ती माझ्या आयुष्यात थोड्या काळासाठी आली आणि तिच्या एका छोट्या कृतीने देता देता एक दिवस मला थोडक्यात पण महत्वाचे शिकवून गेली. आनंदी राहायला खूप पैशाची आणि अपेक्षांची गरज नसते हे तिच्या बरोबर जे काही संवाद झाले तेव्हा तेव्हा नेहमीच जाणवायचं.
नवऱ्याला पुन्हा नोकरी लागली तेव्हाचा तिचा फुललेला चेहरा, आता स्वतःचा इन्शुरन्स घेऊ शकतो असं सांगून तिच्या छोट्या छोट्या अपेक्षा पूर्ण होताहेत याचं समाधान. मुलाला इकडच्या शाळेत पाठवण्यासाठीचा आनंद, मागे एका dog shelter मधून कुत्रा दत्तक घेतानाची घटना, मी तिला जेव्हाही पाहिलं तेव्हा ती तिच्या कुटुंबात सदैव रमलेली आई/बायको, सतत हसरा चेहरा आणि समोरच्याला मदत करायची तयारी.
मागे तिने घर घेतलं त्यावेळी आता आम्ही भेटणार नाही असं मला वाटलं. अर्थात तिची एक मैत्रीण आम्ही राहायचो त्याच इमारतीत खालीच राहायची. शिवाय मुलाची शाळा तिने बदलली नव्हती त्यामुळे मी शाळेच्या वेळेत दिसत राहीन असं तिने घर घ्यायची बातमी दिली तेव्हाच सांगितलं. मग तिच्या सामानसुमान थोडं फार लागलं असावं त्यावेळी एक दिवस दुपारी माझ्याकडे येऊन तिने मला एक राजस्थानला मिळतं, एकाखाली एक चिमण्या लटकत असतात ते शोपीस दिलं. मला खात्री आहे ती मला, भारतीय व्यक्तीला काही तरी खास द्यायचं म्हणून कुठलं तरी खास दुकान शोधत हे घेऊन आली असणार. "This is for good luck" मला तिने देताना सांगितलं आणि त्याच्याबरोबर एक सुंदर कार्ड. तिच्या घरासाठी मीही एक गिफ्ट घेतलं होतं. यानंतर आमच्या वेळा जुळल्या तर पार्किंग लॉटमध्ये भेट होई आणि लवकरच आमचीदेखील त्या जागेतून हलायची वेळ झाली. मग पुन्हा एकदा निरोपाची बोलणी आणि शुभेच्छांची देवाणघेवाण. यावेळी मात्र भेटीगाठी कठीण हे साधारण माहित.
अर्थात मनातून ती जाणं शक्य नव्हतं. तिने तिच्या मुलाची दिलेली काही पुस्तकं आणि वस्तू माझ्याकडे आहेत त्यांचा उल्लेख नेहमी त्यांच्या आठवणीने होतो.
माझी एक मैत्रीण अजून तिथल्याच एका इमारतीत आहे म्हणून एकदा जाऊया, भेटूया असं करता करता मागचं वर्ष असचं गेलं. काल एका सुपरमार्केट मध्ये तिची ती मैत्रीण भेटली आणि सुरवातीला मी तिच्या मुलाची चौकशी केली, अजून तो याच शाळेत असेल तर मग एकदा भेट जमवावी का असं माझ्या मनात होतं आणि ती वाईट बातमी मला मिळाली. एका वाक्यात सांगायचं तर "ट्रेसी गेली." पुढे तिने जे काही सांगितलं ते मला ऐकू तरी आलं का मला आठवत नाही. अजून मी शब्द जुळवतेय.
तिला दम्याचा त्रास होता हे मला आताच कळलं. अर्थात त्यावर जे काही उपचार केले जातात ते ती घेत असणार. ख्रिसमसच्या निमित्ताने डिस्नेला जायचा प्लान त्यांनी बनवला. तिकडे जायचं म्हणून सगळी तयारी करून तिला दगदग झाली हे निमित्त की ती लोकं तिथे गेल्यावर थोडं दाटलेलं हवामान होतं ते तिचं शरीर झेलू शकलं नाही? परामेडीक्स यायला दहा मिनिटं लागली त्यावेळी ऑक्सिजन कमी झाला त्याने ती त्या दम्याच्या attack मधून उठलीच नाही. डॉक्टरांनी दहाएक दिवस प्रयत्नांची शर्थ केली पण बहुतके तिच्या तिसरीत असलेल्या मुलाचीही नियतीला दया आली नाही ना? देता देता एक दिवस देणाऱ्यालाच अवेळी घेऊन जाणारी ही जी कुठली शक्ती आहे, तिच्याकडे नक्कीच न्याय नाही. आज राहून राहून तिच्या लहानग्याचा चेहरा समोर येतोय आणि कसंतरीच वाटतं. एका आईच्या तळमळलेल्या आत्म्याला शांती मिळो हे नक्की कुठल्या तोंडाने बोलायचं?