Friday, June 28, 2013

बुरख्यातली झाडं

नेहमीच्या पार्किंग लॉटमध्ये हिरवाई आली की छान वाटतं. आज मात्र गाडीने ते वळण घेतलं तर पहिलंच झाड जरा वेगळं दिसलं. अरे हे काय याला चक्क बुरखा घातलाय?




गाडीतून खाली उतरल्यावर पाहिलं तर आमच्या नेहमीच्या हिरवाईला नटवायच्या ऐवजी लपवलं होतं. हारीने सगळी झाडं बुरख्यात.



मग एकदम त्यादिवशी एन पी आरवरची बातमी आठवली. सविस्तर वृत्त मायाजालावर आहेच पण ब्लॉगवर थोडक्यात सांगायचं तर गावच्या एका मॉलच्या पार्किंग लॉटमध्ये हजारोंच्या संख्येने मधमाशा मेलेल्या आढळल्या. त्याचं कारण काय असावं याचं रूट कॉज केल्यावर असं लक्षात आलं की हा मॉल मेंटेन करणाऱ्या एका कम्पनीने जंतुनाशक फवारणीकेल्यामुळे या मधमाशा मरण पावल्या होत्य. आता तात्पुरता उपाय म्हणून या झाडांना जाळी लावून बंद केलं आहे.



हे ऐकलेल्या बातमीचं प्रत्यक्ष पुरावा पाहताना जितका मला इथल्या लोकांच्या सतर्कतेचं आणि इतकी त्वरित उपाययोजना करणाऱ्या सिस्टिमच कौतुक वाटलं, तितकंच वाईट वाटलं ते दुसऱ्या एका वेगळ्या गोष्टीबद्दल. याच सिस्टिमने वर्षानुवर्षे अशीच फवारणी केलेली, जैवीक शास्त्रात नको ते बदल घडवून लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी फळं, भाज्या, मांस याच लोकांना खायला घातलीत पण त्यासाठी मात्र ज्या बलाढ्य कंपन्या जबाबदार आहेत त्याबद्दल मात्र कुणीही आवाज उठवला तरी अशी प्रतिबंधात्मक योजना अजूनतरी ऐकिवात नाही. याबद्दल पुन्हा केव्हातरी..सध्या माणसांची नाही तर निदान मधमाशांची काळजी घेतल्याचं कौतुक करुयात.





Sunday, June 23, 2013

पाऊसवाट

पावसाचं माझं नातं जुनंच,  तरीही इकडे नेहमी पडतो म्हणून रुसवाच जास्त. मग एखाद आठवडा उघडीप मिळाली  की जणू  त्याने इतके दिवस केलेला छळ विसरतेच मी. मस्त शनिवारपर्यंत बाहेर जायची सगळी कामं करत राहते. रविवारी पण मुलांना बाहेर न्यायचा बेत करते आणि रविवारची सकाळ उजाडते तीच काळोख दाटलेली. 

का कुणास  ठाऊक,  आज त्याच्यावर रुसावंस वाटत नाही. उलट आजची त्याची रिपरिप मला माझी त्याच्यावरची जुनी प्रीती आठवून देणारी वाटते. काल रात्रीच एका जुन्या, जन्मजन्मांतरीचे संबंध असणाऱ्या मैत्रिणीशी गप्पा झाल्याचा हा परिणाम तर नसेल ना ? काल आमचे जुने भटकंती दिवस आठवत होतो. पुढच्या पावसाळ्यात तिच्या नव्या घरी राहायला भेटायचं आमंत्रण घेऊन संपलेला तो फोन माझ्या मनावर रेंगाळत असावा. सकाळी बहुतेक मग त्या भटकातीच्या आठवणीचीच धुंदी मला पुन्हा पावसाच्या जुन्या प्रेमात नव्याने भाग पाडतेय.

तसा अगदी धो धो नाहीये म्हणून मग "फ्रेश एअर"च्या निमित्ताने रेनी jacket घालून बाहेर चालायला जायचा एक छोटेखानी कार्यक्रम होतोच. चालत असते मी त्या रुळल्या पाउलवाटेने सराइतासारखी. खाली लक्ष द्यायची गरज नस्तेच. मग उंच वाढलेल्या गवताचा एक माळ  लागतो आणि मी जागेच भान विसरून जाते. 

ते भिजलं गवत मला आठवण करून देत असतं जुने पावसाळे असेच नवनवीन जागी गवत तुडवून वाट शोधेलेले आणि कधी हरवलेले. मनाने मी आधीच कित्येक मैल लांबच्या त्या अनवट जागी पोहोचली असते आणि एकदम साद येते "आई मला तुला काहीतरी सांगायचं आहे" माझ्या पिल्लाचा हात हातात घेऊन मग उरल्या पाउलवाटेच कौतुक करत आम्ही घरी येताना मध्येच  एका ठिकाणी थोड्या कमी उंचीच्या गवतातून पण गम्मत म्हणून चालतो. 


आधीच्या माझं मन हरवलेल्या त्या वाटेला मनातल्या मनात मी "पाऊसवाट" म्हणून नाव देऊन टाकलेलं असतं आणि माझ्यासमोर असतो प्रसन्न सुरु झालेला एक ओला  दिवस.   

Monday, June 17, 2013

पुन्हा एकदा घरट्याबाहेर पडताना....

पाच वर्षांपुर्वी जेव्हा आमच्या घरी बाळ येणार होतं, त्याच्या निगराणीसाठी मी घरी राहायचं ठरवलं.त्यावेळचा माझा एक कॉंट्रॅक्ट जॉब होता. ज्यात एक तासाची कमाई आणि अर्थात कामाचं समाधान सोडलं तर बाकी काही सवलती नव्हत्या. त्यावेळी मग ती सोडताना फ़ार वाईटही वाटलं नव्हतं. 

मग यथावकाश पुन्हा नवी नोकरी सुरू केली. यादरम्यान आमच्या पहिल्या (आता थोडं मोठं झालेल्या) बाळाला दुसरं भावंडं येऊ घातलं होतं. यावेळीही पुन्हा निगराणीसाठी घरी राहायला, बाळाला जास्त वेळ द्यायला नक्की आवडलं असतं. पण वाढलेल्या आर्थिक जबाबदारीची जाणीव आणि त्याहीपेक्षा असं सारखं सारखं करियरमध्ये ब्रेक घेणं धोकादायक, म्हणून काम करणं थोडं भागच होतं.

असं म्हणतात ज्याने चोच दिली तो चाराही देतो. तसं माझ्या मनातल्या या आंदोलनावर उतारा म्हणून की काय मला पूर्ण वेळ घरुन काम करायची परवानगी मिळाली. अर्थात कधी वेळ पडेल तर आठवडाभर घराबाहेर जावं लागे. पण त्याची वारंवारता तशी कमी होती. माझ्यासाठी खरं तर हा "ड्रीम जॉब" वगैरे होता. कदाचीत सगळ्याच मातांसाठी (आणि बाप लोकांसाठींदेखील) हा ड्रीम जॉब असावा. म्हणजे कसं असतं आठ-दहा तासाची ड्युटी आपण सहजी करून जातो. ते अंगवळणी पडलेलं असतं. पण त्याभोवतीच्या प्रवासाचे जे काही बाकीचे तास एकप्रकारे व्यर्थ जातात ते आपण आपल्या कुटुंबासाठी उपयोगी आणू शकलो तर ज्याला वर्क-लाइफ़ बॅलन्स म्हणतो तो खर्‍या अर्थाने साधता येईल.

तर गेले जवळपास तीनेक वर्षे मी माझ्या घरट्यात बसून काम करायची लक्झरी का काय म्हणतात ती उपभोगली. हा अनुभव कामाच्या दृष्टीने मला बरंच काही शिकवून गेला आणि खरं तर एक करियर म्हणून यातल्या कमतरता मलाही कळल्या. आणि आता पुन्हा परिस्थिती बदलतेय.मागचे महिने मी पुन्हा एकदा रोज प्रवास करून कामावर आपल्या क्युबमध्ये काम करायच्या रूटिनमध्ये रूळावतेय.

इतक्या वर्षात क्लायन्टकडे जायचे मोजके प्रसंग सोडले तर हा अनुभव मी जवळजवळ विसरलेच होते. म्हणजे एखाद आठवडा असं जाणं वेगळं आणि दररोज आपल्या टीम बरोबर काम करणं वेगळं. पहिला आठवडा तर ठरल्यावेळी तयार होऊन निघणं हाच माझ्यासाठी एक मोठा टास्क होता. कारण त्याची सवयच नव्हती. जायचं यायचं ड्राइव्ह या विषयावर तर वेळ मिळाला तर रोज एक पोस्ट लिहिता येईल. इतकं ते हॅप्पनिंग (आणि वेळखाऊ) प्रकरण आहे. काम करायची मजा वेगळी आणि तो अनुभव टीम बदलली की बदलतो हे सार्वत्रिकच.

सगळ्यात मोठा बदल जाणवतोय ते माझ्या कुटुंबासाठीचा वेळ कमी झालाय त्याबद्दल. इतकी वर्षे ऑफ़िसचं काम संपलं की त्या रूममधून बाहेर येऊन तडक माझ्या ग्रृहिणीपदात शिरून मुलं घरात यायच्या आत त्यांच्या खाण्यापिण्याची तयारी करून ठेवत असे. आता मात्र मी अडकले तरी ती माझ्याआधी घरात आलेली असतात आणि मग माझी जी धावपळ उडते त्यात मग त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ होईल या विचाराने मी कावरीबावरी होते. 

त्यादिवशीच माझा एक मनकवडा मित्र मला म्हणालाही, एक लक्षात ठेव या सगळ्यापाठी तू जी धावतेस, त्याचं कारण तुला तुझ्या मुलांना चांगलं आयुष्य द्यायचं आहे. तुझा वेळ ही त्याची किंमत समज.

पुन्हा एकदा घरट्याबाहेर पडतानाची ही हुरहुर कदाचीत आणखी काही दिवसांनी थोडी कमी होईल. हा अनुभवही मला काहीतरी नवीन शिकवून जाईल. त्यातलं ब्लॉगवर किती मांडता येईल माहित नाही पण ही एक पोस्ट या हुरहुरीला थोडं शांत नक्कीच करेल. 

-अपर्णा
मे २०१३