आम्ही पडलो "बटाट्याच्या चाळी"चे भक्त, वाचक. जसजसे चाळकरी मुंबईबाहेर ब्लॉक सिस्टीममध्ये जाऊन राहू लागले तसं आता याविषयी कुणी लिहिलं तर बरं असा विचार मनात आला. अर्थात तो शोध घेणार तेवढ्यात उपनगरात वारं वाहू लागलं वाढीव चटईक्षेत्राचं. हे गाजर कितपत पचनी पडलं काही कल्पना नाही कारण अस्मादिकांचं ना कुठे मुंबईत चाळीत मालकी हक्काचं वास्तव्य, ना उपनगरात ब्लॉकसिस्टीम मध्ये घर. तरी सद्यस्थितीत ज्या झपाट्याने हे सात- आठ मजली टॉवर्स उभे राहिलेत आणि काही ठिकाणी तर तेही पडून त्याच्या दुप्पट उंच बेभरवशाच्या इमारती उभ्या राहताहेत, ते पाहता आणि काही समविचारी लोकांशी चर्चा करताना सात माळ्यांचा आपण पाहिलेला इतिहास लिहावा अशी एक कल्पना पुढे आली.
तळमजला धरून वरचे माळे यांचा आपसात आणि स्वतःशी एक संवाद सुरु असतो. हे माळे आपल्याला काही सांगू पाहताहेत असं प्रत्येक मुंबई वास्तव्यात मला प्रकर्षाने जाणवतं. यात गच्चीदेखील आली पण गच्चीबद्दल अप्रतिम आठवणी पु.ल. काकांनी लिहून ठेवल्यात त्यात ढवळाढवळ करण्याची खरंच काही गरज नाही, हे इथे वेगळे सांगायला नको.
तर अशीही छोटीशी पार्श्वभूमी या सिरीजविषयी. विषय तसा आद्य मराठीत सेन्सिटिव्हच आहे. मुळात कुठले टॉवर म्हणजे उपनगरातही मराठी डॉमिनंट ते इतर प्रांतीय वगैरे भेद टाळून हे कसे मांडावे हा प्रश्न आहेच. शिवाय चाळी/इमारती पाडून मोठ्या झालेल्या या इमारतीत एक नवीन मालक "इन्व्हेस्टमेंटचं घर" नावाने निर्माण झाला. या घरात येणारा भाडेकरू मार्गाने येणारा वर्ग, त्या संसाराबद्दल दर अकरा महिन्यांनी नवीन लिहावे का? हाही एक प्रश्न होताच. वाचकांची, एकंदरीत ब्लॉगवाचनाची सद्य परिस्थिती पाहता प्रत्येक मला पाच ओळीत उरकावी असाही एक प्रस्तावआला होता. त्याकडे निव्वळ प्रॅक्टिकल डिफिकल्टीजमुळे लक्ष देता आले नाही. म्हणजे सगळी सिरीज आधीच पाच ओळीत तयार करणे हे मोठे जिकिरीचे काम आले. तर इथवर वाचताना बोअर झाले नसेल अशी अपेक्षा करून "माझिया मना" सादर करत आहे "सात माळ्यांची कहाणी".
ही इमारत आहे एका पश्चिम उपनगरातील. इथे सर्व विचारांची, वयांची कुटुंबे नांदतात. सोसायटी नामक नॉन-प्रॉफिट, लोकांच्या कल्याणासाठी, लोकांनीच चालवलेली संस्था इथेही आहे. सण साजरे करण्यासाठीचा उत्साह, लिफ्टचा नव्यानेच वापर करणारे काही आणि त्यामुळे होणारे गोंधळ वगैरे सर्व इथेही आहेत. पैकी काही विशिष्ठ अनुभव मांडण्याचा हा एक प्रयत्न. कुणाचीही खिल्ली उडवण्याचा यात अजिबात हेतू नाही. यावरून प्रेरणा घेऊन काही वाचा ब्लॉगर्सना आपल्या सोसायटीची सिरीज लिहायची प्रेरणा मिळाल्यास "शुभस्य शीघ्रम".
एन्जॉय करूया सात माळ्यांची कहाणी. #AparnA #FollowMe