आज बरेच दिवसांनी इथे येणं झालं. सुरुवात काही वर्षांपुर्वी डावीकडच्या बैठ्या इमारतीतून झाली होती. त्यानंतर मग यथावकाश उजवीकडची थोडी लाम्बुळकी आणि आधीपेक्षा मोठं परसदार (backyard) असलेल्या इमारतीतले वर्गदेखील आमच्या ओळखीचे झाले; नव्हे त्यांची सवय झाली.
सुरुवातीला म्हटलं तसं, मध्ये काही महिने फारसं येणं झालं नाही. पण कधीतरी आलं की मी माझ्या पिल्लांना तिथे रोज सोडायचे माझे जुने दिवस चटकन तरळतात. तेव्हा मुलांना सारखी आई लागायची. त्याची जागा बाबाने कशी पटकन घेतली हेही लक्षात येतं. आई काय, बाबा काय, मुलांना घरच्या माणसाला इथून निरोप देताना व्हायचा तो तात्पुरत्या विरहाचा त्रास व्हायचाच पण तरी जितक्या लवकर ती नवीन रुटीनला रुळतात तसे आपण मोठे रुळतो का हे एक मोठंच कोडं.
आजही आम्ही आत आलो आणि मग यावर्षी आमचा वर्ग जवळजवळ शेवटाला असल्याने तो एक थोडा मोठा हॉलवे आहे तो चालायचा. चालताना डावीकडे आधी एका वर्गाचं दार आणि मग एक छोटी त्रिकोणी खिडकी असे एकामागून एक तीन चार वर्ग पार केले की आमच्या वर्गाचं दार. त्यापल्याड एक छोटी दुनिया. तिथलं सगळचं छोटं छोटं. काही मुलांना आईबाबा परत जाताना एखादं पुस्तक वाचून दाखवताना बसायला ठेवलेला सोफा आणि शिक्षकांचा laptop ठेवायचं टेबल वगैरेच काय त्या तशा मोठ्या गोष्टी. बाकी सगळं इवलं इवलं. छोट्या छोट्या टेबलांपाशी काही बाही करू पाहणारी छोटी छोटी मुलं. त्यातली काही त्या दिवसाला रूळलेली, स्वत:चा पसारा करून त्यात रमणारी तर एकदोन थोडी हिरमुसलेली आईबाबांना नुकताच निरोप देऊन भांबावलेली.
आम्ही सवयीप्रमाणे रेनकोट जागेवर ठेवून गेल्यागेल्या हात धुवायचं प्राथमिक कर्तव्य पार पाडत असताना "तू येऊ नको. तू तिथेच थांब", अशी चिमुकली आज्ञा. हे मला थोडं नवीन. "बरं बाबा".
हम्म आता काय? एका चिमुकल्या बोर्डवर स्वतःच्या नावाचं स्पेलिंग येत असल्यास लिहिणे. आमचा उलटा एस आणि उलटा एन वाचताना मला फार मजा वाटते.
तेवढ्यात आमच्या वर्गाची त्रिकोणी खिडकी दिसते. आज गोष्टीची तशी गरज नाहीये नाही तर आमचं ध्यान लगेच पुस्तक वाच नाहीतर कार्पेट पुसतो मोडला येऊ शकतो. आज खिडकीशी चक्क रांग आहे.
तोवर मी अल्याडची छोटी दुनिया पुन्हा थोडा वेळ पाहून घेते. छोटी छोटी भातुकलीसारखी भांडी, परसदाराला लागून असेलला एका रानवाटेवरून मुलांनी आणलेले काही पाइनकोन्स, फॉल लीव्ज, खारुताईचे लाडके नट्स या सगळ्यामधून शिक्षिकांच्या सहाय्याने मुलांनी बनवलेले वेगळे वेगळे आर्ट पिसेस आणि त्यांचाच वर्गसजावटीत केलें उपयोग. आजूबाजूला असणारे एक दोन छोटे फळे आणि त्यांच्यावरच्या मुलांच्या रेघोट्या. तितक्यात कुणी तिकडे छोटे छोटे tracks सांधून गाडी बनवून तिचा डायवर होतोय. कुणी एका पेटाऱ्यातल्या सुरवंटाला खाऊ देतोय. या सगळ्याचं जर मी चित्रकार असते तर फार सुंदर चित्र झालं असतं.
अरे इतक्यात रांग कमी होतेय म्हणजे पल्याड जायला हवं. आजकाल इकडे निरोप देताना आई/बाबा पल्याड आणि मुलं अल्याड अशी खिडकीच्या काचेवर कारागिरी चालते आणि मग फ़ुल्ल फायनल टाटा असं रुटीन आलंय.
मी मुलाला तिकडे पिटाळून बाहेर खिडकीपाशी बसते. त्याला सरळ दिसेल असे "एस" आणि "एन" काढताना माझं पण डोकं थोडावेळ थांबतं. तेवढ्यात आमच्या पिकासोने पण याची नोंद घेऊन त्याच्या बाजूच्या काचेवर पुन्हा ते स्पेलिंग, त्याच्याभोवती रेघोट्या सुरु केलं. मी त्याच्या नावाला एक सुंदर हार्ट काढून माझ्या चित्रकलेची सांगता केली.
त्यानेही हात हलवून आतमध्ये त्याच्या त्या दिवसाच्या आवडीचं काही शोधायला सुरुवात केली. पल्याडहून हे पाहणारी मूक मी, अजून त्याच्या त्या अल्याडच्या दुनियेतून बाहेर यायला पाहत नव्हते. असं का व्हावं की माझ्या त्या पल्याडच्या दुनियेतलं काहीच मला खुणावू नये?