुन्हा पटतं नाही??
दसर्‍याला जेवणं काहीतरी गोडाचं असे बहुतेक वेळा नव्या तांदळाची खीर नाहीतर पुरणपोळी. मला गोड तेव्हातरी विशेष आवडत नसे. पण सगळीजणं दुपारच्या जेवणाला एकत्र असली की मला नेहमीच आवडे. या दुपारी आई-बाबा घरी असत, जरा सुस्तावलेली दुपार अजुनही आठवते. मग संध्याकाळी आई नेहमी सिमोल्लंघनाची आठवण करी, शेजारी-पाजारी सोनं वाटायला जात असू. आमचे शेजारचे एक काका मला नेहमी हे घे सोनं आणि तुला बांगडी कर असं म्हणतं. दरवर्षी दागिने बदलले असत. त्या तशा दागिन्याने आतापर्यंत मला वाटतं मी नखशिखान्त नटले असते. पण मजा यायची ते सोनं द्यायला. मागच्या वर्षी माझ्या भाचीला तसलंच काही सांगताना मला फ़ार मजा आली.
कॉलेजला वगैरे मात्र दसरा सुट्टी असणे याखेरीज जास्त काही आठवत नाही. मात्र घरी पुस्तकांची पुजा आवर्जुन करायचो. घरचे संस्कार. अजुनही लॅपटॉप, पुस्तकांचं कपाट याची पुजा करते. इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षी एका छोट्या कंपनीत माझं शेवटचं प्रोजेक्ट होतं, तिथलं टिपिकल मराठमोळं वातावरण. त्यावर्षी मात्र दसर्याच्या पुजेला कंपनीत मलाही आमंत्रण होतं. पुन्हा एकदा शाळेची आठवण आली. दसरा थोड्या वेगळ्या पद्धतीने का होईना पण साजरा झाला. दिवाळीचं गिफ़्ट दसर्‍याला वाटायची त्यांची पद्धत होती म्हणजे दिवाळीला ते उपयोगी पडेल असं काहीसं. मग त्यावर्षी मलाही एक मिठाईचा पुडा मिळाला होता. माझ्या कॉलेजमधल्या एक-दोन मित्रांनी "तुझे काय बाबा जाशील तिथे लाड" अशी प्रतिक्रियाही दिलेली आठवते.
आमच्या भागात अगदी जवळपास कुठे रावण वगैरे जाळत नसत. त्यामुळे प्रत्येक दसर्याच्या की त्यानंतरच्या दिवसाच्या नक्की आठवत नाही पण बातम्यांमध्ये गिरगाव चौपाटीवरचा रावण जाळताना दाखवत तो मात्र आठवणीने पाही. तेव्हा नेहमी मला एकदा तरी गिरगावला तेव्हा गेलं पाहिजे असं फ़ार वाटे पण बारावीत असताना मी चर्नीरोडला राहिले तेव्हा त्या दसर्याला मी काय करत होते ते मात्र अजिबात आठवत नाही. कदाचित सुटीसाठी घरीच गेले असेन. असो. दसरा गेला की दिवाळी अशी हाकेवर आल्यासारखं वाटे. त्यामुळे कधी एकदा सहामाही परिक्षा उरकते आणि शाळेला दिवाळीची सुट्टी पडते असं होई. नशीब माझी शाळेतली प्रगती चांगली होती नाहीतर या मानसिकतेने फ़क्त सुट्या आणि शाळेचे न शिकणार्या दिवसातच रमुन आतापर्यंत पुढचा सगळा बट्ट्याबोळ झाला असता.
आजच्या दसर्‍याला हे सर्व आठवुन विद्यादेवीची पुन्हा एकदा उपासना करायचं ठरवतेय. सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा.

Wednesday, September 23, 2009

५००० +



ब्लॉग लिहिणारा लिहित राहतो. कुठेतरी कौतुक प्रत्येकाला हव असतं. काहींना त्याची सवय होते. माझ्या बाबतीत काय आहे याचा विचार मी काही दिवस करत होते. कधी कधी पटापट प्रतिक्रिया येत राहतात कधी लोक नुसतंच वाचुन जातात. मग कधीतरी काउन्टर टाकला. अर्थात सुरुवातीचं ब्लॉगींग म्हणजे आपल्याला लिहितं राहिलं पाहिजे याकडे जास्त लक्ष होतं म्हणून काउंटर टाकेपर्यंत एखादा महिना गेला असेल. पण नंतर सवय लागली प्रतिक्रियांना उत्तर द्यायला किंवा नवा ब्लॉग टाकायला आलं की आकडा पाहायचा. आणि आज योगायोगाने सहजच आले आणि खूप बरं वाटतंय ५००१ आकडा पाहायला.
मुद्दाम स्र्कीन शॉट घेऊन ठेवलाय. या ब्लॉगवर भेट देणार्या सर्वांचे त्यासाठी आभार मानण्यासाठी आजची ही पोस्ट. आणि हो जास्त धन्यवाद ज्यांनी आपल्या अमुल्य प्रतिक्रिया देऊन हा ब्लॉग जागता ठेवायची उमेद वाढवलीत त्यांचे.
सध्या बर्याच गोष्टींच गणित बिघडलय; कदाचित माझ्या आधीच्या पोस्टवरुन लक्षात आलं असेल. पण आज मात्र दिवस संपताना फ़ार छान वाटतय.असाच लोभ राहु द्या.



Tuesday, September 22, 2009

मना तुझे मनोगत मला कधी कळेल का??

कुणी नुसतं "काय होतंय तुला?" विचारावं आणि बांध फ़ुटावा अशी मनाची अवस्था फ़ार विचित्र असते. नक्की काय बिनसलंय कळत नाही. असं कधीपासुन होतंय आठवत नाही. हे सगळं असंच चालु राहिल, असं नसतं पण आत्ता या क्षणी ते कळत नाही. असं वाटत की ही सगळं काही थांबल्याची जाणीव अशीच पाठी लागणार. आता यातुन सुटका नाही.
मग मात्र सारखा एकटेपण जाणवायला लागतं. गर्दीत असलं तरी हरवल्यासारखं. सवयीने रोजची कामं तीच तशीच म्हणून करतो आणि आजचा दिवस संपला म्हणून रात्री पाठ टेकतो. आजुबाजुच्या परिस्थितीत आपल्याला हवा तसा बदल घडवून आणण्यासाठी काय केलं पाहिजे याचा शोध घेतो आणि त्यातुन काही निष्पन्न होत नाही म्हणून अजुन अजुन मन उदास होतं.
हे सर्व दुष्टचक्र इतकं विचित्र की आपल्या मनात काय चाललंय याचा थांग आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला, मित्राला कुण्णाकुण्णाला लागु देत नाही. वरवर सगळीकडे पुर्वीसारखंच वागत राहतो पण आतुन मात्र कुठेतरी काही तरी ढवळून निघालेलं असतं. यशाच्या व्याख्या शोधत राहातो आणि मग आपण कुठे कमी पडतोय त्याचाच शोध घेत राहातो. पाण्यात बुडणारा शेवटचा उपाय म्हणून सगळीकडे हात-पाय मारेल तसंही करुन पाहातो. नेहमीच त्यातुन वर यायला होईल असंच नाही पण प्रयत्न करत राहतो.
अरे आपल्या बाबतीत कसं असं घडतयं?? बाकीच्यांचं कसं व्यवस्थित चाललंय असं उगाच वाटतं. काही काही प्रश्न तर असे असतात की यावर आपण स्वतः काहीच उपाय करु शकत नाही हे माहितही असतं पण या सर्वांनी होणारा त्रागा काही संपत नाही.
अशावेळी ऐकलेली गाणी डोळ्यात पाणी आणतात, वाचन अंतर्मुख करतं आणि भावनांचा कल्लोळ अजुनच वाढतो. सगळं वरवरुन शांत आणि आतुन खूप खूप ढवळलेलं. अशावेळीच खरं तर मनाला सांभाळणं फ़ार गरजेच असतं. न कोसळता आहे त्या परिस्थितीचा सामना करत राहुन हेही दिवस जातील आणी यातुनही आपण काही नवं शिकुन बाहेर येऊ असा काहीसा विचार स्वतःच स्वतःला द्यायचा असतो. परिस्थितीनुसार य़शापय़शाचे मापदंड बदलणे आणि आपलं आपणच अशा कोंडीतुन बाहेर येणं हेच हाती असतं.
तरी चंचल मन पुन्हा पुन्हा त्याच त्याच विचारात जातं मग काय उरला एकच प्रश्न मना तुझे मनोगत मला कधी कळेल का??