माझं शालेय जीवन वसईमध्ये गेल्यामुळे ख्रिसमस काही माझ्यासाठी अमेरिका किंवा कुठल्याही देशामुळे माहित व्हावा अशातली बाब नाही. माझ्या शाळेतल्या असंख्य मैत्रीणी आणि माझ्याच नाही तर माझ्या ताईच्या देखील मैत्रिणीही ख्रिश्चन असल्यामुळे या सगळ्यांकडे जर २५ तारखेला गेलो नाही तर मोठाच अपराध असे. त्यांचे केक आणि काही बेकिंग गुडीज सोडले तर बाकी सगळं पदार्थाचं आपण दिवाळीत फ़राळाचं करतो त्यातलेच असत. आम्हाला शाळेला १० दिवस सुट्टी असे. त्यामुळे या सगळ्यांच्या घरी जाणे, त्यांनी केलेले गोठे पाहणे वगैरेमध्ये कॅलेंडर कधी बदललं कळतही नसे. त्यांच्याकडे सँटा येतो असं काहीसं ऐकून होते. याच्याशी मात्र आमचा फार परिचय नव्हता. तो २४ तारखेच्या रात्री प्रत्येक मुलाला काही तरी भेटवस्तू, खेळणी देत असतो इतकी ऐकीव माहिती फक्त.
अर्थात ख्रिसमस माहित असला, थोडाफार सांता ठाऊक असला तरी ख्रिसमस कॅरोल, हे प्रकरण मला फारसं माहित नव्हतं. त्यासाठी मात्र देशाची सीमा ओलांडावी लागली. आमचे पहिले काही ख्रिसमस, इकडच्या थंडीशी जुळवून घेण्यात गेले तरी एके वर्षी म्हणजे नक्की सांगायचं तर आरुष पोटात असताना डिसेंबरमध्ये फ्लोरिडाच्या डिस्नेला गेलो होतो, तेव्हा या सणाचा सामुहिक उत्साह पहिल्यांदीच दिसला. डिस्नेमध्ये काय संपूर्ण डिसेंबर ख्रिसमस साजरा केला जातो. आपण जशी लहानपणी "दिन दिन दिवाळी","विठूचा गजर हरिनामाचा" म्हणतो तशी इथल्या लोकांच्या तोंडावर लहानपणापासून "रूडॉल्फ द रेड नोज", "वी विश यु अ मेरी क्रिसमस", "द ट्वेल्व्ह डेज ऑफ क्रिसमस", वगैरे कॅरोल्स रूळलेली असतात.
संगीताला भाषा नसते असं म्हणतात; इथे तर मला कळणारी भाषा होती त्यामुळे तिकडे डिस्नेला सर्व लोकांना स्पीकरवर लावलेल्या या क्रिसमस कॅरोल्स बरोबर सोबतीने गाताना पाहून मला फार उत्सुकता निर्माण झाली. पुन्हा केव्हातरी या कॅरोलचा शोध घेऊ असा मी तेव्हापासून विचार करत होते. मुलं इकडच्या पाळणाघरात जायला लागली तशी क्रिसमस कॅरोल्स काय, हळूहळू, या हॉलिडे टाईमनेच आमच्या घरात प्रवेश केलाच.
तरीदेखील सायबेरीयन ट्रान्स मी नक्की केव्हा ऐकलं सांगता येणार नाही.
तरीदेखील सायबेरीयन ट्रान्स मी नक्की केव्हा ऐकलं सांगता येणार नाही.
मला ट्रान्स म्युझिक फार कळतं किंवा नोटेशन्स वगैरे फॉलो करता येतात असं नाही. अगदी या पोस्टपुरता सांगायचं तर मला यातल्या सुरावटींवर लिहिताही येणार नाही. पियानो मंद्र सप्तकात सुरु होऊन बाजूला व्हायोलिन आपल्याला डोलायला लावते, त्या डोलण्यात क्षणभर झुलावं, तोच अतिप्रचंड वेगाने धबधबा कोसळावा तसे सगळ्याच वाद्यांचे सूर तुम्हाला अचंबित करतात. सगळा ऑर्केस्ट्रा तुमच्यासमोर एक नाट्य सादर करतो. या नाट्याचं कथानक आपलं आपणच लिहायचं, एकट्यानेच या मैफिलीचा आस्वाद घ्यायचा आणि त्यात स्वतःला इतकं झोकून द्यायचं की मनातला कल्लोळ, गोंधळ ही सुरावट संपताना शांत व्हावी.
गेली कित्येक वर्षे डिसेंबरच्या उत्तर अमेरिकेतल्या थंडीत, मन कोसो मैल दूर माझ्या आप्तस्वकीयांच्या बरोबर असतं तेव्हा तेव्हा मी हे गाणं ऐकते. यु-ट्यूब वगैरे नव्हतं तेव्हा इकडच्या हॉलिडे रेडिओवर ते हमखास वाजे. यात मध्ये मध्ये वाजणाऱ्या घंटा जशी सुरावट बदलतात त्याबरोबर मनातल्या कथानकात अधिक-उणे होतं. शेवटाला त्यांची लय संथ होत जाते जाते आणि आपण शांत होतो.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला वेगवेगळ्या किनारी असतात. त्यात काही सुखाच्या भरजरी तर काही दु:खाची काजळी ल्यालेल्या. माझ्याही आयुष्यातली अशी एक काळी किनार दुर्दैवाने ख्रिसमसशी संबधीत. जीवलग मित्र-मैत्रिणीकडेही त्या घटनेचा उल्लेख करणं मी टाळते. पण तरी ती घटना मी किंवा माझे कुटुंबीय विसरूच शकणार नाहीत. आमच्या सर्वांच्याच आयुष्यातले संदर्भ बदलले, त्या एका प्रसंगामुळे. जर नियती वगैरे कुणी कुठे असेल तर ती एक तर झूठ आहे किंवा ती फार क्रूर आहे. हा तो कोणी सँटा वगैरे आहे तो लहान मुलांना खेळणी देत असेल पण आमच्याकडच्या एका छोट्या बबडूकडून तोच काहीतरी घेऊन गेला, असे सगळे तिरपागडे विचार मनात घेऊन सुन्न बसलेलो आम्ही, एका तपाहून अधिक काळ उलटून गेला तरी नियतीला ते परत द्यायला जमलं नाही, जमणारही नाही हे आम्हाला माहित आहे.
मी फोन करते, आई म्हणते "तुला आजचा दिवस माहित आहेच." मी हुंदका दाबून "हम्म" करून प्रत्यक्ष उल्लेख न करता आम्ही काही बाही बोलत राहतो. कठीण असतं नं काहीवेळा "मूव्ह ऑन" होणं. माझ्यासाठी तर आणखी कठीण कारण आता गेले काही वर्षे माझ्या मुलांचा सँटा व्ह्यायची जबाबदारी आम्हा दोघांची आहे. अगदी मनापासून सांगते, मी त्या ख्रिसमस नतंर जेवढा सँटा या प्राण्याचा दुस्वास दरवर्षी केला, तेवढा मला त्याबद्दल ऐकीव माहिती होती, तेव्हा तो माझ्यालेखी तसा अस्तिवातही नव्हता. अर्थात हे सगळं घडतं त्याच्याशी कुठल्याही सँटा, देव या संकल्पनाना जोडणं हा मूर्खपणा आहे न कळण्याइतकी मी दुधखुळी नाहीये.पण सध्या जोवर ही मुलं विश्वास ठेवताहेत तोवर माझ्यासाठी हा सँटा बनण्याचा आतापर्यंतचा कठीण जॉब मला करावा लागेल. मनातली आंदोलनं कमी होतील का ते माहित नाही, आनंद तरीही दाखवावा लागेल. अशा कठीण दिवसांमध्ये साथीला असेल ट्रान्स सायबेरीयनची ही धून.
ही पोस्ट खरं यावेळचा सँटा जॉब करत असतानाच लिहायला घेतली आणि ब्लॉगवर टाकेपर्यंत नाताळ संपलाच आहे. २०१५ चा आढावा वगैरे घेऊन याच वर्षात पोस्ट होईल याची काही शाश्वती वाटत नाही तेव्हा भेटूया २०१६ मध्ये. शुभेच्छा :)