शनिवारची सकाळ. सहा वाजल्यापासून मुलं येऊन सरावाला लागलेली असतात. कदाचित त्यांनी आधी स्पीड स्केट्स घालून सराव केला असेल आणि आम्ही नवाच्या invited only क्लाससाठी पोहोचेपर्यंत त्यांचे इन्डोअर स्केट्स घालायला सुरुवात झाली असेल. आम्हीदेखील पटापटा मुलांच्या पायातले शूज बदलून त्यांना स्केट्स घालायला सुरू करतो. सुरुवातीला जाऊ की नको करणारा माझा सात वर्षांचा मोठा मुलगा एकदा का रिंकमध्ये पोहोचला की तिथलाच होतो. धाकटा, चार वर्षांच्या आसपासचं कुणी नसल्याने टाळाटाळ करायला पाहतो, तोच माझ्या मोठ्या मुलाइतकाच झँडर त्याच्या स्केट्सवरून वार्याच्या वेगाने येत "कमॉन, आय अॅम हियर फॉर यू" अशी साद घालून त्यालाही सामील करून घेतो. हे दृश्य आहे आमच्या मागच्या वर्षीपासून नियमित असलेल्या ओक्स पार्क स्केटिंग रिंकमधल्या शनिवारचं.
कोण कोण आहे इथे? या मुलांमध्ये सात वर्षांचा अलेक्झांडर (सगळे त्याला झँडरच म्हणतात) आहे. तो तीनेक वर्षांचा असताना मी त्याला पाहिलं होतं, तेव्हा तो साधं चालण्यापेक्षा स्केट्सवर चांगलं चालतो असं वाटलं होतं. माझ्यासाठी तो आताच स्टार आहे. जसा तो, तशीच पाच वर्षांची सुळूसुळू स्केट्स करणारी हॅडी, एकविसावा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्सुक कोर्टनी, मोठी कोण छोटी कोण हे पटकन न ठरवता येऊ शकणार्या इव्ह आणि आना या दोघी बहिणी आहेत आणि २०१३च्या जागतिक स्पर्धेसाठी अमेरिकेतर्फे निवडला गेलेला चार्लीसुद्धा आहे. वेगवेगळ्या वयोगटातली वीसेक डोकी - किंवा खरं शरीरं म्हटली पाहिजेत - प्रत्येक शनिवारी एकत्र सरावासाठी / शिकण्यासाठी ओक्स पार्कच्या स्केटिंग रिंकमध्ये येतात.
"आय अॅम प्रिपेरिंग फॉर द नॅशनल्स." "तू इथे यायला शनिवारीसुद्धा पहाटे उठतोस?" या माझ्या प्रश्नाच्या उत्तराला कॉनर्स म्हणाला होता. वर म्हटलं तसं चार्लीने एके वर्षी जागतिक स्पर्धेत अमेरिकेचं प्रतिनिधित्व केलंय. विविध स्तरांवर स्पर्धा होत असतात, त्यात बाकीची मुलंही भाग घेत असतात. म्हणजे म्हटलं तर हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी. मी मात्र दर आठवड्याला सराव करताना पाहते, तेव्हा या शब्दाचा मागमूसही दिसत नाही. एखादी अवघड स्टेप ज्याला जमली, तो दुसर्यालाही यावी, म्हणून दिलखुलासपणे मदत करणार.
आजवर बरीचशी अतिशय चांगली माणसं मला योगायोगाने भेटत गेली. त्यातल्या प्रत्येकाने मला काही ना काहीतरी शिकवलं आणि माझी त्या वळणाची जडणघडण होत गेली. माझी या ग्रूपशी दोस्ती ही त्या योगायोगातली आतापर्यंतची सगळ्यात वेगळी घटना किंवा आपण म्हणतो की हे विधिलिखित होणारच होतं, तसं काहीसं.
मला धाकटा मुलगा झाला, तेव्हा माझ्या मोठ्या मुलाला थंडीत कुठे गुंतवावं हा एक प्रश्न होता. त्यात पोर्टलँडची थंडी म्हणजे सूर्यदर्शन अजिबात नाही आणि संततधार पाऊस. त्यामुळे मुलांनी खेळत राहायचं तर काहीतरी इन्डोअर पाहायला हवं होतं. तेव्हा कुणीतरी ओक्स पार्कच्या स्केटिंगचं नाव सुचवलं होतं. त्यात शनिवारी साडेदहाच्या क्लासला एका मुलाच्या तिकिटावर एक पालक फ्री अशी ऑफर होती. ते फुकट आहे म्हणून नाही, तर आमचा मुलगा थोडा बुजरा आहे, त्यामुळे इथे निदान बाबाच्या सोबतीने निदान आत जाईल, या आशेने नवर्याने जायला सुरुवात केली.
अगदी सुरुवातीला त्यांना उत्तेजन द्यायला मीही बाळाला स्ट्रोलरमध्ये टाकून जायला लागले आणि आमची ओळख झाली बिलबरोबर आणि त्याच वेळी मी वर उल्लेखलेल्या झँडरला पाहिलं.
या साडेदहाच्या क्लासला आमच्यासारखे हौशे-नवशे पालक त्यांच्या हाफ तिकिटाला घेऊन आणि किती वैट दिवस आहे त्याप्रमाणे स्केटिंग येत असलेले लोक असा बराच गोतावळा असतो. पण तरी बिलचा उत्साह वाखाणण्यासारखा असे. तो प्रत्येकाला स्केटिंग सुरू ठेवावं म्हणून प्रोत्साहित करत असतो. यात त्याचा वैयक्तिक स्वार्थ काहीच नसतो. तो आणि इथे येणारे जवळजवळ सगळेच पोटापाण्याचा आपापला वेगळा उद्योग करून इथे आठवड्याच्या शेवटी किंवा दिवसाच्या शेवटी त्यांचा छंद पुढे न्यायला येतात. त्यात बिलची स्वतःची दोन मुलं इथे शिकतात आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागीपण होतात; म्हणजे त्याने का बरं इतर प्रतिस्पर्धी निर्माण करावेत?
वर म्हटल्याप्रमाणे आम्ही साडेदहाच्या क्लासला जायला सुरुवात केली. बाळाची कामं वाढल्यामुळे मी नंतर त्यातून कटाप झाले. त्यातल्या त्यात ही दोघं नसल्यामुळे थोडा निवांत वेळ मिळाला, हा काय तो माझा फायदा. पण आमच्या बाबाची कसोटी होती. बरेचदा सकाळीच पोराचं स्केटिंग आवडत नाही वगैरे सुरू होई, कधीमधी दांड्या मारणंही सुरू होतं. पण तरी नेटाने किल्ला लढवून स्केटिंग सुरू ठेवलं. केव्हातरी दादा जातो म्हणून धाकटा, "मलापण स्केटिंग करायचं आहे" म्हणून मागे लागला. त्याला नेलं, तेव्हा सुरुवातीला बेबी स्केट्स दिले, ते त्याला नको होते. त्यामुळे तिकडे थोडी लोळालोळी झाल्यावर पुढच्या वेळी विचारू म्हणून वेळ मारून नेली. पण या साहेबाला नको इतकं लक्षात राहतं. त्यामुळे पुन्हा तेच. बरं नेहमीचे स्केट्स दिले तर त्यावर तोल सांभाळताना मला बाजूला धरावं लागे. त्यामुळे रिंकच्या बाजूला एक रिंगण आहे, तिथे आम्ही दोघं एकत्र चकरा मारतोय असं दृश्य. तेही नाही म्हटलं तरी इतरांना थोडं अडखळवू शकतं, म्हणून मग आम्ही दोघांनी ब्रेक घेतला. आता बाकी काही नाही, पण बाबाला स्केट्स घालून तोल सांभाळता येणं आणि एक गोल चक्कर मारणं इतकं येऊ लागलं होतं. त्यामुळे मुलालाही तो मदत करू शकत होता. त्यामुळे पूर्वीसारखं दांड्या मारण्याची संख्या कमी झाली होती. मोठा आपल्या स्केट्सवर उभं राहू लागल्यावर साडेदहाच्या क्लासला धाकट्यालाही सुरू केलं.
याच दरम्यान मी नोकरी बदलली आणि माझी टिफनीशी ओळख झाली. आमच्या दोघींचा साहेब एक आणि कामाचं स्वरूप थोडं वेगळं. ती तेव्हा माझ्या पुढच्या क्यूबला बसायची. त्यामुळे आमच्या कधीतरी व्यक्तिगत गप्पाही होत. एकदा "शनिवारी काय करता?" या प्रश्नाच्या उत्तराला "स्केटिंग" ऐकून ती उडाली. कारण त्याच स्केटिंग रिंकमध्ये ती लहानपणापासून स्केटिंग शिकली आणि आता तिच्या मुली तिथे शिकतात, शिवाय दर एक महिना आड ती स्वतः तिथे स्वयंसेवक म्हणून कामही करते. त्या वेळी आमच्या तिथल्या काही अडचणी पाहून तिने मला साडेदहाऐवजी दुपारी एकचा क्लास कर म्हणून सल्ला दिला. आमच्या नशिबाने तो तिचा तिथला कामाचा महिना होता. त्यामुळे तिने आम्ही गेल्यावर तिथल्या तमाम प्रशिक्षकांशी आमची गाठ घालून दिली. शिवाय आईची ऑफिसमधली मैत्रीण इकडे आहे म्हणून का काय माहीत नाही, पण मुलांनीदेखील अचानक सहकार्य दिलं. त्यात त्या क्लासमध्ये अजून धडपडत असणार्या धाकट्याने दादाच्या वयोगटात घुसखोरीही करून झाली.
एकचा क्लास साडेदहापेक्षा कमी गर्दीचा, कदाचित मुलांबरोबर एक पालक फुकट नसल्यामुळे किंवा वेळेमुळे, पण त्यामुळे मुलांकडे जास्त लक्ष पुरवलं जाई आणि साडेदहाला अगदी बेसिक स्केटिंग शिकवलं जाई, तर इथे थोडं पुढे - म्हणजे backwards किंवा एक पाय मागे सरळ करून वगैरे अशा थोड्या पायर्या वाढवल्या होत्या. या वेळी आमची ओळख झाली ती एमीबरोबर.
एमीचे तीन मुलगे इथे स्केटिंग शिकतात. वर उल्लेख केलेला चार्ली तिचाच मोठा मुलगा. या तिघांनाही स्केटिंग करताना पाहणं म्हणजे तळ्यात मासे जसे सुळकन इकडे तिकडे फिरतात, तशी ही पूर्ण स्केटिंग रिंकमध्ये सुळसुळत असतात. एमीच्या मते मुलगे सूचना पाळायला फार टाळाटाळ करतात, पण तुमचा मुलगा फार छान ऐकतो.. हे अर्थातच आम्ही कधी अनुभवणार म्हणा:) तर तिने त्याच्याकडे नेहमी लक्ष दिलं आणि साधारण तीनेक महिन्यात ती, "हवं तर एकच क्लास सुरू ठेवू शकता, नाहीतर मोठ्याला सकाळी नऊला एक invited only क्लास आहे त्याला मी घेईन", असं क्लास संपताना म्हणाली.
यात आमचा प्रश्न हा होता की आता आम्ही दोघं मुलं एकतरी खेळ एकत्र खेळायला शिकतील म्हणून रस दाखवत होतो. पण धाकटा अजून चार असल्याने तेवढं काही स्केटिंग शिकला नव्हता. त्यामुळे त्याला नऊच्या क्लासमध्ये प्रवेश देता आला नसता. मग एमीने त्याच्यावरही उपाय काढला. ती म्हणाली, "तुमच्या दोघांनाही सकाळीच आणा."
मोठा क्लासमध्ये असेल तेवढा वेळ धाकट्याला तिथेच कुणी तरी बेसिक शिकवत. बाबालाही स्केट्स देऊन त्यानेही मुलांबरोबर सक्रिय असावं हेही पाहिलं. बाबा आतापर्यंत बर्याच क्लृप्त्या शिकला, हे वेगळं सांगायला नकोच. हा क्लास संपला की तुम्हाला हवं तर साडेदहाच्या क्लासमध्ये थांबून सराव करता येईल, ही सोयही होतीच.
तसं माझ्या मुलाचं स्केटिंग बरं होतं; पण अर्थात आता ज्या मुलांबरोबर त्याला शिकायचं होतं, ती बहुतेक सर्व एकतर स्केटिंग करणार्या कुटुंबातली असल्यामुळे अगदी लहानपणापासून क्लब करत होती, शिवाय ते आठवड्यात इतर दिवशीही येऊन सराव करून जात. आणखी एक म्हणजे त्यांनी हे वर्षानुवर्षे करायचं ठरल्यामुळे त्यांनी यात गुंतवणूक केली होती. म्हणजे स्पष्ट सांगायचं, तर त्यांची स्केटिंग किट्स अतिशय अद्ययावत आणि आपल्या मध्यमवर्गीय भाषेत सांगायचं तर महाग होती. ती महाग असण्यापेक्षा कुठल्याही खेळात जसं तुम्ही योग्य आयुधं वापरलीत तर तुमचा परफॉर्मन्सदेखील चांगला होतो, तो नियम स्केटिंगसाठीदेखील लागू होतोच. तर सांगायची गोष्ट, आम्ही सुरू केलं आणि दोनेक सेशननंतर कुणीतरी माझ्या मुलाच्या पायाची साइज तिच्या मुलाच्या जुन्या स्केट्सच्या साइजशी जुळेल असा अंदाज करून टिफनीकडे ते स्केट्स देऊन गेली. ती माउली कोण हे मला आजतागायत कळलं नाही. ते स्केट्स वापरून इतकं हलक्याने जाता येतं, हे मुलाच्या लक्षात आल्याने आता इथे आपल्याला स्वीकारलंय हे त्याच्या लेखी जास्त अधोरेखित झालं आणि शनिवारी उठण्यातला त्याचा रस अचानक वाढला. बिलकडे सहज चौकशी करता हे स्केट्स निदान सहाशे डॉलर्सचे असतील असं तो म्हणाला. अर्थात तो स्वतःच म्हणाला की या वयात त्यांचे पाय मोठे होणार असतात, तेव्हा प्रत्येक वेळी नवेच स्केट्स घ्यायला पाहिजेत असं नाही. बाकीची मुलंही जुने स्केट्स वापरतात आणि नवे स्केट्स असतील तर पायाला सराव व्हायलाही वेळ जातो.
नेमकं आम्ही सकाळचं सेशन सुरू केलं, त्या वेळी एमी, अॅबी आणि बिल तिघं मिळून या मुलांचा एक स्प्रिंग शो बसवत होते. त्यात आमच्या मुलांनादेखील घेतलं. सुरुवात शोची गाणी बसवायच्या वेळच्या मस्तीमुळे झाल्यामुळे माझी मुलं या नवीन मुलांमध्ये कधी रुळली ते कळलंच नाही. शिवाय माझ्या धाकट्या मुलाला वगळलं जातंय असं होऊ नये, म्हणून त्याला जमेल असंदेखील बसवलं. त्यामुळे इतर वेळी मला रिंकमध्ये जायला मिळत नाही ही धाकट्याची रडारड बंद झाली.
या शोनंतर पुन्हा जेव्हा नेहमीचा सकाळचा क्लास सुरू झाला, तेव्हा माझ्या मुलासमोर आधीपासून हा क्लास आणि खरं सहा वाजल्यापासून येणारी ही मुलं स्केटिंगमध्ये बरीच पुढे होती हे सहज लक्षात येत होतं. त्यालाही ते मी आधीच सांगितलं होतं. पण त्याला काही येत नसेल तर त्याच्याबरोबर करणारं कुणी न कुणी तरी तिथे असे आणि मला जास्त येतं तर मी का कमी येणार्याबरोबर करू.. किंवा हाच माझ्याशी पुढे जाऊन काँपीट करायला लागला तर.. अशा विचारांना तिथे थारा नव्हता.
एकदा एमीबरोबर बोलताना ती चार्लीबरोबर जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी गेली होती, याची चर्चा माझ्याबरोबर करताना ती सहज म्हणाली की तिथे भारताचेही स्पर्धक होते आणि त्यांना स्केटिंग करताना पाहताना कळत होतं की त्यांना अजून ट्रेनिंगची गरज आहे. आम्ही मध्ये वेळ होता तेव्हा त्यांना काही टिप्स दिल्या. "I wish I could have spent some more time with them. I know its hard to get the kind of infrastructure we need for this game". तिच्या या वाक्यात खेळाची आवड जास्त दिसते. त्यामुळे ती सतत इतरांना प्रोत्साहन देत असते. जरी ट्रेनिंगसाठी तुम्ही क्लब मेंबरशिप वगैरे घेऊन करणं जास्त योग्य आहे, तरी आमच्यासारखे अल्याड-पल्याड असणारे लोक वेगळे पडू नयेत, म्हणून नऊच्या क्लासला आम्हाला आमंत्रित केलं जातं. आमच्याबरोबर मुलगी होती, तिची प्रगती पाहून तिलाही एमीने बोलावलं होतं. पुढच्या महिन्यात थॉमसला आणलं आणि तीनेक महिन्यांनी झालेल्या रिजनल्सला पदक मिळालं. आता तो नियमित क्लब करतो.
मला खात्री आहे, अशी अनेक उदाहरणं असतील. यातली बरीच मुलं स्पर्धक म्हणून एकमेकांसमोर उभी ठाकतील यात शंकाच नाही. पण जेव्हा ती सगळी एकत्र सराव करतात, त्या वेळी मात्र ही एक टीम, एक कम्युनिटी असते. आपल्या या मोठ्या टीममधल्या कुणाला काही अडचण असेल तर आपण मदत केलीच पाहिजे, ही भावना यांना वेगळी शिकवावी लागली नाही, असं दिसतं. जो नवा असतो त्याला कुणीतरी मदत करतं, मग हा नवा थोडा अनुभवी झाला की तो पुढच्या नवख्याला मदत करायला तयार होतो. हे चक्र असंच सुरू राहतं.
मागे म्हटलं तसं अशी माणसं, असे मित्र-मैत्रिणी मला मिळाल्याचं समाधान मला वाटतं. इथे ते यासाठीदेखील की मी फार काही न करता मदत करायचा हा वसा माझी मुलंही घेतील. त्यांनी एकंदरीत याच स्पर्धांमध्ये उतरलं / नाही उतरलं, तरी तसा काही फरक पडत नाही. त्यांना अंग सोडून स्केट्सवर गिरक्या घेताना पाहणं जितकं सुंदर वाटतं, तितकंच भरून येतं त्यांना तोल सावरायला मदत करायला कुणीतरी बाजूला आलं की आणि त्यांनीही कुणाच्या तरी खांद्यावर हलके हात ठेवून एकत्र गरगर फिरताना.
आजकाल शुक्रवारपर्यंत कितीही दमलं, तरी जेव्हा शनिवारी मुलं स्केटिंगला जायचं म्हणून आनंदाने लवकर उठतात, तेव्हा आम्हीही आपसूक तयार होतो. इथे स्पर्धा नसायलाच हवी असं काही नाही. पण थोडं कम्युनिटी म्हणून मदतीचीदेखील अपेक्षा करणं चुकीचं नाही. हे छोटे छोटे हात मोठे होताना त्यांच्या मनात हा मदतीचा भाव रुजतोय, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
आज बालदिन आहे. त्या निमित्ताने आमच्या मागच्यावर्षीच्या स्केटिंग शो मधला लहान मुलांनी सादर केलेल्या गाण्याचा एक विडीओ इथे देत आहे. मग आपणही आपल्या लहानग्यांना स्पर्धेच्या तयाऱ्या करतानाच थोडी समुह भावना वाढीला लागावी म्हणन प्रयत्न करणार का? बालदिनाच्या शुभेच्छा.