मागच्या वर्षी जूनमध्ये खेळताना दुखावलेला गुढघा घेऊन नवरा घरी आला आणि हे प्रकरण कितपत त्रास देणार आहे याचा मी अंदाज घेत राहिले. तसं वरवर पाहताना तो ठीक होता पण आतले स्नायू पुन्हा नीट करणं भाग होतं. यथावकाश ती सर्जरी प्लॅन झाली.
मायाजालाच्या रूपाने जास्तीची माहिती घेऊन जेव्हा आम्ही शेवटी ऑपेरेशन रूममध्ये गेलो तेव्हा त्याच्यासाठी रोपण म्हणून स्वतःचा लिगामेंट किंवा एखाद्या डोनरचा लिगामेंट असे दोन पर्याय होते.
स्वतःचा लिगामेंट घेणे म्हणजे दुसऱ्या मांडीवरती जखम. आमच्यासाठी अशा परक्या देशात फारशी सपोर्ट सिस्टीम नसताना ही जास्तीची जखम महाग पडेल का असा विचार करून आणि अर्थात आमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने आम्ही लगेच रोपण करायचा पर्याय निवडला. त्या अनामिक शक्तीवर विश्वास ठेवून मी एकीकडे काम करत राहिले आणि दुसरीकडे डॉक्टर त्यांचं काम करत राहिले.
मला काहीवेळा या फ्री कंट्रीमध्ये तुम्हाला जरा जास्तच लवकर फ्रीडम देतात असं वाटतं. विशेष करून आजाराच्या बाबतीत. सगळी इन्शुरन्स नावाच्या मोठ्या आम्हा सध्या माणसांच्या आवाक्यात नसलेल्या राक्षसाची कृपा. तर आमचा पेंशट जागा झाल्यावर चला आता घरला जा अशी एकंदरीत तयारी दिसली आणि डिस्चार्ज पेपर देताना मला नर्सने एक लिफाफा दिला.
कुणाचा तरी इहलोकाचा प्रवास संपला होता पण त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची शेवटची इच्छा म्हणा किंवा कदाचित स्वतःहून ऑर्गन डोनेशन केलं होतं. त्या कागदावर एका संस्थेच्या नावावर आपण आभार प्रदर्शनाचं कार्ड पाठवावं याची सोय केली होती. खरं हा भला आत्मा कोण आणि आम्ही हे दान स्वीकारणारे कोण हे आम्हा दोन कुटुंबाना कधीच कळणार नाही. पण हे आभार मला त्या कुटुंबालाच नाही तर माझ्यातर्फे आणखी काही जणांपर्यंत पोहोचवायचे आहेत. म्हणून हा पोस्ट प्रपंच.
अवयवदानाविषयी समाज जागृत व्हावा म्हणून एक फिल्म निर्माण केली आहे; तिचं नाव आहे "फिर जिंदगी". यु ट्यूबवर संपूर्ण फिल्म उपलब्ध आहे. या लिंकवर ती नक्की पहा. मी ही फिल्म आई-बाबांबरोबर पहिली आणि नकळत बाबा म्हणून गेले की त्यांना देहदान करायची इच्छा आहे. मी चमकून आईकडे पाहिलं पण तिची यासाठी तयारी दिसली नाही. तर याबाबतीत कायद्याने कागदपत्र केली तरच ते निदान भारतात तरी शक्य आहे असं मला कळलं. बाबांचं माहित नाही पण माझं ऑर्गन डोनेशन मी माझं पहिलं ड्रायवर लायसन्स आलं तेव्हापासून करून ठेवलं आहे. आता नवऱ्यानेही त्याच्या लायसन्सला ते जोडलं आहे.
या चित्रपटाच्या आणि आमच्या अनुभवाने मला तरी याचा चित्रपटात एक वाक्य आहे ते पुन्हा इथे टाकावंसं वाटतं ते म्हणजे हे असं एक दान आहे, मरणालादेखील अभिमान वाटेल. "ऐ मौत होगा तुझे भी फक्र अभी" चित्रपट नक्की पहा आणि या विषयाचा विचार करा.
मला आज या पोस्टच्या निमित्ताने त्या अनोळखी आत्म्याचे जाहीर आभार मानायचे आहेत. #AparnA