उन्हाळा चांगला लागला, म्हणजे पोरांच्या शाळा बंद झाल्या की मग डोळे दुरच्या प्रवासाची वाट पाहायला लागतात. त्यात काही ठिकाणं इकडे आल्यापासून नोंदणीत होती पण जाणं झालं नव्हतं. मागच्या वर्षी आई-बाबांची मदत असल्यामुळे ती यादी पुन्हा हातात घेता आली. या यादीवर अग्रभागी होता "क्रेटर लेक". विकीपेडियावर याबद्दल भरपूर माहिती आहे, त्याबद्दल थोडक्यात सांगायचं, तर एका उद्ध्वस्त ज्वालामुखीमुळे तयार झालेला १,९४३ हजार फुट खोल तलाव, जो दरवर्षी पाऊस आणि वितळलेल्या बर्फाच्या पाण्याने भरला जातो.
आम्ही निघालो आणि आजवर ओरेगावात जाताना दिसणारी गर्द हिरवळ इथेही काही सुंदर वळणे घेत, आमच्या सोबतीला होती.
हळूहळू चढण दृष्टीपथात यायला लागली.
जेव्हा पहिल्यांदी या निळाईला डोळेभरून पाहिलं, त्याच क्षणी या ठिकाणी यायचं सार्थक झालं.
हिवाळ्यात एक बाजू बऱ्यापैकी बंद असते. मात्र उन्हाळ्यात गाडीने संपूर्ण प्रदक्षिणा करायची सोय आहे.
आम्ही गेलो तेव्हा थोडा अजून न वितळलेला बर्फ दिसत होता.
विझार्ड आयलंड, हे एक बेटही आतमध्ये दिसत. खाली जाण्यासाठी एक ट्रेकदेखील आहे आणि आतमध्ये बोटिंगची संधी.
नैसर्गिकरित्या तयार झालेले काही दगडांचे आकार या निळाईवर उठून दिसतात.
आमच्या प्रदक्षिणेतला हा थांबा मला मायदेशाची आठवण करून गेला.
या निळाईची भूल पडताना सांज कशी झाली कळलंच नाही. कदाचित सूर्याचाही इथून पाय निघत नसेल.