कधीतरी फार जुनं आठवायला लागलं की मला "दया" आणि "विमल" आठवतात. दयाने तिसरीत शाळा सोडली कारण तिने शिक्षण घेण्यापेक्षा चार घरची धुणीभांडी केल्यास, तिच्या घरी जास्त उपयोग झाला असता. तसं पाहायला गेलं तर तिसरीच्या वर्गातल्या अतिशय प्रेमळ जॉनाबाई आणि दया अचानक शाळेत यायचं बंद होणं सोडलं तर काहीच आठवत नाही.
चौथीत आम्ही खेळाच्या तासाला सर्व मुली रिंगण करून मग आतली मुलगी एक मैत्रीण शोधते असा काही खेळ खेळायचो. ते आठवलं की आठवते विमल. माझ्यापेक्षा उंच, सावळी आणि टिकलीच्या जागी तुळस गोंदलेली माझी चौथीतली मैत्रीण. तिची टिकली पडली तरी चेहऱ्यात फरक जाणवत नसे. चौथीमध्ये मी शाळा बदलली आणि त्यानंतर मला विमल कधीच दिसली नाही. आमची मैत्री तिथेच थिजली.
मग पुन्हा हायस्कूलमध्ये अनेक मैत्रिणी मिळाल्या. पण दहावीनंतर मी एकटीच रुपारेलला गेल्यामुळे पुन्हा ते संबंध तिथेच राहिले. रुपारेलला बारावीपर्यंत राहायचं ठरलं असल्यामुळे खरं तर मैत्रीण होणार की नाहीत मग त्या टिकतील का वगैरे अर्थातच तेव्हा न पडेलेले प्रश्न होते. पण अशी सांगून होत नाही न मैत्री? त्यामुळे तिथेही ती झालीच. त्यात मी एकटीच मेडिकलला न गेल्यामुळे मी बहुदा पूर्ण आयसोलेट होणार होते पण अम्रिता आणि श्रुती या दोघी पत्ररूपाने बरीच वर्षे टिकल्या. नशिबाने नंतर आम्ही ईमेल, सोशल साईट्सवरदेखील जोडलेले राहिलो. पण त्याच काळातल्या निदान डझनभर मैत्रिणी आणि त्याही त्या दोन वर्षात अतिशय जीवाभावाचे संबंध असलेल्या मैत्रिणी अशाच कुठेतरी हरवल्या.
डिप्लोमाच्या वर्षातल्या मित्र-मैत्रिणींचा आढावा घ्यायचा तरी थोड्याफार फरकाने हा असाच म्हणजे अगदी मागच्या वर्षी मी त्यातल्या त्यात समिताला वीसेक वर्षांनी भेटले पण त्या भेटीत त्यावेळी मेल्स वगैरे नसल्यामुळे आता हरवलेल्या मैत्रिणीची आठवण अगदी सुरुवातीलाच निघाली. डिग्रीला पोचेपर्यंत अगदी आतासारखं "मुठ्ठी में नेट" आलं नसलं तरी सायबर कॅफे होते पण तरीही त्यावेळचेही काही संबंध हरवले. मग पुन्हा इतक्या वर्षांनतर ते शोधलेही गेले नाहीत. त्यात मुलीची बदलेलेली आडनावं माहित नसल्यामुळे त्यांचा तर शोधही मुश्कील.
असो. आज जागतिक मैत्रीदिन वगैरे आणि मी नक्की काय आठवतेय? सहज मनात आलं, आठवतं तेव्हापासून मैत्रीची माळ ओवायला घेतो. सुरुवातीची गाठ मारायची राहून जाते आणि मग त्यातले काही मोती ओघळतात. अर्थात म्हणून आपण आपली माळ ओवायची सोडणार नसतो आणि ते ओघळणारे मोतीही या न त्या कारणाने ओघळायचे थांबणार नसतात. आजच्या या मैत्रीदिनी जसं तुम्ही तुमच्या संपर्कात असणाऱ्या जीवलग मित्र-मैत्रीणीना आठवणीने शुभेच्छा देताहात तसंच तुमच्याही काही ओघळलेल्या मोत्यांची आठवण जरूर ठेवा.
जागतिक मैत्रीदिनाच्या सर्व वाचकांना अनेक शुभेच्छा.