(spoiler alert - खाली या सिनेमाची जवळजवळ संपूर्ण कथा सांगण्यात आली आहे. ज्यांना आधी स्वतः सिनेमा पाहणे आवडते त्यांनी याकडे लक्ष द्यावे)
बारा वर्षाचा पोरगेला हात बसमधून बाबाला टाटा करताना दिसतो. या हाताला चेन दुरुस्त करणाऱ्या आपल्या बाबाला मदत करायची असते, जमलचं तर त्याच्या सातेक वर्षाच्या बहिणीच्या लग्नाच्या हुंड्यासाठी पैसे साठवून कुटुंबाच्या भविष्याची चिंता कमी करायची असते आणि तो काही कायमसाठी जाऊन राहणार नसतो. तो दिल्लीहून लुधियानाला एका कारखान्यात रोजंदारी करून पुन्हा दिवाळीला घरी थोडे दिवस येणार असतो. त्याचा चेहरा नीट पाहतो न पाहतो तोच बस गेलेली पण असते. हा सिद्धार्थ, ज्याच्या चेहरा किंवा ज्याचा फार ठळक नसलेला चेहरा आणि तरीही त्याचं नाव ठळकपणे असलेली कथा साकार करणारा, सत्य कथेवर आधारीत २०१३ मध्ये आलेला हा सिनेमा.
तसं पाहिलं तर मोठ्या शहरात सिग्नलला किंवा कुठे फुटकळ कामं करणारे असे छोटे मोठे सिद्धार्थ आपण कित्येक वर्षे पाहात असतो आणि त्यांची कथा थोडीफार आपल्याला माहित असते. एक असाही असतो किंवा कदाचित जास्त असे असतील ज्यांचा चेहरा खऱ्या अर्थाने हरवतो आणि आपण आपल्या मार्गाने चालताना वाईट वाटणे खेरीज फार काही करणं आपल्या हातीदेखील नेहमीच नसते. ही कथा हा सिद्धार्थ आणि अर्थात त्याच्या पालकांची तगमग मांडताना आपल्याला खऱ्या अर्थाने अंतर्मुख करून जाते.
कथेबाबत विस्तृत लिहायचं तर दिल्लीत, एका छोट्या झोपडीत राहणारं हे छोटं कुटुंब. सिद्धार्थ, चेन दुरुस्त करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे त्याचे बाबा, पिंकी त्याची छोटी बहिण आणि त्यांचा सांभाळ करणारी त्याची आई. या कुटुंबाचं दिवसाचं उत्पन्न फार तर अडीचशे रुपये असेल. त्यात त्यांचा रोजच खर्च, झोपडीचं भाडं हे सगळं सांभाळून मुलांना शाळेत पाठवण्याची चैन या कुटुंबाला परवडणार का? यातूनच एका ओळखीच्याच चुलता लुधियानाच्या कारखान्याचा मालक आहे आणि तिकडे संधी आहे म्हणून लहानग्या सिद्धार्थला तिथे पाठवायचं ठरतं. त्याच्या आईला मनातून कितीही वाटलं की मुलाला शिकवलं पाहिजे तरी तो तिकडे सुरक्षित काम करेल अशा भाबड्या आशेने आणि परिस्थितीच्या अतीव गरजेने हा निर्णय घेतला जातो. सिद्धार्थला जरी धोणी सारखं क्रिकेट खेळायचं असतं तरी त्याला आपल्या कुटुंबियासाठी काही करण्याची तयारी असते. त्यानंतर तो जातो, त्याचा एकदा फोनदेखील येतो आणि नंतर संपर्क तुटलेला आणि दिवाळी उलटली तरी परत न आलेला हा सिद्धार्थ शेवटी सापडतो का?
सारासार विचार केला तर त्याच्या अस्तित्वाचं महत्व नक्की कुणाला असायला हवं? त्याच्या पालकांना. बाकी तो कारखानदार, तो मधला एजंट यांना त्याच्या परतण्याशी देणं घेणं असावं का? किंवा आपलं काम नेटाने करू पाहणारे कायदा सुव्यवस्था अधिकारी किंवा एनजीओ कुणीही यासाठी मदत केली आणि त्याचा पाठपुरावा करावा म्हटला तरी किती? उत्तर स्पष्ट आहे आणि तरीही या कथेतून त्याच्या पालकांची लढाई अधोरेखीत करताना हा चित्रपट आपल्यासाठी न संपणारे अनेक प्रश्न मागे ठेवून जातो.
"सिद्धार्थचे बाबा", हा तगमगलेला चेहरा सिनेमा पाहताना आपण वारंवार पाहतो. हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी ओळखीच्या ट्राफिक पोलिसाला विचारून काही सल्ला मिळतो का ते पाहतो. प्रसंगाचं गांभिर्य ओळखून तो पोलिसस्टेशनला तक्रार नोंदवायला पाठवतो. इथे सिद्धार्थचा चेहरा हा प्रश्न ऐरणीवर येतो. या कुटुंबाकडे एक मोबाईल असतो त्यात पिंकीकडून चार्ज टाकून कधीमधी वापरला जातो. पण एकंदरित मोबाइल जगतात उपऱ्या बापाला कधी आपल्या मुलाचा फ़ोटो काढायचं सुचलंच नसतं. घरी आल्यावर पिंकीचा फ़ोटो काढतानाची तत्परता त्यातल्या त्यात तो दाखवतो. रोजच्या जीवनातलीच लढाई त्याच्यासाठी खरं तर खूप होती. हे संकट म्हणजे अग्निपरीक्षाच. कासावीस होऊन जेव्हा स्वत: लुधियानाला जायचं ठरवतो, तेव्हा होणाऱ्या खर्चाला कसं भागवायचं, याची या कुटुंबाच्या बजेटची चर्चा काळजाला घर पाडते. दिल्लीहून लुधियानाला जायचे ३८९ रू. आणि वरखर्चाच्या तजवीजीसाठी त्याच्याचसारखे हातावर पोट असलेले हात मदतीला येतात. लुधियानाला जी काही माहिती मिळते त्याचं सार इतकच की सिद्धार्थला डोंगरीला नेलं असू शकेल. हा अर्थात त्याच्या रूममेटचा अंदाज.
जसा सिद्धार्थच्या बाबांचा संघर्ष, तशी एकीकडे झुरणारी त्याची आई. तुमच्या-माझ्या आईसारखीच, मुलासाठी कळवळणारी, तो एजंट नवऱ्याला नीट उत्तर देणार नाही, म्हणून वाघिणीसारखी तरातरा जाऊन त्या लुधियानाच्या कारखानदाराच्या पत्त्याचं पान एजंटच्या डायरीतून फाडून आणणारी, एका बाजूला ज्योतिषाकडे जाऊन त्याचे ग्रह बघणारी, नवरा लांबच्या गावी मुलाला शोधायला जाणार म्हणून त्याच्या धंद्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेणारी. तिची वेदना माझ्यातल्या आईला हुंदके द्यायला भाग पाडते.
मग सुरू होतो शोध डोंगरीचा. हे गाव नक्की कुठे आहे आणि तिकडे काय आहे हे आम्हा मुंबईकरांच्या तोंडावर असलेलं उत्तर शोधताना तोंडाला मात्र फेस येतो. डोंगरी शोधली तरी सिद्धार्थ मिळणार का? मुंबईत आणखी अशीच रस्त्यावर असलेली मुलं प्रसंगी सिद्धार्थच्या वडिलांना सल्ला देताना त्यांच्यापेक्षा वडिल वाटून जातात. नकळत या सगळ्याच मुलांचे प्रश्न आपल्याला स्पर्शून जातात. पोटच्या मुलाला आपण जवळजवळ हरवून बसलोय या भावनेने आसपास दिसणारी सगळीच मुलं सिद्धार्थसारखी वाटायला लागतात, त्याचा सुरुवातीला पुसट दिसलेला चेहरा आपल्या सर्वांसाठी धूसर होत जातो. आता दरमजल करत भटकणाऱ्या या बापाच्या वेदनेने आपणाला हुरुहूर लावते. चटका लावणारा हा सिद्धार्थ.
मला सिद्धार्थ म्हटलं की तो राजकुमार आठवतो, ज्याने राजवाड्याबाहेर पडण्याआधी दु:ख कधीही पाहिलं नव्हतं. तसं पाहायला गेलं दुःखाची पराकोटी होते, तेव्हा प्रसंगानुरूप आपलाही "सिद्धार्थ" होत असतोच. त्याचं पुढे काही करता येईल का? हे आपल्याला माहित नसतं. पुन्हा "जैसे थे" झालं की आपल्यातला तो "सिद्धार्थ" तात्पुरता गायब होतो. या साऱ्या भावनांचं, हतबलतेचं पुढे काय करायचं याचा नेमका तोडगा मला तरी अजून मिळाला नाही. इथून पुढे मात्र "सिद्धार्थ" म्हटलं की जसा तो राजकुमार आठवेल तसाच आठवेल हा सिद्धार्थ. जो कळत नकळत आपल्या आसपास कुठे न कुठे दिसत राहणार तरी त्याला ठळक चेहरा नाही. त्याचं अस्तित्व असून नाकारणाऱ्यांमध्ये मीही असेन पण तरी फक्त वाईट वाटणे सोडून मी आणखी काय काय करावं या उत्तराचा शोध सुरु राहीलच.
हा सिनेमा निर्माण करणाऱ्या पूर्ण टीमने त्यांचं काम १०० टक्के केलं आहे. IMDB ने ७.१ मानांकन दिलेला, बेजिंगच्या आणि हॉंगकॉंगच्या २०१४ च्या inernational फिल्म फेस्टिवल ला अवार्ड मिळालेला, इतर ठिकाणीही नामांकन मिळालेला (आणि देशात अर्थात कुठेच नामांकन नसलेला) हा चित्रपट, नेटफिल्क्सने सजेस्ट केला म्हणून मला पाहायला मिळाला. कदाचित जसा सिद्धार्थ हरवला तसा बॉलीवूडमध्ये दर शुक्रवारी येणाऱ्या करोडोंचा गल्ला भरणाऱ्या चित्रपटांच्या गर्दीत हा हरवला का माहित नाही. पण असे चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांनी तो चुकवू नये म्हणून उशिरा का होईना पण ही पोस्ट.
चित्रपटाचं पोस्टर साभार IMDB