Friday, January 31, 2014

सौजन्य सप्ताह

मागच्या आठवड्यात मार्टिन लुथर किंग (ज्यू) दिन साजरा झाला. खरं तर माझा या घटनेशी अगदी सुट्टीपुरताही संबंध नाही. म्हणजे असणार होता पण नेमकं एका मोठ्या रिलीजचा भाग म्हणून काही महिने सगळ्या ऑफिशियल सुट्ट्या (अन)ऑफिशियली रद्द आहेत. त्यामुळे खरं शाळा बंद असल्यामुळे कसं करायचं या विचारात आणि मग नंतर त्याचं रुपांतर कुणी तरी एकाने ऑफिशियली सुट्टी घेण्यात झालं. प्रत्येकवेळी घरून काम करू द्यायला काय मी तिथला किंग आहे की काय? - इति अर्थातच अर्धांग. 

तर हे प्रकरण वाटलं तसं संपलं नव्हतं. आमचं (किंवा खरं तर मोठ्या मुलाचं) हे पाहिलं शालेय वर्ष असल्याने आम्ही बऱ्याच गोष्टी शिकतोय तर त्यातली ही एक सुट्टी किंवा घटना म्हणूया. सोमवारची शाळेची सुट्टी संपल्यावर शाळेच्या बाई ज्या खरं तर (अपेक्षेप्रमाणे) ई मेलवर कमीच असतात. त्यांचा भर मुख्य शिक्षणावर आहे हे मला आवडत उगाच रोज रोज मेलवर लिहून मुलगा अचानक हायस्कूलवासी होऊ शकणार आहे का? तर हे कधी तरी येणारं मेल, ज्यात एक सुंदर संदेश होता म्हणजे काय ते I was highly impressed वगैरेवाला. शाळेत 100 acts of kindness थोडक्यात "सौजन्य सप्ताह" साजरा होत होता आणि प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याने घरी काही चांगली कृती केल्यास त्याबद्दलची नोट शाळेच्या नेहमीच्या फोल्डरमध्ये पाठवायची. मग वर्गात ते हार्ट शेप्ड नोटवर लिहून वाचून दाखवणे आणि सर्वांच्या मिळून शंभर चांगल्या गोष्टी मुलांसमोर मांडणे. किती छान कल्पना. म्हणजे तुम्ही हे करा ते करा पेक्षा तुम्ही जे करताय  त्यातल्या चांगल्या गोष्टी एकत्र करून त्या सारख्या सारख्या करून थोडं आणखी समंजस व्हा हे त्या गोष्टीच जास्त अवडंबर न माजवता केला जाणारा एक सुंदर प्रोजेक्ट. मला तर वर म्हटल्याप्रमाणे highly impressed च झालं. आणि आपण आपल्यातर्फे आपला खारीचा वाटा  पाठवायचा असं  मी मंगळवारी ऑफिसमधून निघताना ठरवलं. माझ्याकडे निदान दोन पूर्ण दिवस होते. 

इतरवेळी मुलांना रागावणे, मुलांना त्यांचं पोट भरलं हे आपल्या मापाने मोजून त्याप्रमाणे कोंबणे, मध्ये मध्ये त्यांच्या आवडीच्या कार्स इ. मुवीज सारख्या पहायच्या ऐवजी आपल्या राहिलेल्या matches पाहणे आणि त्यांना माझ्या लाडक्या खेळांची गोडी लागते का ते पाहणे अशी सध्याच्या पालकांनी करावयाची महत्वाची कामं आम्ही दोघं आठवणीने करत असतो. अर्थात यात मुलांचं कौतुकही  जमेल तसं सुरु असतच पण शाळेत जायला लागल्यावर तिथे थोडा भाव मारायला मिळाला की मुलांना तो हवा असतो हे साहजिक आहे त्यामुळे पालक म्हणून मिळालेली ही  संधी तशी गमवायची नव्हती. "मोटिवेशन हेल्प्स" हे मी कामाला लागल्यापासून मला जास्त जाणवलं आणि आजकालच्या पिढीला ते जन्मापासून हवं असेल तर त्यात काही गैर नाही. 

नेमकं मंगळवारी संध्याकाळी मुलाचा मूड जर यथा तथाच होता त्यामुळे शोधूनही मला काही लिहून पाठवण्याजोगं मिळालं नाही; पण अजून बुध आणि गुरुवार आहेत म्हणून मी शांत होते. मला उगाच ते जुळवून आणायचं नव्हतं. मग गुरुवारी अचानक चमत्कार झाला. (आई इकडे असती तर नक्की म्हणली असती "मी तुला सांगते न माझी सगळी चांगली कामं गुरुवारी होतात) आल्याआल्या चक्क त्याने सगळ्यांच्या चपला उचलून नेहमीच्या जागेवर ठेवून दिल्या, बाबाने मला मी घरात घुसल्याघुसल्या बातमी दिली. त्या दिवशी नेमकं मला खूप ट्राफिक लागलं म्हणून मी मनातून वैतागले होते आणि माझ्या पाठीने छोटा संप पुकारायला सुरुवार केली होती. पण अर्थात आधी ठरवलं होतं आपणही सौजन्य पाळायचं, त्यामुळे मी लगेच कौतुक केलं. मग मला बरं वाटत नाही म्हणून डिश वॉशर रिकामी करायला छोटे हात मदतीला आले, झालचं तर छोट्या भावाला एबीसी शिकवायचं आणखी एक पवित्र कार्य जेवल्यावर लगेच सुरु झालं. (मी लहान होतो तेव्हा तो नव्हता त्यामुळे मी तुम्हाला used to होतो पण माझा लहान भाऊ तुमच्यापेक्षा मला जास्त used to आहे हा एक इतक्यात जुना झालेला युक्तिवाद आहे आमच्याकडे. तो पुढे करून आणखी 100 acts of kindness करून घ्यावे का असा मीच विचार करतेय. ) 

कामाचा तडाखा पाहून  आता मी पडणारच होते म्हणजे शंभर गोष्टी आमच्याच घरून जाणार की काय. मी नोट पाठवायचं मनातल्या मनात विचार केला आणि त्या दिवशी बरं नव्हतं म्हणून विसरूनच गेले. गुरुवारी आमच्या घरी काही विशेष नोंद करण्यासारखं घडलं नाही. पण हे मी वेळेत नोट न पाठवल्याचं डिमोटिवेशन वाटून आज मात्र  लिहायलाच हवं असं मी म्हटलं  आणि त्या घर बांधणाऱ्या माकडाप्रमाणे विसरून गेले. 

शुक्रवारी सकाळी तरी लिहावं  नं? तर मी मुलांच्या ब्रेकफास्टमध्ये वेळ काढला आणि नंतर उशीर होतोय म्हणून जी पळाले ती आठच्या स्टेट्स मिटिंगमध्ये असताना मला माझा घरगुती स्टेट्स आठवला आणि एकदम जिवाचं पाणी झालं. म्हणजे विचार करा तिकडे शंभर गोष्टी लिहिल्या जाणार त्यात आपल्या मुलाचं काहीच नसेल तर त्याचं तोंड कसं होईल? कदाचित इतर मुलं चांगल्या गोष्टी करतात हे शाळेत कळून तो घरी आवर्जून चांगला वागला असेल आणि आता आपण हे साधं कळवण्याचं काम करू शकलो नाही म्हणजे संध्याकाळी त्याचा मूड काय होईल वगैरे विचाराने मला इतकं कसं तरी झालं की आणखी काही न सुचून मी शिक्षिकेच्या मूळ मेलला रिप्लाय करून आधी दिलगिरी व्यक्त करून त्याच्या सौजन्याने वागलेल्या कृती लिहून पाठवल्या. शुक्रवार तसाच गेला. माझी घालमेल काही जाईना मग मी आडून चौकशी करून पाहिली कसा झाला kindness विक वगैरे, तर नेमकं शुक्रवारी वर्गशिक्षिका आजारी असल्याचं कळलं. त्यामुळे आता आपला मेल बहुतेक केरात गेला तरी चालावा असा विचार करून मी स्वत:वरच वैतागून हात चोळत बसले. 

सोमवारी त्याच विचारात ऑफिसला गेले आणि दुपारी जेवताना स्वतःचे मेल तपासताना माझ्या आधीच्या मेलला उत्तर आलेलं दिसलं. हुश्श ! त्या दिवशी संध्याकाळी मुलाला थोडं confidently विचारताना आणि आम्ही कळवलेल्या त्याच्या चांगल्या गोष्टी त्याच्याच तोंडून ऐकताना मला घरच्या extended सौजन्य सप्ताहात त्याला नेहमीप्रमाणे वेठीशी न धरता उगीच जास्त चांगलं वागावंस वाटलं.
  

Wednesday, January 22, 2014

गाणी आणि आठवणी १५ - दिल में जागी धडकन ऐसे

उदय आणि मी कॉलेजमध्ये असताना तो माझा मित्र वगैरे नव्हता. म्हणजे असायचं काही काम नव्हतं. पण त्याचा एक मित्र माझा अतिशय चांगला मित्र आहे, त्यामुळे ते कॉमन मैत्री वगैरे का काय म्हणतात तसं असावं. मग यथावकाश कामाला लागल्यावर त्या कॉमन मित्रामुळे आमचे निदान मुंबईत असेपर्यंत contacts राहिले. आमच्या त्या सगळ्या मित्रमंडळात स्वतःची गाडी असण्याचा मान उदयकडे. म्हणजे तशी सगळी जण सेटल होतहोती पण गाडी घ्यावी हे बहुतेक फक्त उदयच्याच डोक्यात पहिले आलं असावं. कदाचित त्याचा भाऊ actor आहे त्याची थोडी बॉलीवूड पार्श्वभूमी त्याला कारण असू शकेल. मला आठवतं कॉलेजमध्ये हा त्याने घातलेल्या कुठल्या कुठल्या कपड्यांचे ब्रान्ड सांगत असे. आणि प्रत्येकवेळी त्याचं  एक पालुपद असे की "एकदम ओरिजिनल है" म्हणून. आम्हाला काय कळतंय ओरिजिनल काय आणि फेक काय. खरं तर आता आठवलं की मज्जा वाटते. आता खरं काही प्रसिद्ध brand बरोबर काम वगैरे पण करून झालं तरी त्या दिवसातली गम्मत वेगळीच. बालपणीचा काळ सुखाचा टाईप. 

हम्म तर काय सांगत होते? आमची मैत्री. तर मग कामाला लागल्यावर आमच्या त्या कॉमन मित्रामुळे पुन्हा उदयबरोबर पुन्हा कधीकधी भेट होत असे. ही दोघं आणि आमचा एक कामावर भेटलेला आणखी एक मित्र अशी एक त्रयी होती. ही लोकं प्रत्येक शनिवारी दुपारी त्या आठवड्यात लागलेल्या सिनेमाला जात आणि नाही आवडला की सरळ बाहेर येत. आता कुठला चित्रपट आठवत नाही पण त्यातून ते पाच मिनिटात बाहेर आले होते. आणि तो त्यांचा रेकॉर्ड होता. त्यादिवशी नेमकी मी माझं ऑफिस सुटल्यावर त्यांना अंधेरीला भेटून मग आम्ही जेवायला गेलो असताना यांचे असे चित्रपट पाहताना बाहेर यायचे रेकॉर्ड याविषयीच्या परिसंवादाची मी मूक (किंवा खर नुसती हा हा करून मोठ्याने हसणारी) श्रोती होते. यातून दुर्बुद्धी सुचून मी पुढच्यावेळी नाटकाला जाऊया म्हणून या त्रयीला सांगून पायावर धोंडा मारून घेतला होता. 

नाटकाची पहिल्या रांगेची तिकिटं काढली आणि याचं दहाव्या मिनिटापासून "चला", "उठुया", "बोअरिंग होतंय", सुरु झालं. नाटक सोसोच होतं पण तरी असं पहिल्या रांगेतून उठून कलावंतांच्या मेहनतीचा जाहीर अपमान करणं मला पटत नव्हतं त्यामुळे मी एकटीच बसणार म्हणून सगळे कसेबसे थांबले मग मध्यंतरात उठलो तोपर्यंत "मी तुला आज ट्रेनने जायच्या त्रासाऐवजी घरी सोडतो" म्हणून त्याने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊन झालं होतं. आणि तेव्हा मी वसईला राहत होते. मग शेवटी ही लोकं मला सोडायला आणि मला विसरून माझ्याच बाबांशीच खूप वेळ गप्पा मारून परत गेली. 

तर अगदी घट्ट नाही पण तेव्हा आमची चांगली मैत्री होती. एकमेकांचे घरगुती प्रश्न सांगण्याइतपत. आमच्या आणखी एका मित्राचा मी थोडा सिरीयसली विचार करावा वगैरे सांगण्याइतपत. आम्ही मध्ये काही महिने एकाचवेळी मुंबईत सिप्झमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं त्यावेळी संध्याकाळी वेळेवर निघणार असू तर त्याच्या गाडीने तो मला बोरिवलीला सोडत असे. कंपनीच्या बसपेक्षा थोडा वेळ वाचत असे पण त्याच्याबरोबर फुल टाईमपास गप्पा होत. एकदा समोरच्या माणसाने काहीतरी चूक केली तर हा पुढच्या सिग्नलला गाड्या थांबल्या तेव्हा  हा तरातरा आपल्या गाडीतून उतरून समोरच्याला चांगला झापून आला होता. आणि वरून त्याची "भा"राखडी मी ऐकली की काय म्हणून मला, "अशावेळी कान बंद करत जा" हा सल्ला देऊनही पार.   

एकदा मी खूप वाईट मूडमध्ये होते. काय झालं होतं मला आठवत नाही, कॉर्पोरेट जगतातला एखादा पोलिटिकली वाईट दिवस असावा. बहुतेक मी नीट बोलत किंवा ऐकत नसेन त्यामुळे त्याला ते जाणवलं असावं. अचानक तो म्हणाला तू सुनिधीचं हे गाणं ऐकलंय का? आणि त्यादिवशी बोरीवली येईपर्यंत आम्ही ते गाणं ऐकून एकंदरीत सुनिधी या विषयावर गप्पा मारल्या होत्या. 

हे गाणं ज्या लयीत स्वरबद्ध केलयं त्यात गाण्यात म्हट्ल्याप्रमाणेच एक जादू आहे. कधीही ऐकलं तरी डोलायला लावणारंतसं पाहिलं तर त्याच्या त्या "ओरिजिनल"च्या आवडीत त्याच्याकडे नेहमी चांगल्या सीडी असत. गप्पा मारत असलो तरी त्याचं गाण्याकडे (अर्थात driving कडे) लक्ष असे. यान्नी आणि मला त्याकाळी माहित नसलेले विशेष करून बाहेरच्या देशातले काही कलाकार त्याच्याबरोबर बरेचदा ऐकले तरीही सुनिधीचं "दिले में जागी" ऐकलं की मला उदय आठवतो. 

आता आमच्या वाटा खुपच वेगळ्या झाल्यात. जसं मी वर म्हटलं की त्याने गाडी लवकर घेतली तसचं आमच्या त्या सगळ्या मित्रमंडळात लग्न, मुल हेही बहुतेक त्याचंच लवकर झालंय. मागे तो इस्टकोस्टला आल्याचं कुणीतरी कळवलं आणि नेमकं आमचं packing सुरु झालं होतं. पण मला खात्री आहे की आम्ही पुन्हा कधीही भेटलो तर नक्की तासभर तरी गप्पा मारू आणि तेच या अशा मैत्रीकडून अपेक्षित असतं. 



सुनिधीचा स्वर, निदा फाजली यांचे शब्द आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एम. एम. क्रीम (खरं ते Keervani आहे)  या संगीतकाराची कामगिरी, या त्रयीची कमाल या गाण्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाणवते. यातील एकाने जरी थोडं डावंउजवं केलं असतं तर हे गाणं कोलमडू शकलं असतं. पण तसं ते झालं नाही. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सूर,शब्दाच्या लयीत आपण पाच मिनिटं झुलत राहतो आणि हे दोन तीन वेळा ऐकलं की त्यादिवशीचा आपला जर खराब झालेला मूड असेल तर तेही विसरून जातो. मला हा अनुभव जेव्हा जेव्हा मी हे गाणं ऐकते तेव्हा तेव्हा येतो आणि मग आपसूक उदय आणि त्यादिवशीची संध्याकाळ आठवते. पुन्हा मी सिप्झच्या घामेजल्या ट्राफिकमध्ये त्याच्या गाडीतला एसी, गाणी आणि गप्पांमध्ये हरवते. ही पोस्ट  या साऱ्या आठवणी जागवण्यासाठी.
 

Tuesday, January 14, 2014

एक छोटं खाद्यवर्तुळ पूर्ण होतंय….

आपले मराठी सण जवळ आले की मला मज्जा वाटते. म्हणजे त्यावेळी ब्लॉगचे स्टॅट पाहिले की कुणीतरी त्या त्या सणाची जूनी पोस्ट वाचून गेलेलं असतं. मी पण ती पोस्ट पुन्हा वाचते आणि शक्य असेल तेव्हा अर्थात यंदाच्या सणाच्या तयारीला लागते. आपल्याकडे सणांना तोटा नाही. आपलं मनोधैर्य का काय म्हणतात ते नेहमी उंच ठेवायचं असेल तर अशा छोट्या मोठ्या सणांना पर्याय नाही. 

मागचे काही वर्षे जेव्हा आम्ही इस्टकोस्टला होतो तेव्हा आसपासची एक दोन मराठी मंडळ आपले सण आवर्जून साजरे करायची परंपरा कायम ठेवत आमचं मनोधैर्य मध्येमध्ये उंच व्हायला बळ देत. नॉर्थवेस्टला आल्यावर मात्र मराठी मंडळ हे प्रकरण फारसं अंगी लागलं नाही. कदाचित अजून मुलं लहान आहेत, तिकडे असलेल्या जुन्या ग्रुप्समध्ये जाउन घुसायचं वगैरे मुदलात अंगात नाही, पुन्हा ते ठिकाणही थोडं लांब वगैरे असण हे सगळं जे काही असेल त्याने आमच्या मुलांना आपले सण कसे समजवायचे असे प्रश्न यायला लागले आणि मग ठरवलं की यंदा आपलं आपण करायचं. जिथे ते इतरांबरोबर वाटता येईल तिकडे तेही करावं आणि नसेल तर निदान आपली चार डोकी तरी खुश झाली पाहिजेत. 

मागच्या वेळी जानेवारीत मुंबईत असल्याने निदान संक्रांत तर व्यवस्थित साजरी झाली. आमच्यात, "सणाला काय?" या प्रश्नाचा स्पष्ट उद्देश, "खायला स्पेशल काय?" असा असल्याने परत येताना चांगल्या डझनभर गूळपोळ्या घेऊन आलो आणि चवीचवीने खाल्ल्या. 

त्यानंतर होळीला आयुष्यात पहिल्यांदाच पुरणाची पोळी बनवली. ती माझ्या अंदाजापेक्षा बरीच पोळीसदृश्य लागलीदेखील. 


श्रीखंड हा एक पदार्थ जास्त गुंतागुंतीचा नसल्याने आणि दही लावायचं काम आउटसोर्स केल्याने पाडव्याची चिंता नव्हती. 

उकडीच्या मोदकाचं आठवणीने आणलेलं आणि घरातल्या घरात हरवू नये (आणि अर्थात खराब होऊ नये) म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठाने गणेश चतुर्थीला चक्क एकवीस मोदक करता आले आणि ते ज्या वेगाने करू त्याच्या प्रचंड जास्त पटीने संपलेही. 



दिवाळीला सगळा फराळ करणार होते, पण यंदा आमच्या दोघांच्याही घरून बरेच आधी फराळाचे डब्बे आले. त्यात चकलीने थोडा घोटाळा केला होता त्यामुळे नेहमीच्या हुकुमी चिवड्याबरोबर चकली करायचा प्रयोग केला आणि तुफान यशस्वी झाला. आता पुन्हा एकदा आम्ही संक्रांतीच्या उंबरठ्यावर उभे राहिलो. 




करू करू आणि इकडे चिकीचा गूळ मिळत नसल्याने होणार नाही होणार नाही हे माहित असतानाही प्रयत्न म्हणून तिळगूळ बनवून पहिला अगदी समदे नाहीत पण सात आठ लाडू झाले आणि मग चुरा जिंदाबाद म्हणून राहिलो. 

या सगळ्याचा उल्लेख काही वेळा मागच्या वर्षीच्या पोस्ट्समध्ये किंवा ब्लॉगच्या फेसबुक पानावर नुसता फोटो टाकून केला आहे.
माझी स्वतःची स्वयंपाकघरातली एकंदरीत प्रगती, रस इ.इ. पाहता मला स्वतःला हे एक सणांच्या निमित्ताने पूर्ण केलेलं खाद्यवर्तुळ पाहताना समाधान वाटतंय. अजून बरेच खास आपले मराठी पदार्थ आहेत ते कधी जमेल तसं करून पाहिन.घरात खायची आवड सर्वांना असणं हे आमच्या घरात वेगवेगळ्या पाककृती स्वतः करून पाहण्यामागचं मुख्य कारण आहे.नेहमी सगळं मी एकटी करत असते असं नाही. कारण शेवटी आम्ही दोघ या भागातले शिकाऊ उमेदवार आहोत. ज्याला जे जमतं तो ते करून पाहतो. शिवाय एखादा वेगळा पदार्थ करताना काय किंवा नेहमीची न्याहारी बनवताना काय, माझी मुलं आसपास असतात. पैकी आरुष आता जरा "हेल्पर जॉब" करायचा आहे या उत्साहात असतो. म्हणून त्यालाही काहीबाही दिलं जातं. त्याचे हजार प्रश्न, त्या गप्पांतून होणाऱ्या गमती जमती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो पदार्थ सगळ्यात पहिले चाखताना त्याने दिलेली पसंतीची पावती या सगळ्यावर एक वेगळी किंवा प्रत्येक कृतीमागे एक पोस्ट लिहिता येईल. 

महत्वाचं हे आहे की आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ त्या त्या सणांच्या निमित्ताने आपण स्वतः बनवण्याची प्रोसेस एन्जॉय करणे. आमचं खाद्यवर्तुळ आम्ही हळूहळू पूर्ण करतोय आणि आपण? 

अरे हो मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा. सूर्याचं हे संक्रमण आपण सर्वांना लाभदायी होवो हीच सदिच्छा.