ती काही तासांची असताना मी तिला पहिल्यांदी पाहिलं. ती आली, तिने पाहिलं आणि जिंकलं असं तेव्हा मला तरी वाटलं. आमच्या छोट्याश्या कुटुंबातली ती पहिली पुढच्या पिढीची सदस्या, माझ्या ताईची मुलगी, माझी भाची "अदिती". ती झाली तेव्हा माझं इंजिनियरींगचं शेवटचं वर्ष सुरु होण्याआधीची सुट्टी होती. तिला हॉस्पिटलमधून आमच्या घरी सुरुवातीचे महिने ठेवणार याचा कोण आनंद मला होता. माझ्याकडे तिच्यासाठी वेळच वेळ होता. नंतर साधारण चारेक महिन्यांची झाल्यावर ताईला कामावर जावं लागणार होतं. तो पहिला दिवस माझ्या लक्षात आहे. माझा आणि माझ्या बहिणीचा आवाज तसा सारखा आहे. त्यावेळी मी अदिती असलेल्या खोलीत काही बोलत गेले की तिला वाटायचं की तिची आईचं आली.
मग वेळ आली तिची तिच्या घरी जायची. त्या दिवशी आमचं घर इतकं रिकामी वाटत होतं की मला वाटत होतं लगेच ट्रेन पकडून तिच्याकडे जावं. अर्थात लगेच नाही पण माझ्या कामाची जागा आणि तिचं घर हे मला माझ्या घरापेक्षा कमी अंतर असल्यामुळे मी कामावर जायला सुरु केल्यावर अदितीला जास्तीत जास्त वेळा भेटायला जायची संधी मिळाली. भारतात तेव्हा (किंवा कदाचित आताही) ज्या स्पर्धात्मक युगात आम्ही आयटीवाले काम करायचो, तेव्हा कामावरून निघताना अगदी साडेअकरा पण व्हायचे. मग ती झोपली की मी पोचायचे आणि ती सकाळी उठली की मी तिच्यासाठी सरप्राईज म्हणून हजर असायचे.
तिला माझ्याबरोबर आणि मला तिच्याबरोबर खूप आवडत असे. माझ्या मित्र-मैत्रिणींमध्ये मी तिचा उल्लेख"माझी मुलगी" म्हणूनच करत असे. तेव्हा तर माझं लग्न पण झालं नव्हतं. माझे तिच्याबरोबरचे अनेक प्रसंग माझ्या लक्षात आहेत. तिच्यापासून गेले कित्येक वर्षे मी हजारो मैल दूर आहे पण माझं चित्त तिच्याहीपाशी आहे. तिचा अभ्यास, आवडीनिवडी, वाचन यात काय नवीन आलं, हे आमच्या स्काईप संवादातून मी माहित करून घेत असते.
तरी जेव्हा तिने मला पहिलं पत्र ती साधारण सहा वर्षांची असताना पाठवलं होतं तेव्हा मी चकित झाले होते. माझी मुलगी आता लिहिते हे पाहून मला दाटून आलं. ती मराठी माध्यमात शिकत असल्यामुळे आमची पत्रमैत्रीदेखील बहरत होती. सुरुवातीचं चार पाच ओळींचं पत्र आता हळूहळू मोठं होत होतं. काही वर्षांनी त्यात शेवटी नेहमी एक चिंटूचा जोक ती लिहित असे. मी काय लिहित होते ते मात्र मला अजिबात आठवत नाहीये.मला मुलगी नाही याची मध्ये मध्ये खंत वाटली की मी आदितीसोबत संवाद साधते, तिच्याबरोबर शास्त्रीय संगीताची एकच मेहफिल मी ऐकली आहे आणि ती मला नेहमी लक्षात राहील.
यंदा ती बारावीत आहे, परीक्षा सुरु आहेत आणि काही दिवसांपूर्वी तिचं पत्र आलं. आता कॉलेजमध्ये गेल्यामुळे मराठीमध्ये लिहिणं सुटलंय अस म्हणणारी माझी छोटी भाची मला तिच्या आताही एकसारख्या असणाऱ्या सुवाच्च अक्षरातून मला फोन किंवा स्काइपवर सांगू न शकणारी तिच्या करियरसंबंधी काही सांगु पाहत होती. तिच्याकडून सर्वांच्या असणाऱ्या अपेक्षा, तिला काय करायचं आहे आणि हे तिने तिच्या आईबाबांना कसं समजावून सांगितलं आहे हे वाचताना माझे डोळे पुन्हा एकदा भरून आले.
हे पत्र तिने लिहायचं मुख्य कारण आम्हा दोघीमधला असलेला विश्वास आणि तिच्या निकालानंतर मला धक्का वगैरे बसू नये म्हणून तिने घेतलेली खबरदारी हे सगळं वाचून मी तरी इतकचं म्हणू शकते "My Eagle is taking a flight".
आजच्या महिलादिनानिम्मित माझ्या भाचीसारख्या अनेक मुली त्यांच्या भविष्याची तयारी करत असताना दाखवत असलेल्या जिद्दीला सलाम म्हणून. महिलादिनाच्या शुभेच्छा.
आम्हा दोघींमधला पत्रसंवाद मी सगळ्यांना दाखवेनच असं नाही पण मागे तिला एक कार्ड पाठवलं होतं, ते इथे आहे.