जे लोकं मला वरवर ओळखतात त्यांनी मला प्रचंड खिदळताना पाहिलं आहे. जी मंडळी मला खूप जास्त चांगली ओळखतात त्यांनी मला अर्थात खिदळताना पाहिलं आहेच पण हसता हसता डोळ्यातलं पाणी पाहणारी ही काही मोजकी मंडळी आहेत.
आता "अरे संसार, अरे संसार" सुरु झाल्यावर त्यातले किती माझे पाण्याने भरलेले डोळे पाहण्यासाठी माझ्या आजुबाजुला असू शकणार आहेत म्हणा? पण बोलायचा उद्देश इतकाच की मला नक्की कशाने हळवं व्हायला हे बरेचदा माझं मलाच माहित नसतं पण शक्यतो हे भरलेले डोळे सगळ्यांना दिसणार नाही याची मी खबरदारी घेते.
माझे आई-बाबा पहिल्यांदीच अमेरिकेत आले होते आणि आम्ही मे मधल्या मोठ्या विकांताला त्यांच्याबरोबर डीसीचा दौरा आखला होता. आम्ही स्वतः तोवर बरेचदा डिसिला जाऊनही तिथून थोडं पुढे असणारे लुरे केवरंस आणि शेनानडोह पार्क या दोन जागी गेलो नव्हतो आणि सगळ्यात मोठ्ठं म्हणजे माझ्यासाठी आणि अर्थात आई-बाबांसाठीदेखील महत्त्वाचं म्हणजे त्या वर्षी डीसीजवळच्या एका युनिवर्सीटीमध्ये आशा भोसले,सोनू निगम, कैलाश खेर यांचा गाण्याचा कार्यक्रम होणार होता. त्याची तारीख या लॉंग विकेंडच्या एका दिवशी होती;म्हणजे दुधात साखर.मग काय आम्ही सगळा बेत नित आखला आणि सगळी बुकिंग्ज वगैरे करून टाकली.
आमची ती सगळी ट्रीप दृष्ट लागण्यासारखी झाली आणि मला वाटतं शेवटून दुसऱ्या रात्री हा वर म्हटलेला गाण्याचा कार्यक्रम होता. आम्ही, म्हणजे मी आणि आई-बाबा, आशा ताईचे जितके चाहते, तितकाच सोनू पण आमचा लाडका. त्याला आम्ही सारेगम सुरु झालं तेव्हापासून फॉलो करतो असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मी आणि माझी भावंडं सोनुसाठी कुणाची ओळख काढून सारेगमच्या शुटींगच्या ठिकाणी जाऊन पण एक भाग पाहून आलो होतो. आई-बाबा मात्र प्रत्यक्ष पहिल्यांदीच त्याला पाहत होते.
आशाताईंनी सुरुवातीची काही गाणी घेतल्यावर सोनू आला आणि त्याने प्रेक्षकांना अक्षरश: नाचायला लावले. सुरुवातीच्या तीन रांगामधली लोकं तर तितका वेळ त्या महागड्या तिकिटाच्या खुर्चीत बसली पण नाही असं आम्ही गमतीत म्हणालो पण.
या ठिकाणी नंतर काही दिवसांनी हिमेश रेशमीया गाणार होता त्याच्या जाहिरातीच्या सीडीमधेच कुणीतरी फुकटात वाटत होतं आणि सोनुने गातागाता ते पाहिलं तर त्याने नावानिशी त्या प्रकाराबद्दल माईकवरून निषेध व्यक्त करून तो प्रकार थांबवला आणि पुन्हा रफीची काही गाणी गायली.
माझ्या डावीकडे आई, तिच्या डावीकडे बाबा बसले होते आणि माझ्या उजवीकडे माझा नवरा बसला होता. सोनूची गाणी आई-बाबांना भक्तिभावाने ऐकताना केव्हातरी त्याने त्याच्या खास प्रस्थावनेसकट "कल हो न हो सुरु केलं" आणि काय झालं माझं मला कळलच नाही. माझे डोळे घळघळा वाहू लागले.
नशीब की आई-बाबा डावीकडे म्हणजे मंचाच्या दिशेने तोंड करून होते पण उजवीकडे बसलेल्या माझ्या नवऱ्याने माझ्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि मला ढोसलं. मी त्याला तोंडाने "शुश" म्हटलं. बिचारा आधी घाबरला असणार आणि तो आईला सांगेल म्हणून मी त्याला शुश करतेय. मला माहित होतं माझं मन अभद्र विचार करत होतं आणि त्याचे सूर इतके सच्चे लागले होते की डोळे माझं ऐकणार नव्हते.
हर घड़ी बदल रही है रूप ज़िंदगी
छाँव है कभी, कभी है धूप ज़िंदगी
हर पल यहाँ जी भर जियो
जो है समाँ कल हो न हो
आम्हा तिघा भावडांमध्ये आई-बाबांबरोबर सर्वात जास्त वर्षे मी राहिले. माझ्या लग्न व्हायच्या दिडेक वर्षे आधी तर आम्ही तिघंच असायचो. माझ्या आई-बाबांबरोबर मी माझ्या आठवणीतली सगळ्यात लाडकी बंगलोर ट्रीप केली आहे. तिथून आम्ही तिघं उटी-कोडाईलाचारेक दिवस गेलो होतो; ते आमच्या तिघांच्या आयुष्यातले बेस्ट दिवस होते. त्यांनतर आमच्या घरात प्रचंड उलथापालथ झाली आणि सगळ्यात मुख्य मी त्या प्रवाहापासून दूरदेशी ढकलल्यासारखी लांब.
त्या सगळ्या छान दिवसां नंतर आता पुन्हा आम्ही एकत्र भटकंतीचा आनंद घेत होतो. मला वाटतं सोनू आम्हाला सांगत होता "जो है समाँ कल हो न हो". माझे डोळे उगीच काही वाहत नव्हते. मी आवरलं स्वतःला आणि त्या दोघांना अजिबात न कळता उरल्या मेहफिलीचा आनंद लुटला. त्या दिवशी आई-बाबांनी प्रथमच मूर्ती छोटी कीर्ती मोठी अर्थात कैलाश खेरला पाहिलं आणि ऐकलं आणि तेव्हापासून तोही त्याच्या आवडत्या यादीत जाऊन बसला. मला तर तो मी कैलासा ऐकलं तेव्हापासूनच आवडतो. पण तरी जेव्हा त्या ट्रीपची आठवण येते तेव्हा मला स्वतःला सांगावसं वाटतं "जो है समाँ कल हो न हो".