माझ्याबरोबर भगुबाईला असणारा एक मित्र गेले काही वर्षे त्याचं करीयर गुजरातमध्ये करतोय. बरेच दिवस त्याच्याशी प्रत्यक्ष बोलणं झालं नाही, पण आमच्या batch मधल्या मुलांच्या त्या ग्रुपमधल्या मुलांना मी जितकं ओळखते, त्यावरून तरी त्याचं भविष्य तिथे उज्ज्वल असल्याशिवाय तो तिथे जाऊन स्थायिक वगैरे होणार नाही हे मला माहित आहे. तेव्हापासून गुजरात, तिथली इकोनॉमी इत्यादीबद्दल एक कुतूहल आहे आणि पुढचं कुतूहल अर्थातच ते नाव जे गेले कित्येक महिने सगळ्यांच्याच तोंडावर आहे.
माझा राजकारणाचा अभ्यास तसा कमीच आहे आणि कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घ्यावा इतका आत्मविश्वास मला कुणाही पक्षाबद्दल आला नाही; कारण सगळीकडे कामसू आणि कामापुरते असे दोन्ही कार्यकर्ते पाहण्यात आले. मग कुणा पक्षाला चांगलं म्हणायचं हा संभ्रम होणारच.
पण जेवढी माहिती "मोदी" या वलयाबद्दल मला वाचायला मिळाली आणि त्यांची जी काही online भाषणं मी ऐकलीत त्याने मला या व्यक्तीबद्दल आदर आहे. पक्ष म्हणून खरं प्रत्येक पक्षाने त्यांच्या त्यांच्या कमकुवत जागा जेव्हा जेव्हा त्यांना सत्ता मिळाली तेव्हा तेव्हा दाखवून दिल्या आहेत. पण तरी खंबीर नेता मिळाला तर आपण बदल घडवून आणू शकतो असा आत्मविश्वास ज्या नेतृत्वाकडे असायला हवं ते मोदींकडे असेल असं त्यांना ऐकताना जाणवतं.
त्यांच्या मुंबईला केलेल्या भाषणात त्यांनी १८ ते २८ या वयाबद्दल आणि त्यावेळी संधी मिळाल्या नाहीत तर काय होऊ शकतं याबद्दल व्यक्त केलेले विचार मला दहाबारा वर्षांपूर्वी माझा माझ्या करियरशी सुरु असलेला धडा आठवून गेला आणि वाटलं खरच तेव्हाही असाच नेता असता तर? आणि आताचं त्यांचं निवडून आल्यानंतरचं भाषण, ज्यात ते हळवे झालेत, हे सगळं पाहिलं की आत कुठेतरी या व्यक्तीशी आपली नाळ जुळते आहे असं वाटतं. त्याचं कालचं भाषण मी दोनवेळा ऐकलं.
रडणं म्हणजे एका वेगळ्या प्रकारे व्यक्त होणं. हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. तेवढं भावूक होण्यासाठी आपला भूतकाळ कारणीभूत असतो असं मला वाटतं. तळागाळातून वर आलं की ते जुने दिवस आठवणींच्या तळाशी असतात. त्या कधी डोकं वर काढतील सांगता येत नाही. अशावेळी आसवांनी वाट मोकळी करून दिली तर त्यात त्या व्यक्तीचा कमकुवतपणा न दिसत त्याची सच्चाईच दिसते. बदलेले दिवस काळ अर्थातच दाखवेल आणि यातून काही न काही चांगलं हळूहळू का होईना नक्की घडेल.
देशापासून इतक्या दूर असले की काही क्षणांची आर्तता जास्त जाणवते. भावना त्याच असतात फक्त आपण तिथे नसतो. आत्ता वाटलं म्हणून सगळं सोडून येता आलं असतं तर किती बरं असं वाटायचा हा क्षण मला धरून ठेवायचा नाहीये. मला काय बदलता येईल मला नक्की माहित नाही किंवा सांगायचं तर त्यांचा अजेंडा, प्लान इत्यादींबद्दल काही लिहावं अशी माझ्या अभ्यासाची व्याप्ती नाही. पण या क्षणी जर मला कुठे असायचं असेल तर ते माझ्या देशात हे सांगायला मात्र आज लिहायलाच हवं. तुम्ही कुठेही राहिलात तरी चांगल्या गोष्टी आपल्या देशात घडाव्यात असं तुम्हाला वाटणं साहजिक असतं किंवा काहीवेळा देशाबाहेर राहिल्यामुळे तुम्ही तुमच्या देशात होणाऱ्या घटनांचा संदर्भ तुमच्या रोजच्या भावनांशी जास्त तीव्रतेने जोडता. त्यात जसं चुकीच्या घटनामुळे होणारा संताप असतो तसचं चांगल्या गोष्टीच कौतुकही असतं.
मला आजकाल "अच्छे दिन आएंगे" हा वाक्प्रचार आवडतो आणि तसचं हे सगळं वातावरण अनुभवताना समोरचा सद्गदित झाला तस माझेही डोळे पाणावतात. भावनेच्या भरात कदाचित असंच लिहीतही राहीन ज्यात नक्की काय म्हणायचं आहे हेही वाहवून जाईल. आज सगळचं भरून भरून आलंय हेच खरं.