आज पुन्हा एकदा जागतिक मैत्रीदिनाचा रविवार. खरं तर जवळजवळ संपतच आला आणि आताच्या ऑनलाईन जगात प्रत्यक्ष भेटणारे मित्र -मैत्रीण कमी झाल्यामुळे शुभेच्छांची देवाणघेवाणही न बोलता. अर्थात यामुळे काही फरक पडत नाही . कारण जे बंध जेव्हा निर्माण व्ह्यायला हवे होते, ते एकदा निर्माण झाले की मग अंतराने तसा काही फरक पडत नाही. आज खूप दिवसांनी कॉलेजच्या वर्षांमध्ये ऐकलेलं केकेच्या आवाजातलं "यारो, दोस्ती बडी ही हसीन है" लावलंय.
तेरी हर एक बुराई पे डांटें जो दोस्त
गम की हो धूप तो साया बने तेरा वो दोस्त
नाचें भी वो तेरी खुशी में
अरे यारो दोस्ती बडी ही हसीन है
ये न हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है?
मला नाही वाटत मैत्री इतक्या सोप्प्या शब्दात कुणी समजावली असती. केकेचा सुरेल आवाज आणि लेज लुईसने गिटारच्या कॉर्ड्सवर डोलायला लावतानाच अंतर्मुख करणारं संगीत. यातला हा वर लिहिलेला मैत्रीचा भाग मला तेव्हा फार भावला होता आणि आज तोच भाग चटका लावून जातो.
कॉलेजच्या वगैरे काळात अशी मैत्री मोप मिळाली. मैत्रीत खाल्लेला आणि दिलेला ओरडा याचा कधी कुणी हिशोब ठेवला नाही. माझ्या अभ्यासाताल्या पडत्या काळात माझ्यामागे उभ्या राहिलेल्या माझ्या मैत्रिणी आता सगळीकडे विखुरल्यात. या कडव्यात त्या पुन्हा मला एकत्र भेटतात.
कामाच्या सुरुवातीच्या वर्षात त्रास झाल्यावर मग चांगल्या कंपनीत नोकरी मिळाल्याचा आनंद स्टेशनवरच उड्या मारून साजरा करणारा माझा मित्र मला या गाण्यामुळे उजवीकडून जाणाऱ्या गाडीसकट तसाच आठवतो. अजूनही आता न दिसणाऱ्या या उड्या आनंदवार्ता कानावर आली की दिसतात.
फक्त जवळच्या मैत्रीबरोबर जोडले जाणारे अनेक क्षण या गाण्यामुळे डोळ्यासमोर रांग लावतात. तसं पाहायला गेलं तर अर्ध आयुष्य संपल्यात जमा आहे. आजवरच्या प्रवासात जी माणसं मैत्रीमुळे जोडू शकले, ती नसती तर खरच, क्या फिर बोलो ये जिंदगी है??