Monday, October 12, 2015

रंगा येई ओ

फॉल म्हणजे आपला हेमंत येतो तो निसर्गातल्या रंगाची उधळण घेऊन. आता नाही म्हटलं तरी त्या पानगळीच्या रंगांची सवय झालीय पण तरी एखादी सांज अशी येते की दिवसाचा देव जाता जाता त्या रंगात आपले काही रंग घालतो आणि एक वेगळं चित्र आकाशाच्या नैसर्गिक कॅनव्हासवर काढून जातो. काल एक छोटा वॉक मुलांबरोबर करताना ही उधळण दिसली. सुरुवातीला त्याने थोडा पिवळा वापरून फराटे काढायला सुरुवात केली. 

मध्ये त्याला कॅनव्हासच्या पार उजवीकडे कुणा जाणाऱ्याचे मोठा पंजा का चितारावासा वाटला असेल बरं?

पिवळ्याला विस्तारायचं काम मध्यभागी सुरु होतचं. 

आणि मग आगीची धग दिसावी तसा हा केशरी. माझ्या घरची एक भिंत या रंगात  अ‍ॅक्सेंट केली तेव्हा त्याला फ्लेम कलर म्हणतात हे ठाऊक झालं. 

आम्ही चालत घरी पोहोचेस्तो कॅनव्हास पूर्ण भरला होता आणि रविवारची हुरुहूर लावणारी आणखी एक संध्याकाळ रंगमय झाली होती. 


कुठेतरी हेच रंग उगवतीचे म्हणूनही खपत असतील. कोण जाणे? 


Friday, October 2, 2015

उपनगरी अवतरला "गिरगाव कट्टा"


श्रावण आला की खादाड मंडळींना उपासाच्या पदार्थांची आठवण होते म्हणजे तशी ती इतर वेळीही होत असतेच पण मग त्यासाठी संकष्टी नाहीतर घरटी गुरुवार वगैरे करणारी आई-आज्जी--मावशी-काकू अशा लोकांवर विसंबा  आणि ते उपासाचे पदार्थ करून आपल्याला खाऊ घालतील याची वाट पहा. त्यातून त्यांनी ते डाएट नामक फंडा (ए कोण रे तो आमच्या वजनाकडे पाहणारा) वगैरे सुरु केला असला की आलीच का कंबख्ती? असो पण श्रावण आला की भलेभले कोलमडतात. अरे वातावरणच असं असतं न महाराजा की हिरवळ दाटे चोहीकडे (हो आली आता क्र. २ ला बालकवींची पण आठवण आली) शिवाय सणासुदीची लयलूट मग आपण नाही उपासाच्या पदार्थाकडे वळणार तर काय ते भय्याकडे पाणीपुरीच्या लायनीत थांबणार? (ओके मान्य गेले ते चांगली पाणीपुरी लावणारे भय्ये वगैरे वगैरे बरं असो) 

तर सांगायचं तात्पर्य म्हणजे अशा वेळी उपासाचे पदार्थ खाणे हा आपला म्हणजे मराठी बाणा खाद्यसंस्कृती मंडळाचा जन्मसिद्ध हक्क असतो आणि तो आपण आजकाल हा जो  काही बाहेर खाऊया हा फंडा आला आहे त्याला स्मरून बाहेर जाऊन उपासाचे पदार्थ खाऊन साजरा करतो. मग आली का धावपळ? कुणी म्हणे दादरच्या प्रकाशला जा पियुष प्यायल्याशिवाय यायचं नाही बरं का? आणखी कुणाचं काय तर कुणाचं काय. आपण राहणार तिकडे उपनगरात बोरिवलीला. नाही म्हणजे काय हापिस टाईम, झालचं तर मेगाब्लॉक सग्ग सग्ग सांभाळून प्रवास किती करायचा. आणि मग शोध सुरु झाला बोरिवलीतच आणि हा कट्टा आपल्या प्रबोधनकारच्या जवळच मिळाला. 

प्रवेश करताच काही टेबले आणि थोडं आत उजवीकडे एक गल्ला कम छोटं दुकान, तिथे मिठाया,पुरणपोळ्या,चिवडे वगैरे मराठी खाद्यमेव्याची लयलूट आणि घाईतल्या लोकांना पटकन तिथेच काय हवं ते घेऊन बाहेरच्या बाहेर सटकायची सोय, आरामात बसायचं असेल तर वरती वातानुकूलीत कक्षाची सुविधा. 

उपासाच्या दिवशी गेला असाल तर फराळी मिसळ, साबुदाणा वडा वगैरे पदार्थ तुमच्यासाठी तत्परतेने हजर असतील.

 








हे जे मेनुकार्ड आहे ते आम्ही वातानुकूलित कक्षात बसलो होतो तेव्हाचं आहे. नंतर  मैत्रिणीबरोबर खाली बसलो तेव्हा पुन्हा फोटो काढला नाही. 





जेवायला जाणार तर भाकरी सोबत खायचे बरेच प्रकार आहेत. 

 काजूची उसळ आणि वांग्याचं भरीत मागवलं होतं. 



सुरुवात मेथी आणि कोथिंबीर वडी आणि थालीपीठ खाऊन केली. थालीपीठ मला भलतच आवडल्यावर ताईने ते डीप फ्राईड असतं असं सांगून माझा भ्रमनिरास केला पण मी काही त्याची शहानिशा केली नाहीये :) शिवाय हे इतक खाऊन पोट इतकं भरलं की दुधी हलवा वगैरे गोडाचं काही मागवलं नाही. हे सगळे पदार्थही तिथे मिळतात. 


खरं तर ही पोस्ट २०१३ पासून माझ्या ड्राफ्टमध्ये आहे. तेव्हा पहिल्यांदी आम्ही इथे जेवायला गेलो आणि त्या दौऱ्यादरम्यान जातच राहिलो. पण त्यावेळी काढलेले फोटो कुठे गायब  कळलच नाही. तेव्हा तर गुळपोळीचा सिझन होता म्हणून  चांगल्या डझनभर पोळ्या इकडे घेऊन आलो होतो. पण खादाडीबद्दल लिहिताना एकही पदार्थ समोर येऊ नये ये भी ये भी कोई बात हुई? 

यावेळी देखील बरेचदा गेलो (मध्ये त्यांनी त्यांची जागा पण बदलली) पण पहिल्यावेळ इतके  फोटो काढले नाहीत. वानगी म्हणून काही फोटो आहेत, तेही ब्लॉगोबासाठी. पण यावेळी देखील तीन चारदा गेले.  एकदा आईबाबा आणि मी गेलो तेव्हा थाळी आणि इतर काही पदार्थ मागवले. मसाले भात मला आवडतो म्हणून तो समोर आला तर फोटोचं कुणाला सुचतंय? आपण अन्नदाता सुखी भवं म्हणून पोटोबाला तृप्त करायचे. 

आताच गणपती गावाला गेले आणि नवरात्राची वाट पाहिली जाते. तेव्हा अजून सामिष खायला सुरुवात झाली नसेल तर किंवा त्या नऊ दिवसांत उपासाचे किंवा मराठमोळे शाकाहारी पदार्थ खायचे असतील तर आता गिरगाव पर्यंत किंवा गेलाबाजार दादरपर्यंतही जायची गरज नाही. बोरीवली पश्चिमेला कट्ट्यावर आलात की तुम्हाला मराठी स्वयंपाकघरात गेल्यासारखंच वाटेल.