Sunday, April 21, 2013

गाणी आणि आठवणींच्या पलिकडे


मागच्या वर्षी एक अकस्मात एक चांगला योग आला आणि एका कार्यशाळेच्या निमित्ताने श्रीधरजींशी परिचय झाला. आता त्यांचं संगीतक्षेत्रातलं स्थान पाहता माझ्यासारख्या परदेशात भेटलेल्या एखाद्या अगदीच होतकरू व्यक्तीची त्यांनी आठवण ठेवावी असं मी थोडंही मनात आणलं नव्हतं. माझ्यासाठी सगळ्यात मोठा धक्का हा होता की ते परत गेल्यावर त्यांनीच मला एकदा फ़ोन केला आणि एकंदरित त्या कार्यशाळेच्या अनुभवाबद्दल आम्ही बोललो. शिवाय त्यांची तिथे घेतलेली "लिलाव"ची सिडी आवडली का आणि त्याबद्दल तू नक्की मेल कर वगैरे त्यांचं सांगणं म्हणजे मी ते दोन तीन दिवस "आज मैं ऊपर" होते. अगदी माझ्या एका पोस्टवर कौशलची प्रतिक्रिया आली होती तेव्हासारखंच.

मग आमचे थोडे-फ़ार मेल्स इ. झाले.त्यामुळे यावेळच्या भारतभेटीत त्यांना नक्की भेटूया असं मी ठरवलं होतं.अर्थात भारतात गेल्या गेल्या काही वैयक्तिक गोष्टींमुळे तेही लगेच शक्य झालं नाही. मग मी फ़ोन केला तेव्हा ते गोवा दौर्‍यावर निघाले होते. आता ते परत येणार तेव्हा माझा परत निघायचा आठवडा म्हणून मी खरं तर फ़ार काही आशा लावून ठेवली नव्हती. पण त्या शेवटच्या आठवड्यात नेमकं पार्ल्याला माझं एक काम निघालं. तिथे तसंही आम्हाला मागच्या वेळेपासून "गजाली"ला जायचं होतं तेव्हा आम्ही दोघं आणि ऋषांकला बरं नव्हतं म्हणून फ़क्त आरुष असे तिघे निघालो. माझं काम अपेक्षेपेक्षा लवकर झालं आणि मनात आलं बघुया श्रीधरजींना फ़ोन करून. निघायच्या आधी धावत-पळत भेटता आलं तरं. मी आत्ता पार्ल्यात आहे तर हो या की असं ते फ़ोनवर बोलले आणि अगदी आम्ही होतो तिथपासून रिक्षाने कसं यायचं हे सविस्तरपणे समजावलं. रस्त्यात त्यांच्यासाठी काहीतरी घेऊया असं मी म्हणत होते तर त्यांनी दिलेलं मार्गदर्शन इतकं परफ़ेक्ट होतं की सरळ त्यांच्या इमारतीसमोरच रिक्षावाल्याने थांबवलं. मग आणखी वेळ न दवडता सरळ त्यांच्या घराची बेल वाजवली.
वरचं ट्रॉफ़ीज ठेवण्याच्या जागेच डिझाईन त्यांच्या जावयाने केलंय

 खरं म्हणजे इतकी कमी वेळेची नोटीस देऊन त्यांच्यासारख्या व्यक्तीला भेटायला जायला मला कसंतरीच होत होतं पण माझ्याकडे खरं तर त्यादिवशी नसतं तर मग परतायची वेळच आली असती मग पुन्हा कधी म्हणून मी सरळ तो विचार पाठी सारला. त्यांनी स्वतःच दार उघडलं आणि प्रसन्न हसून स्वागत केलं. आमची एकंदरीत चौकशी करताना मला तर आमची जुनी ओळख असल्यासारखंच भासलं.



आरुषला मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायला सांगितले तेव्हा त्यांनी त्यांच्या भिंतीवर असलेल्या बाबुजींच्या फ़ोटोकडे बोट दाखवून त्या आजोबांचे आशीर्वाद घे म्हणून सांगितलं.मी नवर्‍याची ओळख करून दिली आणि आम्ही जन्मजन्मांतरीची ओळख असल्यागत त्यांनी आमच्याशी गप्पा मारायला सुरूवात केली. आम्ही अचानक गेलो तरी आधीच त्यांनी त्यांच्या घरी काम करणार्‍या बाईला त्यांनी उपमा करायला सांगितला होता. खरं तर आम्ही गजालीमध्ये जाणार आहोत हे मी त्यांना खास काही करायला लागू नये म्हणून सांगितलं होतं, पण त्यांचा आग्रह मोडणं शक्य नव्हतं. मग त्यांनी स्वतः आम्हाला आतल्या खोलीत नेलं आणि तिथे त्यांनी बाबुजींचं एक मोठं पोस्टर केलंय ते आणि त्यांची पेटी दाखवली. अगदी आवर्जून तुम्हाला फ़ोटो घ्यायचे आहेत का हे देखील त्यांनीच विचारलं. 
बाबुजींची पेटी ज्याच्यावर त्यांनी हजारो चाली रचल्या, कार्यक्रम केले

त्यानंतर मग आता काय सुरू आहे याविषयी बोलताना आम्ही भेटलो त्याच्या अगदी एक-दोन आठवडे आधीच केलेल्या अभंगाच्या अल्बममधली भक्तिगीतं ऐकवली. त्यांच्याच घरात, त्यांच्या सिस्टिमवर आणि प्रत्यक्ष त्यांच्याच निवेदनाखाली त्यांची इतर कुणीही न ऐकलेली गाणी ऐकताना मला खरंच सांगते काटा आला. म्हणजे त्यावर त्यांचं म्हणणं तुम्हाला वेळ असेल तर मी आणखी ऐकवू शकतो. खरं तर मला तो वेळ हवा होता पण एकंदरित त्या दिवसाची उर्वरीत रुपरेषा, सामानाची बांधाबांध इ.इ.चा विचार करता ते शक्य नव्हतं. पण जे अभंग ऐकले त्यातल्या गायकांचं कौतुक, त्यांची त्या गाण्यामागची पार्श्वभूमी अशी बरीच माहिती त्यांनी ओघानेच आम्हाला दिली. त्यांच्या घरी त्यांच्या सिस्टिमवर त्यांची इतकी ताजी गाणी ऐकायला मिळणे हे सगळं माझ्या तोवरच्या दगदगीच्या ट्रीपमध्ये खरंच अपेक्षित नव्हतं.माझ्यासाठी हा अनुभव एक स्ट्रेस बस्टरच होता.
बाबुजीं आणि श्रीधरजींना मिळालेल्य ट्रॉफ़ीज

मग त्यांनी अगदी आवर्जून मला त्यांच्या रामनवमीच्या कार्यक्रमाबद्दल सांगितलं. माझे आई-बाबा बोरीवलीला राहात असल्याने त्यांनी जावं म्हणून मी ते लक्षात ठेवलं. 

मागच्या आठवड्यापर्यंततरी ही पोस्ट टाकायची होती पण शेवटी राहून गेलं. तरी ही आठवण मात्र लिहायला हवी. तो त्यांनी उल्लेख केलेला गीतरामायणाचा कार्यक्रम बोरीवलीच्या सावरकर उद्यानात आता परवाच्या रामनवमीच्या निमित्ताने पार पडला.अर्थात वर्तमानपत्रातल्या जाहिराती वगैरे पाहून माझ्या मुंबईच्या वाचकांनी नक्की या सर्वांसाठी विनामुल्य कार्यक्रमाचा नक्की लाभ घेतला असेलच अशी आशा.

आमच्या कार्यशाळेच्या वेळी "ऋतु हिरवा"चा विषय निघाला होता आणि सहज श्रीधरजी म्हणाले होते की मी आशाबाईंसाठी काही गाणी करून ठेवलीत आणि त्यांना त्याच्यानंतर माझ्याकडे गायलाच वेळ मिळाला नाही. मग आम्ही आपलं त्यांना म्हटलं की मग तुम्ही ती दुसर्‍या कुणाकडून गाऊन घेणार का? त्यावर त्यांनी ओठ घट्ट मिटत "नाही, मी ती तिच्यासाठीच केलीत" असं म्हणून तो विषय बंद झाला होता. तर आमच्या पार्ल्यातल्या भेटीत त्यांनी आवर्जून ती गाणी आशाबाईंकडूनच रेकॉर्डिंगला सुरूवात केलीय ही बातमी दिली. हे सांगताना त्यांचा फ़ुललेला चेहरा बरंच काही सांगून गेला. 

आशाजींच्या वैयक्तिक आयुष्यातली जखम ताजी असतानाचं त्यांचं गाणं सुरू होतंय ही खरंच चांगली बातमी आहे हे मी त्यांना नमूद केलं त्यावेळी त्या अल्बममधल्या एका कवितेचे शब्द सांगून ते म्हणाले की हे गाणं गायल्यावर आशाबाई अक्षरशः रडल्या आणि म्हणाल्याही हे असेच योग माझ्याही आयुष्यात येताहेत असं दिसतंय. मग "भोगले जे दुःख"बद्दलही आम्ही बोललो. बसावंसं खूप वाटत होतं पण वेळेची कमतरता होतीच. आम्ही निघतानाचा कळस म्हणजे त्यांनी स्वतः गेटवर येऊन कोपर्‍यावरच्या रिक्षावाल्याला स्वतः हाक मारून आम्हाला गजालीकडे सोडायला सांगितलं. हा त्यांचा विनम्रपणा आम्हा दोघांनाही थक्क करून केला. कुठल्या जन्माचं माझं पुण्य मला अशा चांगल्या व्यक्तीमत्वांशी भेट करुन देतं हे आधी एकदा नाना पाटेकर गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी शेजारी होते तेव्हाचं आणि आता श्रीधरजींचं अगत्य अशा काही प्रसंगी नक्की वाटतं. खूप मोठ्या उंचीवर गेल्यावरही दोन्ही पाय जमिनीवर ठेऊन कसं राहता येतं हे असे अनुभव येतात तेव्हा आवर्जून जाणवतं. 

मला वाटतं गाण्यांच्या ज्या काही थोड्याफ़ार आठवणी माझ्याकडे आहेत आणि आणखीही येत राहतील त्या सगळ्याच्या पलिकडे ही भेट आहे.इतक्या मोठ्या संगीतकाराने त्यांची अजून कुणी न ऐकलेली गाणी माझ्यासारखीला ऐकवणे काय किंवा त्यांचे हे गायक आणि रेकॉर्डिंगच्या वेळचे व्यक्तिगत अनुभव आमच्याशी घरचं कुणी असल्याप्रमाणे शेअर करणे काय, मला माझाच हेवा वाटतो. 
बाबुजी गेल्यानंतर त्यांचं केलेलं एक मोठं पेंटिंग श्रीधरजींनी आवर्जून दाखवलं

इतक्यात फ़ोनवर त्यांच्याशी बोलणं झालं त्यावेळी ते वर्ध्यामध्ये एक कार्यक्रम करून परत मुंबईला निघाले होते. त्या गडबडीतही त्यांनी आवर्जून आशाताईंचा अल्बम येत्या महिन्यात ठाण्याला रिलिज होतोय ही बातमी दिली आणि ती जी अभंगाची सिडी आहे त्यातली दोन गाणी एक मला वाटतं सुरेशजी आणि एक शंकर महादेवनचं राहिलं आहे पण आषाढी एकादशीच्या आसपास तीही सिडी येईल असं सांगितलं. 

या दोन सिडीजची मी व्यक्तिशः आतुरतेने वाट पाहाते आहे. जेव्हा केव्हा मी ही गाणी ऐकेन तेव्हा या गाण्यांच्या पलिकडच्या आठवणीत माझं मन नक्कीच जाईल. 

Thursday, April 11, 2013

टिचक्यांच्या जगातली चार वर्षे

मुलाच्या निमित्ताने घरी राहताना मनात आलं म्हणून एक छोटी गुढी उभारली. त्यावेळी माहित नव्हतं याचं पुढे काय होईल पण व्यक्त व्हायला स्वतःच्या हक्काचं व्यासपीठ यानिमित्ताने मिळालं हे लक्षात आलं.मग काही खास अनुभव इथे मांडले गेले. 

पहिलं वर्ष थोडं धडपडीचं, मग नंतर फ़ेलो ब्लॉगर्सच्या सपोर्टमुळे जास्त उत्साहाचं, तिसर्‍या वर्षीदेखील बरेच फ़ॉलोअर्स वाढले आणि आज हे चौथं वर्ष पूर्ण होताना माझ्या ब्लॉगिंग कारकिर्दीला मागं वळून पाहताना जाणवतं ते माझं स्वतःचंच आता ब्लॉगिंग कमी करणं. म्हणजे ते ठरवून केलं गेलं नाही पण कदाचित वैयक्तिक जबाबदार्‍या वाढल्यामुळे असेल तितका नियमितपणा राहिला नाही.

सध्या फ़ेसबुकचे लाइक्स आणि गुगलप्ल्सचे अधिक, शिवाय ब्लॉगस्पॉट फ़ॉलोअर्स असं एकंदरित टिचक्यांचं राज्य आलंय. या टिचक्यांच्या राज्यात मला वाटतं प्रत्यक्ष दोन शब्द लिहिण्यापेक्षा सोपं पडतं म्हणून गुगल लाइक्स, फ़ेसबुक लाइक्स, गुगल प्लसवर शेअर करणं यांची संख्या अधिक दिसतेय. अर्थात लाइक्सच्या जमान्यात आपल्या पोस्टवर मिळणारी टिचकी हीच पावती आहे असं समजायला हवं.

इतक्यात ब्लॉगचे स्टेटस इ. पाहताना मी  पोस्ट टाकली नसेन तरी त्या त्या काळाशी मिळत्याजुळत्या पोस्ट्सवर पडलेल्या टिचक्या, नव्या पोस्टवरचे सोशल साइट्सचे शेअर इ. इ. चं प्रमाण वाढलेलं दिसतं. अर्थात माझं स्वतःचंही इतर ब्लॉग्जवर जाऊन बरेचदा तेच होतं त्यामुळे या टिचक्यांच्या जगातली चार वर्षे साजरी करताना माझ्या अपेक्षेपलिकडे वाढलेले फ़ॉलोअर्स तसंच इथल्या पोस्ट्स शेअर केल्यामुळे वाढलेले वाचक या सर्वांचे आभार मानण्याची एक संधी या वार्षिक पोस्ट्सद्वारे मी नेहमी घेते.

यावर्षी आमच्यासाठी खास म्हणजे काही महिन्यांपुर्वी राहायला गेलेल्या माझ्या नव्या  घरातला माझा पहिला गुढीपाडवा आहे. तर आमची तीच जुनी गुढी आणि नव्या किचनमध्ये उत्साहाने बनवलेलं ताजं श्रीखंड याचा आस्वाद घेतानाच आपल्याला येणारं वर्ष सुख-समाधानाचं जावो हीच मनोकामना. माझ्या स्वतःसाठी गुढीपाडव्याच्या मंगलमय दिवशी लिहिण्या-वाचण्याची बुद्धी द्यायची सरस्वतीस प्रार्थना :) 

ता. क. ही  पोस्ट  फक्त श्रीखंडासाठी थांबली होती  :)